राधामाधव विलास चंपू : एक संस्कृत चंपूकाव्य. शहाजीराजे भोसले ह्यांच्या चरित्रवर्णनार्थ हे रचिले गेले आहे. काव्याच्या कर्त्याचे नाव जयराम असून त्याचे आडनाव पिंड्ये असे आहे. काव्यात कवीने स्वतःविषयी दिलेली माहिती पाहता, सप्तशृंगीच्या समोरील मार्कंडेयाच्या डोंगराखाली ह्या कवीचे गाव (त्याचे नाव दिलेले नाही) होते, असे दिसते. कवीच्या आईचे नाव गंगाबा व वडिलांचे नाव गंभीरराव. गुजराती, पंजाबी, हिंदी, कन्नड इ. बारा भाषांत काव्यरचना करण्याची क्षमता जयराम पिंड्ये ह्याच्या ठायी होती. शहाजीराजांच्या औदार्याची कीर्ती ऐकून हा कवी कर्नाटकात शहाजीराजांची राजधानी बंगळूर (बंगलोर) येथे आला व तेथे त्याने हा चंपू एका उत्तम गायकाकडून राजापुढे गावविला. एका समकालीन व्यक्तीने रचिलेले शहाजीराजांबद्दलचे हे काव्य असल्यामुळे त्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. १६५३ – ५८ च्या सुमारास हे काव्य रचिले असावे, असे ह्या चंपूकाव्याचे संपादक इतिहासाचार्य वि. का. राजवाडे ह्यांचे मत आहे.
प्रस्तुत चंपूकाव्याचे दहा उल्लास आणि अखेरीस एक परिशिष्ट मिळून एकूण अकरा भाग आहेत. पहिल्या पाच उल्लासांत राधाकृष्ण-विलासाचे वर्णन आहे. ज्याला खरा ऐतिहासिक भाग म्हणता येईल, तो सहाव्या उल्लासापासून आहे. पाचव्या उल्लासानंतर राधाकृष्णांचा उल्लेखही ह्या काव्यात येता नाही. ‘प्रामुख्याने ग्रंथ मनुष्यस्तुतिपर समजला न जाता ईशस्तुतिपर समजला जावा व मनुष्यस्तुतिपर जो दोन तृतीयांश भाग आहे तोहि शाह नृपतिरूप कृष्णाच्याच स्तुतिपर आहे असा समज व्हावा’ हा हेतू ह्या मागे असावा, असा राजवाडे ह्यांनी म्हटले आहे. ‘राजदर्शन-समस्यापूरण’, ‘राजसभावर्णन’, ‘राजरीतिवर्णन’, ‘युवराज्यावाप्ती’ आणि ‘राजनीतिवर्णन’ अशी सहा ते दहापर्यंतच्या उल्लासांची अनुक्रमे नावे आहेत. शहाजी महाराजांच्या समोर व इतर राजपुरुषांपुढे कवी जयराम पिंड्ये ह्याने, तसेच इतर भाषांतील कवींनी संस्कृत सोडून इतर अकरा भाषांत जी काव्यरचना व समस्यापूर्ती केली, ती स्वतंत्र परिशिष्टात दिली आहे.
हा ग्रंथ इतिहासाचार्य राजवाडे ह्यांना चिंचवड येथे उपलब्ध झाला. ह्या ग्रंथाला राजवाडे ह्यांनी विस्तृत प्रस्तावना जोडली असून, ह्या ग्रंथात शहाजीराजे भोसले ह्यांच्याबाबत जी ऐतिहासिक विधाने करण्यात आलेली आहेत, त्यांचे यथाक्रम परीक्षण केले आहे. तत्कालीन हिंदू समाज, मुसलमान समाज, भोवतालची राजकीय परिस्थिती, शहाजीकालीन मराठा संस्थानिकांचे शैथिल्य त्याचप्रमाणे ‘एकवर्ण्य’, ‘द्वैवर्ण्य’, ‘चातुर्वर्ण्य’ ह्यांची क्रमवार उत्पत्ती, माहाराष्ट्रिक लोक कोण आणि कोठचे?’ ‘महाराष्ट्रक्षत्रिय म्हणजे कोण?’ पाणिनिकालीन ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र इ. अनेक विषयांचा परामर्श ह्या प्रस्तावनेत घेतला आहे.
संदर्भ : राजवाडे, वि. का. संपा. राधामाधवविलासचंपू, पुणे १९२२.
सुर्वे, भा. ग.