राजवाडे, कृष्णशास्त्री : (१८२० – ६ ऑगस्ट १९०१). मराठी ग्रंथकार. पुण्याच्या संस्कृत पाठशाळेत कृष्णशास्त्रीन्याय, अलंकार, वेदान्त व धर्म ह्या शास्त्राचे अध्ययन करून तेथेच पुढे ते साहित्य व अलंकारशास्त्र ह्या विषयांचे अध्यापक झाले (१८४१).१८५६ साली शिक्षण खात्याच्या भाषांतर विभागात त्यांची नेमणूक झाली. अलंकारविवेक (१८५३) हा राजवाडे ह्यांचा विशेष उल्लेखनीय असा ग्रंथ होय. यात संस्कृतातील अलंकाराचा परिचय थोडक्यात करून देण्यात आला आहे. शक्य तेथे ह्या अलंकारांची उदाहरणे मुक्तेश्‍वर, वामनादी मराठी कवींच्या रचनामंधून त्यांनी दिलेली आहेत. संस्कृतातील साहित्यविचार मराठीत आणण्याचा हा आंरभीचा प्रयत्न म्हणता येईल.

राजवाड्यांनी संस्कृतातील मालतीमाधव, मुद्राराक्षस, अमिज्ञानशाकुंतल, महावीरचरित ह्या नाटकांचे मराठी अनुवादही केले (१८६१ १८६७ १८६९ महावीरचरिताचा अनुवाद अप्रकाशित). ऋतुवर्णन आणि उत्सवप्रकाश (१८७११८७४) ही त्यांनी रचिलेली काव्ये. ऋतुवर्णन हे कालिदासकृत ऋतुसंहाराच्या अनुकरणातून रचिले आहे. उत्सवप्रकाशात अठरा हिंदू सणांचे वर्णन आहे.

पुणे येथे, १८८५ साली भरलेल्या दुसऱ्या मराठी साहित्यसंमेलनाचे राजवाडे हे अध्यक्ष होते. पुणे येथे ते निवर्तले.

कुलकर्णी, अ.र.