राजराज वर्मा, ए. आर् .: (२० फेब्रुवारी १८६३ –१८ जून १९१८). प्रख्यात मल्याळम् कवी, समीक्षक, व्याकरणकार व संस्कृत पंडित. जन्म कोट्टयम् जिल्ह्यातील चंगनारशेरी ह्या गावी. शिक्षण एम्.ए. मल्याळम् मध्ये साहित्यसम्राट म्हणून मान्यता पावलेले ⇨वलियकोयिल तंपुरान केरळवर्मा (१८४५ – १९१५) यांचे राजराज वर्मा हे भाचे व शिष्य. त्रिवेंद्रम येथील महाराजा महाविद्यालयात द्राविडी भाषा व संस्कृतचे ते काही काळ प्राध्यापक होते. केरळवर्मांप्रमाणेच ते संस्कृतचे ते काही काळ प्राध्यापक होते. केरळवर्माप्रमाणेच ते संस्कृतचे प्रकांड पंडित होते. त्यांची प्रतिभा बहुमुखी होती व त्यांनी विविध विषयांवर उच्च प्रतीचे लेखनही केले. राजराज वर्मांनी मल्याळम् भाषकांसाठी लघुपाणिनीयम् (१९१६, सुधारित आवृ. १९१७) हा आद्य व्याकरणग्रंथ तसेच वृत्तमंजरी (१९०४) हा छंदशास्त्रावरील ग्रंथ आणि भाषाभूषणम् (१९०२) हा काव्य व अलंकारशास्त्रावरील ग्रंथ लिहिला. त्यांचे हे तिन्ही ग्रंथ आजही मल्याळम् मध्ये त्या त्या विषयावरील अधिकृत व प्रमाणभूत ग्रंथ म्हणून मान्यता पावले आहेत. संस्कृतमध्येही त्या त्या विषयावरील अधिकृत व प्रमाणभूत ग्रंथ म्हणून पावले आहेत. संस्कृतमध्येही त्यांनी ग्रंथरचना केली आहे.
राजराज वर्मा हे पुरोगामी विचारांचे थोर साहित्यिक होते. मल्याळम् साहित्याला त्यांनी आधुनिक दिशा दिली. म्हणूनच त्यांना आधुनिक मल्याळम् साहित्याचे जनक मानले जाते. काव्यातील द्वितीयाक्षरप्रासाबाबत (चार चरणांच्या श्लोकातील प्रत्येक चरणाचे दुसरे अक्षर तेच ठेवणे) मल्याळम् मध्ये जो वाङ्मयीन वाद दीर्घ काळ गाजला , त्यात आपले गुरू व मामा केरळवर्मांच्या विरोधी भूमिका-द्वितीयाक्षरप्रास चांगल्या काव्यास आवश्यक नाही – राजराज वर्मांनी घेतली. हा वाद त्यांनी काव्यात प्रवर्तित केलेल्या स्वच्छंदतावादी चळवळीस उपकारकच ठरला. मल्याळम् काव्यात नवे स्वच्छंदतावादी परिवर्तन घडवून आणण्याचे श्रेय राजराज वर्मा व त्यांच्या अनुयायांना दिले जाते. स्वतः राजराज वर्मांनी मलय (निलगिरी) पर्वताचे गौरवपूर्ण वर्णन करणारे पण आत्मनिष्ठ स्वरूपाचे मलयविलासम् (१९३०) हे सुंदर भावकाव्य लिहून तसेच मेघदूताचेही मेघसंदेशम् हे द्वितीयाक्षरप्रासाशिवाय सुंदर भाषांतर करून आपल्या द्वितीयाक्षरप्रासविरोधी भूमिकेचे ठोक व साधार समर्थन केले. त्यांनी ह्या आपल्या भूमिकेच्या समर्थनार्थ विविध नियतकालिकांतून विपुल लेखन केले. त्यांनी मल्याळम् (प्रसादमाला-१९१८) तसेच संस्कृत भाषेतही (आंग्लसाम्राज्यम्) काव्यरचना केली आहे. त्यांची आत्मनिष्ठ भावकविता नितान्तसुंदर आहे. त्यांच्या मलयविलासम् काव्यात निसर्गाचे उत्स्फूर्त व अतिशय संवेदनशील असे वर्णन आढळते. हे काव्य वाचून भव्योदात्ततेचा, गूढतेचा व उत्तुंग पर्वतराजीच्या अजिंक्यतेचा प्रत्यय येतो. संस्कृत साहित्यशास्त्र व इंग्रजी साहित्यविचार यांच्या व्यांसगामुळे त्यांनी मल्याळम् मध्ये आधुनिक समीक्षेचा पाया घातला. संस्कृत व पाश्चात्य समीक्षा सिद्धांताचा त्यांच्या समीक्षेत समन्वय साधलेला दिसतो. त्यांनी ⇨उण्णायि वारियर (अठरावे शतक) यांच्या नळचरितम् कथकळी ह्या काव्याच्या प्रस्तावनेत विविध अंगांनी केलेली या काव्याची समीक्षा,तसेच केरळवर्मांच्या मयूर संदेशम् व कुमारन् आशान यांच्या नळिनि या काव्यांना लिहिलेल्या चिकित्सक प्रस्तावनाही ह्या दृष्टीने विशेष महत्त्वाच्या आहेत. आधुनिक साहित्यसमीक्षेचे सिद्धांत त्यांनी मलयाळम् मध्ये प्रथमच मांडले. साहित्यसाह्यम् (१९१०) व भाषाभूषणम् या ग्रंथात त्यांनी गद्यपद्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या मूलभूत सिद्धांताची मांडणी केली आहे. त्यांचे हे दोन्ही ग्रंथ आजही समीक्षाक्षेत्रात प्रमाणभूत मानले जातात.
त्यांनी संस्कृतमधील कालिदासादींच्या कृतींची मलयाळम् मध्ये सुंदर भाषांतरेही केली आहेत: मेघसंदेशम्, कुमारसंभवम्, भाषाशाकुंतलम्, मालविकाग्निमित्रम्, चारूदत्तन् (१९२९), स्वप्नवासवदत्तम् इ. अनुवाद उल्लेखनीय होत. भंगविलापम् व पितृप्रलापम् ही त्यांनी संस्कृतमध्ये लिहिलेली अतिशय आत्मनिष्ठ आणि पाश्चात्य विलापिकेच्या धर्तीवर रचलेली लघुकाव्ये होत. प्रबंधसंग्रहम् (दुसरी आवृ. १९३७) हा त्यांचा विविध विषयांवरील १६ निंबधांचा संग्रह आहे.
प्रख्यात मल्याळम् कवी ⇨कुमारन् आशान हे राजराज वर्मांचे अनुयायी. आशान यांनी आपल्या वाङ्मयीन गुरूच्या मृत्यूवर प्ररोदनम् (१९१९) नावाची तत्त्वचिंतनपर सुंदर विलापिका लिहून आपला आदरभाव तर व्यक्त केलाच पण राजराज वर्मांना चिरंतनही बनविले. ⇨जोसेफ मुंटश्शेरी (१९०३ – ७७) यांनी आपल्या राजराजन्ते माट्टोलि (१९६१) या समीक्षाग्रंथात राजराज वर्मांच्या साहित्याचे चिकित्सक मूल्यमापन केले आहे. ए. आर्. राजराज वर्मा यांचे विस्तृत चरित्र तीन खंडात त्यांची कन्या भागीरथी अम्म व पुत्र एम्. राघव वर्मा राज यांनी मिळून लिहिले आहे.
आधुनिक मल्याळम् भाषासाहित्यक्षेत्रातील एक मानदंड म्हणून राजराज वर्मा ओळखले जातात.
भास्करन्, टी.(इं.) सुर्वे,भा.ग.(म.)