रॅम्झी, सर विल्यम : (२ ऑक्टोबर १८५२ –२३ जुलै १९१६). ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ. ⇨अक्रिय वायूचा शोध लावून त्यांचे आवर्त सारणीतील [इलेक्ट्रॉन रचनेनुसार केलेल्या मूलद्रव्यांच्या कोष्टकरूप मांडणीतील → आवर्त सारणी] स्थान निश्चित केल्याबद्दल त्यांना १९०४ सालचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले.
रॅम्झी यांचा जन्म व १८७० पर्यंतचे शिक्षण स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे झाले. हायडल्बर्ग व ट्यूबिंगेन येथे पुढील शिक्षण झाल्यावर १८७२ मध्ये ते अँडरसन विद्यापीठात दाखल झाले व १८७३ मध्ये त्या विद्यापीठाची पीएच्. डी. पदवी संपादन केल्यावर तेथे पाठनिर्देशक साहाय्यक म्हणून काम करू लागले. १८८० साली ते ब्रिस्टल येथील युनिव्हर्सिटी कॉलेजच्या रसायनशास्त्र विभागात काम करू लागले व १८८१ साली ते तेथे प्राचार्य झाले. १८८७ मध्ये ते युनिव्हर्सिटी कॉलेज (लंडन) येथे दाखल झाले व १९१३ मध्ये ते तेथूनच निवृत्त झाले.
रॅम्झी यांचे सुरुवातीचे संशोधन हे रसायनशास्त्राच्या सर्व शाखांतील होते. बिस्मथच्या नव्या खनिजापासून ते अल्कलॉइडांच्या शरीरक्रियावैज्ञानिक क्रियापर्यंतचा अभ्यास त्यांनी केला. अल्कलॉइडे ही पिरिडिनाशी संबंधित आहेत, असे त्यांनी दाखवून दिले. यानंतर त्यांनी आपले लक्ष अकार्बनी व भौतिकीय रसायनशास्त्रावर केंद्रित केले.
सिडनी यंग व त्यांनी मिळून रासायनिक दृष्ट्या सारख्या असलेल्या दोन द्रवांचा बाष्पदाब ज्या तापमानांना एकच असतो त्या तापमानांचे गुणोत्तर या बाष्पदाबावर अवलंबून नसते हे प्रतिपादणारा ‘रॅम्झी –यंग नियम’ शोधून काढला. १८८७ मध्ये त्यांनी सापेक्षतः शुष्क अमोनिया व हायड्रोक्लोरिक अम्ल यांची विक्रिया होत नाही, हे सिद्ध केले.
प्रयोगशाळेत तयार करण्यात आलेल्या व हवेतून वेगळा केलेल्या नायट्रोजन वायूच्या घनतेत फरक असतो, असे लॉर्ड रॅली यांना १८९२ मध्ये आढळून आले. हा फरक कशामुळे येतो याविषयी त्यांनी सर्व रसायनशास्त्रांकडे विचारणा केली. तसेच रॅली यांना असे वाटले की, नायट्रोजनामधील ओझोनसारख्या जड वायूमुळे घनतेत फरक येतो. याची खात्री करून घेण्यासाठी रॅम्झी यांनी संशोधन सुरू केले. संशोधनांती त्यांना असे आढळून आले की, वातावरणीय नायट्रोजनात आणखी काही जड वायू आहेत, तसेच हवेतूनच ऑक्सिजन व नायट्रोजन पूर्ण अलग करण्याच्या तंत्राचा रॅम्झी यांनी शोध लावला. हे वायू हवेपासून अलग केल्यावर शेष भागात अज्ञात असा वायू अत्यल्प प्रमाणात त्यांना आढळून आला. १८९४ मध्ये रॅली व रॅम्झी यांनी नवीन वायू शोधून काढल्याचे जाहीर केले. पुढे त्या वायूस आर्गॉन हे नाव देण्यात आले. त्यापूर्वी १७८५ मध्ये ह्या वायूचे अस्तित्व हेन्री कॅव्हेंडिश यांच्या लक्षात आले होते. आर्गॉनच्या उच्च घनतेमुळे वातावरणीय नायट्रोजनाची घनता जास्त येते, हे अशा प्रकारे सिद्ध झाले. आर्गॉनसाठी नवीन उद्गम शोधण्यासाठी रॅम्झी यांनी क्लीव्हाईट खनिज व अम्ल तापवून नवीन वायू मिळविला (१८९५), त्याच्यापासून सूर्यावरील हीलियमासारखा वर्णपट मिळतो, असे त्यांना आढळले. अशा तऱ्हेने प्रथम आढळलेला हा हीलियम वायू हवेत अत्यल्प प्रमाणात असतो, असे पुढे आढळून आले.
हीलियम आणि आर्गॉन हे वायू रासायनिक दृष्ट्या क्रियाशील नाहीत, असे आढळून आले. त्यामुळे त्यांना अक्रिय वायू असे संबोधण्यात येऊ लागले. अक्रिय वायूंना आवर्त सारणीत जागा ठेवली नव्हती, तरी हे वायू या आवर्त प्रणालीत चपखलपणे बसले. आवर्त सारणीतील त्यांची जागा ठरविताना आणखी काही अक्रिय वायू असावेत, असे आढळले. १८९८ मध्ये रॅम्झी व एम्. डब्ल्यू. ट्रॅव्हर्झ यांनी द्रव हवेतून ऑक्सिजन व नायट्रोजन अलग करून शेष द्रवातून निऑन, क्रिप्टॉन व झेनॉन हे अक्रिय वायू शोधून काढले. रॅम्झी यांना किरणोत्सर्गी (भेदक कण वा किरण बाहेर टाकणाऱ्या) खनिजांबरोबर हीलियम आढळतो हे माहीत असल्याने त्यांनी पुढे आपले लक्ष किरणोत्सर्गावर केंद्रित केले. १९०३ मध्ये एफ्. सॉडी व त्यांना रेडियमपासून हीलियमासारखी निर्मिती होत असे आढळले. रेडियमाच्या उत्सर्जनामुळे मिळणाऱ्या द्रव्याची घनता ठरविताना १९१० मध्ये रॅम्झी व व्हिट्लॉ ग्रे यांना एक नवीन वायू मिळाला. त्यास रेडॉन असे म्हणतात. अशा रीतीने त्यांनी सर्व अक्रिय वायू शोधून काढले.
नोबेल पारितोषिकाखेरीज १८८८ मध्ये रॉयल सोसायटीचे फेलोपद, १८९५ मध्ये डेव्ही पदक, १९०२ मध्ये ‘नाईट’ किताब इ. सन्मान त्यांना मिळाले होते.
इ. स. १९१० मध्ये ते भारतात आले असता त्यांना टाटा घराण्यातर्फे मिळालेल्या देणगीतून एक शास्त्रीय संशोधन शाळा उभारण्यास व तिचा विकास करण्यास त्यांचे फार मोठे साहाय्य झाले. या प्रयत्नामुळे बंगलोर येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ही संस्था १९११ मध्ये सुरू झाली.
ए सिस्टिम ऑफ केमिस्ट्री (१८९१), द गॅसेस ऑफ द अँट्मॉस्फिअर (१८९६), इंट्रोडक्शन टू द स्टडी ऑफ फिजिकल केमिस्ट्री (१९०४), एलेमेंट्स अँड इलेक्ट्रॉन्स (१९१३) इ. पुस्तके त्यांनी लिहिली.
हॅझ्लेमीर [हाय विकम (बकिंगहॅम)] येथे ते मरण पावले.
जमदाडे, ज. वि.