राजा शिवप्रसाद (सितारे हिंद) : (? १८२३ – २३ मे १८९५). अव्वल इंग्रजी कालखंडातील हिंदी लेखक. राजा शिवप्रसाद यांचे आजोबा नवाब कासिमअली खाँ याच्या जुलमाला कंटाळून मुर्शिदाबादहून काशीला आले व स्थायिक झाले. शिवप्रसादांनी हिंदी, ऊर्दू, फार्सी, इंग्रजी, संस्कृत, बंगाली या भाषांचा चांगला अभ्यास केला होता. भरतपूर दरबारी काही काळ नोकरी केल्यावर १८४५ साली ते सरकारी नोकरीत शिरले. इंग्रज राजवटीला हरतऱ्हेने मदत केल्यामुळे ते लवकरच शाळानिरीक्षक बनले.

राजा शिवप्रसादांनी अनेक प्रकारची ग्रंथ रचना केली : मानवधर्मसार (१८९०), उपनिषद्सार (१८९५), योगवासिष्ठ के कुछ चुने हुए श्लोक यांसारखे तत्त्वज्ञानात्मक ग्रंथ लिहिले तर भूगोल हस्तामलक (१८९७), छोटा भूगोल हस्तामलक (१८८८), वर्णमाला (१९००), गुटका (भाग १, २ ,३) नया गुटका (भाग १, २) हिंदी व्याकरण (१८८६), कुछ बयान अपनी जुबान का, बाल बोध, अंग्रजी अक्षरों के सीखने का उपाय, बच्चों का इनाम, लडकों की कहानी, वीरसिंह का वृत्तांत, यांसारखी शालोपयोगी पुस्तके ही लिहिली. वामामनरंजन (१८७५), सारखे पुस्तक लिहिले. तर आलसियों का कोडा (१८८७), राजा भोज का सपना, हिदुस्थानके पुराने राजाओं का हाल (१८५७), यांसारखी साहित्यिक गुणांनी युक्त पुस्तके ही लिहिली. सैण्डफोर्ड और मारटन की कहानी, गीत गोविन्दादर्श, कबीर टीका ही त्यांची साहित्यिक अभिरुची दर्शविणारी पुस्तकें. इतिहास तिमिरनाशक (भाग १,२,३–१८७७,८३,९२) सिखों का उदय और अस्त (१८८९) इ. शालोपयोगी इतिहासही त्यांनी लिहिले. ही पुस्तकें राजाभोज का सपनासारखी दीर्घकथा वगळता फारशी महत्त्वाची नाहीत. त्याकाळचा विचार करता हिंदी गद्य सामर्थ्यशाली करण्याचे श्रेय शिवप्रसादांना द्यावे लागेल.

शिवप्रसादांचे भाषाविषयक विचार विवादास्पद ठरले. आरंभी संस्कृत, अरबी, फार्सी, इंग्रजी, शब्दांचा उपयोग करून सर्वमान्य होईल अशी सुबोध भाषा असावी, असा त्यांचा आग्रह होता. मात्र पुढे अरबी-फार्सीमिश्रीत ऊर्दू भाषेचा वापर करण्याकडे त्यांचा अधिक कल झाला. सरकारी नोकरीत आल्यामुळे आणि इंग्रज राजवटीबद्दल मनापासून आस्था असल्यामुळे त्यांनी भाषाविषयक शासकीय धोरणांचा पाठपुरावा केला. मात्र लिपीच्या बाबतींत ते देवनागरी लिपीचे समर्थक होते. त्याचप्रमाणे शिक्षणसंस्थात हिंदी (मग ती ऊर्दू प्रधान का असेना), भाषेचे स्थान टिकवून धरण्यात शिवप्रसादांनी मोठे योगदान केले आहे, हे मान्य करायला हवे. त्यांच्या प्रेरणेने १८४४ पासून सुरू झालेले बनारस अखबार हे वर्तमानपत्र त्यांच्या भाषाविषयक नीतीचा प्रचार करण्यासाठी निघाले होते.

त्यांना इंग्रज सरकारने १८७२ मध्ये ‘सी. एस्. आय.’ ही पदवी दिली. १८८७ मध्ये ‘राजा’ ही पदवी प्राप्त झाली. राजदरबारी राजा शिवप्रसादांना प्रतिष्ठा प्राप्त झाली असली, तरी जनमानसात त्यांना आदराचे स्थान मिळालेले दिसत नाही.

संदर्भ : वार्ष्णेय, लक्ष्मीसागर, आधुनिक हिंदी साहित्य, (१८५०–१९००), प्रयाग १९५४.

बांदिवडेकर, चंद्रकांत