येस्पर्सन, ऑटो: (१९ जुलै १८६० – ३० एप्रिल १९४३). विख्यात डॅनिश भाषावैज्ञानिक, स्वनवैज्ञानिक, इंग्लिश भाषेचे अभ्यासक, परभाषाशिक्षणाच्या नव्या पद्धतीचे प्रवर्तक व पुरस्कर्ते आणि ‘नोव्हिआल’ नावाच्या कृत्रिम आंतरराष्ट्रीय संपर्कभाषेचे निर्माते. कोपनहेगन विद्यापीठातून एम्.ए. फ्रेंच (१८८७) पीएच्. डी. इंग्लिश भाषा (१८९१) या पदव्या घेतल्या शिवाय इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी येथे विशेष अध्ययन पूर्ण केले आणि कोपनहेगन विद्यापीठात इंग्लिश भाषेचे प्राध्यापकपद (१८९३–२५) भूषविले. डेन्मार्कमधील रास्क, स्वीडनमधील न्यूरोप, इंग्लंडमधील स्वीट या भाषाभ्यासकांचा त्यांच्या विचारांवर खोलवर परिणाम झाला. ‘निओग्रमेरियन’ गटाच्या विचारसरणीविरुद्ध अशी त्यांची काहीशी प्रतिक्रिया झाल्यामुळे व भाषेच्या सामाजिक अंगावर अधिक भर टाकण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे सोस्यूरपासून प्रवर्तित झालेल्या नव्या भाषावैज्ञानिक विचारांशी ते समरस होऊ शकले नाहीत मात्र येस्पर्सन यांच्या विचारांचे ऋण सपीरसारखे नंतरचे नव्या विचाराचे भाषावैज्ञानिक मान्य करतात, अशी काहीशी गमतीची स्थिती त्यांच्या संबंधात आहे. त्यांच्या डॅनिश व इंग्लिश ग्रंथांचे इतर भाषांतून अनुवाद झाले आहेत. अनेक देशांत त्यांनी प्रवास केला आणि मानसन्मान मिळवले.
येस्पर्सन यांच्या विचारांची काही प्रमुख सूत्रे सांगता येतील ती अशी – (१) भाषा हा माणसाचा जीवनव्यवहार आहे, ती काही केवळ विचार व्यक्त करणारी बंदिस्त व्यवस्था नाही, ती समाजाचे भावजीवनही व्यक्त करते (मॅन्काइंड, नेशन अँड इंडिव्हिड्युअल, १९२५). (२) तिचा अभ्यास करायचा म्हणजे भाषाव्यवस्था ही प्रत्यक्ष व्यवहारात कशी प्रकट होते याचा तपशीलवार शोध घ्यायचा. शब्दरूपे असतात, त्यांचे कार्य असते, या कार्यातून अर्थ व्यक्त होतो. भाषेचे वर्णन करताना या अर्थाचे सूत्र पकडून सुरुवात करायची. (सोस्यूरचे म्हणणे भाषाव्यवहार, बाह्य रूप यापासून सुरुवात करून भाषाव्यवस्था, अर्थ यांचा शोध घ्यायचा). (लँग्विज: इट्स नेचर, डिव्हेलपमेंट अँड ऑरिजिन, १९२५). (३) भाषेचे स्वतःचे असे एक ‘लॉजिक’, एक तर्कव्यवस्था असते. तर्कज्ञांची उद्देश्य विधेय विभागणी जशीच्या तशी भाषेला लावून भागणार नाही. द्रव्यवाचक नामे, त्यांचा विस्तार करणारी भावदर्शक क्रियापदे आणि विशेषणे व विस्ताराचा विस्तार करणारी क्रियाविशेषणे अशी ही तीन श्रेणींची रचना असते. पहिली श्रेणी आणि दुसरी श्रेणी यांचे नाते दोन प्रकारचे असते – अधिनिक्षेप (जंक्शन) किंवा विधिनिक्षेप (नेक्सस). या दोन प्रकारांतून अनुक्रमे केवळ पदबंध किंवा वाक्यसदृश पदबंध वाक्य यांची निष्पत्ती होते.
Wonderfully |
suggestive |
poem |
३ |
२ |
१ |
(अधिनिक्षेप, त्यातून प्रथम श्रेणीचा पदबंध). The wonderful suggestiveness of the poem / (that) the poem suggests wonderfully (विधिनिक्षेप, त्यातून स्वतंत्र किंवा समाविष्ट वाक्य). (फिलॉसफी ऑव्ह ग्रॅमर, १९२४ ॲनलिटिक सिंटॅक्स, १९३७). (४) सुट्या ध्वनीचा विचार न करता एका बाजूला त्यांची व्यवस्था आणि या समग्र व्यवस्थेचे परिवर्तन यांचा विचार करावा आणि दुसऱ्या बाजूला तो ध्वनी निर्माण होताना चालणारे एकेका वागिंद्रियाचे कार्य यांचा विचार करावा (लेरेबुछ डेर फोनेटिक आणि फोनेटिश ग्रुंटफ्रागन, १९०४). (५) परभाषा शिकवताना केवळ लेखन-वाचन, नियमांचे ज्ञान, भाषांतर यांवर भिस्त न ठेवता श्रवण व संभाषण, सराव, व्यावहारिक उपयोग यांना महत्त्व द्यावे (हाऊ टू टीच अ फॉरिन लँग्विज, १९०४). या विचारसूत्रांचे उपयोजन त्यांची इंग्लिश भाषेवरची पुस्तके (ग्रोथ अँड स्ट्रक्चर ऑव्ह द इंग्लिश लँग्विज, १९०५ मॉडर्न इंग्लिश ग्रॅमर ऑन हिस्टॉरिकल प्रिन्सिपल्स (७ भागांत), १९०८–४९, इसेन्शल्ज ऑव्ह इंग्लिश ग्रॅमर, १९३३) आणि अनेक शोधनिबंध (लिंग्विस्टिका, १९३३) यांमधून दिसून येते. तसेच ते नोव्हिआल भाषेच्या निर्मितीतही दिसून येते (ॲन इंटरनॅशनल लँग्विज, १९२८).
प्रसन्न व्यक्तिमत्त्व आणि प्रसन्न भाषाशैली यांमुळे त्यांच्या चाहत्यांचा परिवार मोठा होता आणि आहे.
संदर्भ : Sebeok, Thomas A. Ed. Portraits of Linguists …. 1746-1963. Vol. II. Bloomington, Indiana, 1966.
केळकर, अशोक रा.
“