रसायन : (आयुर्वेद). चार चिकित्सांपैकी रसायन चिकित्सा ही तिसरी चिकित्सा होय. प्रशस्त रसरक्तादि धातू निर्माण करण्याचा जो उपाय त्याला ‘रसायन चिकित्सा’ असे म्हणतात. प्रशस्त धातू म्हणजे उत्तम विशुद्ध सारवान धातू.
सृष्टीमध्ये नैसर्गिक जीवनक्रम असणारे जीव प्राकृत निरोगी शरीराचे आणि त्या जीवांच्या नियत आयुष्याचा उपभोग घेऊन कालवृद्ध होऊन ते आपले जीवन संपवितात. बलवंतांचे आक्रमण झाले तरच ते अकाली मरतात. बलवंत म्हणजे विकृत ऋतू, विकृत प्राणी, जंतू वा साथीचे रोग इ. होत. मानव मात्र त्याचे नियत आयुष्यही न भोगता अकाली मरतो. वास्तविक मानव बुद्धिमान असल्यामुळे मानव जीवाचे नियत आयुष्यही वाढवून दीर्घकाल जगला पाहिजे. निसर्गातील आपल्या शरीर घटकांना श्रेष्ठ प्रतीचा आहारविहार अणि औषधे ह्यांची निवड करून यांच्या सेवनाने आपले घटक श्रेष्ठतर, श्रेष्ठतम बनविण्याचे अविरत प्रयत्न केले पाहिजेत आणि आदर्श महाबलवान महापुरुष निर्माण केला पाहिजे परंतु बुद्धीचा तसा उपयोग न करता मानव आत्मघाती उपयोग करतो आणि अल्पायुषी होतो. वन्य जीवांमध्ये आदर्श जीव पुष्कळ मिळतात पण मानवामध्ये आदर्श अत्यल्पसंख्या आहे. ही मानवासारख्या बुद्धिमान जीवाच्या जीवनाची शोकांतिका आहे.
प्राचीन आयुर्वेदाचार्यांनी ह्या दृष्टीने अतिशय संशोधनपूर्वक प्रयत्न करून उपचार शोधून काढले. ते उपचार म्हणजेच रसायन चिकित्सा होय. रसायनाला वयःस्थापनही म्हणतात.
वय म्हणजे तारूण्य. ते संपादन करणे, टिकवून धरणे व वाढवणे म्हणजे वयःस्थापन होय. तारूण्य जितके दीर्घ तितके मानवी आयुष्य दीर्घ त्याचे स्थापन जितके दृढतेने, निर्देष आणि सर्वांगीण होईल तितके तारुण्य दीर्घ होईल म्हणून वयःस्थापनाचे म्हणजे रसायनाचे मानवी जीवनात अती महत्त्व आहे.
आयुष्याच्या तीन अवस्था असतात : बाल्यावस्था, तारुण्यावस्था व वृद्धावस्था, अर्थात ह्या दोहोंमधील मद्यावस्था. सोळव्या वर्षी बाल्यावस्था ओलांडल्यानंतर विशीपर्यंत शरीरवाढ, तिशीला ऐन तारुण्य व चाळिशीपर्यंत शरीराची सर्वांशी परिपूर्णता जी निरोगी प्रकृतीत होते ती टिकवून ठेवणे हेच वयःस्थापन होय.
समाजात संपूर्ण निरोगी व बलवान व्यक्ती क्वचितच आढळतात व म्हणूनच तारूण्याने मुसमुसलेले पुरुष व स्त्री शरीर हे दृष्टीच्या आकर्षणाचा विषय होत असतो. अर्थातच याचे कारण बहुसंख्या शरीरे अल्पवयातच खुरटलेली पाहण्याची जणू दृष्टीला सवयच झालेली असते. एखादे बालक बारा वर्षांचे असूनही सोळा ते अठरा वर्षे वयाचे दिसते. तसेच पन्नास वर्षांचा प्रौढ तीस ते पस्तीस वर्षे वयाचा तरुण वाटतो, तेव्हा आनंद व आश्चर्य वाटते व असे तारुण्य समाजात असावे अशी आकांक्षा निर्माण होते.
तरुणही वातादि दोषांनी युक्त अशा प्रकृतीचा असला, तर त्याचेही ते ते दोषाधिक्य आटोक्यात आणून इतर दोषांशी समानता स्थापन करणे हेही रसायनाचे कार्य असते. यामुळे असा तरुण खरा निरोगी होऊ शकतो. प्रकृतिस्थापन हे एक प्रकारचे वयःस्थापनच होय. ज्या व्यक्तीचे दोष सम म्हणजे धातू व रसादी सात धातू व मन असे आठ घटक उत्तम दर्जाचे म्हणजे विशुद्धतर असले, तर तो पुरुष अतिशय बलवान व अनेक गुणसंपन्न होतो. कोणत्याही कार्याच्या आरंभाच्या वेळी त्या कार्याची पूर्णता होईल असा त्याला आत्मविश्वास असतो. आपले व जगाचे कल्याण व्हावे हीच इच्छा त्याला असते. त्याला विकार झाले, तर सौम्य असतात. म्हातारपण हळूहळू येते आणि त्याला बहुतेक त्याच्यासारखीच गुणवन व दीर्घायुषी अशी पुष्कळ अपत्ये होतात. हे आदर्श आरोग्याचे संक्षिप्त स्वरूप आहे.
रसायनाचे प्रयोजन : आरोग्यसंपन्न मनुष्याने निसर्गातला दीर्घायुषी पुरषोत्तम होणे व म्हतारपण येऊ न देणे, जन्मतः निर्माण होणाऱ्या रोगांचा प्रतिकार करणे, वंशानुगत वैगुण्य नष्ट करणे, प्रकृतिजन्य दोष नाहीसे करणे आणि असाध्य रोगांचाही नाश करणे ही रसायनाची प्रयोजने होत.
चिकित्सेवे प्रकार : (१) व्यवहारात चालू असलेली रोगनाशनी चिकित्सा (२) जन्मतः उत्पन्न झालेली, दोषप्रकृती नाहीशी करणारी प्रकृतिस्थापनी चिकित्सा (३) सर्व धातू उत्तमसार करणारी रसायनी चिकित्सा आणि (४) मोक्षदायिनी-नैष्ठिकी चिकित्सा. अशा चार चिकित्सांपैकी रसायनी ही तिसरी चिकित्सा होय.
औषधाचा प्रकार : औषध दोन प्रकारचे असते. एक रोगहरण करणारे आणि दुसरे आरोग्यसंपन्न व्यक्तीचे बल वाढविणारे बलवर्धक औषध. एक रसायन व दुसरे बाजीकरण होय.
औषधाचे शरीरावरील कार्य : रसायन सेवन केल्याने दीर्घायुष्य, स्मरणशक्ती, बुद्धी, उत्तम आरोग्य, तारुण्य, कांती, उत्तम रूप, प्रभा, शारीर व मानसिक इंद्रियबल, वाणीचे सामर्थ्य, नम्रता, सौंदर्य ह्या सर्व गोष्टी प्राप्त होतात. संपूर्ण शरीराचे रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा आणि शुक्र हे धातुघटक शस्त म्हणजे विशुद्धतर होतात. असे हे रसायन कार्य आहे.
रसायनाचे चिकित्सेमध्ये स्थान : रसायन हे केवळ रोगकर दोषांचा नाश करून रोग बरे करीत नाही, तर धातूंना बल देऊन धातूंचे पचन सामर्थ्य व बाह्यद्रव्ये (दोष इ.) आत्मसात करण्याची क्षमताही वाढवून त्यांचे शल्यत्व नाहीसे करण्याचे सामर्थ्य रसायनामध्ये असते. म्हणून जीर्ण रोग, नवे-जुने असाध्य रोग, जन्माबरोबर आलेल्या विकृती व वैगुण्ये असताना शरीराच्या धातूंचे, अवयवांचे व घटकांचे सामर्थ्य कमी झालेले असते, अशा वेळी त्यांचे वरीलप्रमाणे दोन्ही प्रकारचे सामर्थ्य वाढवून दोषनाश करणे आवश्यक असते. या दृष्टीनेही रसायन चिकित्सा ही मोलाची आहे. केवळ दोषनाश करणाऱ्या औषधांचा शरीरावर रसायनाच्या मानाने अनिष्ट परिणाम होतो, शरीर घटकांचे सामर्थ्य वाढवले न जाता उलट कमी होते. देशकालादिकांचा विचार करून निवडलेले रसायन नेहमी घेतले, तरी ते चालते, उदा., ‘क्षीरधृताम्याऽसो रसायनानां श्रेष्ठ!’ म्हणजे दूध व तूप यांचे सतत सेवन हे सर्व रसायनांमध्ये श्रेष्ठ रसायन आहे. त्यामुळे शरीर घटक अतिशय बलवान होऊन झालेले रोग नाहीसे करतातच पण भावी रोगकारक दोष शरीरात उत्पन्न होऊ शकत नाहीत, झाले तरी ते वाढू शकत नाहीत, वाढले तरी त्यांना रोग निर्माण करण्याला शरीरात स्थान मिळू शकत नाही, स्थान मिळाले तरी रोग उत्पन्न होऊ शकत नाही. धातू घटकांमध्ये उत्तम प्रतिकारशक्ती असल्यामुळे ह्या आपत्ती उत्पन्न होऊ शकत नाहीत. अशा अवस्थेत दोष कारण शोधून ते नाहीसे केले, तर दोषनाशक औषध न घेताही दोषनाश होतो.
रोगनाशनी व प्रकृतिस्थापनी ह्या पहिल्या दोन चिकित्सा करून शरीरात स्वास्थ्य मिळविल्यानंतर रसायन चिकित्सेचे कार्य होण्याला शरीराची अनुकूल भूमिका तयार होते. शरीरातील जन्मतः वा आहारविहारजन्य दोष वरील दोन्ही चिकित्सांनी नाहीसे केल्याने चिकित्सेतील दोषांची चिकित्सा करण्याचे एक प्राथमिक कार्य संपुष्टात आलेले असते. रसायन चिकित्सेने धातू व इंद्रिये ह्यांना बालवान करण्याचे कार्य उरते, अर्थात ते कार्य दोषांचा अडथळा न येता सुरळीत रीतीने साध्य होते. पूर्वीच्या दोन्ही चिकित्सांमध्ये दोषनाश व धातुबलवृद्धी असे दुहेरी कार्य करावयाचे असते, त्यामुळे ते अधिक अडचणीचे असते, म्हणजे पहिल्या दोन्ही चिकित्सा रासायनिक चिकित्सेला अनुकूल शारीरिक व मानसिक भूमिका तयार करणाऱ्यात आहेत.
रासायनिक चिकित्सा ही नैष्ठिकी चिकित्सेला अनुकूल भूमिका तयार करते : पहिल्या दोन्ही चिकित्सांमध्ये दोष शल्यरूप असतात. दोषशामक औषधांनी बरे वाटते. सुख होते. हे सुख पूर्ण दोषनाश होईपर्यंत, शरीर व मन निर्दोष होईपर्यंत अल्पकाळ असते. योग्य औषधाने मुख व दोषोद्रेकाने दुःख ही वारंवार होत असतात. ह्या ठिकाणी इच्छा दोषात्मिका, तृष्णा ह्या सुखदुःखामुळे उत्पन्न होत असतात आणि पुन्हा त्या तृष्णेच्या शमनाने सुख व शमन न झाल्यामुळे दुःख होत असते. असे सारखे रहाटगाडगे सुरू असते. ही सुखदुःखे दोषौषधजन्य असतात. त्यावर अवलंबून असतात. म्हणजे सापेक्ष असतात. मनुष्य जेव्हा वरील दोन्ही चिकित्सांनी स्वस्थ आरोग्यसंपन्न होतो तेव्हा तो निर्मल, निर्दोष म्हणून निःशल्य असतो. दुःख नाश झालेला असतो. त्यामुळे औषधजन्य सापेक्षा सुखाची आवश्यकता उरलेली नसते. सर्व शरीरात स्वास्थ्य असल्यामुळे शरीराच्या सूक्ष्म घटकांतून हे सुखसंवेदनाचे तरंग हळूवार क्षणोक्षणी सर्व शरीरभर पसरत असतात. त्यामुळे त्याची इंद्रिये, मन व आत्मा नेहमी प्रसन्न असतात. सुखी म्हणून आनंदी असतात. हे सुख व तद्जन्य आनंद बाह्य औषध-आहारजन्य नसतो, म्हणजे सापेक्ष नसतो, निरपेक्ष असतो. त्यामुळे शरीरावरील कोणत्याही अंगोपांगाच्या सूक्ष्मस्थानांतही शल्य नसल्यामुळे तेथे तद्जन्य दुःख तत् शामकजन्य सुख ह्यांचा अभाव असल्यामुळे त्या स्थानाकडे मन विक्षिप्त होत नाही. मन चिंतनात, ध्यानात पूर्ण एकाग्र होते.
अशा स्वस्थ शरीराच्या व्यवधानहीन मनाच्या सात्त्विक अवस्थेत रसायन चिकित्सा केल्याने शरीर, मन, बुद्धी, स्मृती, धृती ह्या सर्व बलवान होतात. मोक्षदायक योगसाधनेला म्हणजे नैष्ठिकी चिकित्सेला रसायन चिकित्सा ही अनुकूल भूमिकाभूत अशी ठरते.
रसायनाला व रसायनानंतर उपयुक्त अशी एकांतहितकर आहारद्रव्ये : जी द्रव्ये मितप्रमाणांत सेवन केली असताना कोणताही दोष निर्माण करीत नाहीत ती एकांतहितकर द्रव्ये होत. अल्पदोष असले, तर ते शरीराला सात्म्य झाल्यानंतर बाधक होत नाहीत. तांबसाळ, साठे तांदूळ इ. शूक धान्ये गहू, जव अशी इतर धान्ये हरिण, तितर, लावा इत्यादींचे मांस मूग, तूर, मसूर इ. डाळी चाकवत, हरिणदोडी, कावळी, दुधी कावळी, ब्राह्मी इ. भाज्या गायीचे तूप, सैंधव आणि आवळा, डाळिंब इ. फळे ही एकांतहितकर आहारद्रव्ये होत. गोड रसाचे बहुतेक पदार्थ वयःस्थापन करतात.
रसायनाची निवड : रसायनाची निवड करताना प्रथम प्रकृतीचा विचार करावा लागतो. उदा., पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना बिब्बा, लसूण, सोमल, चित्रक, आले, हरताळ ही रसायने रसायन म्हणून न ठरता रोगकारकच ठरतील. त्या व्यक्तींना आवळा, शतावरी, भुईकोहळा, अश्वगंधा, लोह, अभ्रक सुवर्णमाक्षिक, तूप ही रसायने युक्त होतील. त्याप्रमाणे इतर पकृतींचाही विचार करून रसायने निवडावयाची असतात. ह्याचप्रमाणे धातूंच्या असारत्त्वाचा विचार करावयाचा असतो. रसधातुपुष्टीसाठी दूध व प्रवाळ रक्तधातूसाठी लोह, विडंग मांसधातूसाठी त्रिफळा, आवळा, हिरडा, अश्वगंधा, भुईकोहळा व वर सांगितलेली पौष्टिक रसायने द्यावीत. अशा तऱ्हेने तत्तत् धातुगामी द्रव्ये योजून धातूत सारत्व निर्माण करवयाचे असते. अवयव व इंद्रियगामी द्रव्ये त्या त्या इंदियाच्या अवलत्वाकरिता योजावयाची असतात. उदा., हद् आमलकी, मातुलुंग, डाळिंब, गाईचे दूध, बृहत्वात चिंतामणी, चिंतामणी रस, महालक्ष्मी विलास रस, सोने इ. द्रव्ये योजावीत.
रसायनाचा नैसर्गिक काळ : जन्माला येताबरोबर घशातला कफ काढून टाकल्यावर पहिला घास मध-तुपाबरोबर सोने द्यावयास सांगितले आहे. तेव्हा जन्मापासून मरेपर्यंत मानवाला रसायनाची गरज आहे. एवढे खरे की, बाल्य आणि तारूण्य यांत शरीराची वाढ जोरात चालू असते. त्या वेळी शरीराच्या प्रयत्नाला मदत म्हणून जर आपण रसायन (वयःस्थापन) द्रव्यांचा उपयोग केला, तर त्याचा परिणाम उत्कृष्ट, चिरकालीन होतो. बाल्यात आणि तारुण्यात शरीर धातूंची वाढ होत असताना काही काळात काही धातूंची वाढ फार जोराने होत असते. शरीरामध्ये ज्या धातूचा परिपोष द्रव्यतः व गुणतः नीट झालेला नाही त्या धातूच्या आणि त्याबरोबर सर्व शरीराच्या परिपोषणाकरिता त्या धातूच्या वाढीच्या काळात अनुरूप द्रव्ये दिली, तर इष्ट परिणाम उत्कृष्ट होतो. धातूंच्या वाढीचे हे काळ व शरीरातील अपरिपुष्ट धातू तज्ञ वैद्याला समजू शकतात. सुमारे वयाच्या आठव्या महिन्यापासून आणि पुढे आठव्या वर्षापासूनचा काळ दातांच्या वाढीचा असतो, हे स्पष्ट आहे. ज्या मुलाच्या अस्थिधातूचा परिपोष चांगला झालेला नाही, त्या मुलाला तसचे ज्या वंशात उंच व धिप्पाड संतती निर्माण न होता ठेंगू निर्माण होते त्यांनाही वर सांगितलेल्या अस्थिपोषणाच्या काळात अस्थिपोषक रसायन दिले, तर यांच्या शरीरातील हे वैगुण्य निश्चित नाहीसे होईल.
प्रत्येकाने ग्रीष्म व वर्षा ऋतूंत बल रक्षणार्थ वयःस्थापन औषधे सेवन करावीत.
वयाला अनुसरून रसायन भेद : मुले ही कोमल असताना ती सर्वसह नसतात. त्यांना द्यावयाची रसायन द्रव्ये मृदू असावीत. शक्यतो रुचकर असावीत. वातातपिक रसायंनेच त्यांना योग्य होत आणि यांच्या वाढत्या वयाला अनुसरून ती त्यांना उपयुक्त होऊ शकतील. रेचक, वमन इ. शोधनांचा निषेध असल्यामुळे पंचक्रम न करता त्यांना रसायने द्यावी लागतात. ह्याकरिता हरितकीसारख्या शोधक रसायनांची मात्रा कमी देणे आवश्यक आहे. त्यांचा स्वाभावच रेचक असल्यामुळे धातूमधल्या असलेल्या दोषांचेही शोधन करून कोष्ठापर्यंत ते दोष आणतात. त्यांना चित्रक, बिब्बा इ, तीक्ष्ण, तीव्र अशा द्रव्यांची रसायने देता येणार नाहीत, शक्य तितकी हिताहितकर रसायने न वापरता एकांतहितकर रसायने वापरावीत. दूध, मध, गायीचे तूप, सोने, ब्राह्मीरसायन, मनुका, आंबा अशा तऱ्हेची द्रव्ये वापरावीत. क्वचित लसणासारखे, पिंपळीसारखे द्रव्य वातशामक पण पित्तवर्धत असे हिताहितकर द्रव्यही वापरावे लागते पण ते अल्प प्रमाणात व तूप वगैरे द्रव्यांबरोबर अबाधत स्वरूप करून द्यावे लागते.
तारुण्यात इतके जपण्याचे कारण नाही. व्यक्ती जीवात्मा आणि कुटिप्रावेशिक रसायनास योग्य असला, तर त्याला वातातपिक रसायनापेक्षा कुटिप्रावेशिक रसायनच ( कायाकल्प) द्यावे. कुटिप्रावेशिक रसायन तरुणांवाचून इतरांना सहसा देऊ नये.
वृद्धांमध्ये शुक्रधातू आणि इतर धातू क्षीण झालेले व होत असलेले आढळतात तेव्हा त्यांच्याकरिता वृष्य व क्षीण धातुवर्धक अशी रसायने निवडणे योग्य होय.
रसायन अवस्था : रोग असाध्यावस्थेत असताना ताबडतोब रसायन देण्याला सुरुवात केली पाहिजे हे खरे पण ह्या अवस्थेत रसायनाचा उपयोग होईलच असे नाही पण त्या विचारांचा शमनकाळ मिळणे शक्य दिसत असेल, तर तो काळ साधलाच पाहिजे. उदा., रक्तपित्त असाध्य असेल आणि हेमंत व शिशिर हे त्या विकाराचे सुखकाळ त्या चिकित्सेला लाभणे शक्य लाभणे शक्य असेल, तर त्या काळात त्याची चिकित्सा अर्थात रसायन चिकित्सा केलीच पाहिजे. तो त्याचा सुखकाळ होय, ह्या काळात तो विकार शमलेला असतो व तोच काळ चिकित्सेला अनुकूल असतो आणि शरीराचे बल तीव्रावस्थेपेक्षा ह्या अवस्थेत किंचित वाढलेले असते, अग्नी थोडा बरा असतो. म्हणून त्या काळात शतावरीवृत इ. चिकित्सा केली पाहिजे. अशा रीतीने अवस्थांचा विचार करावा लागतो.
असाध्य रोगांवर करावयाची रसायने म्हणजेच अवारणीय रसायने होत.
आहार व पथ्यापथ्य : बहुतेक रसायने घेत असताना दूध, तूप, साठे तांदूळ ह्यांचा उपयोग करावयाचा असतो पण काही रसायनांमध्ये विशिष्ट पथ्ये सांगितलेली आहेत. नागेश्वर रसायन सेवन करीत असता गहू व तिळाच्या तेलाचे सेवन हेच पथ्य सांगितले आहे. नेहमी रसायन सेवन करीत असताना मन शांत गंभीर सुविचारयुक्त असे ठेवले पाहिजे.
मद्य, मैथुन, अतिश्रम, व्यायाम, रात्री जागरण व दिवसा झोप हे वर्ज्य केले पाहिजेत.
वर्धमान रसायन तत्त्व : रसायनाची काही औषधे वर्धमान प्रमाणात घ्यावयाची असतात. शुद्ध औषधी प्रयोग म्हणजे ज्या प्रयोगाने व्याधीचे शमन होते पण त्याबरोबर किंवा त्यानंतर औषधाने अन्य रोग किंवा दोष उत्पन्न होत नाही तो प्रयोग विशुद्ध होय.
असे निवडलेले औषधही शरीराला अगदी परके असते. आत्मसात झालेला आहारही प्रथम शरीराला परकाच असतो. तो जोपर्यंत शरीराचा घटक होत नाही तोपर्यंत तो शरीराल परकाच ठरतो.
रोगनाश औषध करीत नाही. शरीर करीत असते. औषधाचे साहाय्य मात्र घेते. औषध पचवून त्याच्या साहाय्याने शरीर कार्य करवून घेते. औषध पचेल इतक्याच प्रमाणाने ते घेतले पाहिजे. पचल्यावरही त्याचा कोणताही त्रास होता कामा नये. म्हणून क्रमाने त्याचे प्रमाण वाढवीत गेले, तर ते द्रव्य पचवणारा शरीराचा अग्नीही वाढत जातो. शरीरात ते औषध अशा रीतीने विपुल प्रमाणात पण सात्म्य झाले, तर ते ज्या कारणाकरिता घेतलेले आहे त्याचे समूळ उच्चाटन होते. तो दोष किंवा रोग नाहीसा होतो.
तसेच ते क्रमाने सोडवयाचेही असते. ते जर एकदम सोडले, तर सवयीच्या व सात्म्याचा द्रव्याचा वियोग झाल्यामुळे शरीराला त्याची जी भूक असते व त्याच्यावर त्याच्या ज्या चांगल्या क्रिया अवलंबून असतात त्या एकदम बंद पडतात. त्यामुळे शरीराचा तोल जातो. म्हणून क्रमानेच ते औषध सोडले पाहिजे. ह्यामुळे जे रोग उत्पन्न होतात त्यांना असात्म्यज रोग म्हणतात.
रसायनास योग्य व्यक्ती : सत्य वक्ता, न रागवणारा, मद्य व मैथुनापासून संपूर्णतया अलिप्त, मनानेही कुणाची हिंसा न चिंतणारा, विशेष परिश्रम न करणारा, शांतवृत्ती, कुणालाही आवडेल असे बोलणारा, नित्य पवित्र आचरण ठेवून जपजाप्य करणारा, धैर्यशील, यथाशक्ती दान करावे हा स्वभाव असणारा, तपस्वी, देव, गाय, ब्राह्मण, आचार्य, गुरू, वडील माणसे ह्यांचे पूजन व सेवा ह्यांत आनंद मानणारा, दुःखीजनांच्या दुःखाने स्वतः दुःखी होऊन त्यासाठी जाणीवपूर्वक करता येईल ते करणारा, नित्य दूध, तूप यांचे सेवन करणारा, निरहंकारी, मनमोकळी, निष्कपट वागणूक असणारा असा कुलीन, अध्यात्माची म्हणजे मोक्ष साधनेची इंद्रियांना ओढ असलेला, वृद्ध, आस्तिक मताचे लोक व नित्य मनावर ताबा ठेवून वागणाऱ्यांची आदरपूर्वक सेवा करणारा आणि धर्मशास्त्राचे वाचन व त्याचा आज्ञांचे निष्ठेने पालन करणे हा त्याचा नित्य व्यवसायच बनला आहे असा पुरुष रसायंनास योग्य होय.
अयोग्य व्यक्ती : मनावर तावा न ठेवू शकणारे, आळशी, दरिद्री, कुपथ्य करणारे, व्यसानी, पापाचारी व औषध किंवा उपचारांवर अश्रद्धा व देणाऱ्याचा अपमान करणारे रसायन घेण्यात अयोग्य व्यक्ती आहेत.
रसायनाचे प्रकार : रसायनाचे विधीवरून मुख्य दोन प्रकार होतात. एक कुटिप्रावेशिक व दुसरा वातातपिक.
कुटिप्रावेशिक : स्वतंत्र कुटीमध्ये राहून ध्यावयाचा रसायन प्रयोग तो कुटिप्रावेशिक. हा विधी महाफलदायी आहे व फार कष्टाचा आहे.
वातातपिक : उन, वारा, पाणी इ. अपिरहार्य विधिनिषेध न बाळगता नेहमीचे व्यवहार चालू असताना घ्यावयाचे रसायन.
रसायनाचे काम्य, नैमित्तिक व आजस्रिक असे पुन्हा तीन प्रकार होतात.
काम्य रसायन : ह्याचे पुन्हा तीन प्रकार. (१) प्राणकाम, (२) मेधाकाम, (३) श्रीकाम.
प्राणकाम : जीवनामध्ये अनेक संकटांचा प्रतिकार करून अत्यधिक स्थितीत घ्यावयाचे रसायन. उदा., आमलकी, भल्लातक, शिलाजतू इत्यादी.
मेधाकाम : स्वतःची किंवा स्वतःच्या वंशामधील बुद्धी जर कमी असेल आणि आपण व आपला वंश बुद्धिमान व्हावा त्या दृष्टीने करावयाची रसायने. पांढरी बावची, ब्राह्मी, वेखंड, सोने इत्यादी.
श्रीकाम : असक्ष्मीनाशक, कांतिवर्धक, कांतिदायक अशी रसायने. उदा., ब्राह्मी, सोने इत्यादी.
नैमित्तिक : नैमित्तिक म्हणजे रोगनाशक रसायने. उदा., शिलाजतू, भल्लातक इत्यादी.
आजस्रिक: नित्य ध्यावयाचे रसायन. उदा., दूध व तूप ह्यांचा नेहमी रसायन म्हणून उपयोग करावा. हे रसायनांमध्ये श्रेष्ठ आहे.
आयुष्यवर्धक : ज्या घराण्यांमध्ये दीर्घायुषी लोक नाहीत, त्यामुळे त्यांचा वंशही लवकर नष्ट होण्याची शक्यता असते. त्यांनी आयुष्यवर्धक अशी रसायने सेवन करावीत. वात प्रकृतीच्या लोकांनी डुक्करकंद, कफ व मेदस्वी प्रकृतीच्या लोकांनी हरीतकी, कफ-पित्त प्रकृतीच्या लोकांनी आवळकाठी अशा तऱ्हेची रसायने नित्य सेवन करावीत, शिवाय, ब्राह्मरसायन, च्यवनप्राश रसायन ही पण घ्यावीत.
वंशामध्ये बुद्धिमांद्य असेल किंवा बुद्धी वाढावी ही इच्छा असेल, तर शंखपुष्पी, ज्येष्ठमध, ब्राह्मी, वेखंड, सोने इ, रसायने घ्यावीत.
वाचेमध्ये दोष असेल, तर नारसिंहधृत घ्यावे. ते वाचा, मेधा, बुद्धी व कांती वाढविणारे आहे.
दात चांगले नसतील व ते बळकट करावयाचे असतील, तर नित्य काळ्या तिळाचे सेवन केले पाहिजे. मात्र त्वग्विकार नाहीना हे पहावे.
केस गळत असतील, टक्कल पडले असेल, तर माक्याचा रस पोटात घ्यावा व माक्याचे तेल नित्य लावावे.
सौंदर्य वाढविण्यासाठी अथवा आहे ते कायम टिकविण्यासाठी वावडिंग, बिब्बा, सुंठ यांचा रसायन म्हणून उपयोग करावा.
वर्ण सुधारावयाचा असेल, तर सोने, रौप्य, चंदन, काळा वाळा, ज्येष्ठमध, अनंतमूळ, भुईकोहळा, दुर्वा ह्यांचा नित्य उपयोग करावा.
डोळ्यातील तेज व दृष्टी वाढविण्यासाठी असाण्याचा नार व अरणीमूळ ह्यांचा उपयोग नित्य करावा.
आतपर्यंतची रसायने स्वस्थ व्यक्तीला उपयोगी पडणारी रसायने आहेत.
रोग झाला असता घ्यावयाची रसायने : रसायनांचे रोगनाशक व दोषनाशक असे प्रकार होतात. वात प्रकृती, कफ प्रकृती व पित्त प्रकृती व्यक्तींना रोग झालेलाच असतो असे नाही पण जन्मतः जे प्रकृती दोष असतात त्यांमुळे वैगुण्ये अबलत्व निर्माण झालेले असते. प्रकृती दोषांच्या गुणांचे शरीर बनलेले असते. त्या गुणांची द्रव्ये वर्ज्य करून यांच्या विपरीत गुणांच्या द्रव्यांचे सेवन नित्य करावयाचे असते. वात प्रकृतीच्या व्यक्तीने तिल तैल, पित्त प्रकृतीच्या व्यक्तीने गाईचे तूप व कफ प्रकृतीच्या व्यक्तीने मध ही आहार रसायने नित्य सेवन करावीत. सम प्रकृतीच्या व्यक्तीने शुद्ध थंड पाणी सेवन करीत असावे. तरही रसायनांचा उपयोग व्यक्तिविशेष पाहून करावयाचा असतो. यांना ‘प्रकृतिस्थापन रसायने’ असे म्हणतात.
प्रत्येक रोगामध्ये रोग व त्याचा दोष यांचे शोधन करून व शामक औषधे देऊन नंतर तत्तत् रोगनाशक रसायन प्रयोग करायलाच हवेत. रोगाच्या आरंभी रसायन प्रयोग केला, तर रोग सहसा होण्याची भीती नसते पण रोग असाध्यावस्थेत गेल्यानंतर रसायनालाच शरण जावे लागते. रसायन औषधावाचून तो रोग बरा होणे शक्य नाही. अशा वेळी वातातपिक पद्धतीने का होईना त्या रोगांचे नाशक औषध नित्य सेवन केलेच पाहिजे. रसायन औषधे किंमतीने जशी भारी असतात तशी हलकीही असतात उदा., वातव्याधीवर लसूण व तिळाचे तेल, मूळव्याधीवर बिब्बा किंवा ताक इतके साधे व सोपे रसायन प्रयोग नित्यसेवनाकरिता वैद्याच्या सल्ल्याने आपल्या प्रकृतीला मानवेल असे निवडून घेऊन त्याचे सेवन नित्य करावे. गोमूत्रासह चित्रकाचे सेवन केले असता पांढरे कोड नाहीसे होते. पिंपळी रसायनविधीने सेवन केले असता कास, श्वास, राजयक्ष्मा, अर्श, ग्रहणी, पांडू, सूज, पाणथरी इ. रोग नाहीसे होतात. अर्श आणि कृमींवर वावडिंग तसेच रक्तपित्तावर शिवणीचे फळ रसायन म्हणून उपयोगी पडते. राजयक्ष्मा व रक्तपित्तावर चिकण रसायनविधीने उपयुक्त ठरतो.
शरीरातील दोषवैगुण्ये व धातुवैगुण्ये ही नाहीशी करण्याकरिता प्रकृतिस्थापन चिकित्सा उपयुक्त होते. प्रकृतिस्थापनानंतर धातुवैगुण्ये नाहीशी करण्याकरिता रसायन (वयःस्थापन) चिकित्सा करावयाची असते. अल्पसार किंवा मध्यसार धातू हे उत्तमसार व्हावेत, श्रेष्ठ दर्जाचे व्हावेत, म्हणून त्या धातूंवर कार्य करणारी द्रव्ये उपयोगात आणावयाची असतात. ही चिकित्सा करताना सारत्व कमी असलेल्या धातूचा अग्नी मंद आहे की त्याच्या परिपोषक स्रोतसांचा अवरोध होऊन पोषक द्रव्ये कमी पडली आहेत की, आहारातूनच पोषक द्रव्ये मिळत नाहीत, अशी जी असतील ती कारण पाहून तद्नुरूप चिकित्सा करावी लागते. मांस, धातू असार असेल आणि त्याला कारण त्याचा अग्नी चांगला नसेल, तर तो वाढवणारा बिब्बा स्त्रोतसांचा अवरोध असेल, तर तो नाहीसा करणारे द्राक्षासव मांसपरिपोषक अंश आहारात कमी असेल, तर रक्तमांस बलप्रद आंबा मांसरस मांस धातूचे मलच जास्त तयार होत असतील, तर ते मल नाहीसा करणारा हिरडा अधिक उपयोगी होईल. सारांश, वरीलप्रमाणे धातूंच्या असारत्वाच्या मुळाशी जी जी कारणे असतील ती ती पाहून, ती नाहीशी करण्याची योजना करणे जरूर आहे.
असारत्व व मानसभाव : धातूंच्या सारत्वाचा व असारत्वाचा मानसिक स्थितीशी संबंध असतो. उदा., मांस असार व्यक्तीमध्ये कृश असणे हा जसा शारीरिक दोष असतो, तसेच मन लालचावलेले असणे, अधीर असणे, कुणालाही क्षमा न करणे, चोरी करणे इ. मानसिक दुर्गुणही असतात. हे दुर्गुण मांसाचे असारत्व नाहीसे केल्यानंतर नाहीसे होऊ शकतात.
जन्मतः वैगुण्ये : काही शारीरिक व मानसिक वैगुण्ये जन्मतः दिसून येतात. तीही रसायन चिकित्सेने नाहीशी करता येतात. ही वैगुण्ये जर दोन्ही वंशांचा अभ्यास करून लक्षात आली, तर ती पुढील पिढीत येऊ नयेत म्हणून फार श्रम घेतले पाहिजेत. ह्याचा विचार समाजात दृढमूल झाला पाहिजे. लग्न झाल्यावर दोघांच्या शरीरांचे व वंशांचे परीक्षण करून कोणती वैगुण्ये किंवा रोग येण्याचा संभव आहे हे निश्चित करून त्या रोगांना अनुरूप आहार-विहार, व्यसने ही अल्प मुदतीत क्रमाने सोडून तन्नाशक औषधे व आहार-विहार सुरू कारावा. नंतर शोधनाने शुद्धी करून तद् रोगनाशक रसायनांचे सेवन करावे. ह्याच्याही अगोदर आपल्या बंशातील मौलिक गुणांचे रक्षण व वर्धन करण्याकरिता आवश्यक तो आहार-विहार व औषधे ह्यांना प्राधान्य देऊन यांच्या सेवनाला प्रथम सुरुवात करावी. विटाळपणी ज्या गोष्टी करावयास नको त्या समजून घेऊन त्या टाळाव्यात. पतीपत्नींनी रसायन औषधे सतत घ्यावयाची असतात परंतु पुरुषाने गर्भधारणा होईपर्यंत तरी घ्यावीत, स्त्रीने अंगावर मूल पीत असेपर्यंत तरी घ्यावीत व मुलाने तारुण्यात येईपर्यंत तरी घ्यावीत. स्त्रीने गरोदरपणी मासानुमासिक काढे व दूध आणि यांच्याबरोबर वैगुण्य नाहीशी करणारी योग्य रसायन औषधे घ्यावीत. डोहाळे लागतील त्यांचे योग्य पालन करावे व तज्ञांच्या सल्ल्याने वागावे. प्रसूतीनंतर दूध वाढविणारी य वंशागत दोषनाशक औषधांचे सेवन करावे. स्तनालाही लावाले. मुलाला बाळगुटी द्यावी. बाळगुटी ही रसायन चिकित्साच आहे. तिच्यामध्ये हिरडा, वेखंड इ. वयःस्थापन द्रव्येच अधिक असतात व तीही सकाळ-संध्याकाळ नित्य द्यावीत. त्यामुळे मुलाला हवापाण्याचे दोष वाधत नाहीत आणि धातूंचा परिपोष चांगला होतो व ते श्रेष्ठे दर्जाचे निर्माण होते. मधूनच विकार डोकावू लागले, तर लगेच तन्नाशक औषधाची जोड दिली जाते. जन्मतः मुलामध्ये जी वैगुण्ये दिसून येतात ती वैगुण्ये नाहीशी करणारी द्रव्ये प्राधान्याने ह्या गुटीत दररोज उपयोगात आणवीत.
व्यक्तिगत वैगुण्ये: व्यक्तीमध्ये निरनिराळी शारीरिक व मानसिक वैगुण्ये असतात. ती रसायन चिकित्सेनेच बरी होऊ शकतात. दृष्टिदोष असणार्यांनी सतत त्रिफळा, सैंधव, डाळिंब, पक्ष्यांचे मांस, तूप ह्या द्रव्यांचे सेवन केले पाहिजे. व्यक्तीला जो दोष नाहीसा करायचा असेल तो दोष नाहीसा करणार्यां रसायन द्रव्यांच्या सतत सेवनाने नाहीसा करता येतो. दररोज नियमाने सोनामुखी, हिरडा, सुंठ इत्यादीपैकी एखादे द्रव्य नियमाने वर्षानुवर्ष घेणारे लोक पूर्वी पुष्कळ होते. उपःपान, धारोष्ण दूध पिणे इ. नियमही वयःस्थापन करण्याच्याच प्रयत्नाचे निदर्शक होत.
कुटिप्रवेशिक रसायन :कुटीची रचना: कुटिप्रावेशिक रसायनाकरिता कुटीची आवश्यकता असते. ही कुटी ब्राह्मणांचा वेददोषांनी व साधुपुरुषांच्या निवासाने पुनीत झालेल्या पुण्यभूमीत असावी. राजपुरुषांचे नेतृत्व असावे. कुटीसाठी निवडलेले हे स्थान सर्व प्रकारे नियम असावे अर्थात हिस्र प्राण्यांचा, दुर्जनांचा उपसर्ग पोहचणार नाही असे असावे. कुटीत असेपर्यंत लागणाऱ्या औषधी वनस्पती व उपचार साधने केव्हाही मिळू शकतील अशी नगरी ह्या स्थानाजवळ असावी. गावाच्या पूर्वोत्तर दिशेला, भरपूर लांब, रुंद व उंच अशी तीन परिसरयुक्त, बाऱ्याच्या संचाराकरिता सूक्ष्म छिद्रे किंवा जाळ्या यांनी युक्त असलेली, सर्वही ऋतूंत हवामानाचा त्रास होणार नाही अशी स्वच्छ व मनाला प्रसन्न शांत वाटेल अशी कुटी असावी. अभद्र, अश्लील शब्द एकू येऊ नयेत अशी योजना तेथे असावी. स्त्रियांनाही तेथे प्रवेश नसावा (स्त्रियांना जेव्हा रसायन करावयाचे असेल तेव्हा त्या परिसरात पुरुषांना प्रवेश नसावा) आणि आवश्यक ती साधने, उपकरणे नेहमी तेथे असून वैद्य, औषधे व ब्राह्मणाचे साहचर्य हवे तेव्हा प्राप्त होण्याचीही तेथे व्यवस्था असावी.
कुटी प्रवेश : शुभ मुहूर्तावर निर्मल मनाने सर्व प्राणिमात्राशी स्नेहभाव ठेवून श्रद्धेने देव, गो, ब्राह्मण ह्यांची पूजा करून, मुंडन करून, नीट विचार करून कुटी प्रवेश करावा.
स्वस्थ मनुष्याला धातू उत्तमसार बनविण्याकरिता, दोष प्रकृती मनुष्याला प्रकृती दोष नाहीसे करण्याकरिता, रुग्णाला रोग नाहीसे करण्याकरिता आणि असाध्य रुग्णाला असाध्यत्व नाहीसे करून रोगनाश करण्याकरिता कुटीमध्ये ठेवावे. रसायन औषधे प्रकृती, रोग, देश, काळ ह्यांचा विचार करून निवडावयाचे असते, दोष प्रकृती नाशाकरिता त्याला ज्या ऋतूत करे वाटते त्याला त्या ऋतूत कुटीमध्ये ठेवावे, तसेच जीर्ण रोग्याला त्याचा रोग जास्तीत जास्त सौम्य असताना ठेवावे आणि असाध्य रोग्याला मात्र तत्काल ठेवावे.
स्वतंत्र कुटी करून त्या व्यक्तीला तेथे का ठेवायचे? यात शास्त्रकारांचा हेतू असा असला पाहिजे. कुटिप्रावेशिक रसायनामध्ये शरीरातील घटक अगदी नवीन बनवायचे असतात. सोम रसायनासारख्या काही रसायनांत शरीर केवळ सर्वांगव्रणाने युक्त त्वचेने झाकलेला हाडांचा सापळा होत असतो. अशा स्थितीत बाहेरचा कीट, पशू, पक्षी, ऊन, वारा इत्यादीचा कशाचाही उपद्रव त्याला हू नये ह्याकरिता जपावयाचे असते. अशा वेळी त्याची इंद्रिये अधिक नाजूक झालेली असतात म्हणून शांत, अती सौम्य प्रकांशयुक्त, निःशब्द, किंचितही मनाचा क्षोभ करणार नाही असे वातावरण आवश्यक असते. म्हणून कुटीतल्या कुटीत, तिसऱ्या कुटीत, तिसऱ्या कुटीत त्याला ठेवायचे असते.
काही रसायनांत शरीराचे घटक वरीलप्रमाणे अगदी जीर्ण होऊन पुन्हा सर्वश्रेष्ठ प्रतीचे नवीन घटक निर्माण करावयाचे असतात. नख, दात, केस गळूनही नवे यावयाचे असतात. काही कुटिप्रवेशिक रसायने उदा., आमलकी रसायने ही एकांतिक नसतात, तरी पण त्या व्यक्तीलाही शांत, शुची अशा वातावरणाची जरूरी असते.
पूर्वकर्म : कुटिप्रावेशिक रसायन स्वस्थ मनुष्याला घ्यावयाचे असेल, तर रोगहरणाच्या दृष्टीने पूर्वकर्म करावयाचे नसते, तर ऋतुकालीन दोष संचय नाहीसे करण्याकरिता प्रकुपित दोष शरीरातून काढावयाचे असतात. रसायनाला काळाचे बल असणे आवश्यक आहे आणि हे हेमंत ऋतूमध्ये उत्तम बल असते. त्या वेळेला रसायन घेणे हे उत्तम होय. शरद्कालीन पित्थाचा प्रकोप होत असतो. त्याचे शोधन करून रसायन द्यावे. त्याकरिता प्रथम पित्तशामक व रक्तदोषनाशक अशी घृते देऊन स्निग्ध झाल्यानंतर स्वेदन करावे. विधिपूर्वक शिरेतून रक्तस्त्राव करावा, नंतर रेचक द्यावे, रेचक म्हणून हिरड्याचा उपयोग करमे जास्त चांगले. रेचनानंतर पेयादी क्रम करून शरीर पूर्वस्थितीला आल्यानंतर त्याला पातळ यवागुवर ठेवावे. यवागूमुळे शरीरामद्ये शुद्धीनंतरच्या काळामध्ये जर मलसंचय झाला असेल, तर तो नाहीसा होतो. असा कोठा शुद्ध व हल्का झाल्यानंतर रसायन सुरू करावे. ह्या पूर्वकर्म काळात क्रमाने ध्यान-धारणादि कर्मामध्ये त्याने आपला काळ घालवून कुटीतील कांतवासामध्ये आपली प्रसन्नता कशी सतत टिकवली जाईल ह्याकरिता अभ्यास केला पाहिजे.
अस्वस्थ व्यक्तीला (रोगनाशाकरिता) रसायन द्यावयाचे असेल, तर रोग, दोष व प्रकृती ह्यांना अनुसरून शोधन द्यावे.
रसायन करण्याच्या मुख्य ध्येयाला अनुसरून रोग व त्याचे दोष ह्यांना अनुसरून स्नेह द्यावे. उदा., बुद्धी, स्मृती इ. ह्या बलवान व्हाव्यात म्हणून रसायन द्यावचाये असेल, तर बुद्धी-स्मृतिवर्धक द्रव्यांनी सिद्ध केलेले गाईचे तूप देऊन स्नेहन करावे.
प्रधानकर्म : शरीर शुद्ध व जीर्ण मलविरहित झाल्यानंतर त्याला कुटीमध्येच धार्मिक विधी केल्यानंतर सकाळी रसायन द्रव्य द्यावयाचे असते. ते पचल्यानंतर गाईचे दूध, तूप व साखर ह्यांबरोबर भात द्यावयाचा असतो. जब, तीळ ह्यांचाही अन्नामध्ये उपयोग करावयाचा असतो पण बहुतेक ठिकाणी तांदळाचाच उपयोग सांगितला आहे.
दूध-तूप-तांदूळ ह्यांचाच प्राधान्याने उपयोग करावयाला सांगितलेला दिसून येतो ह्याचे मुख्यकरून असे कारण की, तांदळापासून पुरीषमल जास्त उत्पन्न होत नाही व शरीर घटक नवे निर्माण करण्याची पात्रता म्हणजे जनन शक्ती ह्या तीनही आहार्य द्रव्यांत प्रामुख्याने आहे. म्हणून रसायन काळात ह्यांचाच आहार करावयास सांगितलेला आहे.
कुटीत असताना त्या व्यक्तीने नियमित वेळी रसायन द्रव्य सेवन केल्यानंतर त्याच्या पचनानंतर चांगली भूक लागल्यानंतर आहार घ्यावा. इतर वेळी नियमितपणे भुकेला अनुसरून गाईचे दूध सेवन करावे. योग्य वेळी य योग्य तितकी झोप घ्यावी. बाकीच्या काळात आपल्या आराध्य देवतेचे चिंतन करीत स्वस्थ आसनस्थ बसावे. कोणत्याही इंद्रियांना ताण पडेल असे करू नये. कोणतेही विचार मनात येऊ न देता चिंतनामध्ये वेळ घालवावा. ह्याची सवय पूर्वकर्मामध्ये हळूहळू लावली जातेच.
पश्चातकर्म : रसायनविधी पूर्ण झाल्यानंतर आतल्या कुटीतून मधल्या कुटीत नंतर बाहेरच्या कुटीत एक एक आठवडा ठेवून नंतर त्याला चौदा दिवसांनी कुटीबाहेर काढावे. ह्या काळात बंद करून आहार मात्र तोच द्यावा. बाहेर आल्यानंतर एकांतहितकर गहू, जव, मूग, दूध, तूप इ. द्रव्यांपैकी विशेषतः त्याला पूर्वी सात्म्य व प्रकृतीला योग्य असलेले अन्न देण्याला सुरुवात करावी. ते अन्न देताना पातळ-दाट आणि नेहमीच्या स्वरूपात (घन) असे क्रमाक्रमाने देण्याला सुरुवात करावी. पूर्ण आहारावर आल्यानंतर वातातपिक रसायनांपैकी योग्य ते रसायन देऊन नित्य व्यवसायाला त्याने सुरुवात करावी. त्यानंतरही तोच आहार ठेवला, तर रसायनाचे फल कायमचे टिकून राहील.
रसायन व वाजीकरण : ही दोन्ही स्वस्थ मनु८ष्याला बल व उत्साह निर्माण करणारी असतात. सर्व धातूंचा बल, पुष्टी देणारे ते रसायन होय आणि जे प्राधान्याने शुक्र धातूला बल, पुष्टी देते ते वाजीकरण होय. रसायन द्रव्य हे परिणामी वाजीकरण होऊ शकते पण वाजीकरण द्रव्य हे परिणामी रसायन होऊ शकतेच असे नाही. [⟶ वाजीकरण].
उपसंहार : मानवी जीवन सर्वांगीण परिपूर्ण व संपन्न करावयाचे असेल, तर रसायनसेवन हे सर्वोत्तम साधन आहे. ह्या साधनाने मानव सर्वोत्तम आदर्श मानवी जीव निर्माण करू शकतो. कल्याणकार, महान पुरुषोत्तमाचे दर्शन रसायनसेवनाने शक्य होते. रसायन हे एकमेव संजीवनी आहे.
पटवर्धन, शुभदा अ.
“