रथ, मृत्युंजय : (१८८२–१९२४). ओडिया समीक्षक, चरित्रकार, निबंधकार, कवी व प्राच्यविद्यापंडित. तेव्हाच्या बिहार व ओरिसा प्रांतांतून संस्कृत उपाधी (टायटल) परीक्षेत ते सर्वप्रथम येऊन त्यांना सुवर्णपदकही मिळाले होते. ओरिसातील विविध ठिकाणच्या सरकारी शाळांतून त्यांनी संस्कृत अध्यापनाचे काम केले. ‘पंडित’ ह्या उपाधीने ते संबोधिले जात. संस्कृतचे ते प्रकांड पंडित असले, तरी त्यांचे लेखन मात्र ह्या पांडित्याने भारभूत झाले नाही. अत्यंत साध्या, पारदर्शी, काटेकोर व प्रवाही शैलीत त्यांनी आपले लेखन केले. वयाच्या अवघ्या बेचाळिसाव्या वर्षी ऐन उमेदीच्या काळात त्यांचे निधन झाले.

आधुनिक ओडिया समीक्षेचे ते एक जनक मानले जातात. त्यांनी अनेक प्राचीन व मध्ययुगीन ओडिया कवींवर जे चिकित्सक चरित्रपर निबंधलेखन केले आहे, ते चिरंतन महत्त्वाचे असून ओडिया साहित्यात घातलेली ती महत्त्वाची भर मानली जाते. यांतील सर्वोत्कृष्ट ग्रंथ ⇨सारळा दासांवरील (सारळा चरित, तिसरी आवृ. १९२४) मानला जातो. त्याव्यतिरिक्त्त प्राचीन व अर्वाचीन कवींच्या ग्रंथांचे त्यांनी उत्तम संपादनही केले आहे.

प्रख्यात संस्कृत नाटकांचे-उदा., कुमारसंभव, विक्रमोर्वशीयम्‌, मुद्राराक्षस इ.-त्यांनी ओडियात सुंदर अनुवादही केले आहेत.

काही प्रख्यात भारतीय व ओडिया स्त्रियांची त्यांनी जी शब्दचित्रे रेखाटली, ती नारी-दर्पण (१९१७) नावाने संगृहीत आहेत. शैलीच्या दृष्टीने ओडिया साहित्यातील या प्रकारचा हा वैशिष्टापूर्ण ग्रंथ होय. कर्मयोगी गौरीशंकर (चरित्र, १९२५), प्रबंधपाठ (निबंध) व नराज (काव्य-तिसरी आवृ. १९२८), रसावली (काव्य-दुसरी आवृ. १९२९) हे त्यांचे इतर उल्लेखनीय ग्रंथ होत.⇨रवींद्रनाथ टागोर व ⇨मधुसूदन राव यांनी घालून दिलेल्या काव्यादर्शांना अनुसरून त्यांनी आपले सुंदर काव्यलेखन केले आहे.

दास, कुंजविहारी मिश्र, नरेंद्र (इं.) सुर्वे, भा. ग. (म.)