रत्नपूर : श्रीलंकेतील ‘रत्नभांडार’ म्हणून प्रसिद्ध असलेले शहर व याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या ३७,३५४ (१९८३). हे देशाच्या नैर्ऋत्य भागात कोलंबोच्या आग्नेयीस ६० किमी.वर काळूगंगा नदीकाठी एका टेकडीच्या पायथ्यालगत वसलेले आहे. देशाच्या प्रमुख रबर आणि भात उत्पादक प्रदेशातील हे शहर रत्नांना पैलू पाडणे आणि व्यापार यांसाठी विशेष प्रसिद्ध आहे.

प्राचीन काळापासून (सु. ३,००० वर्षांपूर्वी) येथील मौल्यवान खड्यांविषयी माहिती असावी. सॉलोमन या हिब्रू राजाने येथून मौल्यवान रत्ने मागविली होती असे सांगितले जाते. अरेबियन नाइट्समधील सिंदबादच्या वर्णनांतही या शहरातील रत्नांविषयीचे उल्लेख होते. त्यामुळे आशिया आणि यूरोपमध्ये हे शहर प्रसिद्धीला आले.

शहराच्या परिसरात व आसपासच्या नद्यांच्या खोऱ्यांत अनेक मौल्यवान रत्नांच्या खाणी असून त्यांतून नील, माणिक, वैदूर्य, पुष्कराज, जमुनिया, झिकॅान, चंद्रशिला इ. मौल्यवान रत्ने मिळतात. यांशिवाय याच्या परिसरात ग्रॅफाइटच्याही खाणी आहेत. यांच्या उत्पादनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत या शहराला महत्त्वाचे स्थान आहे. शहराजवळील टेकडीवर पोर्तुगीजांनी बांधलेला एक किल्ला असून येथील ‘महासामन देवल’ हे बौद्ध मंदिर प्रसिद्ध आहे. शहराच्या परिसरात रबर, चहा, भात, सुपारी, नारळ, भाजीपाला इ. शेतीउत्पादने घेतली जातात. येथे एक वातावरणविज्ञानविषयक वेधशाळा आहे.

चौंडे, मा. ल.