राजगड : शिवकालातील एक महत्त्वाचा डोंगरी किल्ला. छत्रपती शिवाजींची सुरूवातीची राजधानी येथे होती. तो महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात (वेल्हे तालुका) वेल्हे गावाच्या आग्नेयीस सु. १६ किमी.वर समुद्रसपाटीपासून १,३७६ मी. उंचीवर आहे. पायथ्याच्या गुंजवणे गावापासून पायवाटेने गडावर जाता येते. तेथूनच राजगडचा चढ सुरू होतो. हत्ती, घोडे वगैरे वाहने जातील एवढी रूंदी वाट आहे. या गडाला उत्तरेस पद्मावती, आग्नेयीस सुवेळा आणि नैर्ॠत्येस संजीवनी अशा तीन माच्या व एक बालेकिल्ला आहे. याचा तट व बुरूज अनेक ठिकाणी दुहेरी म्हणजे चिलखती आहेत. यावर येण्यास गुंजपा, पाली, आळू व काळेश्वरी असे चार दरवाजे व तीन दिंड्या आहेत. पद्मावती माची पुष्कळ लांब-रूंद असल्यामुळे राजगडावरील मुख्य वस्ती येथेच होती. तथापि सुवेळा व संजीवनी ह्या दोन्ही माच्यांवर आणि बालेकिल्ला यांवरही वस्ती होती. खुद्द छ शिवाजी महाराज कुटुंबासह या बालेकिल्ल्यावर रहात असत. सुवेळा माची साधारण सपाट व चिंचोळी आहे. उलट संजीवनी माची चिंचोळी असली, तरी पायऱ्या पायऱ्यांनी खाली व वर चढत गेली आहे. येथील मुख्य देवता पद्मावती तिचे मंदिर पद्मावती माचीवर आहे. याशिवाय पूर्वी हवालदाराची सदरसुध्द येथेच होती पण स्वातंत्र्योत्तर काळात ती भुईसपाट झाली आहे. तिन्ही माच्या व बालेकिल्ला यांवर गणेश, मारूती, ब्रम्हर्षि, जननी काळेश्वरी, भागीरथी यांची लहानमोठी मंदिरे आणि दारूखाना, दिवाणघर, राजवाडा, पागा इ. कमीअधिक पडीक अवेस्थेतील वास्तू आहेत. प्रत्येक माची व बालेकिल्ला यांवर पाण्याची व्यवस्था असून पद्मावती माचीवरील तळे पुष्कळच मोठे आहे. बालेकिल्ल्यावर लहानशी बाजारपेठ असून, त्या नमुन्यावरच पुढे रायगडची बाजारपेठ उभारलेली दिसते. या डोंगराचे प्रारंभीचे नाव मुरूमदेव. याला बहमनी आमदानीत महत्त्व नव्हते पण अहमदनगरच्या निजामशाहीचा संस्थापक पहिला अहमद याने मुरूमदेव आपल्या ताब्यात घेतला. तदनंतर त्यास गडाचे रूप येऊ लागले. या गडाचे रक्षण करण्याचे काम प्रथम गुंजण माळवातील शिलिमकर देशमुखांकडे होते. शिवाजीने १६४७ नंतर लवकरच मावळातील निरनिराळे गड आपल्या ताब्यात घेतले. त्याबरोबरच मुरूमदेव आपल्या ताब्यात घेतला. त्याला राजगड हे नाव देऊन ते आपले राजधानीचे ठिकाण केले. यामुळे प्रथम काही दिवस शिलिमकर व शिवाजी यांत कुरबुरी होत असत. शिवाजींनी १६७० पर्यंत हीच राजधानी ठेवली. शिवाजी व पुढे संभाजीनंतर हा किल्ला एकदोन वेळा औरंगजेबाच्या ताब्यात गेला असला तरी तो सामान्यतः मराठयांच्याच ताब्यात राहिला. छ. शाहूंच्या कारकीर्दीत मावळातील कित्येक किल्ले भोरच्या सचिवांच्या ताब्यात दिले होते. सिंहगड वगळता संस्थाने विलीन होईपर्यंत ते त्यांच्या ताब्यात राहिले. त्यावेळी तेथे हवालदार व काही अधिकारी वर्ग असे.
संदर्भ : खरे, ग. ह. स्वराज्यातील तीन दुर्ग, पुणे, १९६७.
खरे, ग. ह.