राजस्थान विद्यापीठ : राजस्थानातील एक विद्यापीठ. राजपुताना विद्यापीठ अधिनियमानुसार (८ जानेवारी १९४७) जयपूर येथे स्थापना. संपूर्ण राजस्थान हे त्याच्या कक्षेत होते. अजमेर-मारवाड राजस्थानात विलीन झाल्यांनतर तो परिसरही विद्यापीठाच्या कक्षेत आला. जोधपूर आणि उदयपूर विद्यापीठांच्या कक्षा सोडून राज्यातील बाकीचा सर्व परिसर विद्यापीठाच्या कक्षेत येतो.

विद्यापीठाची २०३ संलग्न महाविद्यालये (३२ संस्कृत महाविद्यालये अंतर्भूत), चार घटक महाविद्यालये व ३० विद्याविभाग आहेत. विद्यापीठाचे स्वरूप संलग्नक व अध्यापनात्मक आहे. जुलै ते मे असे विद्यापीठाचे शैक्षणिक वर्ष आहे. ते दोन सत्रांत विभागले आहे. कला, ललित कला, संगीत, नाट्यशास्त्र व सामाजिक विज्ञाने, विज्ञान, वाणिज्य, अभियांत्रिकी व तंत्रविज्ञा, विधी, शिक्षण, वैद्यक व औषध निर्माणशास्त्र, आयुर्वेद, संस्कृत अध्ययन, व्यवस्थापनशास्त्र इ. विद्यापीठाच्या विद्याशाखा आहेत. अध्यापनाचे माध्यम हिंदी व इंग्रजी आहे.

विद्यापीठात कला, वाणिज्य व विज्ञान शाखांतर्गत पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाची तसेच ‘शास्त्री’, ‘आचार्य’ (संस्कृत प्रमाणपत्र व पदविका परीक्षा) व एम्.एस्‌सी.(गणित) इ. बहिःस्थ परीक्षा देण्याची सोय उपलब्ध आहे. एम्.ए. एम्.कॉम. इत्यादींचे अभ्यासक्रम पत्रद्वारा शिक्षणाने राबविले जातात. यांशिवाय सायंकालीन अभ्यासक्रम, उन्हाळ्याच्या सुटीतील अध्यापनवर्ग, रोजगार व मार्गदर्शन संचालनालय, विद्यार्थी सल्लागार मंडळ इत्यांदीची विद्यापीठात सोय उपलब्ध आहे.

संदर्भसाहित्य, सूक्ष्मपट, संशोधनाची स्वतंत्र व्यवस्था यांनी विद्यापीठाचे ग्रंथालय सुसज्ज असून त्यात ३,२८,००० ग्रंथ ३६,४६५ बांधणी केलेली नियतकालिके व ४,४४२ सूक्ष्मपट होते (१९८४-८५). याच वर्षी विद्यापीठात २,४७,९१३ विद्यार्थी व ६९४ अध्यापक असून विद्यापीठाचे उत्पन्न १२·३४ कोटी रु. व खर्च १२·३१ कोटी रु. होता.

मिसार, म. व्यं.