रवींद्र संगीत : रवींद्रनाथ टागोरांनी प्रवर्तित केलेला एक वैशिष्ट्यपूर्ण संगीतप्रकार. भारतात एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकांत जी कलात्मक-सांस्कृतिक क्रांती झाली, त्याचे बरेचसे श्रेय गुरुदेव ⇨ रवींद्रनाथ टागोर यांच्याकडे जाते. इतकेच नाही, तर ते त्या क्रांतीचे एक प्रमुख प्रणेतेच होते, असे म्हणावयासही हरकत नाही. त्यांनी जवळजवळ तीन हजार गाणी लिहिली आणि ती स्वरबद्धही केली. कवी आणि संगीतकार ह्यांचा सुरेख संगम त्यांच्या व्यक्त्तिमत्त्वात दिसून येतो. रवींद्रनाथांची हीच गीते पुढे ‘रवींद्रसंगीत’ ह्या नावाने प्रसिद्धी पावली. लहानपणी काही काळ त्यांनी शास्त्रीय संगीताचा अभ्यास केला. त्यांच्या घरी नित्य संगीताच्या बैठकी होत असत. त्यावेळचे प्रसिद्ध संगीतज्ञ यदुभट्ट, विष्णुचक्रवर्ती, राधिका गोस्वामी ह्यांच्या मधुर गायनाने त्या रंगत असत आणि ह्याच शास्त्रीय संगीताच्या प्रभावामुळे रवींद्रनाथांच्या संगीतरचना वैशिष्ट्यपूर्ण व परिपूर्ण ठरल्या. शास्त्रीय संगीताप्रमाणेच त्यांनी लहानपणी बंगालची लोकगीतेही खूप ऐकली होती. पद्मा नदीवर नाव चालविण्याऱ्या कोळी लोकांची भटियाली गीते, गावोगाव भ्रमंती करणाऱ्या संन्यासी लोकांची बाउल गीते, तसेच राधा-कृष्णाच्या रूपलीलावर्णनांची भजने, कीर्तने ह्या सर्वांचे उत्कट संस्कार त्यांच्यावर झाले. त्यांतील स्वर त्यांच्या रचनेत एकरूप झालेले दिसतात.
रवींद्रनाथांनी जी अनेक देशभक्त्तीपर गीते, धर्मगीते, प्रेमगीते, अनुष्ठानिक गीते लिहिली, त्यांत मुख्यतः भावनाविष्कार आणि प्रसंगानुरूप वातावरणनिर्मितीस आवश्यक अशी शब्दरचना आणि स्वर ह्यांचा समन्वय दिसून येतो.
रवींद्रसंगीताचे सामान्यतः तीन गटांत वर्गीकरण केले जाते : (१) त्यांच्या प्रारंभीच्या गीतांमध्ये शास्त्रीय संगीताचे आणि लोकसंगीताचे स्वर जसेच्या तसे उतरलेले दिसतात (२) दुसऱ्या प्रकारच्या गीतांत प्रचलित स्वरांबरोबरच त्यांचे स्वतःचे स्वर मिसळलेले दिसतात आणि (३) तिसऱ्या प्रकारच्या गीतांत गुरुदेवांची स्वयंभू स्वररचना दृष्टोत्पत्तीस येते.
काव्य व संगीत यांच्या सहसंवादित्वाच्या संदर्भात रवींद्रनाथांची भूमिका अशी असावी : वाक्य जिथे संपते, तिथूनच गाण्याची सुरुवात होते. ज्याला वाक्य प्रकट करू शकत नाही, त्याला गाणे प्रकट करते आणि म्हणूनच ते अनिर्वचनीय आहे.
भारतातील प्रचलित अशा संगीतशैलींहून रवींद्रसंगीताची शैली भिन्न आहे. गुरुदेवांची गाणी रागांत निबद्ध आहेत पण ख्यालाच्या बंदिशींसारख्या आलाप-तान घेऊन ती गायची पद्धत नाही. गुरुदेवांनी म्हटलेच आहे की, ‘मी माझ्या गीतांमध्ये असे अंतरच ठेवले नाही, की दुसरे कोणी ते भरून काढतील आणि त्यामुळे मी संतुष्ट होईन’.
त्यांची पुष्कळशी गीते भैरवी, खमाज, काफी, पिलू, मल्हार, बिहाग, यमन वगैरे रागांमध्ये रचलेली आहेत. कित्येक रागांत मिश्र राग आसावरी-भैरवी, दरबारी-तोडी-भैरवी, भैरव-भैरवी, मुलतानी-भीमपलासी येतात. तसेच काही गीतांचे स्वर राग-नियमांपासून मुक्त्त असलेलेही आढळतात. रागांच्या सीमा त्यांनी निःसंकोचपणे ओलांडल्या आहेत. त्यांनी आपल्या गीतांत भावनानुरूप शब्दयोजनेला पुरेपूर महत्त्व दिले आणि म्हणूनच त्यांच्या रचनांत नवीन प्रकारच्या छंदांचा आविष्कार झाला. छंदांसाठी नवीन ताल निर्माण करून त्यांनी संगीताचे साहित्य आणि व्याकरण समृद्ध केले. उदा., झपताल –५ मात्रा, षष्ठीताल –६ मात्रा, रूपकडाताल –८ मात्रा, नवताल –६ मात्रा, एकादशी ताल –११ मात्रा, नवपंचताल –१८ मात्रा.
त्यांची स्वरलिपी-पद्धती ही भातखंडे व पलुस्कर पद्धतींशी मिळतीजुळती असूनही त्यात त्यांची वेगळी व स्वतंत्र अशी स्पष्ट प्रतिमा दिसून येते. कोमल आणि तीव्र स्वरांकरता त्यांनी स्वतंत्र अक्षरांचा उपयोग केला. कोणत्या गीतामध्ये कोणत्या शब्दानंतर, किती थांबायचे, कितीवेळा पुनरावृत्ती करायची, कुठे अनुकोमल, अतिकोमल स्वर गायचे, हे दर्शविण्यासाठी त्यांनी स्वतंत्र संकेतचिन्हांचा उपयोग केला.
त्यांच्या स्वररचनेतील सु. तीनचारशे रचना प्रसिद्ध आहेत आणि त्यांपैकी तीन-चार गीतांना तर आंतरराष्ट्रीय ख्याती लाभली आहे : उदा.,
(१) ‘जन-गण मन अधिनायक जय हे भारत भाग्यविधाता।’
(२) ‘जदि तोर डाक शुने केऊ ना आसे तबे एकला चलो रे।’
(३) ‘आमार शोनार बांगला आमि तोमास भाल बासि।’
इत्यादी.
रवींद्रसंगीताचे संगीतलेखन तपशीलवार झालेले असून ते जसेच्या तसे गाण्याची रूढी प्रबल आहे. या बाबतीत भारतीय संगीताच्या बहुतेक रागसंगीतापेक्षा ते निराळे पडते. बंगालबाहेर या संगीताचा प्रसार फारसा नसला, तरी एका संवेदनशील, प्रतिभावान कवीकलाकाराने शब्द व स्वर यांचे नाते निश्चित करण्याचा कसोशीने प्रयत्न केला आहे, ह्याचे भान संगीताभ्यासकांनी ठेवणे आवश्यक आहे. रवींद्रसंगीत गायकमालेतील पंकज मलिक, सुचित्रा मित्र, संतोष सेनगुप्ता, द्विजेंद्र मुकर्जी, कनिका बॅनर्जी, हेमंत मुकर्जी हे खास उल्लेखनीय गायक होत. सध्या रवीद्रसंगीताचे विधीवत शिक्षण ‘रवींद्र भारती’, कलकत्ता आणि ‘विश्वभारती’, शांतिनिकेतन येथे दिले जाते. ह्याशिवाय भारताच्या अन्य काही भागांतही रवींद्रसंगीताच्या शिक्षणक्रमाची सुविधा उपलब्ध आहे.
सेन, अनिता (इं) गोरे, रेखा (म.)