रक्तमूल : (इं. रेडरूट, डायर्स अल्काना, अल्कानेट लॅ. अल्काना टिंक्टोरिया कुल-बोरॅजिनेसी). फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] द्विदलिकित (बियांत दोन दलिका अथवा दले असलेल्या) वनस्पतींच्या वर्गातील ही सु. १५ –२० सेंमी. उंच, केसाळ, बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी) व पसरट वाढणारी लहान वनस्पती [⟶ ओषधि] मूळची द. व पू. यूरोप व पू. भूमध्यसामुद्रिक प्रदेशातील असून तिची लागवडही करण्यात येते. हिच्या अल्काना या प्रजातीत सु. २५ – ३० जाती असून त्यांचा प्रसार द. यूरोप व भूमध्यसामुद्रिक प्रदेशापासून इराणपर्यंत आहे. भारतात ही वनस्पती असल्याचा उल्लेख नाही. हिची पाने साधी, एकाआड एक व केसाळ असतात. फुले लहान, जांभळट, तुतारीसारखी असून त्यांच्या कंठात बारीक व पातळ खवले असतात आणि ती झुबक्यांनी येतात. फळ लहान, शुष्क आणि कठीण आवरणाचे [कपालिका ⟶ फळ] असते. इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨बोरॅजिनेसी अथवा भोकर कुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात. नवीन लागवड बियांपासून करतात.
मुळांच्या सालीत अल्कानीन किंवा अँकूसीन द्रव्य असते म्हणून या वनस्पतीची परदेशात लागवड करतात या द्रव्यापासून अल्काना (अल्कानेट) हा लाल रंग काढतात तेले, पोमेड, औषधे, मद्ये इत्यादींत, तसेच रेशीम व सूत रंगविण्यास व प्रयोगशाळेत रंगद्रव्य म्हणून त्याचा उपयोग करतात.
अल्कानेट किंवा बग्लॉस ही संज्ञा अँकूसा या बोरॅजिनेसी कुलातील प्रजातीला वापरलेली आढळते आणि अल्काना व अँकूसा या संज्ञा समानार्थी असल्याचा उल्लेख आहे. इटालियन अल्कानेट, टफ्टेड अल्कानेट व कॉमन अल्कानेट ही नावे अनुक्रमे अँकूसा ॲझूरिया, अँ. सीस्पिटोजा व अँ. ऑफिसिनॅलिस या जातींना वापरात आहेत. या सर्व जाती शोभेकरिता उद्यानांतून लावतात.
संदर्भ : 1. Bailey, L. H. The Standard Cyclopedia of Horticulture, Vol. I, New York, 1961.
2. Lawrence, G. H. M. Taxonomy of Vascular Plants, New York, 1965.
परांडेकर, शं. आ.
“