रणजी : (१० सप्टेंबर १८७२ – २ एप्रिल १९३३). थोर भारतीय क्रिकेटपटू. पूर्ण नाव कुमार श्री रणजितसिंहजी. नवानगरच्या जामसाहेबांचे ते वारस होत. त्यांचा जन्म जामनगरजवळच्या सरोदर या खेडेगावात झाला. राजकोटच्या ‘राजकुमार कॉलेज’मध्ये वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी शिक्षणास प्रारंभ केला. तिथेच त्यांना क्रिकेटची गोडी लागली. कॉलेजचे प्राचार्य क्रिकेटतज्ञ चेस्टर मॅक्नॉटन ह्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ रणजींना झाला. त्यांनीच रणजींचे उपजत क्रीडागुण हेरले.
लवकरच ते फलंदाजीत व विशेषतः फटकेबाजीत पारंगत झाले. क्रिकेटबरोबरच रणजी टेनिस आणि बिल्यर्ड्झ या खेळांतही प्रवीण होते पण त्यांचा कल क्रिकेटकडेच जास्त होता. १८८८ साली ते उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. ‘सेंटफेथ’ शाळेत शिकत असताना त्या शाळेचे मुख्याध्यापक गुडचाईल्ड यांच्या नजरेत रणजींचा खेळ भरला. त्यांनी रणजींना सर्वतोपरीने उत्तेजन दिले व हेवर्ड, रिचर्ड्सन, वॉट्स, लॉक्वुड अशा कसलेल्या गोलंदाजांची गोलंदाजी त्यांना खेळायला लावली. पण वेगवान गोलंदाजाचा चेंडू अंगावर आला, की रणजी घाबरून बाजूला सरत. हे पाहून त्यांच्या क्रिकेटशिक्षकाने त्यांचा उजवा पाय खुंटीला बांधून ठेवला व तशा स्थितीत त्यांना वेगवान गोलंदाजी खेळायला लावली. परिणामी ते वेगवान गोलंदाजीला निर्भयपणे सामोरे जाऊ लागले. तदनंतर त्यांनी अपार कष्ट घेऊन आपल्या खेळात खूप सुधारणा व प्रगती घडवून आणली. १८८८ साली इंग्लंड-ऑस्ट्रेलियातील कसोटी सामने पाहिल्यानंतर आपणही मोठे क्रिकेटपटू व्हावे, अशी महत्त्वाकांक्षा त्यांच्या मनात निर्माण झाली. १८९२ साली ट्रिनिटी महाविद्यालयाच्या व १८९३ साली केंब्रिज विद्यापीठाच्या संघांत त्यांची निवड झाली. १८९४ साली त्यांचा समावेश ‘मेरिलीबोन क्रिकेट क्लब’च्या (एम्. सी. सी.) संघात झाला. १८९५ सालापासून रणजींचे क्रिकेटमधील खरे तेज लोकांना दिसू लागले. त्याच साली ससेक्स परगणा संघात त्यांचा सन्मानपूर्वक अंतर्भाव झाला. भारतीय खेळाडू परगणा संघातून क्रिकेट (कौंटी क्रिकेट) खेळण्याच्या योग्यतेचे नसतात, हा इंग्रजांचा समज रणजींनी आपल्या खेळाने चुकीचा ठरवला. पहिल्याच सामन्यात (१८९५) ‘एम्. सी. सी.’ विरुद्ध शतक झळकवून त्यांनी लॉर्ड्सचे मैदान गाजवले. त्यानंतर त्यांच्या शतकांचा जोरदार धडाका सुरू झाला.
त्यावेळेपासूनच त्यांचे नाव मान्यवर फलंदाजांच्या नामावळीत समाविष्ट झाले. १८९६ साली पहिल्याच कसोटी सामन्यात इंग्लंडतर्फे त्यांची निवड झाली असती पण एम्. सी. सी.चे त्यावेळचे अध्यक्ष लॉर्ड हॅरिस हे वर्णद्वेष्टे होते. ब्रिटिश नागरिक नसल्याने रणजींना इंग्लंडतर्फे खेळता येणार नाही, असा त्यांनी निर्णय दिला. त्यामुळे मोठीच खळबळ माजली. पण मँचेस्टरच्या दुसऱ्याच कसोटीमध्ये रणजींची निवड झाली. त्यात रणजींनी पहिल्या डावात ६२ व दुसऱ्या डावात नाबाद १५४ धावा काढून आपल्या पहिल्याच कसोटी पदार्पणात शतक फडकावण्याचा बहुमान मिळवला. १८९७-९८ च्या हंगामात रणजी इंग्लंड संघातर्फे ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेले. तिथेही सिडनी येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात त्यांनी १७५ धावा टोलवल्या. १९०२ पर्यंत रणजी एकूण १५ कसोटी सामने खेळले. त्यांतील २६ डावांत त्यांनी एकूण ९८९ धावा काढल्या असून, त्यांत २ शतके आहेत व त्यांनी ४४·९५ धावांची सरासरी गाठली आहे. ते ससेक्सकडून १९०४ पर्यंत खेळत राहिले. नंतर मात्र त्यांच्या खेळात खंड पडला. कारण १९०७ साली ते नवानगरचे जामसाहेब झाले. त्यामुळे १९०८, १९१२ व १९२० या तीन हंगामांतच ते इंग्लंडमध्ये पहिल्या दर्जाचे सामने खेळले. त्यांच्या संपूर्ण क्रिकेट कारकीर्दीचा तपशील असा : एकूण ५०० सामने २४,६९२ धावा २८५ सर्वोच्च (नाबाद) ७२ शतके (त्यांत १४ द्विशतके) आणि ५६·३७ सरासरी. तसेच १८९९ व १९०० या लागोपाठच्या दोन हंगामांत त्यांनी प्रत्येकी तीन हजारांवर धावा काढल्या. १९०० साली अकरा शतके (त्यांत ५ द्विशतके) ठोकली व ८७·५७ धावांची सरासरी साधली. एकाच महिन्यात एक हजार धावा पूर्ण करण्याचा पराक्रम त्यांनी आपल्या कारकीर्दीत तीन वेळा केलेला आहे. रणजी हे ‘ग्लान्स’ फटक्याबद्दल प्रख्यात होते. त्या फटक्याचे जनकत्वही त्यांच्याकडेच जाते. तसेच त्यांचा ‘हुक’चा फटकाही अप्रतिम होता. त्यांचे हे फटके पाहण्यासाठी प्रेक्षक अतोनात गर्दी करीत. भारतात जन्मलेले व इंग्लंडतर्फे खेळणारे तेच पहिले भारतीय खेळाडू होत. पुढे त्यांचे पुतणे दुलीपसिंहजी व पतौडीचे थोरले नवाबही इंग्लंडकडून खेळले. भारताला कसोटी सामन्याचा अधिकृत दर्जा मिळण्यापूर्वीच रणजी कसोटीत खेळलेले आहेत हे त्यांच्या कारकीर्दीचे एक वैशिष्ट्यच. रणजींनी इंग्लिश क्रिकेटला पौर्वात्य चमक व शैली दिली, असे म्हटले जाते. ‘रणजी हे एका छोट्या संस्थानचे राजकुमार असले,तरी खेळाच्या साम्राज्यातील सम्राट आहेत’, असे गौरवोद्गार त्यांच्याबद्दल ए. जी. गार्डनर या सुप्रसिद्ध इंग्लिश लेखकाने काढलेले आहेत. इंग्लिश खेळाडूंपेक्षा सरस खेळाडू भारतातही निर्माण होऊ शकतात, हे त्यांनी कृतीने सिद्ध केले. जामनगर येथे त्यांचे निधन झाले.
भारतात मात्र रणजी पहिल्या दर्जाचे क्रिकेट खेळले नाहीत. तथापि त्यांची स्मृती जागृत रहावी, म्हणून भारतातील राष्ट्रीय विजेतेपदाच्या क्रिकेट स्पर्धेला रणजींचे नाव देण्यात आलेले आहे. भारतात रणजी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा १९३४ पासून ते आजतागायत सातत्याने चालू आहेत. देशाचे एकूण पाच विभाग कल्पून, त्यांतील निरनिराळ्या राज्यांच्या क्रिकेट संघांमध्ये या स्पर्धा भरवल्या जातात व अंतिम विजेत्या संघास रणजी करंडक बहाल करण्यात येतो.
संदर्भ : 1. Raiji, Vasant, Ed., Ranji, A Centenary Album, Bombay 1972.
2. Ross, Alan, Ranji, London, 1983.
३. अभ्यंकर, शंकर, रणजी, पुणे, १९७५.
४. रायजी, वसंत अनु. काळे, श्री. वा. रणजी, पुणे, १९६५.
पंडित, बाळ ज.
“