यूकॅलिप्टस : फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] ⇨मिर्टेसी कुलातील (जंबुल कुलातील) एका प्रजातीचे नाव. ग्रीक भाषेत यू = चांगले कॅलिप्टो = टोपण घातल्याप्रमाणे आच्छादणे, अशी या संज्ञेची व्युत्पत्ती असून ह्या प्रजातीतील सर्व वनस्पतींच्या फुलातील ४ – ५ पाकळ्या व त्याखालचा काही भाग (संवर्त) प्रथम एकत्र जुळून असतो व फूल उमलण्याच्या वेळी तो झाकणीसारखा निघून येतो आणि आतील केसरदले व किंजदले उघडी पडतात, या घटनेला अनुलक्षून वरील प्रजातिनाम दिलेले आहे. या प्रजातीत सु. ५०० – ६०० जाती असून त्यांचा प्रसार ऑस्ट्रेलिया, टास्मानिया, न्यू गिनी आणि त्याजवळची बेटे येथे विपुल आहे. त्या प्रदेशांतील जंगलांत यांची मोठी संख्या असून त्यामुळे तेथील वनश्रीला विशिष्ट स्वरूप प्राप्त झाले आहे. या प्रजातीतील जाती बहुतेक सर्व मोठमोठे वृक्ष असून काही झुडपे आहेत ती सर्व सदापर्णी व सुगंधी झाडे आहेत. उपोष्ण कटिबंध व समशीतोष्ण कटिबंधातील उबदार प्रदेश येथे यूकॅलिप्टसाच्या अनेक जातींची लागवड त्यांच्या आर्थिक महत्त्वामुळे केली आहे. भारतात आजपर्यंत सु. १०० जातींच्या लागवडीचा प्रयत्न झाला असून त्यांपैकी काही जातींची लागवड यशस्वी झाली आहे (उदा., निलगिरी डोंगरावरील यू. ग्लोब्युलस). बहुतेक जाती जलद वाढतात व काहींचे त्यांच्या नैसर्गिक परिसरात प्रचंड आकारमान होते काही तर जगातील अतिशय उंच वृक्षांपैकी आहेत. वृक्ष सरासरीने १०० – १५० मी. उंच वाढतात. बहुतेक वृक्षांतून स्रवणाऱ्या स्तंभक (आकुंचन करणाऱ्या), टॅनीनयुक्त लालसर पदार्थाला ‘गोंद’ असे सामान्यपणे म्हणतात (परंतु त्याचे खरे नाव ‘किनो’ आहे). त्यामुळे बहुतेक यूकॅलिप्टस वृक्षांना गोंद वृक्ष (गम ट्रीज) म्हणण्याचा प्रघात पडला आहे. वृक्षांची साल विविध, बहुधा निळसर व सुटून निघणारी किंवा चिकटून कायम राहणारी असते. कधी जाड व तंतुयुक्त तर कधी खवलेदार वा भेगाळ असते. यू. ग्लोब्युलस या जातीचे कोवळे पल्लव निळसर दिसतात त्यामुळे ब्ल्यू गम ट्री असे त्याचे इंग्रजी नावही प्रचारात आहे. रेड गम, व्हाइट गम, कोरल गम अशी इंग्रजी नावेही त्या त्या रंगाच्या लक्षणामुळे दिली गेली आहेत.

यूकॅलिप्टस ग्लोब्युलस : (१) बालपर्णासह फांदी, (२) फुलांसह फांदी, (३) कळी, (४) फूल, (५) फळया वृक्षांची (किंवा झुडपांची) पाने साधी, जाडसर, दात्राकृती वा अंर्धचंद्राकृती, प्रपिंड – चित्रित (बाष्पनशील – बाष्परूपाने उडून जाणाऱ्या – तेलाच्या काहीशा पारदर्शक ग्रंथींचे ठिपके असलेली) व लोंबती असून त्यांच्या किनारी अखंड असतात कोवळी असताना ती समोरासमोर, बिनदेठाची उभट किंवा आडवी असून जून झाल्यावर त्यांना देठ असतो आणि ती एकाआड एक व लोंबती राहतात. यू. ग्लोब्युलसमध्ये ती सु. १५ – ३० X २·५ – ५ सेंमी. असतात. फुले पांढरी क्वचित पिवळट वा लालसर, नियमित, द्विलिंगी व लहान असून साध्या किंवा शाखायुक्त चवरीसारख्या किंवा गुलुच्छाकृती फुलोऱ्यावर [⟶ पुष्पबंध] पानांच्या बगलेत येतात. संवर्ताची नलिका (पुष्पासन) खालच्या बाजूस किंजपुटाला वेढून (चिकटून) राहते सर्व पाकळ्या एकत्र जुळून त्यांचे एक टोपीसारखे झाकण (अपिधान) फूल पक्व होते वेळी पडून जाते काही जातींत पाकळ्यांचा फार ऱ्हास झालेला असतो. केसरदले (पुं – केसर) अनेक, सुटी व प्रथम आतील बाजूस वळलेली असतात. किंजपुट अध:स्थ, ३ – ६ कप्प्यांचा असून बीजके अनेक असतात [⟶ फूल]. फळ (बोंड) वरच्या बाजूस तडकून ३ – ६ शकले होतात. बिया बारीक व अनेक. इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨मिर्टेसी कुलात व मिर्टेलीझ गणात (जंबुल गणात) वर्णन केल्याप्रमाणे असतात.

लागवड : भारतातील लागवडीसंबंधी अनेक प्रयोग करण्यात आले असून कोणत्या जाती कोठे लावणे फायदेशीर होईल याबाबत आर्‌. एस्‌. ट्रौप, आर्‌. एन्‌. पार्कर इ. अनेक शास्त्रज्ञांचे निष्कर्ष मार्गदर्शक ठरले आहेत व याबाबत काही निश्चित माहिती उपलब्ध झाली आहे. काही जाती विशिष्ट उंचीवर चांगल्या वाढतात काहींना कोरडी जमीन चालते, काहींना पाणथळ जमीनही मानवते, तर बहुतेकांना खोल, सकस व बऱ्याच खोलीवर ओलसर असलेली जमीन चांगली मानवते. नैसर्गिक रीत्या बियांपासून नवनिर्मिती होते. नवीन पल्लव आलेल्या फांद्या (छाट कलमे) लावूनही अभिवृद्धी (लागवड) करता येते, असा अनुभस ऑस्ट्रेलिया, द. आफ्रिका आणि रशिया येथे आला आहे. भारतात प्रथम पन्हेरीत फेब्रुवारी ते मार्चमध्ये बी रुजवून आलेली रोपे नंतर पावसाळ्यात लागणीकरिता वापरतात, त्या वेळी ती सु. ३० सेंमी. उंच असतात. साधारणत: लागण करताना आजूबाजूस सु. २·५ – ३·५ मी. जागा मोकळी ठेवतात शक्य तो सावली टाळणे आवश्यक असते. ज्यांची साल जाड व कायम राहणारी असते, त्यांना फक्त कोवळेपणी आगीपासून जपावे लागते. सुगंधी पानांमुळे या झाडांना गुरे सहसा तोंड लावत नाहीत. काही कवके (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पती उदा., गॅनोडर्मा) व वाळवी यांपासून या झाडांना उपद्रव होतो परंतु ६ – ८ वर्षांनंतर हा धोका कमी होत जातो निकोटीनयुक्त पाण्याच्या हलक्या सिंचनाने इजा कमी करता येते.

यूकॅलिप्टसाच्या झाडांची जलद वाढण्याची क्षमता, त्यांचे अनेकविध उपयोग व अल्पावधीत त्यांपासून होणारा चांगला आर्थिक लाभ या कारणांमुळे भारतात या झाडांची लागवड वाढत आहे. तथापि ही झाडे जमिनीतील पाणी व पोषक द्रव्ये फार मोठ्या प्रमाणावर शोषून घेतात आणि त्यामुळे इतर झाडांच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो ही झाडे गुरे खात नसल्याने व अवर्षणातही ती टिकून रहात असल्याने रुक्ष प्रदेशातील वनवृद्धीसाठी उपयुक्त आहेत वगैरे उलटसुलट मते यूकॅलिप्टसच्या वाढत्या लागवडीच्या संदर्भात तज्ञांनी मांडलेली आहेत. मात्र जमिनीच्या व हवामानाच्या निरनिराळ्या परिस्थितींतील याबाबतची पुरेशी माहिती अद्याप उपलब्ध झालेली नसल्याने व्यापक निष्कर्ष मांडणे शक्य झालेले नाही.


उपयोग : मजबूत, कठीण, जड आणि टिकाऊ लाकडाबद्दल यूकॅलिप्टसाच्या कित्येक जाती जगप्रसिद्ध आहेत. ऑस्ट्रेलियात तर इमारती लाकूड मुख्यत: हेच आहे. सुकल्यावर ते फारसे आकसत नाही. लहानमोठे खांब, पूल, नावांचे धक्के, सिलीपाट (रेल्वेच्या रुळांखालील ओंडके), फरशी, खोकी, हत्याराचे दांडे, पिंपाच्या फळ्या, कठडे, तक्ते, अतिदाबाखाली बनविलेले (व लाकडाचे धागे असलेले) बांधकामातील फलक, कोळसा, मिथिल अल्कोहॉल, ॲसिटोन, ॲसिटेट ऑफ लाइम इ. अनेक वस्तू आणि उत्पादने यूकॅलिप्टसाच्या भिन्न भिन्न जातींपासून मिळवितात. भारतात इमारती लाकडापेक्षा जळणाकरिता काही जाती (विशेषतः यू. ग्लोब्युलस) लागवडीत व उपयोगात आहेत मात्र कुटिरोद्योगात तेलाचे उत्पादन काही प्रमाणात होते. कित्येक जातींच्या कोवळ्या फांद्या व पाने यांपासून वाफेच्या साहाय्याने ऊर्ध्वपातन (उष्णतेने बाष्प करून व मग थंड करून द्रव मिश्रणातील घटक अलग करण्याची क्रिया) करून बाष्पनशील तेल काढले जाते व त्याला व्यापारी महत्त्व आहे. भिन्न जातींच्या तेलात रासायनिक संघटनांच्या दृष्टीने फरक आढळतात. यूकॅलिप्टस तेलाचे तीन प्रकार केले आहेत : (१) औषधी तेले, (२) औद्योगिक तेले आणि (३) सुगंधी द्रव्योद्योग तेले. सिनिओल हे घटक द्रव्य औषधी तेलात प्रमुख असते हे ज्या जातींपासून काढतात (यू. सिडेरोझायलॉन, यू. ल्युकोझायलॉनयू. एलिओफोरा) त्या भारतात लागवडीत आहेत. ऑस्ट्रेलियात यू. ग्लोब्युलसचा तेलाकरिता उपयोग करीत नाहीत कारण तीपासून औषधी तेलाचे उत्पादन कमी होते परंतु भारतात तीच जाती तेलाच्या व्यापारी उत्पादनासाठी वापरात आहे. औद्योगिक तेलात फेलांड्रीन व पायपरिटोन हे घटक प्रमुख असतात. ऑस्ट्रेलियात यू. डाईव्हजच्या तेलाचे या दृष्टीने उत्पादन करतात व तीपासून मिळणाऱ्या एल – पायपरिटोन द्रव्याचा उपयोग संश्लेषित (कृत्रिम) थायमॉल व मेंथॉल यांच्या उत्पादनात होतो. ज्या तेलांत टर्पेनिऑल, सिट्रोनेलॉल, जिरॅनिल ॲसिटेट व यूडेस्मॉल ही द्रव्ये असतात त्यांचा उपयोग सुगंधी द्रव्योत्पादनात करतात. यू. सिट्रीओडोरा भारतात मर्यादित स्वरूपात उपयोगात आहे, कारण त्यात सिट्रोनेलॉल असते. औषधी यूकॅलिप्टस तेल मुख्यतः यू ग्लोब्युलस या जातीपासून स्पेन, पोर्तुगाल, ब्राझील, कोलंबिया, मेक्सिको, झाईरे इ. देशांत बनविले जाते. झाईरेत औद्योगिक तेल यू. डाईव्हजपासून आणि सुगंधी द्रव्यांकरिता यू. सिट्रीओडोरोयू. मॅकॅर्थरीपासून मिळवितात. ब्राझील, ग्वातेमाला येथे व काही प्रमाणात कॅलिफोर्नियात सुगंधी द्रव्योद्योगात यू. सिट्रीओडोरापासून मिळालेले तेल वापरतात. ऑस्ट्रेलियात ह्या व इतर आणखी काही जाती तेलाकरिता वापरल्या गेल्या आहेत. भारतात यांपैकी काही जाती शोभेकरिता आणि जळणाकरिता वापरून पाहण्यात आल्या परंतु तेलांकरिता वापरल्या गेलेल्या नाहीत.

यूकॅलिप्टसाच्या अनेक जातींच्या खोडाच्या सालीत भिन्न प्रमाणात टॅनीन असते व तीपासून टॅनीनयुक्त द्रव्ये व्यापारी प्रमाणावर मिळतात. काही जातींतून टॅनीन – अर्क मिळतो काही जातींपासून २५ – ३०% तर काहींतून ७ – ३०% टॅनीन मिळते.

पाणथळ जमिनीच्या प्रदेशातील जंगल वाढीकरिता नद्यांच्या तीरांवर व उघड्या टेकड्यांच्या बाजूंवर वस्ती करण्याकरिता जमीन धुपण्यापासून तिचे संरक्षण करण्याकरिता आणि वाऱ्याच्या वेगाला प्रतिबंध करण्याकरिता यूकॅलिप्टसाची झाडे लावतात. हिवतापाला प्रतिबंध करण्यासाठी (साठलेले पाणी कमी करून डासांची उत्पत्ती थांबवण्यासाठी) हे वृक्ष लावतात. काही जाती उद्याने व भव्य मार्गांना शोभा आणतात. साल व लाकूड यांचा उपयोग कागदनिर्मितीत लगद्याकरिता करतात.

वर उल्लेख केलेल्या किनोचा उपयोग अतिसार, जुनाट आमांश, कापणे, दंतवैद्यक इत्यादींत केला जातो.

निलगिरी, अन्नमलई, पळणी, सिमला, शिलाँग (आसाम), राणीखेत, कांग्रा, कुलू, चंबा, मलबार, कूर्ग, लखनौ, कुमाऊँ, दार्जिलिंग, डेहराडून, पंजाब इ. भारतातील प्रदेशांत यूकॅलिप्टसाच्या भिन्न भिन्न जाती कमीजास्त उंचीवर भिन्न भिन्न प्रमाणात लागवडीत आहेत. निलगिरीवरच्या मोठ्या लागवडीमुळे व तेथे होणाऱ्या तेलाच्या मोठ्या उत्पादनामुळे यूकॅलिप्टस तेलाला ‘निलगिरी तेल’ म्हणतात. त्याचे अनेक उपयोग केले जातात. साबणाकरिता सुगंधी द्रव्ये, जंतुनाशके, कीटक व कृमी यांना घृणास्पद ठरणारे पदार्थ, दुर्गंधिनाशक पदार्थ इत्यादींकरिता निलगिरी तेल उपयुक्त असते. श्वासनलिकेच्या वरच्या भागातील संसर्गजन्य विकार व काही कातडीचे रोग यांवर निलगिरी तेल वापरतात. संधिवातावर समभाग ऑलिव्ह तेल मिसळून चोळतात भाजलेल्या जागी लावण्याच्या मलमात तेल असते. जुनाट दमा व श्वासनलिकादाह यांवर तेल उत्तेजक, कफोत्सारक (कफ पातळ करून पाडणारे) आहे उकळत्या पाण्यात बेंझोइन टिंक्चर, पाइनचे तेल, मेंथॉल व निलगिरी तेलाचे थेंब टाकून त्यातील वाफ नाकात ओढून घेतल्यास त्या तक्रारी कमी होतात. यू. ग्लोब्युलसाची मुळे रेचक आहेत. कालिकत (केरळ) येथे यू. सिट्रीओडोरापासून ‘सिट्रीओडोरा तेल’ काढतात त्याचाही उपयोग सुगंधी पदार्थ बनविण्यास करतात. यू. डाईव्हजपासून काढलेले तेल धातुकापासून (कच्च्या रूपातील धातूपासून) खनिज वेगळे काढण्यासाठी वापरतात.

संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol III. New Delhi, 1952.

    2. Lawrence, G. H. M. Texonomy of Vascular Plants, New York, 1965.

    3. Mitra, J. N. Systematic Botany and Ecology, Calcutta, 1964.

   4. Rondle, A. B. The classification of Flowering Plants, Vol. II., Cambridge 1963.   ५. देसाई, वा. गो. ओषधीसंग्रह, मुंबई, १९७५.

दोंदे, वि. पं. परांडेकर, शं. आ.