रात्रीचे घड्याळ : काही निवडक ठळक ताऱ्यांच्या वेधांवरून रात्रीच्या वेळी किती वाजले हे समजण्यासाठी बनविलेले उपकरण. याला नक्तचक्र असेही म्हणतात. सामान्यतः सप्तर्षी समूहांतील जे दोन तारे सांधणारी रेषा वाढविली असता ध्रुवताऱ्यातून जाते, त्या पहिल्या दोन ध्रुवदर्शक [⟶ सप्तर्षी व ध्रुवमत्स्य] ताऱ्यांचा उपयोग यासाठी करतात. त्याचप्रमाणे ध्रुवमत्स्यातील ठळक ताऱ्याचाही उपयोग होऊ शकतो. हे घड्याळ करण्यामागील तत्त्व असे की, परिध्रुवीय (ध्रुवाभोवतालचे) तारे एका नाक्षत्र दिवसात ध्रुवाभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतात. ही प्रदक्षिणा अपसव्य (घड्याळाच्या काट्याच्या उलट) दिशेने असते. यामुळे ध्रुवदर्शक ताऱ्याच्या ध्रुवसापेक्ष स्थानावरून रात्रीची वेळ काढता येते. एका नाक्षत्र दिवसाचा कालावधी एका माध्य सौर दिनापेक्षा सु. ३ मि. ५६ से. नी कमी असतो. म्हणून एका माध्य सौर दिवसात तारे एका पूर्ण प्रदक्षिणेमध्ये ३६० अंशांहून किंचित अधिक कोन आक्रमण करतात. माध्य सौर कालाप्रमाणे एका ठराविक वेळी जर दररोज तारे व ध्रुव सांधणाऱ्या रेषेचे वेध घेतले, तर ती रेषा अपसव्य दिशेने रोज सु. १ अंश इतक्या गतीने ध्रुवाभोवती सावकाश वलन करीत असताना आढळते व एका वर्षात ३६० अंशांतून फिरून एक प्रदक्षिणा पूर्ण करते. ताऱ्यांच्या अशा दैनिक व वार्षिक गतीचा समन्वय घालून रात्रीचे घड्याळ तयार करण्यात आले आहे.
अशा सामान्य घड्याळात एक वाटोळ्या तबकडीच्या बाह्य कडेवर महिने व तारखांचे रेखांकन केलेले असते. तबकडी धरण्यासाठी तिला विशिष्ट ठिकाणी एक मूठ जोडलेली असते. या मुठीवर तबकडीच्या केंद्रातून जाणारी एक रेषा कोरलेली असते. या तबकडीस ‘दिनांक चक्र’ असे म्हणतात. तबकडीवर समकेंद्र (तोच केंद्रबिंदू असलेली) पण आकाराने लहान अशी दुसरी तबकडी बसवलेली असते. हिच्या कडेवर २४ तास व प्रत्येक तासाची मिनिटे यांच्या खुणा केलेल्या असतात. मोठ्या तबकडीवरील तारखांच्या खुणांपर्यंत पोहोचेल असा एक दर्शक काटा लहान तबकडीला जोडलेला असतो. या लहान तबकडीला ‘वेलाचक्र’ असे नाव आहे. वेलाचक्र फिरवून त्याचा दर्शक काटा दिनांक चक्रावरील कोणत्याही तारखेशी जुळविता येतो. तबकड्यांच्या केंद्रापासून निघून दिनांक चक्राच्या बाह्य कडेच्याही बाहेर जाणारी (दिनांक चक्राच्या तबकडीच्या व्यासाहून अधिक लांबीची) एक लांब पट्टी तबकड्यांवर बसविलेली असते. तिची एक कडा अगदी सरळ असून वाढवल्यास ती तबकड्यांच्या बरोबर केंद्रांतून जाते. दोन्ही तबकड्या व त्यांवरील सरळ कडा असलेली लांब पट्टी समकेंद्र असून पट्टी केंद्राभोवती फिरविता येते. तबकड्या व पट्टी ज्या अक्षावर बसविलेल्या असतात तो पोकळ असून त्याच्या छिद्रांतून पलीकडेच दिसू शकते.
या उपकरणाची मागील बाजू उत्तर दिशेकडे करून ते साधारणपणे विषुववृत्त पातळीत उभे करतात. वेलाचक्राचा दर्शक काटा दिनांक चक्रावरील योग्य त्या तारखेवर येईल अशा तऱ्हेने वेलाचक्र फिरवून ते पक्के करतात. अक्षाच्या छिद्रातून ध्रुवतारा दिसेल व दिनांक चक्राच्या मुठीवरील मध्यगत रेषा उत्तर ध्रुवाच्या खाली असलेल्या सममंडलाच्या दिशेबरोबर जुळेल अशा तऱ्हेने उपकरण स्थिर धरतात. एवढे झाल्यावर दोन्ही तबकड्यांवरील लांब पट्टी फिरवून तिची सरळ कडा उपरिनिर्दिष्ट सप्तवर्षीतील दोन ध्रुवदर्शक ताऱ्यांच्या रेषेला समांतर करतात. अशा स्थितीत पट्टीची सरळ कडा वेलाचक्रावर जी वेळ दाखवील ती वेध घेण्याच्या वेळची स्थानिक वेळ होय. यासाठी परिध्रुवीय ताऱ्यांपैकी कोणताही सोयीस्कर ठळक तारा उपयोगात आणता येईल. मात्र त्याला अनुसरून इयत्तीकरणासाठी (समतुल्य निरपेक्ष मूल्ये काढण्यासाठी) दिनांक चक्राच्या मुठीच्या स्थानात बदल करावा लागेल.
घड्याळाचा शोध लागण्यापूर्वी वेळ ठरविण्यासाठी दिवसा छाया यंत्र व रात्री नक्तचक्र याचा उपयोग होत असे. यूरोपात नक्तचक्रे लाकडी बनवीत असत व अठराव्या शतकात घडयाळांचा वापर करू लागल्यावरही काही काळ नक्तचक्रांचा उपयोग केला जात होता.
फडके, ना. ह.