रानमूग : (जंगली माठ, रानमाठ, मुकणी हिं, मुगम, मुगणी, त्र्यंगुली गु. मुगवला क. कोहेसरू सं. कोशिला, कुरंगिका लॅ फॅसिओलस ट्रायलोबॅटस, विग्ना ट्रायलोबॅटा कुल-लेग्युमिनोजी उपकुल-पॅपिलिऑनेटी). ही वर्षायू (जीवनक्रम एका हंगामात पूर्ण करणारी), क्वचित बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी) वेल हिमालयापासून ते श्रीलंकेपर्यंत आणि वायव्य भारतात २,१०० मी. उंचीपर्यंत व ब्रह्मदेशातही जंगली अवस्थेत किंवा लागवडीत आढळते. सामान्यपणे शेतातील बांधावर लावतात किंवा नैसर्गिक रीत्या उगवलेली दिसते. कोठे कोठे इतर पिकांबरोबर मिसळून लावतात. पूर्वी हिचा अंतर्भाव फॅसिओलस या प्रजातीत करीत परंतु हल्ली मूग, मटकी व उडीद यांच्याप्रमाणे विग्ना या प्रजातीत केला जातो, कारण त्या वनस्पतींशी या वेलीचे साम्य आढळते. हिचे खोड बारीक, रांगते व सु. ३०–६० सेंमी. लांब व शाखायुक्त असते. पाने संयुक्त, त्रिदली, सोपपर्ण (तळाशी लहान उपांगे असलेली), पातळ, फिकट हिरवी असून प्रत्येक दल १·३ – २·५ सेंमी. लांब व तितकेच रुंद व तीन अपूर्ण खंडांत विभागलेले असते. पानांच्या बगलेत ऑक्टोबरात लहान पिवळ्या फुलांचे तिकोनी गुच्छ [स्तबकासारखे ⟶ पुष्पबंध] येतात. फुलांची संरचना पतंगरूप व ⇨ अगस्ता, गोकर्ण, वाटाणा यांच्या फुलांसारखी असते (आकृती पहा). फळ (शिंबा-शेंग) सु. २·५ –५ X ०·०३ सेंमी. लांब, बारीक, काहीसे वाकडे, लहान, गोलसर असून त्यात गर्द तपकिरी किंवा काळपट, ६ –१२ बिया असतात प्रत्येक बी सु. २·५-३·२ मिमी. लांब व लंबगोल असते. हिची इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ लेग्युमिनोजी वा शिंबावंत कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात.
जंगली माठाचे नेहमी खरीप पीक घेतात. दर हेक्टरी सु. २५ –३० किग्रॅ. बी पेरतात. बेवड पीक घेतल्यास हेक्टरी सु. १०,००० – १२,५०० किग्रॅ. हिरवे खत मिळते. जनावरांना ह्या वनस्पतीचा हिरवा चारा घालतात. त्या दृष्टीने याचे महत्त्व बरेच आहे तो रसाळ व पोषक असल्याने गुरे आवडीने खातात. तो सुकवून भाताच्या काडाबरोबर खाऊ घालतात. जंगली माठाची डाळ पोषक व कोठे फार महत्त्वाची मानली असूनही फक्त गरीब लोकच तिचा खाण्यासाठी वापर करतात. चीनमध्ये तिच्या पिठापासून ⇨ आरारूटाचा एक प्रकार बनवितात. ह्या वनस्पतीची पाने पौष्टिक व शामक (शांत करणारी) असून नेत्र दुर्बलतेवर त्यांचे पोटीस बांधतात. जीर्ण ज्वरात पानांचा काढा देतात. शिंबा थंड, रुक्ष, वाजीकर (कामोत्तेजक), स्तंभक (आकुंचन करणारी) असतात. आग (दाह), क्षय, तृष्णा (तहान), ज्वर, कफ, खोकला, पित्त विकार व मूळव्याध इत्यादींवर शिंबा गुणकारी असतात.
संदर्भ : C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. X, New Delhi. 1976.
परांडेकर, शं. आ.
“