रंगमंच : (स्टेज). रंगमंच म्हणजे ज्या भूमीवर किंवा जागेवर प्रत्यक्ष नाटकाचा प्रयोग होतो ती जागा. याला रंगपीठ किंवा इंग्रजीत स्टेज असे म्हटले जाते.

रंगमंचविषयक कल्पना देशकालपरत्वे सतत बदलत गेलेल्या आहेत. रंगमंचासंबंधीचा प्राचीन काळातला विचार भारत आणि ग्रीस देशांत झालेला आढळतो. नाटक, नाट्यगृह आणि रंगमंच यांचा निकटचा परस्परसंबंध आहे. भारतीय रंगमंचाची-नाट्यगृहाची संकल्पना ही ग्रीक नाट्यगृहाच्या संकल्पनेवरून घेतली आहे, असा अनेकांचा समज आहे पण वस्तुस्थिती तशी नाही. भरतमुनींच्या नाट्यशास्त्रात नाट्यमंडप, नाट्यगृह इ. शब्दप्रयोग आलेले आहेत. नाट्यगृहाचे, त्यातल्या रंगमंचाचे स्वरूप काय असावे, त्याची बांधणी कशी असावी यांविषयीचे तपशीलही दिलेले आहेत. यावरून भरतमुनींच्या आधीपासून रंगमंचविषयक विचार भारतामध्ये झालेला होता.

भरतमुनींनी नाट्यगृहाचे तीन प्रकार सांगितले आहेत : (१) विकृष्ट, (२) चतुरस्त्र व (३) त्र्यस्त्र. ह्या तीन प्रकारांत ज्येष्ठ, मध्यम, कनिष्ठ असे भेद वर्णिलेले आहेत. देवांकरता ज्येष्ठ नाट्यगृह, राजेलोकांकरता मध्यम नाट्यगृह आणि सर्वसामान्यांसाठी कनिष्ठ नाट्यगृह असा फरक केलेला असे. विकृष्ट नाट्यगृहातील योजना पुढीलप्रमाणे असे : एकूण नाट्यगृह चौसष्ट हात म्हणजे सु. ९६ फूट लांब आणि बत्तीस हात म्हणजे सु. ४९ फूट रुंद असे. या संपूर्ण क्षेत्राचे पूर्व-पश्चिम भाग करीत. पश्चिमेकडील भागात नेपथ्यभूमी असे. या जागेचा उपयोग पात्राच्या वेशभूषादी गोष्टींसाठी केला जाई. नेपथ्यभूमी आणि प्रेक्षागृह यांच्या मधोमध राहिलेल्या जागेचे दोन भाग पाडीत. पैकी प्रेक्षागृहाला लागून असणाऱ्‍या भागाच्या दोन्ही बाजूंकडील आठ आठ चौरस हातांचे तुकडे सोडून १६X ८ हातांच्या म्हणजे सु. २४X१२ फुटांच्या राहिलेल्या भागास रंगपीठ किंवा रंगमंच असे म्हटले जाई. यालाच रंगशीर्ष असेही म्हटले जाई. हे रंगशीर्ष आणि त्याच्या पुढील रंगपीठ हे दोन भाग नटवर्गाला अभिनयासाठी राखून ठेवलेले असत.

याच पद्धतीने चतुरस्त्र आणि त्र्यस्त्र नाट्यगृहांचे वर्णन भरताने केलेले आहे. चतुरस्त्र नाट्यगृह सु. १६२, ९६ आणि ४८ फूट लांबीचे असे तीन प्रकारांत होत. त्र्यस्त्र नाट्यगृह आणि त्यातला रंगमंच चतुरस्त्रप्रमाणेच असावा, असे भरताने म्हटले आहे. या संदर्भात स्वतंत्र मोजमाप त्याने दिलेले नाही.

रंगमंचाला दर्शनी पडदा असतो. त्याला प्राचीन काळी ‘यवनिका’ असा शब्द होता. या शब्दावरून रंगमंच पडद्याची कल्पनाही आपण ग्रीकांकडून घेतली असा समज आहे, पण तो खरा नाही. या पडद्याची कल्पना मूळची भारतीयच आहे. दर्शनी पडद्याप्रमाणे स्थळदर्शनासाठी पुढे विविध पडद्यांची योजना करण्याची पद्धत रूढ झाली. ते पडदे लावण्यासाठी रंगमंचाच्या वरच्या बाजूस मंडपी बांधण्याची प्रथा सुरू झाली. तसेच रंगमंचाच्या दोन्ही बाजूंस पाखांचा (विंगा) उपयोग सर्रास सुरू झाला. नेपथ्य, प्रकाशयोजना यांच्या संदर्भाला जसजशी प्रगती होत गेली, तसतशी रंगमंचाची रूपेही बदलत गेली. तिन्ही बाजूंनी उघडा असलेला रंगमंच, बंदिस्त रंगमंच आणि आता पथनाट्याच्या निमित्ताने आलेला मुक्त रंगमंच असे रंगमंचाचे विविध प्रकार देशकालपरत्वे सतत बदलत राहिलेले आहेत.

संदर्भ : 1. Allen, James T. Stage Antiquities of the Greeks and romans and Their Influence, New York, 1963.

2. Fuerst, Walter Rene Hume, Samuel J. Twentieth Century Stage Decoration, 2 Vols, London, 1928.

3. Selden, S. Sellman, H. D. Stage Scenery and Lighting, 1959.

4. Southern, r. Changeable Scenery, 1952.

५. जेफेरिस, डेरेक, अनु. परांजपे, प्रभाकर नारायण, प्रकाशयोजना नेपथ्यरचना, मुबंई, १९६७.

देशपांडे, वि. भा.