रफी, महंमद हाजी  : (२४ डिसेंबर १९२४–३१ जुलै १९८०). भारतीय चित्रपटसृष्टीतील एक नामवंत पार्श्वगायक. अमृतसर जिल्ह्यातील कोटला सुलतानसिंग या गावी एका सधन शेतकरी कुटुंबात जन्म. छोट्या रफीला शेतीची किंवा शिक्षणाची आवड नाही, असे पाहून त्याच्या थोरल्या भावाकडे लाहोरला धाडण्यात आले. थोरल्या भावाने रफीचे गाण्याचे अंग लगेच हेरले व छोटे गुलाम अली खाँसाहेब, अब्दुल वहीद खाँसाहेब अशा उस्तादांकडून त्याला गाणे शिकवण्याची व्यवस्था केली. रफीची रागदारी पक्की झाली, ती याच काळात. पुढे रफीने फिरोझ निझामी यांच्याकडे दोन वर्षे शागिर्दी केली. निझामी जेव्हा लाहोर नभोवाणी केंद्राचे संगीत-दिग्दर्शक झाले, तेव्हा त्यांनी महंमद रफीला नभोवाणीवर गायनाची संधी दिली. पुढे निझामी यांची दिल्ली केंद्रावर बदली झाली, तेव्हा रफीही दिल्लीस गेला. दरम्यान लाहोरला चित्रपट-निर्मिती सुरू झाली होती. गुलबलोच (१९४४) या पंजाबी चित्रपटात संगीत-दिग्दर्शक श्यामसुंदर यांनी रफीला दोन गीते गाण्याची संधी दिली. दिग्दर्शक नाझीर यांच्या आग्रहामुळे रफी मुंबईच्या चित्रपटासृष्टीत आला आणि त्याने नाझीरच्या लैला मजनू (१९४५) या चित्रपटात छोटी भूमिकाही केली. तथापि रफीच्या गळ्याची व गायकीची ओळख असणारे संगीतकार त्यावेळी मुंबईत नव्हतेच. योगायोगाने लाहोरचे संगीत-दिग्दर्शक श्यामसुंदर त्याचवेळी मुंबईत आले व त्यांनी रफीला गाँव की गोरी (१९४५) या पहिल्याच हिंदी चित्रपटात पार्श्वगायनाची संधी दिली. तरीही रफीचे मुंबईत नीट बस्तान बसले नाही. समूहगीतांत भाग घेणे (समाज को बदल डालो, १९४७) चित्रपटांत छोट्या भूमिका करणे या मार्गांनी चित्रपटसृष्टीत स्थिरस्थावर होण्यासाठी त्याची धडपड चालू होती. सुदैवाने रफीचे गुरू फिरोझ निझामी हे त्याच वेळेस जुगनू (१९४७) या चित्रपटाचे संगीत-दिग्दर्शक म्हणून मुंबईत आले व साहजिकच रफीला त्या चित्रपटात पार्श्वगायक म्हणून संधी मिळाली. त्या चित्रपटातील ‘यहाँ बदला वफाका’ या नूरजहाँबरोबर गायलेल्या द्वंद्वगीतामुळे रफीची खास पंजाबी ढंगाची गायकी एकदम लोकप्रिय झाली. १९४८ साली निघालेल्या प्यार की जीत या चित्रपटातील ‘इस दिल के टुकडे हजार हुए’ या हुस्नलाल-भगतराम यांनी स्वरबद्ध केलेल्या गाण्यामुळे रफीला अधिक प्रसिद्धी मिळाली व ती पुढे सतत वाढतच गेली. ३६ वर्षांच्या कालावधीत महंमद रफीने भजन, रागदारी, गजल, कवाली अशा निरनिराळ्या गीतप्रकारांमध्ये सु. २५ हजारांवर गाणी आपल्या दर्दभऱ्या, मुलायम आवाजात गाऊन प्रथम श्रेणीचा पार्श्वगायक म्हणून कीर्ती मिळविली. दिलीपकुमार, अशोककुमार यांपासून ते ऋषीकपूरपर्यंत बहुतेक सर्व चित्रपटांतील नायकांना त्याने आपला ‘उसना आवाज’ दिला. गुलाम हैदर, नौशाद, शंकर-जयकिशन, ओ. पी. नय्यर, रोशन, सचिनदेव बर्मन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, आर्‌. डी. बर्मन, कल्याणजी-आनंदजी यांसारख्या हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध संगीत-दिग्दर्शकांची गाणी रफीने गायली व लोकप्रिय केली.

 

विविध भावनांचा विविध ढंगांतील तरल, उत्कट, नाट्यपूर्ण, खेळकर, जोशपूर्ण आविष्कार करणारी अतिशय लवचिक, दर्दभरी, पल्लेदार, हळुवार व मुलायम अशी स्वरसंपदा रफीजवळ होती. परदेशांत अनेक वेळा त्याने आपल्या संगीताचे कार्यक्रम केले. उत्तम पार्श्वगायक म्हणून त्यांला सहा वेळा ‘फिल्म फेअर’ पुरस्कार मिळाले. ते पुढीलप्रमाणे : ‘चौदहवी का चाँद हो या आफताब हो’ (चौदहवी का चाँद), ‘तेरी प्यारी प्यारी सूरत को’ (ससुराल), ‘चाहुंगा मैं तुझे शाम सबेरे’ (दोस्ती), ‘बहारो फूल बरसाओ’ (सूरज), ‘दिल के झरोखे में तुझको बिठाकर’ (ब्रह्मचारी), ‘क्या हुआ तेरा वादा’ (हम किसी से कम नहीं). चित्रपटगीतांखेरीज ‘बापूजी की अमर कहानी’ यांसारखी देशभक्त्तिपर आणि इतरही गीते त्याने गायली आहेत.

१९७३ साली रफीला ‘पद्मश्री’ हा किताबही मिळाला. असा हा हसऱ्या चेहऱ्याचा मनमिळाऊ पार्श्वगायक मुंबई येथे पैगंबरवासी झाला.

धारप, भा. वि.