मशीनगन : (यांत्रिक बंदूक). एक क्षेत्रमार करणारे आयुध. सातत्याने जलद गोळीबार करू शकणारे स्वयंचलित, अवजड, बंदुकवजा योद्धोपयोगी असलेल्या या आयुधाचा पल्ला तीन हजार मीटरपर्यंत असतो. बंदूक वा पिस्तुल ह्यांच्याप्रमाणेच मशीनगनची गणना लघुशस्त्रास्त्रांत केली जाते. एकदाच चाप दाबून सातत्याचा दमदार गोळीबार करणे हे मशीनगनचे वैशिष्ट्य आहे त्यामुळे तिचा उपयोग युद्धामध्ये पायदळाची बगल सांभाळून लक्ष्यावरील गोळीबारात त्या दलाला भरीव व जवळचा पाठिंबा देण्यासाठी केला जातो. याशिवाय रणगाडा किंवा इतर चिलखती वाहतुकी वाहनांवर जवळच्या लक्ष्यावरील सातत्याच्या जलद गोळीबारासाठी मशीनगन बसविलेली असते. तसेच खाली झेप घेऊन जमिनीवरील शत्रुसैन्य-जमावावर गोळ्यांचा वर्षाव करण्यासाठी आणि आकाशातून शत्रूंच्या विमानावर नेम धरून गोळीबार करण्यासाठी विमानातही मशीनगन बसविण्यात येते.

पिस्तुल, बंदूक, तोफ इ. आयुधांप्रमाणेच मशीनगनच्या रचनेतसुद्धा अस्त्र-प्रक्षेपणासाठी दारूच्या स्फोटक ज्वलनात उत्पन्न होणाऱ्या विलक्षण दाबशक्तीच्या वायूचाच उपयोग केली जातो. मात्र मशीनगनचे खास वैशिष्ट्य म्हणजे नळीतून गोळी बाहेर उडविली गेल्यानंतर, शिल्लक असलेल्या हवेत विरून जाणाऱ्या वायुशक्तीचा उपयोग करण्यात येतो. पुन्हा पुढची गोळी ठासली जाऊन ती उडविली जाईपर्यंतच्या सर्व क्रिया पार पाडण्यासाठी लागणारी यंत्रयोजना मशीनगनमध्ये केलेली असते. ह्या यंत्रणेमुळे एकदाच चाप दाबून सतत व जलद गोळीबार साधण्याची क्लृप्ती मशीनगनमध्ये साधली जाते. पूर्वी मशीनगनची नळी फार तापू नये म्हणून पाण्याचा वापर करण्यात येई.

गोळी उडवून शिल्लक राहिलेल्या वायूच्या दाबशक्तीप्रमाणेच, गोळी उडण्याच्या प्रतिधक्क्यात मशीनगनला मागे हटवणाऱ्या प्रतिधक्कात्मक शक्तीचादेखील उपयोग मशीनगनमध्ये होतो. गोळी भरणे, गोळीगाळ्याची (चेंबर) मागची बाजू घट्ट बंद करणे, गोळी उडविणे, रिकामे काडतूस बाहेर फेकणे व पुन्हा दुसरी गोळी भरणे, ह्या गोळीबाराच्या सर्व क्रिया क्रमशः सुरळीत व आपोआप घडवून आणणारी मशीनगनची यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठीच प्रामुख्याने ह्या प्रतिधक्कात्मक शक्तीचा वापर यात केलेला असतो.

एकोणिसाव्या शतकातील धातूचे काडतूस (मॅटॅलिक कारटेज) व प्रहार-बत्तीचे शोध लागल्यानंतर रायफलच्या बांधणीत झपाट्याची प्रगती व सुधारणा करण्याच्या प्रयत्नात मशीनगनचा शोध लागला. रिचर्ड जॉर्डन गॅटलिंग याने १८६३ मध्ये प्रथम १० नलिका असलेली व त्यातून दर मिनिटास ३,००० गोळ्या त्यास जोडलेल्या इलेक्ट्रिक मोटरच्या साह्याने, उडवू शकणारी पहिली मशीनगन तयार केली. पण ही मशीनगन भारभूत व गैरसोयीची होती. युद्धात प्रकर्षाने वापरली गेलेली पहिली खरीखुरी मशीनगन हायरम स्टीव्हेन्झ मॅक्सिम ह्याने १८८५ मध्ये तयार केली. प्रतिधक्क्यामुळे मिळणाऱ्या शक्तीचा उपयोग त्यात सातत्याने गोळीबार साधण्यासाठी केला होता. पहिल्या जागतिक महायुद्धात [⟶⟶महायुद्ध, पहिले] मॅक्सिम, ब्राउनिंग व ल्यूइस ह्या विशेषज्ञांनी तयार केलेल्या मशीनगन पाश्चिमात्य सैन्यात हमखास वापरल्या गेल्या. पहिल्या महायुद्धात झालेल्या प्राणहानीत ९२ टक्के हानी मशीनगनच्या माऱ्यामुळे झाली होती. त्याकाळी मशीनगन व तोफ ह्या दोन नव्याने शोधल्या गेलेल्या व युद्धात प्रकर्षाने वापरात असलेल्या अस्त्रायुधांचा प्रभाव एवढा परिणामकारक होता की, आक्रमक युद्धतंत्र स्थगित होऊन खडकात बसून बचावात्मक स्थिर युद्धतंत्राचा अवलंब उभय पक्षांना स्वीकारावा लागला.

दुसऱ्या महायुद्धाच्या [⟶⟶महायुद्ध, दुसरे] वेळी ल्यूइस व ब्राउनिंग याच्या मशीनगन युद्धाच्या सुरुवातीस सर्रास प्रचारात होत्या. जर्मनांच्या एम्. जी.–३४ व–४२ ह्या मिनिटाला १,५०० गोळ्या उडविणाऱ्या मशीनगन कार्यक्षमता व बांधणीचा सुटसुटीतपणा ह्यासाठी अग्रेसर होत्या. त्यांच्याच आधारावर अमेरिकेने १९५७ मध्ये एम्.–६० ही मशीनगन बांधली.

सातत्यपूर्ण गोळीबाराच्या वैशिष्ट्यामुळे मर्यादित अंतरावरील लढाईसाठी मशीनगनचे महत्त्व अजूनही कायम आहे आणि तिच्या बांधणीत संभाव्य युद्धानुकूल सोयी व सुधारणा करण्याची स्पर्धाही प्रगत राष्ट्रांत चालू आहे.

पाटणकर, गो. वि.