येट्स, विल्यम बटलर : (१३ जून १८६५–२८ जानेवारी १९३९). अँग्लो-आयरिश कवी, नाटककार आणि निबंधकार. आयर्लंडमधील डब्लिन शहरी जन्मला. त्याचे वडील चित्रकार होते. येट्सचे शिक्षण लंडन व डब्लिन येथे झाले. डब्लिनच्या ‘मेट्रोपोलिटन स्कूल ऑफ आर्ट’ मध्ये काही काळ त्याने कलाशिक्षण घेतले होते (१८८४–८६). १८८६ साली त्याने स्वतःला लेखनास वाहून घेण्याचा निर्णय घेतला. येट्सच्या बालपणाचा बराचसा काळ त्याच्या आजोळी, स्लायगो येथे गेला. तेथील सृष्टिसौंदर्याची पार्श्वभूमी त्याच्या अनेक कवितांना लाभली आहे. साधारणत: वयाच्या सतराव्या वर्षापासून तो काव्यरचना करू लागला, असे दिसते. १८८७ पासून त्याच्या कविता प्रसिद्ध होऊ लागल्या. ह्याच वर्षी लंडनमधील थिऑसॉफिकल सोसायटीचा तो सदस्य झाला. तत्पूर्वी डब्लिन हेर्मेटिक सोसायटी ह्या गूढाभ्यासक गटाच्या उभारणीस त्याने हातभार लावला. १८८८ मध्ये विल्यम मॉरिस, जॉर्ज बर्नार्ड शॉ, ऑस्कर वाइल्ड ह्यांसारख्या साहित्यिकांशी त्याचा परिचय झाला. द वाँडरिंग्ज ऑफ ऑइसिन अँड अदर पोएम्स हा त्याचा पहिला काव्यसंग्रह १८८९ मध्ये प्रसिद्ध झाला. ह्याच वर्षी मॉड गॉन ह्या बंडखोर, आयरिश राष्ट्रवादी तरुणीशी त्याचा परिचय झाला, येट्स तिच्यावर प्रेम करू लागला परंतु त्याच्या प्रेमाला तिच्याकडून कधीच प्रतिसाद मिळाला नाही. १८९१ साली लंडनच्या आणि १८९२ मध्ये डब्लिनच्या आयरिश लिटररी सोसायटीची स्थापना झाली. ह्या दोन्ही संघटनांचा येट्स हा संस्थापक सदस्य होता. १८९१ साली आयरिश नेता चार्ल्स स्ट्यूअर्ट पार्नेल ह्याचे निधन झाल्यानंतर आयर्लंडच्या राजकीय जीवनात निर्माण झालेली पोकळी कला-साहित्याने भरून काढता येईल,असे येट्सला वाटत होते. द केल्टिक ट्वाय्लाइट (१८९३) हा त्याचा निबंधसंग्रह म्हणजे त्याच दिशेने टाकलेले एक पाऊल होते. १८९६ मध्ये ऑगस्टा लेडी ग्रेगरी ह्या आयरिश स्त्रीशी त्याची ओळख झाली. ह्या परिचयाचे गाढ मैत्रीत रूपांतर झाले. येट्सबरोबर ‘आयरिश नॅशनल थीएटर सोसायटी’च्या स्थापनेत (१९०२) तिने भाग घेतला (तत्पूर्वी ‘आयरिश लिटररी थीएटर’ ह्या नावाने हा गट ओळखला जायचा. १८९९ मध्ये तो अस्तित्वात आला होता). ह्याच संस्थेचे १९०४ मध्ये ‘ॲबी थीएटर’ असे नामकरण झाले. आयरिश जीवनावरील नाट्यकृतींचे लेखन आणि सादरीकरण हे ह्या संस्थेचे उद्दिष्ट होते. अगदी आरंभापासून येट्सने ह्या संस्थेला नाट्यकृती दिल्या. द काउंटेस कॅथलीन (पद्यनाटक, प्रथम प्रयोग १८९९), कॅथलीन नी हौलिहान (१९०२), ॲट द हॉक्स वेल (१९१६), द ओन्ली जेलसी ऑफ एमर (लेखन १९१६, प्रथम प्रयोग १९२२), द किंग ऑफ द ग्रेट क्लॉक टॉवर (१९३४) व परगेटरी (१९३८) ही येट्सची काही नाटके. उपर्युक्त नाटकांपैकी ॲट द हॉक्स वेल आणि द ओन्ली जेलसी ऑफ एमर ही नाटके गेलिक साहित्यातील अनेक कथांचा नायक, आयरिश महायोद्धा कूखुलिन ह्याच्या जीवनावर आहेत. विख्यात अमेरिकन कवी एझरा पाउंड हा येट्सचा काही काळ सचिव होता. पाउंडमुळे येट्सचे लक्ष जपानी नो नाट्याकडे गेले आणि त्या नाट्यप्रकाराने तो प्रभावित झाला. त्या प्रभावातून त्याने ‘फोर प्लेज फॉर डान्सर्स’ ही नाट्यमाला लिहिली. ॲबी थीएटरच्या स्थापनेमागे कल्पना होती, ती आयरिशांच्या लोकरंगभूमीची तथापि तशा रंगभूमीसाठी येट्सने लिहिलेली नाटके सर्वसामान्यांसाठी होती, असे म्हणता येणार नाही. येट्स हा मनाने उमरावी संस्कृतीचा पुरस्कर्ता होता व मध्यम वर्गाविषयी तसेच घोळक्यांच्या संस्कृतीविषयी त्याला तिटकारा होता. आपल्या व्यक्तिरेखांच्या आत्म्यांचा नाट्याविष्कार घडवून आणणे, आत्म्यांचा प्रवास उभा करणे हा येट्सच्या नाट्यलेखनामागील उद्देश होता आणि नाट्यलेखन हा त्याच्या व्यापक सर्जनशील जीवनाचा एक लहानसा भाग होता. शिवाय येट्सला आयर्लंडबद्दल प्रेम असले, तरी त्याला आयरिश इतिहासातील पेगन कालखंड आणि त्या कालखंडातील वीरतेची मूल्ये ह्यांबद्दल विशेष ओढा होता. त्यामुळे तो अधार्मिक, कॅथलिक पंथविरोधक आणि म्हणून आयरिशविरोधीही ठरवला गेला. परंतु वादांना तो कधीच भ्याला नाही आणि चाकोरीतल्या यशाचीही त्याने कधी पर्वा केली नाही.
येट्सच्या काव्यग्रंथांत द विंड अमंग द रीड्स (१८९९), द शॅडोई वॉटर्स (१९००), इन द सेव्हन वूड्स (१९०३), द ग्रीन हेलमेट अँड अदर पोएम्स (१९१०), रिस्पॉन्सिबिलिटीझ (१९१४), द टॉवर (१९२८), द वाइंडिंग स्टेअर अँड अदर पोएम्स (१९२९) आणि लास्ट पोएम्स (१९४०) ह्यांचा समावेश होतो.
प्रतीकवादी प्रवृत्तीचा जाणीवपूर्वक आविष्कार आपल्या कवितांतून घडवणाऱ्या इंग्रजीतील आरंभीच्या कवींपैकी येट्स हा एक होय. कवी म्हणून त्याच्या विकासाचे दोन टप्पे दाखवता येतील. पहिला, १९०० पर्यंतचा. ह्या कालखंडातील त्याच्या कवितेवर प्रतीकवादाप्रमाणेच एडमंड स्पेन्सर, इंग्रजीतील स्वच्छंदतावादी कवी-विशेषतः शेली-तसेच ⇨ प्री–रॅफेएलाइट्स ह्या संघटनेतील इंग्रज कवी ह्यांचा प्रभाव प्रत्ययास येतो. तथापि १९०० नंतरच्या त्याच्या कवितेत परिपक्वतेचा आणि समृद्धतेचा एक वेगळाच अनुभव येतो. समकालीन जगाची सुखदुःखे, आशा-आकांक्षा ह्यांच्याशी तो समरस झालेला दिसून येतो. उदात्तता आणि व्यक्तिनिरपेक्षता कवितेत असली पाहिजे आणि संपूर्ण युगाच्या दर्शनाविष्कारासाठी कलावंताने स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाला दुय्यम स्थानावर ठेवले पाहिजे, अशी भूमिका त्याने घेतली.
सौंदर्यवादी, गूढवादी आणि राष्ट्रवादी प्रवृत्तींचे एकजीव रसायन येट्सच्या व्यक्तिमत्त्वात झालेले होते. ‘डब्लिन हेर्मेटिक सोसायटी’चे किंवा ‘थिऑसॉफिकल सोसायटी’चे त्याचे सदस्यत्व गूढवादाकडे असलेला त्याचा ओढा दर्शविते. गूढवादी इंग्रज कवी विल्यम ब्लेक ह्याच्या ‘प्रॉफेटिक बुक्स’चा त्याने अभ्यास केला होता. यातुविद्येबद्दलही त्याला आकर्षण होते. तत्त्वज्ञानातील प्लेटॉनिक आणि नवप्लेटॉनिक परंपरांचाही परिचय त्याला होता आणि विज्ञानयुगाबद्दल त्याला आस्था नव्हती. वयाच्या बावन्नाव्या वर्षी जॉर्जी हाइड-लीज ह्या तरुणीशी येट्सने विवाह केला (१९१७). येट्सच्या पत्नीलाही गूढाविषयी आकर्षण होते. समाधीसारख्या अवस्थेत ती जात असे आणि तेव्हा तिच्या हातून काही लेखन स्वयंचलितपणे होत असे. एक आध्यात्मिक माध्यम म्हणून येट्स तिच्याकडे पाहत असे. ‘ए व्हिजन’ ह्या त्याच्या तात्त्विक कवितेची रचना करताना येट्सने तिच्या स्वयंचलित लेखनाचाही आधार घेतला. आपले जीवनविषयक चिंतन इतिहासचक्रांच्या संकल्पनेतून मांडण्याचा प्रयत्न येट्सने ह्या कवितेत केलेला आहे. बायझंटिअमबद्दल त्याला आकर्षण होते. कला आणि आत्मिक विकास ह्यांना वाहिलेल्या संस्कृतीचे प्रतीक म्हणून त्याने बायझंटिअमकडे पाहिले. जीवनाच्या उत्तरार्धात येट्सने लिहिलेल्या काही उत्कृष्ट कवितांत बायझंटिअम प्रतीकार्थाने अवतरले आहे.
येट्सने गद्यलेखनही विपुल केले असून कथा, कादंबरिका, निबंध, आयरिश आख्यायिकांचे आणि मिथ्यकथांचे स्वतः च्या शैलीत पुनर्निवेदन असे त्या लेखनाचे स्वरूप वैविध्यपूर्ण आहे. येट्सच्या कथात्मक साहित्यात द सिक्रेट रोझ (१८९७) आणि स्टोरीज ऑफ रेड हॅनरॅहन (१९०४) ह्यांचा समावेश होतो. द केल्टिक ट्वायलाइट (१८९३), आय्डीआज ऑफ गुड अँड एव्हिल (१९०३), डिस्कव्हरीज : ए व्हॉल्यूम ऑफ एसेज (१९०७) आणि इफ आय वेअर फोर-अँड-ट्वेंटी (१९४०) ते त्याचे उल्लेखनीय निबंधग्रंथ. त्याच्या फेअरी अँड फोक टेल्स ऑफ द आयरिश पीझंट्री (१८८८) मध्ये आयरिश लोककथा आहेत. रेव्हरीज ऑफ चाइल्डहूड अँड यूथ (१९१५), द ट्रेंबलिंग ऑफ द व्हेल (१९२२), एस्ट्रेंजमेंट (१९२६), द डेथ ऑफ सिंग अँड अदर पॅसेजिस फ्रॉम ॲन ओल्ड डायरी (१९२८), ऑटोबायग्रॅफीज (१९५५) हे त्याचे काही आत्मचरित्रात्मक साहित्य.
‘आयरिश फ्री स्टेट’ची स्थापना १९२२ मध्ये झाल्यानंतर नव्या सेनेटचा सदस्य होण्याचे निमंत्रण येट्सला देण्यात आले आणि त्याने ते स्वीकारले. सहा वर्षे तो सेनेटचा सदस्य होता. १९२३ साली साहित्याच्या नोबेल पारितोषिकाचा सन्मान त्याला प्राप्त झाला.
येट्सचे निधन फ्रान्समध्ये रॉकब्र्यून-कॅप मार्टिन येथे झाले. त्याच्या पार्थिव देहाचे दफन त्या वेळी आयर्लंडमध्ये करता आले नाही ते रॉकब्र्यून येथेच झाले. परंतु १९४८ साली त्याचे शव तेथून काढून आयर्लंडमधील स्लायगो येथे नेण्यात आले. त्यानंतर ड्रमक्लिफ येथील प्रॉटेस्टंट चर्चच्या आवारात ते पुरण्यात आले.
संदर्भ : 1. Bloom, Harold, Yeats, Oxford, 1970.
2. Donaghue, Denis, Yeats, New York. 1971.
3.Ellmann, Richard, The Identity of Yeats, London, 1954.
4. Ellman, Richard, Yeats the Man and the Masks, London, 1949.
5. Hone, y3wuoeph, W. B. Yeats 1865-1939, London, 1942.
6. Hone, y3wuoeph, William Butler Yeats: the Poet in Contemporaty Ireland, London, 1916.
7. Melchiori, Giorgio, The Whole Mistery of Art: Pattern into Poetry in the Work of W. B. Yeats, London, 1960.
8. Parkinson, Thomas, W. B. Yeats, Self-critic, Berkeley, 1951.
9. Peterson, Richard F. William Butter Yeats, 1982.
10. Saul, G. B. Prolegomena to the Study of Yeat’s Poems, Philadelphia, 1957.
11. Unterecker, john, A Reader’s Guide to William Butler Yeats, London, 1959.
12. Ure, Peter Yeats, London, 1967.
13. Wilson, f. A. C. W B. Yeats and Tradition, London, 1958.
14. Wilson, F. A. C. Yeats Iconography, London, 1960.
कुलकर्णी, अ. र. कळमकर, य. शं.
“