यादवी युद्ध : एखाद्या देशातील अधिकृत शासनयंत्रणा ताब्यात घेण्यासाठी किंवा टिकवून ठेवण्यासाठी त्याच देशातील दोन गटांत किंवा पक्षांत होणारा लष्करी संघर्ष (उदा., स्पेनमधील यादवी युद्ध १९३६ – ३९) किंवा एखाद्या राज्यातून अलग होऊन स्वतंत्र होण्यासाठी त्याच राज्यातील एखाद्या गटाने वा पक्षाने अधिकृत शासकांशी केलेला लष्करी संघर्ष (उदा., अमेरिकन यादवी युद्ध १८६१ – ६५) म्हणजे यादवी युद्ध, असे स्थूलमानाने म्हणता येईल. देशांतर्गत किंवा समाजांतर्गत असा हा सैनिकी संघर्षाचा प्रकार आहे. महाभारतातील यदुगणाच्या कुलांतर्गत युद्धावन यादवी युद्ध ही संज्ञा मराठीत रूढ झाली असून, इंग्रजीतील सिव्हिल वॉर या संज्ञेशी ती समानार्थक आहे. ते नागरी किंवा यादवी असते, कारण त्यात प्रतिस्पर्धी पक्षांतर्फे देशांतील नागरिकही सहभागी झालेले असतात आणि ते युद्ध असते कारण प्रतिस्पर्धी पक्ष सशस्त्र सैनिकी किंवा लष्करी बळावर संघर्ष करीत असतात. अमेरिकन यादवी युद्धाप्रमाणे अशा युद्धांचा शेवट प्रतिस्पर्धी पक्षांपैकी एका पक्षाचा पूर्णपणे निःपात होण्यात दिसून येतो किंवा बांगला देशाच्या निर्मितीप्रमाणे एखाद्या यादवी युद्धाचा शेवट मूळ राज्यापासून अलग होऊन स्वतंत्र झालेल्या देशाप्रमाणे असतो.
यादवी युद्धाची संकल्पना ही अगदी काटेकोरपणे व्याख्या करण्याजोगी नाही. आधुनिक राजकीय-सामाजिक विचारप्रणालीनुसार ज्ञातियुद्ध, मुक्तियुद्ध, क्रांतियुद्ध, वर्गयुद्ध यांसारख्या संज्ञांनीही यादवी युद्धाचा निर्देश करण्यात येतो तथापि या प्रत्येक संज्ञेमागील कल्पना स्पष्ट केल्याशिवाय यादवी युद्धाचा आशय कळू शकत नाही.
यादवी युद्धामुळे कित्येक वेळा समाजस्वास्थ्य व सामाजिक विकास या दृष्टीने काही दुष्परिणामदेखील झालेले आढळतात. उदा., न्यायसंस्थेविषयीचा अनादर होणे, अप्रामाणिकपणा हाच सदाचार ठरणे, असहकार वाढीस लागणे इत्यादी. त्याचप्रमाणे माणुसकीचे अवमूल्यन होते. क्रौर्य वा हिंसाचार हेच सामाजिक-राजकीय प्रश्न सोडविण्याचे एकमेव साधन ठरते. यादवी युद्धातून प्रतिक्रांतिवादी निर्माण होतात. एकूण यादवी युद्धाची मूळ उद्दिष्टे फलद्रूप न होता, असंतोष निर्माण होऊन नवीन क्रांतिवादी चळवळ सुरू होते. बांगलादेश, ईजिप्त, अल्जेरिया, ब्रह्मदेश, पश्चिम आशियातील मुस्लिम राष्ट्रे यांतील अलिकडच्या इतिहासावरून ही गोष्ट लक्षात येऊ शकते. यादवी युद्धात जर परकीयांची मदत घेतली तर कधी कधी ते युद्धोत्तर काळात त्यांना सोयीस्कर असे सरकार प्रस्थापित करतात. समाजाला आपली गाऱ्हाणी, मागण्या इत्यादींचे निरसन करून घेण्यासाठी वैध व सनदशीर मार्ग आणि साधने बहुतांश राष्ट्रांत उपलब्ध असतात तथापि त्यांद्वारे राज्यशासन जेव्हा दाद देत नाही, तेव्हा गुप्तपणे वा उघडपणे शासनाला विरोध करण्यात येतो. याच विरोधाला बंडाचे स्वरूप प्राप्त होते. व शेवटी या बंडाची एकतर सशस्त्र क्रांतीत [⟶ क्रांति–२] किंवा यादवीत परिणती होणे शक्य असते.
काही वेळा प्रचलित राज्यशासन व राज्यकर्ते अकार्यक्षम, दुराचारी, प्रतिगामी इ. असल्याचे दाखवून त्या देशातील लष्करी नेते अवचितपणे राज्यसत्ता बळकावतात [⟶ अवचित सत्तांतरण] परंतु कित्येक वेळा अवचित सत्ताप्राप्ती अयशस्वी झाली तर यादवी युद्ध पेटण्याचा संभव असतो. जनतेच्या पाठिंब्यावरच अशा प्रकारची सत्तांतरे अवलंबून असतात. लॅटिन अमेरिका, मध्य-पूर्व आशिया किंवा आफ्रिका, येथील मुस्लिम राष्ट्रांत अशा प्रकारची सत्तांतरे घडून आली तसेच यादवी युद्धेही झाली.
एखाद्या राष्ट्रात अनेक धर्मपंथ तसेच वांशिक किंवा भाषिक अल्पसंख्याक गट असतात. त्यांना बहुसंख्यांकांकडून न्याय मिळत नाही म्हणून ते गट विरोध करूलागतात. विरोधाची परिणती राष्ट्राच्या फाळणीत किंवा यादवी युद्धात होऊ शकते. राष्ट्रातील राजकीय वा आर्थिक असमतोल या कारणामुळेही यादवी युद्ध पेटते.
यादवी युद्धांचे मूलतः दोन प्रकार पडतात : (१) ज्या समाजात सुस्थिर राजकीय संस्थांच्या परंपरेचा अभाव असतो, त्या समाजातील उत्स्फूर्त म्हणजे पूर्वनियोजित व जबाबदार नेतृत्व नसलेली हाणामारी हीच यादवी होय. अशा हिंसात्मक संघर्षास सोयीसाठी यादवी युद्ध म्हटले जाते. प्राचीन कालातील युद्धे अशाच स्वरूपाची असावीत.
(२) ज्या राष्ट्रात राजकीय व इतर समस्यांचे निरसन करण्यास लोकमान्य संस्था-साधने नसतात, तेथे नियोजित यादवी घडू शकते. कधीकधी समस्या वैधपणे सोडविण्याचे प्रयत्न निष्फळ ठरणार या वैफल्यभावनेतून अथवा गाऱ्हाणी, मागण्या केल्या, तर राज्यशासन सूड घेईल या भयगंडातून नैराश्य निर्माण होते तेव्हा भयग्रस्त लोक हिंसाचार सुरू करतात. हिंसाचार व दहशत या स्वरूपाची कृत्ये केल्याविना गाऱ्हाण्यांची दाद घेतली जाणार नाही, अशा भावनेतूनही यादवी युद्ध होऊ शकते. यादवी युद्धात किंवा राष्ट्रांतर्गत सामाजिक अस्थिरता व युद्धसदृश्य राजकीय परिस्थितीत परकीय राष्ट्रांना हस्तक्षेप करण्याची संधी सापडल्यास यादवी युद्धाला किंवा परिस्थितीला वेगळीच कलाटणी मिळून राष्ट्राचे ऐक्य व भवितव्य धोक्यात येऊ शकते. रशियात व फ्रान्समध्ये राज्यक्रांतीनंतर यादवी युद्धे झालेली आहेत.
यादवी युद्धाचा परिणाम शेजारील व इतर राष्ट्रांवरही होऊ शकतो. संयुक्त राष्ट्र सनदेच्या दुसऱ्या अनुच्छेदाप्रमाणे, आंतरराष्ट्रीय विविध संबंध तसेच तंटेबखेडे यांच्या बाबतीत दंडशक्तीचा वापर किंवा धाक दाखविण्यास बंदी आहे, तथापि राष्ट्रांतर्गत बंड, संघर्ष वा यादवी युद्ध उद्भवल्यास त्या राज्यशासनास दंडशक्ती वा धाक वापरण्यास वरील तरतूद लागू नाही.
यादवी युद्धस्वरूप प्राप्त झाले, तर इतर राष्ट्रांनी युद्धस्थिती (स्टेट ऑफ वॉर) जारी असल्याचे गृहीत धरून अलिप्तता राखली पाहिजे.
राष्ट्रांच्या विधीप्रमाणे यादवी युद्ध बेकायदेशीर ठरत नाही. आंतरराष्ट्रीय विधी व संयुक्त राष्ट्र-सनद यांच्या तरतुदींप्रमाणे विशिष्ट अटी पाळून बंडखोरांना युद्धमान (बेलिजरन्ट) म्हणून इतर राष्ट्रे मान्यता देऊ शकतात, त्या मान्यतेचे स्वरूप असे : (अ) यादवी युद्ध चालू असून त्याबरोबर एकंदर संघर्षमय परिस्थिती असावी. (आ) संघर्षग्रस्त राष्ट्राच्या एकूण राज्यक्षेत्रापैकी मोठा प्रदेश बंडखोरांच्या अंकित असून तेथे बंडखोरांनी आपली शासनव्यवस्था प्रस्थापित केली असावी. (इ) जबाबदार प्राधिकरणाच्या (अथॉरिटी) आज्ञेप्रमाणे बंडखोराच्या कारवाया चालू असून, युद्ध करताना त्यांनी युद्धसंकेतांचे पालन केले पाहिजे.
स्पेनच्या यादवी युद्धात (१९३६ – ३९) जनरल फ्रँकोप्रणीत बंडखोरीला युद्धमान्यता नाकारण्यात आली होती कारण काही परकीय राष्ट्रांनी तेथे अवैध हस्तक्षेप केला होता.
अमेरिकेतील मेल्विन स्मॉल आणि डेव्हिड सिंगर या संशोधकांच्या आकडेवारीप्रमाणे १८१६ ते १९८० या काळात १०६ यादवी युद्धे झाली. त्यांपैकी २१ युद्धांत परराष्ट्रांनी भरीव हस्तक्षेप केला व त्यामुळे त्या युद्धांना आंतरराष्ट्रीय युद्धांची प्रतिष्ठा मिळाली. ३३ यादवी युद्धांत परराष्ट्रांनी सैनिकी हस्तक्षेप केला. अमेरिका व ब्रिटन या राष्ट्रांनी प्रत्येकी सहा वेळा दुसऱ्या राष्ट्रांच्या अंतर्गत संघर्षात हस्तक्षेप केला तर रशियाने एकाच यादवी युद्धात (इराण) हस्तक्षेप केला. रशियाचा अफगाणिस्तानातील हस्तक्षेप (१९७९) वादग्रस्त आहे. संयुक्त राष्ट्र सनदेप्रमाणे दुसऱ्या राष्ट्रांच्या अंतर्गत कलहात सैनिकी वा असैनिकी हस्तक्षेप करणे मुळातच अन्याय्य ठरते. मात्र संयुक्त राष्ट्र आमसभेने अशा हस्तक्षेपास सामूहिक आत्मसंरक्षण म्हणून संमती दिली, तर तो हस्तक्षेप न्याय्य ठरतो. सामान्यतः यादवी युद्धाच्या प्रारंभकाळात एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्राच्या शासनाला बंडाळी या उठावाचा मुकाबला करण्यास वरील सभा परवानगी देते, तथापि प्रस्थापित शासनाला उलथवून टाकू इच्छिणाऱ्या चळवळींना परराष्ट्राने मदत करणे न्याय्य ठरत नाही. प्रस्थापित राज्यशासनाच्या शक्तीची मुकाबला करण्याची बंडखोरांना जेव्हा शक्ती येते, तेव्हा मात्र परराष्ट्राने प्रस्थापित राज्यशासनाला मदत बंद केली पाहिजे म्हणजे बंडग्रस्त राष्ट्रात ज्या पक्षाला जास्त लोकमान्यता असते तो पक्षच विजयी होऊ शकतो अशी या हस्तक्षेपामागची एकंदर आंतरराष्ट्रीय विचारसरणी आहे. अर्वाचीन काळातील चीनमधील माओप्रणीत समाजवादी व चँक-कै-शेकचे राष्ट्रीय सरकार यांच्यातील यादवी दक्षिण व्हिएटनाम व उत्तर व्हिएटनाम यांच्यातील यादवी आणि अमेरिकी हस्तक्षेप व दक्षिण व्हिएटनामचा तसेच त्याची मदतनीस अमेरिका यांचा पराभव ही याची उदाहरणे आहेत. व्हिएटनामच्या यादवी युद्धातील अमेरिकेचा हस्तक्षेप अन्याय्य ठरला [⟶ व्हिएटनाम].
पहा: गनिमी युद्धतंत्र युद्ध व युद्धप्रक्रिया.
संदर्भ: 1. Aron, Raymond, Peace and War, London, 1966.
2. Debrau, Regis, Strategy for Revolution, Harmondsworth, 1971.
3. Draper Hal, Karl Marx’s Theory of Revolution, London, 1978.
4. Dunn, John, Modern Revolutions, Cambridge, 1972.
5. Giap, Vo Nguyen, People’s War, Peoples Army, 1968.
6. Green, T. N.The Guerrilla and How to Flight Him, New York, 1962.
7. Johnson, J. J. Role of the Military in under Developed Countries, Princeton, 1962.
8. Marighela. Carlos, For the Liberation of Brazil, Harmondsworth, 1971.
9. Oppenheimer, Martin, uzben Guerrillas, Harmondsworth, 1974.
10. Semmel, Bernard, Marxism and the Science of War, Oxford, 1981.
दीक्षित, हे. वि.