येशू ख्रिस्त : (इ. स. पू. सु. ६–इ. स. सु. ३०). ख्रिस्ती धर्मप्रवर्तक. सहाव्या शतकात डायोनिशिअस एक्झीगस (इ. स. सु. ५००–५४५) नावाच्या मठवासियाने रोमन कॅलेंडरचा अभ्यास करून येशूचा जन्म इ. स. १ मध्ये झाल्याचे नमूद केले आहे. परंतु संशोधकांचे म्हणणे असे आहे, की येशूचा जन्म इ. स. पूर्वी ६ किंवा ७ साली उन्हाळ्यात झाला. रोम शहराच्या प्रस्थापनेपासून जिथे वर्षे मोजली जातात (इ. स. पू. ७५३), अशा रोमन साम्राज्यात येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. येशू ख्रिस्ताचा निश्चित जन्मदिन आपल्याला माहीत नाही. इ. स. चौथ्या शतकातच जन्मदिनाबाबत २५ डिसेंबरचे संदर्भ आढळतात. परंतु अख्रिस्ति असलेल्या ‘नातालिस सोलिस इन्व्हीन्सीबिलीस’ म्हणजे अजिंक्य सूर्यदेवतेच्या सणाऐवजी त्या दिवशी हा सण साजरा करण्यात यावा म्हणून हाच दिवस येशूचा जन्मदिन म्हणूनही निवडलेला असण्याची बरीच शक्यता आहे.
पॅलेस्टाइनमधील यहुदा प्रांतातील बेथलीएम येथे कुमारी माता ⇨मेरीच्या उदरी येशूचा जन्म झाला. गालीलेया (गॅलीली) प्रांतातील नाझारेथ हे त्याच्या आईवडिलांचे गाव. आई-वडील मेरी (मिरियम) व जो (यो) सेफ. त्याच्या वडलांचा व्यवसाय सुताराचा असल्यामुळे येशूचे बालपण नाझारेथ येथे वडिलांच्या हाताखाली सुतारकाम करण्यात गेले असावे. येशूचे मूळ हिब्रू नाव ‘येशुआ’ म्हणजे ज्यूंचा एकमेव देव ‘येहोवाचा सहायक’. क्रिस्त वा ख्रिस्त (मूळ ग्रीक ‘क्रिस्तोस’) ही उपाधी त्याला नंतर जोडली गेली असून तिचा अर्थ ‘देवाचा अभिषिक्त’ वा ‘देवाचा नियुक्त’ असा आहे. त्याच्या आयुष्यातील पहिल्या ३० वर्षांविषयी थोडी माहिती उपलब्ध आहे. फक्त, तो बारा वर्षांचा असताना शास्त्री व परूशी ह्यांच्याशी जेरूसलेमच्या मंदिरात वादविवाद करत असल्याचा उल्लेख ल्यूककृत शुभवर्तमानात (२:४१–५२) आढळतो. येशू ख्रिस्त काश्मीरमध्ये होता असे म्हणणे मात्र केवळ कल्पनाविलास असून त्यास भरीव पुरावा नाही.
येशू ३० वर्षांचा असताना येशूला बाप्तिस्मा देणारा येशूचा नातेवाईक (मेरीची मावसबहीण एलिझाबेथ हिचा मुलगा) योहान (जॉन द बॅप्टिस्ट) हा जॉर्डन नदीच्या काठी पश्चात्तापाची घोषणा करीत फिरत होता. येशूने योहानकडून आपला बाप्तिस्मा करून घेतला. त्यावेळी आपणाला परमेश्वराने काही विशिष्ट कार्य करण्यासाठी निवडले आहे आणि आपणाबरोबर परमेश्वराचा आत्मा व कृपादृष्टी आहे हे येशूला जाणवले.
‘देवाचे राज्य जवळ आले आहे’ हा योहानचा संदेश ऐकून त्याची सिद्धता करण्यासाठी येशूने अहर्निश प्रयत्न केले. कारण त्याने केलेल्या कार्याचा अवधी तीन वर्षांहून अधिक नसावा, असे संशोधकांचे म्हणणे आहे. त्याच्या मागे जरी असंख्य लोक फिरत होते, तरी त्याने त्यातून फक्त १२ जणच अपॉसल्स किंवा ‘धर्मदूत’ म्हणून निवडून घेतले. त्यांपैकी यहुदा इस्कर्योत याने शेवटी शत्रूशी हातमिळवणी केली व एका रात्री येशूला पकडून देऊन परूशी व याजक ह्यांच्या हवाली केले.
येशूच्या कार्याची क्रमवार व संपूर्ण माहिती चारींपैकी एकाही शुभवर्तमानात आढळत नाही परंतु मत्तयकृत शुभवर्तमानाच्या चौथ्या अध्यायात २३–२५ ह्या वचनांत येशूच्या कार्याची रूपरेखा व क्षेत्र ह्यांचे जे थोडक्यात वर्णन आले आहे ते असे : देवाच्या राज्याची घोषणा करणे. आजाऱ्यांना व पीडितांना बरे करणे. जॉर्डन नदीच्या पलीकडून यहुदा प्रांतातून, जेरूसलेम, गालीलेया वगैरे ठिकाणांहून लोकांचे थवे येशूकडे येत. चारही शुभवर्तमानांत त्याच्या संदेशांची नोंद आहे. संदेश देताना तो क्लिष्ट शब्द, तत्त्वज्ञान टाळत असे. सोप्या शब्दांत, नेहमीच्या जीवनातील प्रसंगांच्या आधारे तो आपला संदेश देत असे. शेतकरी, मेंढपाळ, रानातील फुले व पक्षी इत्यादींवर आधारलेले ४० दृष्टांत व २ रूपककथा (बी पेरणाऱ्याचे रूपक) ह्यांची नोंद सर्व शुभवर्तमानांत आढळते. येशूने ह्याच्यापेक्षा कितीतरी पट अधिक दृष्टांत दिले असतील परंतु ते सर्वच्या सर्व नोंदले गेले नाहीत. अवघ्या सहा तासांत सांगता येतील एवढेच संदेश आणि दृष्टांत नोंदले गेले आहेत. तसेच त्याने तीन वर्ष कार्य केले. ह्या कालावधीत त्याने केवळ १९ रोग्यांनाच बरे केले नसेल, तर कितीतरी जणांच्या जीवनात प्रकाश आणला असेल. अवघ्या सहा आठवडयात घडू शकतील एवढ्याच घटनांची नोंद ह्या ४ शुभवर्तमानांत आढळते. असंख्य घटना अनुल्लेखित राहिल्या असतील. दैवी चमत्कार वा सामर्थ्य दाखवण्याचे प्रसंग त्याने कटाक्षाने टाळले कारण त्याला तशा प्रकारची प्रसिद्धी नको होती.
आपणाला फार मोठे कार्य अल्पावधीत करावे लागणार आहे, ही कालमर्यादेची जाणीव त्याला एकसारखी टोचत होती. येशूने यहुद्याचे याजक व परूशी ह्यांच्या कर्मठपणामुळे त्यांच्यावर सतत हल्ला चालू ठेवला (ढोंगी, सापाच्या पिल्लांनो असे त्यांना तो संबोधित असे). रोमी सरकारच्या हुकमतीखाली असूनही यहुदी राजा हेरोद ह्याच्या वर्तनामुळे त्याच्याशी संबंध ठेवण्याचे तो उघडपणे टाळीत असे (त्याला कोल्हा, खोकड असे म्हणे). पापी व जकातदार ह्यांच्या घरी जात असे व त्यांच्या समवेत भोजन करीत असे. महारोग्यांना स्पर्श करीत असे. श्रीमंतांपेक्षा गरिबांना व भिकाऱ्यांना स्वर्गाच्या राज्यात लवकर प्रवेश मिळेल असा प्रचार करीत असे. यहुद्यांच्या आध्यात्मिक जीवनाचे केंद्रस्थान व यहुदी राष्ट्राचा मानबिंदूच असे जेरूसलेममधील मंदिर जर पाडले तर आपण ते तीन दिवसांत परत बांधू अशी घोषणा त्याने केली होती. जेरूसलेमचा लवकरच नाश होईल असे भाकित त्याने केले होते (इ. स. ७० साली तसे झाले). पतित स्त्रीने केलेल्या तैलाभ्यांगाचा सर्वांदेखत मार्मिक शब्द उच्चारून त्याने स्वीकार केला. माझ्याकडे आल्यावाचून कोणीही देवाकडे जाऊ शकत नाही, अशा प्रकारची विधाने तो धैर्याने करीत असे. ह्या सर्वांमुळे येशू म्हणजे एक वादग्रस्त व्यक्तिमत्त्व झाले होते. ज्या समाजात सर्वच बंधुभावाने राहतात आणि जेथे गरिबांची बूज राखली जाते व त्यांना मानाने वागवले जाते त्या समाजाच्या बाजूने येशू ख्रिस्त खंबीरपणे उभा राहिला. ह्या सर्वाला परमेश्वराची संमती आहे असे सांगणे आणि हा परमेश्वर म्हणजे खुद्द इझ्राएलचा देव असून आपण त्याचा पुत्र आहो असे सांगणे, म्हणजे उद्याचे मरण आजच ओढवून घेण्यासारखे होते हे त्याला ठाऊक होते. ‘गुरुजी शत्रू आपणास मारण्याचा कट करीत आहेत. आपण जेरूसलेमला जाऊ नये’, असा आग्रह शिष्य करीत असतानाही तो झटकन उठून जेरूसलेमकडे तोंड करून चालू लागला. ‘मी मरावे व तिसऱ्या दिवशी परत उठावे याचे अगत्य आहे’ असे म्हणून त्याने जणू आगीत तेलच ओतले. ह्या घटनांना जवळजवळ २,००० वर्षे झाली. उपेक्षित, गरीब, मुले, विधवा व समाजबहिष्कृत वर्गांची काळजी घेणाऱ्या बंधूंच्या नव्या समभाव असलेल्या समाजाची उभारणी करणारा आणि सामाजिक किंवा आर्थिक मानापमानाच्या दडपणासमोर न वाकणारा त्या काळाचा क्रांतिकारक असा येशू याला शोभेल असेच मरणही लाभले. त्याला पकडून जेरूसलेम येथे न्यायासनासमोर उभे केले असता यहुदी याजकाला ‘मी देवाचा पुत्र आहे’ असे त्याने सांगितले. गव्हर्नर पिलाता हा त्याच्या सुटकेसाठी प्रयत्न करीत असता त्याने त्याचा अव्हेर केला. शिपायांनी केलेली थट्टा आणि चाबकाचा मार सहन केला. क्रूसावर लटकवल्यानंतर, ‘बापा, त्यांना क्षमा कर ते काय करतात ते त्यांचे त्यांनाच समजत नाही’ अशी आपल्या शत्रूंसाठी क्षमायाचना केली. शेवटी ‘आता सर्व पूर्ण झाले आहे, मी आपला आत्मा तुला सोपवून देतो’, असा उदात्त विचार व्यक्त करून येशूने प्राणत्याग केला.
ज्या कबरीत येशूचे शव शुक्रवारी सूर्यास्तापूर्वी ठेवले होते, ती कबर रविवारी पहाटे रिकामी आढळली. त्याचे शव त्याच्या शिष्यांनी रात्रीच चोरून नेले असावे अथवा क्रूसावर तो मरण न पावता नुसताच बेशुद्ध झाला असावा व रात्री परत शुद्धीवर आला असावा, ही विधाने बायबलमध्ये पूर्णपणे नाकारलेली आहेत. येशू ख्रिस्ताच्या कुशीत भाला भोसकल्यानंतर त्यातून रक्त व पाणी विभक्तपणे कसे आले, याचे सेंट योहानने वर्णन केले आहे आणि ते येशूच्या मरणाचे निश्चित असे चिन्हही मानले जाते. आरंभीच्या काळातील ख्रिस्ती शिकवणुकीच्या बायबलमध्ये असणाऱ्या सर्व सारांशांमध्ये येशू ख्रिस्त मेला, असेच सांगण्यात येते. त्याच्या मरणाबरोबरच शिष्यांना वाटले, की सर्व काही संपले परंतु त्याच्या मृत्यूनंतरच्या तिसऱ्या पुररुत्थानाच्या दिवशी, रविवारी, येशू ख्रिस्त जिवंत रूपात भेटल्यावर त्यांना नवीन सामर्थ्य व श्रद्धा प्राप्त झाली [⟶ पुनरुत्थान]. देवाने हे घडवून आणून येशूच्या जीवनाला व कार्याला असलेला आपला पाठिंबा व्यक्त केला, ह्याची त्यांना खात्री झाली व ह्या विश्वासावर त्यांनी ख्रिस्तमंडळ (चर्च) उभारले. अनेक वर्षे ख्रिस्ताच्या अनुयायांनी अपार छळ सोसला, हजारोंनी हौतात्म्य स्वीकारले परंतु ह्याच विश्वासाच्या आधारावर चर्च आजतागायत कार्य करत भक्कमपणे उभे आहे.
येशू ख्रिस्ताच्या ऐतिहासिक अस्तित्वाबद्दल शंका नाही, याच्याशी आजचे पंडित सहमत आहेत. येशूच्या समकालिनांनी लिहिलेली चार शुभवर्तमाने हीच येशूच्या जीवनाविषयी विशेष माहिती देतात.येशूच्या समकालीनांनी लिहिलेली चार शुभवर्तमाने हिच येशूच्या जीवनाविषयी विशेष माहिती देतात. येशूचे समकालीन त्याच्याकडे त्यांना आलेल्या त्याच्या पुनरुत्थानाच्या अनुभवातून पाहतात. या अनुभवातूनच ते त्याच्या शिकवणुकीचा आणि कृतीचा अर्थ लावतात. ही शुभवर्तमाने सलग जीवनकथेच्या रूपात लिहिलेली नाहीत व अशी जीवनकथा ते लिहूही देत नाहीत. त्यात वेगवेगळे परिच्छेद आहेत आणि श्रद्धेच्या प्रकाशात लिहिलेला तो इतिहास आहे. ‘काय घडले’ याकडे त्यांचे मुख्य लक्ष नसून, जे घडले त्याद्वारे त्याला काय सांगायचे होते, याकडेच जास्त लक्ष होते. प्राचीन यहुदी किंवा इतर ख्रिस्ती नसलेल्या लेखकांनुसार येशू ख्रिस्ताचे अस्तित्व कोणीही नाकारीत नाही. अगदी प्राचीन काळात अख्रिस्ती लेखक टॅसिटस (इ. स. ५५ ? – १२०), स्विटोनिअस (इ. स. ७०? – १३०) आणि धाकटा प्लिनियस (इ. स. ७२? – ११३) हे आहेत.
टॅसिटसने आन्नालेसमध्ये (१५·४) लिहिले आहे, की टायबेरियस सम्राटाच्या आधिपत्यातील पाँटियस पायलट (पिलात) या राज्यपालाच्या हुकूमावरून येशू ख्रिस्ताला मारण्यात आले. क्लॉडियसमध्ये (२५·४) स्विटोनिअस लिहितो, की क्रेस्तस (क्रिस्तस) नामक कुणा मनुष्याने रोममध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण केले. धाकटया प्लिनियसने ट्राजाला (पत्र १०–१६) लिहिले आहे, की ख्रिस्ताला देवासारखे पूज्य मानीत होते.
आजच्या आपल्या काळापर्यंत येशू ख्रिस्त प्रेरणादायक ठरला आहे. येशू ख्रिस्ताशी संबंधित असे एकही चित्र काढले नसेल असा आधुनिक पाश्चिमात्य चित्रकार सापडायला कठीण आहे. भारताच्या प्रबोधन काळातील महान पुरुषांनी येशू ख्रिस्ताबद्दल सखोल आदरातून लिखाण केले आहे. उदा., राजा राममोहन रॉय, केशवचंद्र सेन, पी. सी. मुजुमदार, महात्मा गांधी, विनोबा भावे प्रभृती.
येशू ख्रिस्त व्यक्ती व शिकवण यासंबंधी जगातील बहुतांश भाषांत तसेच मराठीतही बरेच वाङ्मय उपलब्ध आहे. मराठीत १६१३ मध्ये फादर स्टीफन्स यांनी लिहिलेला ख्रिस्तपुराण हा ग्रंथ प्रा. शांताराम बंडेलू यांनी पुन्हा संपादून प्रसिद्ध केला आहे (१९५८). बाबा पदमनजींनी ‘येशू ख्रिस्ताचे चरित्र’ लिहिले आहे (१८९५). ना. वा. टिळक (सहायक : लक्ष्मीबाई टिळक व देवदत्त टिळक) यांनी ख्रिस्तायन तयार केले (१९३८). मराठीमध्ये इतरही छोटी-मोठी ख्रिस्तचरित्रे आहेत. ख्रिस्ताच्या जीवनासंबंधी ऐतिहासिक कादंबऱ्याही प्रकाशित झाल्या आहेत. उदा., वि. ज. बोरकरकृत अनाहत (१९७०). येशूची सुबक आणि चित्रमय जीवनचरित्रेही तयार झाली आहेत. येशू ख्रिस्त तारक (दुसरी आवृ. १९७५) व येशू ख्रिस्त (१९८२) ही अलीकडील उल्लेखनीय मराठीतील चरित्रे आहेत. जगातील तसेच भारतातील बहुतांश भाषांत ख्रिस्तचरित्रे उपलब्ध आहेत.
संदर्भ : 1. Adam, K.The Son Of God, New York, 1960.
2. Dodd, C. H. According to the Scriptures, London, 1952.
3. Leon-Dufour, The Gospels and the Jesus of History, London, 1968.
४. गेनसे, जे. एच्. अनु. दीक्षित, द. गो. नाझरेथकर येशूची शोकांतिका व त्याचा विजय, मुंबई, १९५४.
५. धर्माधिकारी, भाऊ, मानवाचा पुत्र येशू, मुंबई, १९८३.
आयरन, जे. डब्ल्यू. लेदर्ले, मॅथ्यू-रायनर
“