योगदर्शन : आस्तिक सहा दर्शनांपैकी योगदर्शन हे एक दर्शन होय. येथे दर्शन शब्दाचा अर्थ तत्त्वज्ञान असा आहे. वेदांना प्रमाण मानणारी न्याय ,  वैशेषिक ,  सांख्य ,  योग ,  कर्ममीमांसा आणि ब्रह्ममीमांसा अशी सहा दर्शने प्रसिद्ध आहेत. चार्वाकाचा भौतिकवाद ,  बौद्ध दर्शन आणि जैन दर्शन ही तीन वेद प्रमाण न मानणारी म्हणजे नास्तिक दर्शने होत. चार्वाकाचे दर्शन सोडल्यास बाकीची दर्शने पुनर्जन्मपरंपरा मानतात आणि या जन्मपरंपरेतून सुटका म्हणजे मोक्षही मानतात. मोक्षप्राप्तीचे साधन तत्त्वज्ञान होय. तत्त्वज्ञान चित्तशुद्धीने मिळते व चित्तशुद्धी योगसाधनेने प्राप्त होते. मनाची एकाग्रता म्हणजे योग होय. मनाच्या म्हणजे चित्ताच्या सर्व वृत्तींचा निग्रह करण्यानेच मनाची एकाग्रता सिद्ध होऊ शकते. योग हे तत्त्वदर्शनाचे साधन म्हणून चार्वाकाशिवाय इतर सर्व दर्शनांमध्ये मान्य झालेले आहे. हा सर्व दर्शनांचा समान सिद्धांत आहे. म्हणून  ⇨ अष्टांगयोग या सर्व दर्शनांनी मान्य केला आहे. या सर्व दर्शनांमध्ये मुमुक्षूकरता योगसाधनेचा उपदेश केलेला आढळतो. परंतु वर निर्दिष्ट केलेल्या षड्दर्शनांपैकी योगदर्शन हे स्वतंत्र दर्शन पातंजल योगसूत्र म्हणून उपलब्ध आहे. पातंजल म्हणजे पतंजलींनी तयार केलेले. हे सांख्य दर्शनातील तत्त्वज्ञानावर आधारलेले आहे.

  

    सांख्य दर्शनाचे सेश्वर सांख्य म्हणजे ईश्वर मानणारे सांख्य दर्शन आणि निरीश्वर सांख्य म्हणजे ईश्वराचे अस्तित्व न मानणारे सांख्य दर्शन असे दोन संप्रदाय प्रसिद्ध आहेत. पातंजल योगसूत्र हे सेश्वर  ⇨ सांख्य दर्शना वर आधारलेले दर्शन आहे. त्रिगुणात्मक प्रकृती व पुरुष अशी मूलभूत दोन तत्त्वे सांख्य दर्शनाचे दोन्ही संप्रदाय मानतात. त्यांपैकी सेश्वर सांख्य दर्शन पुरुष या तत्त्वाचे दोन प्रकार मानतात. एक म्हणजे संसार भोगणारे अनंत जीवात्मे  हेच पुरुष होत आणि दुसरा नित्य मुक्त ,  सर्वज्ञ ,  विश्वाच्या उत्पत्ति-स्थिति-लयाला कारण असा श्रेष्ठ पुरुष म्हणजे परमेश्वर.

  

    पतंजली मुनींनी योगसूत्र हा दर्शनग्रंथ लिहिला. पतंजलींचा काळ इ. स. पू. सु. दुसरे शतक होय. व्याकरण महाभाष्य कार पतंजली आणि योगसूत्र कार पतंजली हे दोघे एकच होत ,  असे बहुतेक संशोधक मानतात. महाभाष्य कार पतंजलींचा काळ हा पुष्यमित्र शुंग या सम्राटाचा काळ म्हणजे इ. स. पू. दुसरे शतक होय  पुष्यमित्राच्या संबंधी महाभाष्या तील उल्लेखावरून हाच पतंजलींचा काळ असे अनुमानित होते. कारण वर्तमानकाळाचा प्रयोग पुष्यमित्राच्या निर्देशक वाक्यात केलेला आहे.  [⟶  पतंजलि] .

  

    योगसूत्रा ची समाधिपाद ,  साधनपाद ,  विभूतिपाद आणि कैवल्यपाद अशी चार प्रकरणे आहेत. या योगसूत्रा वर आचार्य व्यास यांचे भाष्य आहे. हे व्यास म्हणजे कृष्णद्वैपायन व्यास ( महाभारत कार) किंवा बा दरायण व्यास ( ब्रह्मसूत्र कार) नव्हेत. हे तिसऱ्या किंवा चौथ्या शतकात झाले असावेत. या व्यासभाष्या ची शैली हा संस्कृत गद्याचा उत्कृष्ट प्रकार आहे. हाइन्रिख झिमर या पश्चिमी पंडिताच्या मते या भाष्याला जागतिक तत्त्वज्ञानाच्या साहित्यात शैलीच्या दृष्टीने उत्तम स्थान आहे. त्याच्यावर नवव्या शतकातील एक श्रेष्ठ दार्शनिक  ⇨ वाचस्पतिमिश्र यांची तत्त्ववैशारदी ही टीका त्याचप्रमाणे सु. सोळाव्या शतकातील विज्ञानभिक्षू या पंडिताची योगवार्तिक नावाची टीका प्रसिद्ध आहे. वाचस्पतिमिश्र व विज्ञानभिक्षू यांच्यामध्ये अनेक महत्त्वाचे मतभेद आहेत. योगसूत्रावर इतरही अनेक महत्त्वाच्या टीका प्रसिद्ध आहेत. राजमार्तंड ,  मणिप्रभा ,  योगसुधाकर अशी त्यांची नावे आहेत. अठराव्या शतकातील महाराष्ट्रीय श्रेष्ठ वैयाकरणी नागोजी भट्ट यांचीही भाष्यच्छायाव्याख्या नामक टीका प्रसिद्ध आहे.

  

    समाधिपाद :  योगाने द्रष्टा जो आत्मा तो स्वतः च्या रूपामध्ये स्थिर होतो. हा आत्मा म्हणजे शुद्ध चैतन्य. या स्थितीत आत्मा म्हणजे पुरुष शुद्ध ,  केवल ,  मुक्त असा राहतो. ह्या स्थितीतून तो चलित होत नाही. ही स्थिती प्राप्त होण्याच्या अगोदर तो मनोवृत्तींशी एकरूप झालेला असतो. या मनोवृत्तींचा पूर्ण विलय ,  चित्तवृत्तींचा निरोध म्हणजे योग होय. संसार म्हणजे या चित्तवृत्तींमध्येच एकरूप झालेल्या जीवात्म्याची म्हणजे पुरुषाची स्थिती. संसारनाश म्हणजे मुक्ती. योगशास्त्राचे उद्दिष्ट म्हणजे शुद्ध व मुक्त स्वरूपात आत्मा कायम राहणे हे होय.

  

   चित्तवृत्ती  दोन तऱ्हेच्या असतात. क्लेशरूप आणि क्लेशरहित. संसारी बद्ध जीवात्म्याच्या मनोवृत्ती या क्लेशात्मकच असतात. विषयांबद्दल आसक्त व द्वेषयुक्त त्या वृत्ती असतात  उत्कट अभिनिवेशरूप अशा त्या वृत्तींचा प्रवाह सुरू असतो. ह्याला कारण अहंकार अथवा अस्मिता. वृत्ती आणि त्यांच्याशी एकरूप राहिलेला द्रष्टा ह्यांच्यामध्ये फरक न वाटणे म्हणजे अस्मिता. हाच मोह होय. सत्त्व-रज-तमात्मक प्रकृती आणि चैतन्यरूप पुरुष हे दोन्ही एकच होत ,  अशा तऱ्हेचा भ्रम अशा मोहाला कारण असतो. या भ्रमालाच अविद्या किंवा अज्ञान म्हणतात. अज्ञानामुळे अहंकार उत्पन्न होतो. अहंकारामुळे विषयाचे सुख वाटते. त्यामुळे विषयाची तृष्णा ,  लोभ ,  आसक्ती किंवा आवड उत्पन्न होते  या आवडीलाच योगशास्त्रात ‘राग’  ( प्रेम) असे म्हणतात. हा राग विषयसुखामुळे उत्पन्न होत असतो. अहंकारामुळेच विषयापासून दुःख उत्पन्न होते  त्यामुळे क्षोभ उत्पन्न होतो  त्या विषयाच्या नाशाची इच्छा उत्पन्न होते. ही विषयनाशाची इच्छा म्हणजे द्वेष होय. या राग-द्वेषांचा संस्कार खूप खोल असतो. हे जन्मसिद्ध अनुभवाला येतात. अत्यंत खोल राग-द्वेष म्हणजेच अभिनिवेश होय. विवेकी मनुष्याला विषयाचे प्रेम आणि विषया चा  द्वेष हे दोन्हीही दुःखकारक वाटतात आणि त्यांना मूलभूत कारण असलेली अविद्या किंवा अहंकार हेही दुःखकारक वाटतात. म्हणून अविद्या ,  अस्मिता ,  राग ,  द्वेष आणि अभिनिवेश या पाचही चित्ताच्या अवस्थांना क्लेश अशी  संज्ञा आहे. या क्लेशांमुळेच पाप-पुण्यरूप कर्म जीवात्म्याकडून घडत असते. त्याच्या योगाने अदृष्ट अशी पुण्ये आणि पापे निर्माण होतात. या पुण्य-पापांपासून मानवांपेक्षा खालच्या योनी ,  मानवयोनी आणि मानवांपेक्षा अधिक वरच्या देवयोनी यांची प्राप्ती होते. कर्मविपाकामुळे म्हणजे पाप-पुण्यांच्या सामर्थ्याने विविध योनींची प्राप्ती होते. आयुष्यमर्यादा या विविध योनींना असते आणि या विविध योनींमध्ये सुखदुःख ां चे भोग प्राप्त होतात. या भोगरूप संसारातून मुक्त होण्याकरता चित्तवृत्तींचा पूर्ण संयम करावा लागतो. तो संयम म्हणजे प्रशांत ,  विमल ,  सात्त्विक अशी चित्तवृत्ती म्हणजे ‘संप्रज्ञात समाधि ’ साध्य करावयाची असते. अभ्यास आणि वैराग्य यांच्या योगाने चित्तवृत्तींचा संयम साधता येतो. हा प्रयत्न दीर्घ काल निरंतर सद्भावनेने ,  तपाने ,  ब्रह्मचर्याने ,  ज्ञानाने आणि श्रद्धेने संपादावा लागतो. वैराग्य दोन तऱ्हेचे  ऐहिक आणि पारलौकिक विषयांची तृष्णा नष्ट होणे हा वैराग्याचा पहिला प्रकार. या वैराग्यास ‘वशीकार’ अशी संज्ञा आहे आणि त्याच्या पुढची अंतिम वैराग्यस्थिती म्हणजे सत्त्व-रज-तम या तीन गुणांचा संपर्क क्षीण होऊन त्यांच्यापासून अलिप्त स्थिती प्राप्त होते. ही वैराग्याची पराकाष्ठा होय. त्यामुळेच कैवल्य सिद्ध होते.


 चित्तवृत्तींपासून अलिप्त अशी चैतन्याची स्थिती हे कैवल्य होय. हे सिद्ध होण्याकरता चित्तवृत्ती ह्या क्लेशरहित कराव्या लागतात. क्लेश हे चित्तवृत्तीचे मल होत. ही मलिनता नष्ट करावी लागते. या चित्तवृत्ती पाच प्रकारच्या  प्रमाण ,  विपर्यय ,  विकल्प ,  निद्रा आणि स्मृती. प्रमाण म्हणजे यथार्थ ज्ञान  ते बाह्य इंद्रियांनी आणि अंतःकरणाने प्राप्त होत असते. हे प्रमाणरूम ज्ञान प्रत्यक्ष ,  अनुमान आणि शाब्द असे तीन प्रकारचे असते. इंद्रियात दोष उत्पन्न झाले किंवा अनुमानाच्या साधनांत दोष असले किंवा शब्दांत म्हणजे प्रतिपादनात अथवा वाक्यात वक्त्याने चूक केलेली असली ,  तर अयथार्थ ज्ञान अथवा भ्रम उत्पन्न होतो. यासच विपर्यय म्हणजे वस्तुस्थितीचा विपर्यास असे आपण म्हणतो. शब्दांनी निर्माण होणाऱ्या काही संकल्पना म्हणजे विकल्प होय. या संकल्पना म्हणजे वस्तुस्थितीचा विपर्यास नसतो  परंतु त्या संकल्पनांप्रमाणे वस्तुस्थिती नसते. त्या अधांतरी असतात. त्या खऱ्याही नसतात व खोट्याही नसतात. ‘गायीला अस्तित्व आहे ’ या वाक्याने गाईचे अस्तित्व सांगितले. हे अस्तित्व गाईहून वेगळे नाही. शब्द तेवढे वेगळे आहेत. अभावविषयक जाणीव म्हणजे निद्रा अथवा झोप होय. झोप ही सुद्धा मनोवृत्तीच आहे. आपण मागे जे अनुभव घेतलेले असतात ते अनुभव पुन्हा जागृत होतात त्यास स्मृती किंवा आठवण असे आपण म्हणतो.

  

    चित्तवृत्ती एकाग्र आणि शुद्ध केल्याने समाधी सिद्ध होते. या समाधीच्या खालची आणि वरची किंवा अलीकडची व पलीकडची अशा दोन अवस्था आहेत. अलीकडच्या अवस्थेस ‘संप्रज्ञात’ समाधी आणि पलीकडच्या अवस्थेस ‘असंप्रज्ञात’ समाधी म्हणतात किंवा पर्यायाने ‘सविकल्पक’ आणि ‘निर्विकल्पक’ समाधी असे म्हणतात. संप्रज्ञात किंवा सविकल्पक समाधीत शब्दरूप विचार ,  शब्दरहित विचार ,  आनंद आणि शुद्ध अस्तित्वाची जाणीव अशा सूक्ष्म चार अवस्था असतात. या सर्व अवस्थांच्या पलीकडे निर्विकल्पक समाधी असते. परमवैराग्याने ही निर्विकल्पक समाधी सिद्ध होते.

  

    साधनपाद  :  या समाधीच्या अवस्थेपर्यंत पोहोचण्याकरता आठ साधने उपदेशिली आहेत. म्हणून या योगास अष्टांगयोग म्हणतात. आठ साधने असलेला योग असा त्याचा अर्थ होय. यम ,  नियम ,  आसन ,  प्राणायाम ,  प्रत्याहार ,  धारणा ,  ध्यान आणि समाधी अशी ही योगाची आठ अंगे होत. त्यात मुख  ⇨ समाधी होय. म्हणून पुष्कळ वेळा समाधी म्हणजेच योग आणि समाधी ज्याला साधली तो योगी होय असे म्हणतात. यम पाच प्रकारचे  :  अहिंसा ,  सत्य ,  अस्तेय ( चोरी न करणे) ,  ब्रह्मचर्य ( जननेंद्रियांचा संयम) आणि अपरिग्रह ( संपत्तीचा संग्रह न करणे). हे पाच प्रकारचे यम निरपवाद रीतीने सर्व प्रकारच्या अवस्थेत पाळणे हे व्रत योग साधण्यास आवश्यक आहे. म्हणून यास महाव्रत असे म्हणतात. नियम पाच प्रकारचे  :  शौच ( शारीर व मानस असे अंतर्बाह्य पावित्र्य) ,  संतोष ,  तप ( शीतोष्णादी द्वंद्व सहन करणे आणि त्याबरोबरच उपवासादी व्रतांचे आचरण) ,  स्वाध्याय ( अध्यात्मविद्येचे अध्ययन) व ईश्वरप्रणिधान ( ईश्वराची भक्ती) असे हे नियम होत. पद्मासनादी अनेक योगासने स्थिरपणे व आनंदाने करणे  प्राणायाम  प्रत्याहार ( मन स्थिर करण्याकरता सतत मनोवृत्ती आवरणे)  ध्येयविषयामध्ये चित्त स्थिर होणे म्हणजे धारणा  स्थिर चित्त होत असताना चित्त दुसऱ्या कोणत्याही ध्येयविषयाकडे न जाणे आणि ध्येयविषयात रमणे म्हणजे ध्यान व ध्येयविषयाबाहेरचे सगळे विषय आपोआप मनाने वगळणे म्हणजे समाधी होय. धारणा ,  ध्यान आणि समाधी हे तिन्ही निश्चितपणे साधू लागले म्हणजे त्यास योगशास्त्रात संयम अशी पारिभाषिक संज्ञा देतात.

  विभूतिपाद  :  योगाभ्यासाने संयम सिद्ध होतो व विविध प्रकारच्या संयमांनी विविध प्रकारच्या सिद्धी किंवा सामर्थ्ये प्राप्त होतात. भूत-भविष्यांचे ज्ञान ,  पूर्वजन्माचे ज्ञान ,  दुसऱ्याच्या मनाचे ज्ञान ,  मरणाच्या सूचक चिन्हांचे ज्ञान ,  हत्ती ,  गरुड ,  वायू इत्यादिकांची बलेही प्राप्त होतात. सर्व विश्वाचेही ज्ञान होते. क्षुधा व तृष्णा यांच्यावर विजय मिळतो. सिद्ध पुरुषांचे दर्शन होते. दिव्य गंध ,  दिव्य रस ,  दिव्य स्पर्श ,  दिव्य रूप ,  दिव्य शब्द इत्यादिकांचे प्रत्यक्ष ज्ञान होते. परशरीरात प्रवेश करता येतो  अवकाशत गमन करता येते  पंचमहाभूतांवर नियंत्रण मिळवता येते  सूक्ष्म बनणे म्हणजे अणिमा ,  अत्यंत हलके होणे म्हणजे लघिमा ,  कितीही विस्तृत बनणे म्हणजे महिमा ,  कितीही अवजड होणे म्हणजे गरिमा ,  दूरच्या वस्तूला स्पर्श करण्याची शक्ती म्हणजे प्राप्ती ,  इच्छेला येईल ते मिळवण्याची शक्ती म्हणजे प्राकाम्य ,  भूत-भौतिक सृष्टीवर नियंत्रण ( ईशित्व) आणि वशीकरण अशा आठ प्रकारच्या सिद्धीही प्राप्त होतात. रूप व लावण्य ,  अत्यंत दृढ शरीर आणि विशेषतः इंद्रियांवर विजय या गोष्टी प्राप्त होतात.

  

  कैवल्यवाद :  कैवल्य प्राप्त झाले असता वर सांगितलेल्या सिद्धींची किंवा सामर्थ्यांची अपेक्षा रहात नाही. साधकाने सिद्धींची अपेक्षा धरली तर समाधी दुरावते. मागील जन्माच्या योगाभ्यासाने ,  दिव्य औषधींनी ,  तपाने आणि समाधीनेही सिद्धी प्राप्त होतात. योगी एकदम अनेक शरीरे धारण करू शकतो. त्याला पुढे पुनर्जन्म नसतो  कारण तो जे जे कर्म करतो ते अलिप्तपणे ,  अनासक्तीने करतो. त्याचे पुण्य किंवा पाप असे बंधनकारक परिणाम नसतात. कर्मे चार प्रकारची असतात  :  कृष्ण ,  शुक्ल ,  शुक्ल-कृष्ण आणि अशुक्ल-अकृष्ण. कृष्ण म्हणजे पाप  शुक्ल म्हणजे पुण्य. शुक्ल-कृष्ण म्हणजे पाप-पुण्यमिश्रण आणि अशुक्ल-अकृष्ण म्हणजे पुण्य नसलेले आणि पाप नसलेले कर्म. पहिल्या तीन प्रकारांनी जन्म-मरणपरंपरारूप संसार सुरू राहतो. हा संसार अनादिकालापासून चालू राहिलेला असतो. चित्तामध्ये असंख्य वासना भरलेल्या असतात. जीवात्मा म्हणजे द्रष्टा पुरुष शरीरद्वारा चित्ताच्या योगाने विषयांचा भोग घेत असतो. हा ( १) चैतन्यरूप पुरुष , ( २) रूप-रस-गंधादी बाह्य विषय व ( ३) चित्तवृत्ती ही त्रिपुटी चित्तरूपच असते. हीच बद्धस्थिती. बाह्य विषय निराळे ,  चित्तवृत्ती निराळ्या आणि द्रष्टा चैतन्यरूप पुरुष निराळा अशी वस्तुस्थिती आहे. ही वस्तुस्थिती म्हणजेच प्रज्ञा होय. ही प्रज्ञा सर्व आवरणांचा म्हणजे मलांचा क्षय झाला म्हणजे मोक्षास म्हणजे कैवल्यास प्रकट करते. त्यात नित्य शुद्ध असा पुरुष म्हणजे आत्मा प्रकट होतो. पुरुषाहून अन्य असलेले चित्तासह सर्व विश्व हे त्रिगुणात्मक प्रकृतीचे विकार होय. त्रिगुणात्मक प्रकृती ही नित्य आहे परंतु परिवर्तन पावणारी आहे. पुरुष हा कधीही परिवर्तन पावत नाही. प्रकृती पुरुषाच्या भोगार्थ असंख्य विकार निर्माण करते. भोग म्हणजे सुख-दुःखादिकांचा अनुभव. शुद्धपुरुषाचे दर्शन झाल्याबरोबर पुरुषाला भोग देणे हे कार्य संपते. म्हणून त्रिगुणांचा विकाररूप आविर्भाव समाप्त होतो. हीच स्थिती कैवल्य होय. यातच चैतन्यशक्ती स्वरूपात स्थिर राहते.

  

    सेश्वर सांख्य दर्शनाप्रमाणे सिद्ध होणारे योगदर्शन पतंजलींनी सूत्ररूपाने ग्रंथित केले. वैशेषिक दर्शन ,  बौद्ध दर्शन आणि जैन दर्शन या तिन्ही दर्शनांचे योगशास्त्र आहे. अष्टांगयोग हा या तिन्ही दर्शनांना मान्य होतो  परंतु २५ किंवा २६ तत्त्वांची मांडणी असलेले सांख्य दर्शन त्या दर्शनांना मान्य नाही. ईश्वरप्रणिधान एका अर्थाने ते मान्य करतात. सिद्ध व मुक्त योग्याची भक्ती ते मान्य करतात. वैशेषिक दर्शनाने ईश्वराचे अस्तित्वही मान्य केले आहे.

 संदर्भ : 1. Dasgupta, S. N. Yoga Philosophy in Relation to Other Systems of Indian Thought, Calcutta, 1930.

              2. Eliade, M. Yoga, Immortality and Freedom, London, 1958.

              3. Jha, Ganganath, Ed., The Yoga-Darshan (The Sutras of Patanjali, With the Bhasys of Vyas,  with Notes from Vacaspati Misra’s  Tattvavaisaradi, Vijnona Bhiksu’s                     Yogavartika and Bhoja’s Rajamartanda ), Madras, 1934.

              4. Kenghe, C. T. Yoga as Depth-Psychology and Para-Psychology, Vols., I-II.

              5. Wood, Ernest, Yoga, London, 1959.

              6. Wood. J. H.  Eng. Trans, The Yoga-System of Patanjali (with Yoga-Bhashya and Tattva-Vaicuradi), Varanasi, 1966.

              ७. कोल्हटकर ,  कृ. के. भारतीय मानसशास्त्र अथवा सार्थ आणि सविवरण पातंजल योगदर्शन ,  मुंबई ,  १९५९.

  

 जोशी ,  लक्ष्मणशास्त्री