रंगपूर : सिंधू संस्कृतीशी (इ. स. पू. २७५०−१७५०) संपर्क दर्शविणाऱ्या अवशेषांसाठी प्रसिद्ध असलेले गुजरातमधील स्थळ. ते सुरेंद्रनगर या जिल्ह्यात लिंबडी तालुक्यात लिंबडीच्या ईशान्येस २९ किमी.वर वसले  झिलाईदार लाल खापरांवरील चित्रकाम, रंगपूर.आहे. १९७१ च्या जनगणनेनुसार या खेड्याची लोकसंख्या १,८३८ होती. गुजरात राज्यातील सौराष्ट्रात सिंधू संस्कृतीचा प्रसार झाला होता, हे ⇨लोथल येथे झालेल्या उत्खननात सिद्ध झाले आहे. त्याआधी रंगपूरला चार वेळा उत्खनने झाली होती. त्यानंतर १९५३−५५ साली भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याने रंगपूरला पुन्हा उत्खनन केले. या उत्खननानुसार रंगपूरचा हडप्पा अवशेषांशी निकटचा संपर्क होता, हे १९३४-३५ मध्ये उत्खनन करून श्री. वत्स यांनी मांडलेले मत सिद्ध झाले आहे. हडप्पा संस्कृतीची संक्रमण अवस्था येथील तीन वस्त्यांतून दृग्गोचर होते. सुरुवातीच्या पहिल्या वस्तीचे लोक जॅस्पर आणि अकीक या दगडांच्या ओबडधोबड छिलक्यांची लहान पाती वापरीत असत, असा पुरावा १९५३-५४ च्या उत्खननात मिळाला. या हत्यारांबरोबर मातीची खापरे मिळाली नाहीत. दुसरी आणि तिसरी वस्ती ताम्रपाषाणयुगीन काळाची द्योतक होती. या कालातील खापरे लालभडक असून त्यांवर काळ्या अगर गडद तपकिरी रंगात नक्षी काढलेली आहे. १९५४-५५ सालच्या उत्खननांत हडप्पासारख्या बनावटीची व आकाराची अनेक मडकी सापडली. यांवर बैल, मोर, हरिण यांची चित्रेही रंगविलेली होती. याशिवाय सु. दोन मीटर रुंदीचा मातीच्या विटांचा प्राकार, विटांची गटारे, स्नानगृहे व इतर वास्तूही उघडकीस आल्या. यानंतरच्या कालात उत्कृष्ट तांबड्या झिलईची खापरे वापरात आली. श्री. रं. राव यांनी रंगपूरच्या वस्त्यांचा काल इ. स. पू. ३०००−८०० असा गृहीत धरला आहे. महाराष्ट्रातील चांदोली (पुणे जिल्हा) व राजस्थानातील आहाड (उदयपूर जिल्हा) यांप्रमाणे येथेही तांबडीलाल मृत्पात्रे हे लोक वापरीत असे दिसून आले. हडप्पा संस्कृतीचा शेवट येथे अचानकपणे न होता ती संस्कृती हळूहळू तांबडी खापरे वापरणाऱ्यांच्या संस्कृतीत उत्क्रांत झाली, असे उत्खनित पुराव्यावरून कळून आले. सिंधू संस्कृतीच्या अखेरच्या टप्प्यातील अवनत अवस्था इथे प्रामुख्याने दृष्टोत्पत्तीस येथे. येथील उत्खननात कुठेही सिंधू संस्कृतीसारख्या मुद्रा आढळल्या नाहीत.

याशिवाय येथे एक हिंग्लज मठ नावाचे अलंकृत मध्ययुगीन मंदिर असून ते पढार नावाच्या अनुसूचित जमातीचे पूजास्थान आहे.

संदर्भ : 1. Archaeological Survey of India, Indian ArchaeologyA Review, 1953-54 1954-55.

2. Government of Gujarat, Surendranagar District Gazetteer, Ahmadabad, 1977.

3. Rao, S. R. Lothal and the Indus Civilization, New Delhi, 1973.

देव, शां. भा.