योनेस्को, अझॅन : (२६ नोव्हेंबर १९१२– ). श्रेष्ठ फ्रेंच नाटककार आणि व्यस्त रंगभूमीच्या (थीएटर ऑफ द ॲब्सर्ड) आद्य प्रणेत्यांपैकी एक. रूमानियातील स्लातीना येथे जन्मला. त्याची
आई फ्रेंच आणि वडील रुमानियन होते. १९१३ साली त्याचे कुटुंबीय फ्रान्समध्ये, पॅरिस शहरी येऊन राहिले आणि तेथून १९२५ साली पुन्हा रूमानियात आले. आपले सर्व माध्यमिक शिक्षण त्याने तेथेच पूर्ण केले आणि बूकारेस्ट विद्यापीठातून फ्रेंच भाषेची पदवी मिळवली. काही काळ (१९३६–३८) त्याने बूकारेस्टच्या एका माध्यमिक शाळेत फ्रेंच भाषेचे अध्यापन केले. त्यानंतर डॉक्टरेटसाठी हाती घेतलेल्या आपल्या प्रबंधावर काम करण्यासाठी तो पॅरिसला आला. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पॅरिसमधील एका प्रकाशनसंस्थेच्या निर्मितीविभागात त्याने काम केले. १९४५ नंतर तो पॅरिसमध्येच स्थायिक झाला.
ला कांतात्रीस शोव्ह (लेखन १९४८ प्रथम प्रयोग १९५० इंग्लंडमध्ये द बाल्ड प्रिमा दोन्ना ह्या नावाने, तर अमेरिकेत द बाल्ड सोप्रानो ह्या नावाने प्रकाशित, १९५८) ही एकांकिका योनेस्कोची पहिली नाट्यकृती. हे एक प्रतिनाट्य (अँटी प्ले) आहे. एका प्राथमिक पुस्तकावरून संभाषणात्मक इंग्रजी शिकत असताना ह्या नाटकाची कल्पना योनेस्कोला सुचली. असंबद्ध शब्दमालिका, ठोकळेबाज वाक्संप्रदाय, वापरून वांझोटे झालेले वाक्प्रचार, शब्दश्लेष इत्यादींनी युक्त अशा संवादांतून भाषेच्या वापराची टिंगलटवाळी त्याने केली आहे. तसेच स्वत्व नसलेल्या व भावनाविकारशून्य अशा व्यक्तिरेखा त्याने ह्या एकांकिकेत निर्माण केल्या. स्वतःचे स्वत्व हरवल्यामुळे इतरांचे स्वत्व ते स्वतःचे मानू लागतात. गूढता आणि आधिभौतिक पातळी नष्ट झालेल्या जगातील जीवनाचे शोकसुखात्मक (ट्रॅजिकॉमिक) दर्शन ही एकांकिका घडविते.
योनेस्कोच्या अन्य उल्लेखनीय नाटकांत ला लसाँ (प्रथम प्रयोग १९५१, इं. शी. द लेसन). ले शॅझ (प्रथम प्रयोग १९५२, इं. शी. द चेअर्स), द रिनॉसेरॉस (प्रथम प्रयोग १९५९), ल र्वा स मर (प्रथम प्रयोग १९६२, इं. शी. एक्झिट द किंग) आणि ला स्वाफ ए ला फँ (प्रथम प्रयोग १९६४, इं. शी. हंगर अँड थर्स्ट) ह्यांचा समावेश होतो. ह्यांपैकी ‘द लेसन’, ‘द चेअर्स’ आणि ‘एक्झिट द किंग’ ह्या एकांकिका आहेत.
‘द चेअर्स’ ही योनेस्कोची सर्वोत्कृष्ट नाट्यकृती. एका वृद्ध दांपत्याने काही प्रतिष्ठित व्यक्तींना आपल्या घरी बोलाविलेले असते. पुढील पिढ्यांनी जतन करून ठेवावा, म्हणून आपला जीवनविषयक संदेश, ह्या दांपत्यापैकी वृद्ध पुरुषाला ह्या मंडळींना द्यायचा असतो. त्याच्यापाशी वक्तृत्व नसल्यामुळे त्याने एका व्यावसायिक वक्त्त्याला त्यासाठी पाचारण केलेले असते. पाहुण्यांसाठी खुर्च्या मांडल्या जाऊ लागतात. लोकांची गर्दी व खुर्च्यांची संख्या वाढत जाते. येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत हे वृद्ध दांपत्य अत्यंत अगत्याने करीत असते. संदेशवाचनाची सर्व तयारी झाल्यानंतर फक्त वक्ता यायचा राहतो. तोही येतो. आपला संदेश आता जगापुढे येणार, ह्या आनंदाच्या भरात हे दांपत्य समुद्रात उडी मारून मृत्यूच्या स्वाधीन होते. तो वक्ता त्यानंतर त्या गर्दीला सामोरा जातो पण तो मुका आणि बहिरा असतो. त्याच्या घशातून केवळ घरघर बाहेर पडते. तो फळ्यावर काही लिहू पाहतो पण तो लिहितो, ती केवळ निरर्थक अक्षरे. ह्या नाटकात येणारे पाहुणे रंगभूमीवर दाखविले जात नाहीत. खुर्च्या रिकाम्याच राहतात पण पाहुणे आले आहेत, त्यांची गर्दी वाढते आहे, असे दर्शविणारा अभिनय म्हातारा-म्हातारीची कामे करणाऱ्यांनी करायचा आहे.
आयुष्यभराच्या अनुभवाच्या बुडाशी असलेली संवादशून्यता त्याचे संप्रेषण करण्याची अशक्यता त्याचप्रमाणे मानवी अस्तित्वाची निष्फळता आणि पराभूतता ह्यांतून ह्या नाटकाचा व्यापक आशय आकारतो. योनेस्कोने ह्या एकांकिकेचे वर्णन ‘शोकात्म प्रहसन’ असे केलेले आहे. मराठीत हे नाटक खुर्च्या ह्या नावाने रघू दंडवते ह्यांनी रूपांतरित केले आणि ‘रंगायन’ ह्या संस्थेने सादर केले.
योनेस्को हा, नाटक हे स्वतःच्या अंतर्गत मनोविश्वाच्या बाह्य प्रक्षेपणाचे माध्यम मानतो. माझी स्वप्ने, माझ्या चिंता, माझ्या विचित्र आकांक्षा, माझ्या अंतर्गत मनोधर्मातल्या विसंगती ह्यांसारख्या गोष्टींमध्ये मी माझ्या नाटकांचे विषय शोधतो, असेही त्याने म्हटले आहे. आपल्या नाट्यलेखनामागील विचार स्पष्ट करताना त्याने सामूहिक अबोध मनाच्या संकल्पनेचा आधार घेतला आहे. कोणत्याही माणसाच्या इच्छा, वासना, स्वप्ने, चिंता त्याच्या एकट्याच्या नसतात, तर प्राचीन वंशपरंपरेचा – अवघ्या मानव जातीची मालमत्ता असलेल्या अतिप्राचीन संचयाचा – तो एक भाग असतो. नवा नाटककार, जे नवे आहे, त्याची सांगड जे अतिप्राचीन आहे, त्याच्याशी घालण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या मनात खोल दडलेल्या अतिरिक्त वासनांचा तो जेव्हा आविष्कार करतो, तेव्हा तो त्याच्यातल्या सखोल मानवतेचाच आविष्कार करीत असतो. फ्रेंच अकादमीचे सदस्यत्व त्याला १९७० साली देण्यात आले.
संदर्भ :
- Coe, R. N., Ionesco, New York, 1965.
- Coe, R. N., Ionesco : A Study of His Plays, London. 1971.
- Esslin, Martin, The Theatre of the Absurd, London, 1966.
- Pronko, L. C., Eugene Lonesco, New York, 1965.
- इनामदार, एस्. डी., ‘‘व्यस्त रंगभूमी’’, नवभारत (रंगभूमी विशेषांक, वाई, मे-जून, ८५).
लेखक : कुलकर्णी, अ. र.