राघवन् पिळ्ळा, एटप्पळ्ळी : (१९०९−१९३६). आधुनिक मल्याळम कवी. जन्म केरळमध्ये एर्नाकुलम् जिल्ह्यात कोचीनजवळील एटप्पळ्ळी ह्या खेड्यात. ⇨चंगम्पुळ कृष्ण पिळ्ळा (१९१४−४८) हे दुसरे प्रख्यात मलयाळम् कवीही एटप्पळ्ळी येथेच जन्मले आणि ते राघवन् पिळ्ळांचे परममित्रही होते. ह्या दोनही कवींचे आयुष्य विपन्नावस्थेत व हालअपेष्टांत व्यतीत झाले. त्यांनी आपल्या काव्यांतून कमालीची आत्मनिष्ठा, दुःख, दारिद्र्य, वैफल्य, दुर्दैव, कारुण्य, निराशा यांचा प्रत्ययकारी आविष्कार केलेला आहे. साधी, सुबोध शब्दकळा, दैनंदिन जीवनातील भाषेचा वापर, आकलनसुलभ आशय इ. त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये होत. तरुण वर्गात ह्या दोघांचीही कविता अतिशय लोकप्रिय होती. हे दोघेही कवी अल्पायुषी होते. राघवन् पिळ्ळांनी वयाच्या २७ व्या वर्षी प्रेमातील वैफल्यामुळे आत्महत्या केली तर चंगम्पुळ हे वयाच्या ३४ व्या वर्षी क्षयामुळे निधन पावले. मल्याळम्मधील स्वच्छंदतावादाचे हे दोघे प्रमुख प्रतिनिधी होते. १९३० ते ५० च्या दरम्यान त्यांची कविता अतिशय लोकप्रिय होती.

राघवन् पिळ्ळांचे एका श्रीमंत कुटुंबातील मुलीवर प्रेम होते तथापि काही कारणाने हे प्रेम सफल होऊ शकले नाही. त्या मुलीचा विवाह दुसऱ्या एका श्रीमंत मुलाशी ज्या दिवशी पार पडला, त्याच दिवशी राघवन् पिळ्ळांनी आत्महत्या करून आपल्या जीवनाचा शेवट करून घेतला. मित्राच्या ह्या आत्मघाताचा चंगम्पुळ यांच्यावर सखोल परिणाम झाला व त्यांनी त्यावर रमणन् (१९३६, २५ वी आवृत्ती १९३८) नावाची एक उत्कृष्ट गोपगीतात्मक विलापिका लिहिली. ह्या विलापिकेच्या अल्पावधीतच अनेक आवृत्त्या निघाल्या व विक्रिचाही तिने उच्चांक गाठला.

राघवन् पिळ्ळांचे तुषारहारम् (१९३५), हृदयस्मितम् (१९३६) आणि नवसौरभम् (१९३६) हे काव्यसंग्रह असून, त्यांत त्यांच्या भावगीतपर कविता संग्रहीत आहेत. मणिनादम् म्हणजे ‘घंटानाद’ हे त्यांचे आत्मचरित्रपर असे शेवटचे काव्य असून ते पूर्ण करून त्यांनी ह्या जगाचा निरोप घेतला. हे काव्य त्यांच्या मरणोत्तर प्रसिद्ध झाले (१९४५). चंगम्पुळ यांनी राघवन पिळ्ळांच्या निवडक ८१ कविता संकलित आणि संपादित करून त्या एटप्पळ्ळी राघवन् पिळ्ळपुटे कृतिकळ (१९३३) नावाने प्रसिद्ध केल्या. राघवन् पिळ्ळा हे प्रतिभासंपन्न असे एक श्रेष्ठ कवी होते तथापि अल्पायुष्यामुळे ते विपुल काव्यनिर्मिती करू शकले नाहीत.

मल्याळम्मधील स्वच्छंदतावादी भावकवितेचा परमोत्कर्ष साधल्याचे श्रेय ह्या दोन कवींना दिले जाते व त्यांचा काव्यसंप्रदाय ‘एटप्पळ्ळी संप्रदाय’ म्हणून मल्याहम्मध्ये ओळखला जातो.

भास्करन्, टी. ( इं. ) सुर्वे, भा. ग.(म.)