येर्कुलानु, आलेशांद्रि : (२८ मार्च १८१० – १३ सप्टेंबर १८७७). पोर्तुगीज इतिहासकार, कादंबरीकार आणि कवी. लिस्बन शहरी जन्मला. तरुण वयात र्दो मिगेलच्या निरंकुश राजसत्तेविरुद्ध झगडला त्यामुळे काही काळ त्यास इंग्लंड व फ्रान्स ह्या देशांत परागंदा व्हावे लागले होते. १८३२ मध्ये र्दो मिगेलवर चालून आलेल्या र्दो पेद्रो ह्याच्या सैन्यातील एक साधा सैनिक म्हणून तो पोर्तुगालला परतला. त्यानंतर ओपोर्तो येथील सार्वजनिक ग्रंथालयात तसेच आझ्यूंदा येथील शाही ग्रंथालयात त्याने ग्रंथपाल म्हणून काम केले. पोर्तुगीज संसदेचा तो काही काळ सदस्य होता. पोर्तुगालमधील विज्ञान अकादमीचे उपाध्यक्षपदही त्याने भूषविले. व्हाल द लोवोस येथे तो निधन पावला.
पोर्तुगीज साहित्यात स्वच्छंदतावाद आणण्याचे श्रेय श्रेष्ठ पोर्तुगीज कवी ⇨आल्मैदा गार्रॅ ह्याच्याबरोबरच येर्कुलानोलाही दिले जाते. त्याने काही कादंबऱ्याही लिहिल्या. तथापि त्याची कीर्ती आज मुख्यतः त्याने लिहिलेल्या इतिहासग्रंथांवर अधिष्ठित आहे. इश्तॉरिअ द पोर्तुगाल (४ खंड, १८४६–५३ इं. शी. हिस्टरी ऑफ पोर्तुगाल) व इश्तॉरिअ द ओरिझ्यँ इश्ताबेलेसिमॅन्तु द इंकिझिसांउ एँ पोर्तुगाल (१८५४–५९, इं. शी. हिस्टरी ऑफ द ओरिजिन अँड एस्टॅब्लिशमेंट ऑफ इंक्विझिशन इन पोर्तुगाल) हे त्याचे इतिहासग्रंथ प्रसिद्ध आहेत. शास्त्रीय आणि निःपक्षपाती दृष्टिकोणातून इतिहासलेखन करणारा येर्कुलानो हा पहिला पोर्तुगीज इतिहासकार होय. येर्कुलानो हा निष्ठावंत ख्रिस्ती होता. तथापि इतिहासलेखन करताना प्रचलित धर्मश्रद्धाही त्याने बाजूला ठेवल्यामुळे पोर्तुगीज चर्चच्या रोषाला त्याला तोंड द्यावे लागले. त्याने लिहिलेल्या कादंबऱ्यात माँझ्यि द सिस्तॅर (१८४८, इं. शी. सिस्टर्शन मंक) ही विशेष उल्लेखनीय. ख्रिस्ती धर्मोपदेशकांचे ब्रह्मचर्य हा ह्या कादंबरीचा विषय. ऊ पारॉकु द आल्देआ (१८४४, इं. शी. द पारिश प्रिस्ट) ही कादंबरी लिहून त्याने पोर्तुगीज साहित्यात गोपकादंबरी (पास्टोरल नॉव्हेल) आकारास आणली.
रॉड्रिग्ज, एल. ए. (इं.) कुलकर्णी, अ. र. (म.)