येल विद्यापीठ : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील एक जुने व प्रसिद्ध विद्यापीठ. न्यू हेवन (कनेक्टिकट राज्य) या शहरात ते वसले आहे. जगप्रसिद्ध हार्व्हर्ड आणि स्टॅनफर्ड विद्यापीठांसारखी अमेरिकेत या विद्यापीठाला प्रतिष्ठा व परंपरा आहे.विद्यापीठाची विविध शिक्षणकेंद्रे सु. ७१ हेक्टर परिसरात असून व्यायामकेंद्रे आणि क्रीडामैदाने यांचे क्षेत्र २९३ हेक्टरांचे आहे.
दहा ख्रिस्ती धर्मोपदेशकांनी १७०१ साली ब्रॅनफर्ड येथे सुरू केलेले ‘कॉलेजिएट स्कूल’ हे या विद्यापीठाचे आद्य स्वरूप. १७१६ साली त्याचे न्यू हेवन येथे स्थलांतर करण्यात आले. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा मद्रास येथील गव्हर्नर एलिहू येल (कार. १६८७–९२) याने सेवानिवृत्तीनंतर या महाविद्यालयास मोठी देणगी दिली व म्हणून त्याचे नाव या विद्यापीठास १७१८ साली देण्यात आले. येल महाविद्यालयाचे पुढे १८८७ साली ‘येल विद्यापीठ’ असे अधिकृत नामकरण झाले.
या विद्यापीठाच्या अध्ययन-अध्यापनाच्या विषयांत उत्तरोत्तर वाढ होत गेल्याचे दिसून येते. वैद्यक विद्यालय (१८१०), धर्म विद्यालय (१८२२), विधी विद्यालय (१८२४), स्नातकोत्तर विभाग (१८४७), भौतिकी विद्यालय (१८६१), ललित कला व स्थापत्य विद्यालय (१८६५), संगीत विद्यालय (१८९४), वनविद्या विद्यालय (१९००), परिचर्या किंवा शुश्रुषा विद्यालय (१९२३), अभियांत्रिकी विद्यालय (१९३२), नाट्यकला विद्यालय (१९५५), व्यवसाय संघटना आणि व्यवस्थापन (१९७४) हे विद्यापीठाच्या विकासाचे काही ऐतिहासिक टप्पे होत. विद्यापठातील एकूण विद्यार्थिसंख्या सु. ११,००० असून त्यांत ९०० परदेशी विद्यार्थी व १,१०० च्या वर प्राध्यापक आहेत (१९८६). येथील ग्रंथालयात सु. ८० लक्ष पुस्तके असून नियतकालिकांची संख्या सु. ६,००० आहे.
विद्यापीठातील स्नातकपूर्व शिक्षणात अगदी निवडक व हुशार विद्यार्थीच घेतले जातात आणि ते उच्च शालेय शिक्षणात अगदी वरच्या दर्जाची गुणवत्ता प्राप्त केलेल्या साधारणपणे २०% विद्यार्थ्यांपैकी असतात. त्यांपैकी १७ % विद्यार्थी अल्पसंख्यांक वर्गातील निवडलेले असतात. १९६९ पर्यंत या विद्यापीठात स्नातकपूर्व शिक्षणासाठी विद्यार्थिनींना प्रवेश दिला जात नसे. विद्यापठातील ९०% विद्यार्थी वसतिगृहात व १० टक्के बाहेर राहतात. एकाच वसतिगृहात विद्यार्थी आणि विद्यार्थिनी राहत असल्या, तरी त्यांच्या खोल्या वेगवेगळ्या मजल्यांवर असतात. स्नातकपूर्व विद्यार्थ्याचा वार्षिक शिक्षणखर्च सु. १,८०,००० रु. आहे. गरजेनुसार विद्यार्थ्यामागे सु. ५६,४०० रु. वर्षाला सरासरी मिळतात. स्नातकपूर्व शिक्षण देणारे सर्व प्राध्यापक पीएच्.डी. झालेले असतात. विशेष म्हणजे स्नातकोत्तर विभागातील प्राध्यापकही स्नातकपूर्व शिक्षणात मोठ्या संख्येने भाग घेतात. शैक्षणिक वर्ष दोन सहामाहींचे असते. दर सहामाहीनंतर मुख्य परिक्षा घेतल्या जातात, तरी परीक्षा नित्य असतात व सर्व परीक्षांचे महत्त्व अनेकदा मुख्य परीक्षांइतकेच असते आणि चार वर्षांच्या अध्ययनानंतर बी. ए. व विज्ञान विषयात बी. एस्. या पदव्या दिल्या जातात. प्रत्येक विद्यार्थ्याला चार वर्षांत ३६ विषयांचा अभ्यास करावा लागतो. या ३६ विषयांपैकी २४ विषय हे प्रमुख अभ्यासक्षेत्रातून व १२ त्याबाहेरील क्षेत्रातून निवडावे लागतात. काही प्रमुख विषयक्षेत्रे पुढीलप्रमाणे आहेत : (१) भौतिकी, (२) मानव्यविद्या, (३) आफ्रो-अमेरिकन विद्या, (४) मानवशास्त्र, (५) स्थापत्य, (६) परदेशी विद्या (चीन, जपान, रशिया इ.), (७) नाट्यशास्त्र, (८) अभियांत्रिकी आणि अनुप्रयुक्त शास्त्रे, (९) भाषाशास्त्र, (१०) अणुजीवशास्त्र, (११) जीवरसायनशास्त्र इत्यादी.
स्नातकोत्तर शिक्षणात विद्यार्थिसंख्या सु. ४,५७२ व प्राध्यापकसंख्या सु. ५०० होती (१९८४-८५). स्नातकोत्तर अध्यापनातही सहामाही परीक्षा पद्धती असून त्यातून एम्. ए., एम्. फिल., पीएच्. डी. यांसारख्या पदव्या यशस्वी विद्यार्थ्याना दिल्या जातात. मानव्यविद्या, भौतिकी व समाजशास्त्र, धर्मशास्त्र, विधी, वैद्यक इ. विषयांत स्नातकोत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सापेक्षतः अधिक आढळते.
साधारणपणे स्नातकोत्तर विद्यार्थ्याला प्रतिवर्षी सु. १,४४,००० रु. खर्च होतो तथापि शिष्यवृत्त्या, शिक्षक म्हणून मिळणारे वेतन व इतर अनुदाने या रूपाने काही आर्थिक फायदेही सर्वसाधारण स्नतकोत्तर विद्यार्थ्याला उपलब्ध असतात. याशिवाय शैक्षणिक कर्जेही कमी व्याजाने मिळू शकतात.
येल विद्यापीठातील काही वैशिष्ट्यपूर्ण अभ्यासकेंद्रे पुढीलप्रमाणे आहेत : दुर्मिळ ग्रंथ आणि हस्तलिखितांचे बैनके ग्रंथालय, निसर्गेतिहासाचे पोबॉडी संग्रहालय, वेधशाळा, संगणक केंद्र, महासागर विज्ञान आणि पक्षिविज्ञान यांची प्रयोगशाळा, क्लाइन भूगर्भशास्त्र प्रयोगशाळा व रसायन संशोधन शाळा, गीब्ज जीवशास्त्र प्रयोगशाळा, अणुगर्भरचना संशोधन शाळा, अणुजीवशास्त्र संशोधन शाळा, जीवभौतिकी संशोधन शाळा, एम्परर प्रवेगक, क्लाइन जीवशास्त्र मिनार, इलेक्ट्रॉन व जड आयन यांचा प्रवेगक, अभियांत्रिकी व अणुप्रयुक्त शास्त्राचे बेक्टन केंद्र, सामाजिक-राजकीय धोरण संस्था, सामाजिक व्यवहार संशोधन शाळा व राज्यशास्त्र संशोधन शाळा इत्यादी.
उदारमतवादी शिक्षणाची आद्य अभिजात परंपरा अबाधित राखून येल विद्यापठाने आधुनिक ज्ञानविज्ञानांच्या अध्ययन-अध्यापनाचा मोठा विकास घडवून आणला. येल लिटररी मॅगझिन (स्था. १८३६) आणि येल डेली न्यूज (स्था. १८७८) ही या विद्यापठाची नियतकालिके उल्लेखनीय आहेत. येल बॅन्ड, रेडीओ केंद्र, राजकीय संघ (युनियन) आणि चर्चा मंडळ यांसारखे या विद्यापठातील उपक्रमही महत्त्वाचे आहेत. ‘विद्यापीठ समिती’ (कौन्सिल) हे या विद्यापीठाचे आणखी एक वैशिष्ट्य. उपसमित्या नेमून व भेटी देऊन ही समिती विद्यापठाच्या शैक्षणिक कार्यात वरचेवर मार्गदर्शन करीत असते. अमेरिकेच्या राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रांत येल विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी–एलिज–महत्त्वाची पदे भूषविली आहेत व कार्येही केलेली आहेत.
संदर्भ : 1. Cass,J Birnbaum, M.Comparative Guide to American Colleges, New York, 1985.
2. Pierson. G.W.Yale College an Educational History. 1871-1927, New Haven, 1952.
3. Pierson, G. W. Yale, The University College, 1921-27, New Heaven, 1956.
जोशी, म. ल.