येन्झेन (जेन्सेन),योहानेस हान्स डानियल : (२५ जून १९०७-११ फेब्रुवारी १९७३). जर्मन भौतिकीविज्ञ. अणुकेंद्रीय कवच प्रतिमानासंबंधीच्या [⟶ अणुकेंद्रीय भौतिकी] संशोधनाकरिता येन्झेन यांना ⇨मारीआ गोपर्ट मायर व ⇨यूजीन पॉल विग्नर यांच्या समवेत १९६३ सालच्या भौतिकीच्या नोबेल पारितोषिकाचा बहुमान मिळाला.
येन्झेन यांचा जन्म हँबर्ग येथे झाला. हँबर्ग विद्यापीठात शिक्षण घेऊन त्यांनी पीएच्. डी.(१९३२) व डी. एस्सी. (१९३६)या पदव्या संपादन केल्या. १९३३–४१ या काळात हँबर्ग विद्यापीठात अध्यापन केल्यावर ते हॅनोव्हर येथील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये सैद्धांतिक भौतिकीचे प्राध्यापक झाले १९४९ मध्ये हायडल्बर्ग विद्यापीठात प्राध्यापकपदावर त्यांची नेमणूक झाली.
प्रारंभी त्यांनी आयन जालकांचा (आयनांनी–विद्युत् भारित अणूंनी वा अणूगटांनी–बनलेल्या स्फटिकाच्या जालकांचा) ⇨पुंजयामिकीच्या दृष्टीने अभ्यास केला, तसेच अती उच्च दाबाखालील द्रव्याच्या वर्तनासंबंधी संशोधन केले. पुढे एच्. ई. झ्यूस व ओ. हॅक्सेल यांच्या समवेत संशोधन करून त्यांनी १९४९ मध्ये अणुकेंद्राच्या गुणधर्मांचे विशदीकरण करण्यासाठी अणुकेंद्रीय कवच प्रतिमान सुचविले. याच सुमारास मायर यांनीही जवळजवळ अशाच स्वरूपाचे प्रतिमान स्वतंत्र रीत्या मांडले. या प्रतिमानानुसार अणुकेंद्राचा विचार प्रोटॉन व न्यूट्रॉन यांच्या एका बिंदूभोवतील यदृच्छ गतीच्या स्वरूपात न करता अणुकेंद्र हे निरनिराळ्या त्रिज्यांच्या कवचांचे व गोलीय स्तरांचे बनलेले असून प्रत्येक कवचात न्यूट्रॉन व प्रोटॉन असतात अशा प्रकारे केला पाहिजे, असे सुचविण्यात आले. या प्रतिकृतीचे गृहीत पुढे अनेक प्रयोगशाळांतून करण्यात आलेल्या प्रोटॉन व न्यूट्रॉन यांच्या प्रकीर्णनासंबंधीच्या (इतर अणुकेंद्रांशी होणाऱ्या टकरींमुळे त्यांच्या गतीच्या दिशेत होणाऱ्या बदलांसंबंधीच्या) प्रयोगांद्वारे प्रस्थापित केले.
येन्झेन यांनी अमेरिकेतील विस्कॉन्सिन, कॅलिफोर्निया, इंडियाना व मिनेसोटा या विद्यापीठांत, तसेच इन्स्टिटयूट ऑफ ॲडव्हान्स्ड स्टडी (प्रिन्स्टन) व कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थांत अभ्यागत प्राध्यापक म्हणून काम केले. मायर यांच्या बरोबर त्यांनी एलेमेंटरी थिअरी ऑफ न्यूक्लिअर शेल स्ट्रक्चर (१९५५) हा ग्रंथ लिहिला. ओ. हॅक्सेल यांच्या समवेत ते १९५५ पासून Zeifschrift Fiir Physik या नियतकालिकाचे सहसंपादक होते. हे हायडल्बर्ग येथे मृत्यू पावले.
भदे, व. ग.