यांत्रिक अभियांत्रिकी : गणित व भौतिकी या मूलभूत विज्ञान शाखांच्या पायावर आधारलेल्या अभियांत्रिकीच्या या शाखेमध्ये यंत्रे व शक्तिनिर्मिती यांचा प्रामुख्याने विचार केला जातो. विशेषतः यंत्रांशी निगडित अशी प्रेरणा, गती व कार्य यांचा या शाखेत अधिक संबंध येतो. शक्तिनिर्मितीची विविध यंत्रे (उदा., निरनिराळी एंजिने व टरबाइने) कापड, कागद, साखर यांसारख्या उपभोग्य वस्तूंच्या निर्मितीसाठी लागणारी यंत्रसामग्री, सायकल, मोटारगाडी, आगगाडी, विमान यांसारखी वाहतुकीची साधने आणि ही यंत्रे व साधने तयार करण्यासाठी लागणारी लेथ, रधित्र, छिद्रण यंत्र वगैरे विविध प्रकारची यांत्रिक हत्यारे या सर्वांचा यांत्रिक अभियांत्रिकीत अंतर्भाव होतो. या अनेक यंत्रांचे आराखडे करणे, त्यांचे भाग बनविणे व जुळविणे, कारखान्यातील उत्पादन प्रक्रिया, उत्पादित वस्तूचे वितरण व एकूण व्यवस्थापन करणे या गोष्टींचाही यात समावेश होतो.

विश्वकोशामध्ये यांत्रिक अभियांत्रिकीच्या वरील विविध बाबींचे निरनिराळ्या स्वतंत्र नोंदींत विवरण दिलेले आहे. प्रस्तुत नोंदीत यांत्रिक अभियांत्रिकीचा संक्षिप्त इतिहास, विकास, शिक्षण व संशोधन यांसंबंधी माहिती दिली आहे. यंत्रविद्येच्या विकासाचा ऐतिहासिक आढावा तंत्रविद्या या नोंदीत दिलेला आहे. यंत्रांच्या मूलभूत तत्त्वांशी संबंधित अशा यामिकी यंत्र-१ ‘कंपने, यांत्रिक’ ‘कार्यक्षमता, यंत्रांची’ आणि ‘कार्य, शक्ति व ऊर्जा’ या नोंदी आहेत. एंजिन व टरबाइन या नोंदींत शक्तिनिर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या विविध एंजिनांचे व टरबाइनांचे सर्वसाधारण विवेचन केलेले आहे. कोळशावर वाफेची व त्यापासून करण्यात येणारी शक्तीची निर्मिती यांविषयी वाफ, वाफ एंजिन, वाफ टरबाइन व शक्ति-उत्पादन केंद्र या नोंदींत माहिती दिलेली आहे. जलशक्ती या दुसऱ्या शक्तिनिर्मितीच्या साधनांविषयी जल टनबाइन या शीर्षकाखाली विवरण केले आहे. अंतर्ज्वलन-एंजिन, डीझेल एंजिन, चक्रीय एंजिन या नोंदींत तेल या इंधनावर चालणाऱ्या मूलचालकांची माहिती दिली आहे. विविध मूलचालकांद्वारे निर्माण केलेल्या शक्तीचे प्रेषण करणाऱ्या पद्धतींचे विवरण ‘शक्तिप्रेषण, यांत्रिक’ दोरचालन पट्टा आणि पट्टाचालन साखळी व साखळी चालन आणि दंतचक्र या नोंदींत केलेले आहे. जे अनेक मूळघटक जोडून यंत्रांची जुळणी करण्यात येते त्यांसंबंधी पुढील स्वतंत्र नोंदी आहेत: आस उतरण कप्पी कॅम क्लच गतिरोधक गतिनियंता चाक चावी (चक्राची) झडप तरफ दंतचक्र दोर धारवा पट्टा व पट्टाचालन प्रचक्र बोल्ट व नट यंत्र-१ रॅचेट चाक व खिटी वॉशर ‘शृंखला, यांत्रिक’ साधी यंत्रे स्क्रू स्प्रिंग ट्रॅक्टर ट्रामगाडी मोटारगाडी मोटारसायकल रिक्षा रेल्वे विमान सायकल स्कूटर वगैरे वाहनांवर स्वतंत्र नोंदी असून या संदर्भात मालवाहू यंत्रे व वाहक साधने, स्वयंचल अभियांत्रिकी, झोत प्रचालन, टरबाइन प्रचालन व रॉकेट या नोंदीही पहाव्यात. यंत्रांचे भाग आणि धातूच्या व इतर पदार्थांच्या वस्तू बनविण्यासाठी लागणाऱ्या यंत्रांसंबंधी व साहाय्यक साधनांविषयी चक्रा कर्तन यंत्र छिद्रण यंत्र छिद्रपाट व धारक पकड टेंप्लेट दाब छिद्रण व कातर यंत्र दाब पकड दाबयंत्र प्रच्छिद्रण यंत्र ब्रोचण यंत्र यांत्रिक हत्यारे रधित्र ‘लाटण, धातूंचे लेथ वातचलित हत्यारे शाणन यंत्र हत्यारे (कर्मशालेतील) या नोंदींत वर्णन दिले आहे.

यंत्र भागांच्या निर्मितीमध्ये आवश्यक असणाऱ्या प्रक्रियांसंबंधी ओतकाम ‘घडाई, धातूची’ झाळकाम व डाखकाम धातुपत्राकाम धातुरूपण धातु व अधातूंचे जोडकाम रिव्हेट वितळजोडकाम या स्वतंत्र नोंदी आहेत. या संदर्भात धातूंचा शिणवटा जुळणी व मापसूट पदार्थांचे बल आणि वंगणक्रिया या नोंदीही पहाव्यात. उच्चालक यंत्रे पंखा पंप फिरता जिना लिफ्ट शिवणयंत्र वगैरे व्यवहारातील यंत्रे व साधने तसेच प्रशीतन व वातानुकूलन यांकरिता लागणारी साधने यांविषयीची माहिती त्या त्या शीर्षकाच्या नोंदीखाली दिलेली आहे. वस्तूच्या यांत्रिक उत्पादनाशी निगडित अशा उत्पादन अभियांत्रिकी, उद्योग अभियांत्रिकी, उपकरण योजना, कार्यविधी अभियांत्रिकी, प्रक्रिया अभियांत्रिकी, प्रणाली अभियांत्रिकी, मूल्य अभियांत्रिकी या नोंदीही पहाव्यात.

इतिहास : मानवी जीवन कमी कष्टप्रद व अधिक समृद्ध होण्यासाठी, पोषण, निवारा व इतर दैनंदिन गरजा भागविण्याकरिता अनेक वस्तू निसर्गातील कच्च्या मालापासून बनवाव्या लागतात. विविध ऊर्जांचा उपयोग करून या वस्तूंची निर्मिती करण्याच्या व्यवसायास अभियांत्रिकी म्हणतात. माणसाची पहिली गरज म्हणून स्थापत्यशास्त्राची प्रथम प्रगती झाली. यांत्रिक विद्येची वाढ सुतारकाम, धातुकाम अशा कारागिरीच्या स्वरूपात प्रारंभी झाली असली पाहिजे. लढाईच्या तंत्रात यांत्रिक ज्ञानाचा उपयोग वाढत राहिला. हे सर्व ज्ञान पंधराव्या-सोळाव्या शतकांपर्यंत अनुभवावरच आधारलेले होते आणि ते मुख्यतः व्यक्तीपुरते व पिढ्यानुपिढ्या चालणारे असे होते. पंधराव्या शतकानंतर यूरोपमध्ये भौतिकी व गणित या शाखांच्या बरोबर अभियांत्रिकी हा विषय ज्ञानाची एक शाखा म्हणून वाढीस लागला. अठराव्या शतकात स्थापत्य, खाणकाम, धातुविज्ञान, यांत्रिक व रासायनिक अशा अभियांत्रिकीच्या प्रमुख शाखा होत्या. यांपैकी दोन-तीन विषयांत अनुभवाने पारंगत झालेल्या व्यक्तींनी बंदरे, रेल्वे, जहाजे बांधणे यांसारखी मोठाली स्थापत्य-यांत्रिक अशी मिश्र कामे पार पाडली. स्थापत्य अभियांत्रिकीचे पद्धतशीर शिक्षण देणारी संस्था फ्रान्समध्ये १७४७ मध्ये सुरू झाली आणि पुढे इंग्लंड आदी देशांत तिचे अनुकरण झाले. इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीची सुरुवात वाफेच्या एंजिनाच्या शोधाने अठराव्या शतकात झाली. जेम्स वॉट यांच्या वाफेच्या एंजिनाने (१७८२) वर्तुळाकार गती निर्माण करता आली आणि तीवर इतर प्रकारची यंत्रे चालविणे सुलभ झाले. जॉर्ज स्टीव्हे न्सन यांच्या वाफेच्या एंजिनाच्या आगगाडीमुळे (१८२५) वाहतूक करण्याच्या पद्धतीत क्रांती झाली. अशा महत्त्वाच्या शोधांमुळे यांत्रिक अभियांत्रिकी हा विषय एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला स्वतंत्र मानला जाऊ लागला. यातून यांत्रिक विषयांचे शिक्षण देणाऱ्या शाळा आणि यंत्रविद्येत पारंगत असलेल्या व्यावसायिकांच्या स्वतंत्र संस्था यांचा उगम झाला.

इंग्लंडमध्ये बर्मिंगहॅम येथे इन्स्टिट्यूशन ऑफ मेकॅनिकल एंजिनियर्स ही मध्यवर्ती संस्था जॉर्ज स्टीव्हेन्सन यांच्या अध्यक्षतेखाली १८४७ मध्ये स्थापन झाली. अमेरिकेतील अशी संस्था १८८० मध्ये आणि पुढे इतर यूरोपीय देशांत व या क्षेत्रात महत्त्वाचे स्थान असलेल्या देशांत (उदा., जपानमध्ये १८९७ साली, चीनमध्ये १९५१ साली) अशा संस्था सुरू झाल्या. भारतात ⇨ इन्स्टिट्यूशन ऑफ एंजिनियर्स (इंडिया) ही संस्था १९२० मध्ये स्थापन झाली. या संस्थेच्या कार्याच्या विभागांपैकी यांत्रिक अभियांत्रिकी हा एक विभाग आहे. या संस्थांचा प्राथमिक उद्देश यंत्रज्ञान असलेल्या व्यक्तींना विचारविनिमयासाठी एकत्र आणणे हा होता. अशा विचारविनिमयात यंत्रविज्ञानातील तांत्रिक अडचणींचा ऊहापोह करणे, नवीन संशोधनाची दखल घेणे व उत्तेजन देणे, यांत्रिक अभियांत्रिकीच्या शिक्षणाची दिशा व दर्जा सुधारणे वगैरे बाबींचा समावेश होता. सुरुवातीच्या काळात स्क्रू, नट, बोल्ट, वाफेच्या बाष्पित्राची (बॉयलरची) सुरक्षा व्यवस्था अशा विषयांतही मानके (प्रमाणभूत मापे) प्रचलित नव्हती. यामुळे उत्पादनात अडचणी येत व अपघात घडत. यूरोप-अमेरिकेतील अशाच संस्थांनी उत्पादनात सुसूत्रता व ठराविक दर्जा आणण्याच्या दृष्टीने अनेक मानके ठरविण्याचे महत्त्वाचे काम या काळात सुरू केले आणि तसे काम आजही चालू आहे. यासाठी आता अनेक राष्ट्रीय स्तरावरील संस्था एका आंतरराष्ट्रीय संघटनेखाली एकत्र विचारविनिमय करतात. यंत्रयुगामुळे निर्माण झालेल्या प्रदूषणासारख्या नवीन समस्यांचाही या सर्व संस्था विचार करतात आणि त्याचबरोबर सदस्यांच्या व्यावसायिक निष्ठा, सचोटी, सामाजिक जबाबदारी यांसंबंधीही जागरूकता ठेवण्याला हातभार लावतात.


यांत्रिक अभियांत्रिकीची कार्यव्याप्ती रुंदावत व बदलत चाललेली असल्याने राष्ट्रीय स्तरावरील संस्थांत विशिष्ट विषयांकरिता (उदा., स्वयंचलित नियंत्रण, ज्वलन एंजिने, वंगण तंत्रविद्या, प्रदूषण इ.) खास तज्ञांचे गट संघटित करण्यात आले आहेत. वितळजोडकाम व प्रशीतन यांसारख्या विषयांकरिता इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वेल्डिंग (लंडन) व इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रेफ्रिजरेशन (पॅरिस) अशा आंतरराष्ट्रीय संस्थाही स्थापन करण्यात आल्या आहेत.

उपशाखांचा विस्तार : एखादी क्रिया अथवा वस्तू जास्तीत जास्त वेगाने निर्माण करण्यासाठी यंत्र बनविणे हा यंत्रज्ञानाचा मूळ उद्देश मानला जातो. यंत्र बनविण्यासाठी अनेक संबंधित उपशाखांचे ज्ञान लागते. यंत्रांच्या प्रगतीचा इतिहास पाहिल्यास असे दिसून येते की, संशोधकाला एखादी नवीन कल्पना सुचते. त्यातून यंत्रनिर्मिती होते व हे करीत असताना अथवा यंत्र प्रत्यक्ष उपयोगात येत असताना आढळून येणाऱ्या त्यातील विविध त्रुटी काढून टाकण्यासाठी नवीन ज्ञानाची जरूरी भासते आणि त्यातून नवीन विषयांचा सखोल अभ्यास होत रहातो. वाफेच्या एंजिनामुळे व त्यानंतर चार्ल्‌स पार्सन्स यांनी बनविलेल्या वाफ टरबाइनामुळे वाफेच्या ऊष्मागतिकीचा [यांत्रिक व इतर रूपांतील ऊर्जा आणि उष्णता यांतील परस्पर संबंधांविषयीचे गणितीय विवरण ⟶ ऊष्मागतिकी] अभ्यास वाढीस लागला. अंतर्ज्वलन-एंजिन व डीझेल एंजिन यांच्या शोधामुळे आणि त्यानंतर प्रशीतन यंत्रणेच्या संदर्भात ऊष्मागतिकी विषयाचा अधिक विस्तार झाला.

एकोणिसाव्या शतकात निरनिराळी यंत्रे शोधण्यात आली आणि या यंत्रांचे वेग, आकारमान व उत्पादकता यांत सतत वाढ होत गेली. अशी यंत्रे बनविण्यासाठी लागणाऱ्या पदार्थांचे बल व यंत्रांच्या मूलघटकांच्या गतिकीचे सिद्धांत या उपशाखांत अनुभव व प्रयोग यांमुळे भर पडत होती. यामुळे यंत्र बनविण्यासाठी लागणाऱ्या भागांचे आकारमान व बल जास्त अचूकपणे एंजिनामुळे विमान बनविणे शक्य झाले आणि त्यातून वायुगतिकी [⟶ वायुयामिकी] हा नवीनच अभ्यासाचा विषय निर्माण झाला. यंत्राच्या वाढत्या वेगामुळे वंगणाचे व कंपनांचे जे प्रश्न उद्‌भवतात त्यांतून वंगणशास्त्र व कंपनशास्त्र यांचा सखोल अभ्यास झाला. ही सर्व यंत्रसामग्री अथवा इतर वस्तू तयार करण्याच्या पद्धतींतही त्याचप्रमाणे बदल होत गेले. यंत्रांच्या भागांच्या उत्पादनासाठी लेथ, रधित्र, छिद्रण अशी सर्वसाधारण कामाच्या उपयोगाची यांत्रिक हत्यारे एकोणिसाव्या शतकात इंग्लंडमध्ये निर्माण झाली. अमेरिकेत प्रथम रायफलींच्या व नंतर मोटारगाडीच्या मोठ्या प्रमाणावरील उत्पादनासाठी एकसारखे अचूक भाग बनविणे, उत्पादनाचा वेग वाढविणे व जास्त कौशल्याची कामे कमी कुशल कामगारांकडून करून घेणे या गरजा उत्पन्न झाल्या. त्यासाठी विशिष्ट कामासाठीच बनविलेली चक्री कर्तन, शाणन, दंतचक्र तयार करणारी अशी विविध यंत्रे निर्माण झाली. यंत्रांचे एकमेकांत बसणारे भाग अचूक व्हावेत यासाठी जुळणी व सह्यता सीमा यांची मानके निर्माण झाली आणि त्यातून उत्पादन अभियांत्रिकी या उपशाखेचे महत्त्व वाढीस लागले. कापड, कागद, बिस्किटासारखे खाद्यपदार्थ अशा उपभोग्य वस्तू मोठ्या प्रमाणावर निर्माण करताना उत्पादन प्रक्रियेतील मनुष्याचा सहभाग कमी करून यंत्रांचे स्वयंचालन वाढत्या प्रमाणात होत गेले. यातून स्वयंचलित यंत्रे व नियंत्रण पद्धती ही उपशाखा विशेष अभ्यासाचा विषय झाली. [⟶ स्वयंचालन नियंत्रण प्रणाली].

तेल व कोळसा या इंधनांचे साठे मर्यादित असल्याने यंत्र चालविताना ऊर्जेचा जास्तीत जास्त काटकसरीने वापर करणे यंत्र चालविण्यामुळे हवा, पाणी, ध्वनी यांचे प्रदूषण होऊ न देणे यंत्राचे जास्तीत जास्त स्वयंचालन करण्यासाठी इलेक्ट्रॉनीय मापने व ð सूक्ष्मप्रक्रियक यांचा वापर करणे या नवीन उद्देशांची दखल यंत्राचा आराखडा करतानाच घेणे १९७० सालानंतर आवश्यक झाले. वरील गरजेतून ऊर्जेची काटकसर, प्रदूषण व संगणक नियंत्रित यंत्रे या उपशाखांचा अभ्यास वाढला आहे. यंत्रांचे आराखडे करताना रूढ पद्धतीने कागदावर आकृती काढण्याऐवजी संगणकाच्या साहाय्याने यंत्रांच्या भागांचे आकार व आकारमाने ठरविणे सुलभ होत आहे [⟶ संगणक आलेखिकी]. यंत्रामुळे प्रत्यक्ष कार्य घडते व इलेक्ट्रॉनिकीमुळे यंत्रांचे पूर्ण नियंत्रण करणे सुलभ होते. यंत्रे बनविताना हे दोन विषय स्वतंत्रपणे हाताळले जात. आता या दोन्ही विषयांचा संयुक्तपणे उपयोग करून रोबॉटासारखे यंत्र बनविण्याच्या उपशाखेला ‘मेकॅट्रॉनिकी’ हे नाव रूढ होत आहे [⟶ रोबॉट स्वयंचालन]. नेहमीच्या नैसर्गिक खनिज इंधनांखेरीज ऊर्जा निर्मितीसाठी पर्यायी उद्‌गम म्हणून पवनचक्की. सौरशक्ती यांच्या उपयोगालाही महत्त्व येत आहे [⟶ शक्ति- उद्‌गम].

मानवी शरीर हे एक यंत्र आहे, असे आपण म्हणतो. १९७० सालानंतर शरीररचनेचा आणि हृदय, फुप्फुसे, मूत्रपिंड अशा अवयवांच्या क्रियांचा यांत्रिक दृष्टीतून अभ्यास करून मोडलेल्या हाडांना जोडणारे कृत्रिम भाग, कृत्रिम हृदय, मूत्रपिंडाचे कार्य करणारे यंत्र यांचा उपयोग वाढत आहे. या उपशाखेला ‘जैव अभियांत्रिकी’ म्हणतात.

कार्यव्याप्ती : यांत्रिक अभियांत्रिकीच्या कार्यव्याप्तीत पुढील गोष्टींचा समावेश करण्यात येतो. यंत्रासंबंधीच्या ज्ञानाच्या शाखांचा अभ्यास करणे, अशा सखोल अभ्यासातून चालू तंत्रे व सिद्धांत यांतील ज्या त्रुटी लक्षात येतील त्यांवर नवीन संशोधन करून नवे सिद्धांत मांडणे, या ज्ञानाचा उपयोग करून यंत्रनिर्मितीचे नियोजन करणे, यंत्रांच्या वेगवेगळ्या भागांचे आकार, आकारमान, रचना, वेग, दाब इ. ठरवून आराखडे तयार करणे व त्याप्रमाणे प्रत्यक्ष यंत्रनिर्मिती करणे. नवीन कल्पनांचा वापर करावयाचा झाल्यास त्यासाठी संशोधन करणे, चालू यांत्रिक उद्योगातील दैनंदिन उत्पादन प्रक्रिया सुसूत्रपणे चालू ठेवणे, यंत्रसामग्रीची देखरेख, दुरुस्ती व सुधारणा करणे, व्यवस्थापनामध्ये उत्पादनाचे नियोजन, निर्मिती मूल्य ठरविणे, आर्थिक नियोजन, बँकेचे व इतर अर्थव्यवहार संबंधित कायदे, त्याचप्रमाणे कामगारांशी सहकार्याचे संबंध राखणे व त्यांचे प्रशिक्षण या गोष्टी येतात. व्यवस्थापनाचा सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणजे उत्पादित वस्तू योग्य किंमतीला विकणे. एखादा यंत्रज्ञ स्वत: यशस्वी उद्योजक होण्यासाठी त्याला उत्पादन तंत्राच्या ज्ञानाइतकीच किंबहुना थोडी अधिक गरज व्यवस्थापनाच्या कौशल्याची आहे.


शिक्षण : भारतात रूडकी येथे १८४७ मध्ये व पुणे येथे १८५४ मध्ये आणि नंतर इतरत्र अभियांत्रिकी महाविद्यालये सुरू झाली. त्यांमध्ये स्थापत्य व यांत्रिक या दोन्ही शाखांचे एकत्रित शिक्षण विद्यार्थांना दिले जाई. रेल्वे व खाणी यांच्या वाढीबरोबर १९१० च्या सुमारास यांत्रिक अभियांत्रिकीचे शिक्षण स्वतंत्रपणे देण्यास सुरुवात झाली. पहिल्या महायुद्धानंतर उद्योगधंद्यांमध्ये वाढ झाल्याने त्यांना कुशल कामगार पुरविण्यासाठी धंदेशिक्षण शाळा सुरू झाल्या. उद्योगधंद्यांना लागणाऱ्या यंत्रज्ञान असलेल्या मनुष्यबळाचे तीन महत्त्वाचे स्तर आहेत. पहिल्या स्तरावर लागणाऱ्या कुशल कामगाराच्या शिक्षणासाठी सर्व देशभर औद्योगिक प्रशिक्षण संस्था निघाल्या आहेत. त्यांत सामान्यतः दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो आणि दोन वर्षांत सुतारकाम, लोहारकाम, वितळजोडकाम, लेथ, रधित्र, चक्री कर्तन अशा यंत्रांवरील काम, यंत्रांची आरेखने काढणे इ. विषयांचे प्राथमिक ज्ञान दिले जाते. यात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव मिळणे हे महत्त्वाचे मानले जाते. हे विद्यार्थी शिक्षणानंतर उद्योगधंद्यांत उत्पादनाच्या कामाला उपयोगी होतात. दुसरा स्तर हा कामगारांच्या कामावर देखरेख ठेवणे, उत्पादनाचे परीक्षण, यंत्रसामग्रीची देखभाल अशा पर्यवेक्षकीय कामांसाठी मुख्यतः लागतो. यासाठी दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना तीन वर्षांचा यंत्रनिकेतनाचा पदविका अभ्यासक्रम घेता येतो. तिसरा स्तर उत्पादन तज्ञ, व्यवस्थापन तज्ञ, अभिकल्पक (यंत्राचा आराखडा करणारा तज्ञ) इ. उच्च श्रेणीच्या तज्ञांचा असतो. यासाठी बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याला विद्यापीठीय पदवीकरिता चार वर्षांचे शिक्षण दिले जाते. या अभ्यासक्रमात गणिताच्या द्वारे मूलभूत सिद्धांत समजून घेऊन पदार्थाचे बल, गतिकी, ऊष्मागतिकी, यांत्रिक उत्पादन अशा विषयांचे ज्ञान विद्यार्थ्याला व्हावे यावर भर असतो. पदवी परीक्षेनंतर दोन वर्षांचे पदव्युत्तर शिक्षण घेता येते. या अभ्यासक्रमात गणिताचे अधिक ज्ञान व यांत्रिक अभियांत्रिकीच्या एका उपशाखेच्या विशेष अभ्यास अशी योजना असते. सर्व अभियांत्रिकी शाखांचे पदवी, पदव्युत्तर व त्यापुढील उच्च स्तरीय शिक्षण देण्यासाठी दिल्ली, कानपूर, खरगपूर, मद्रास व मुंबई येथे स्वतंत्र विद्यापीठाचा दर्जा असलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्था आहेत. यांत्रिक अभियांत्रिकीच्या शिक्षणात विद्यार्थ्याने स्वतःच्या हाताने काही कौशल्याचे काम करावयास शिकणे हे मिळालेल्या ज्ञानाचा व्यावहारिक उपयोग करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जाते. पुस्तकातील ज्ञानाबरोबरच निरीक्षण व कल्पकता यांची जोड अवश्य पाहिजे कारण ज्यांना पुस्तकी ज्ञान मिळाले नाही अशा व्यक्तींनीही महत्त्वाचे शोध वरील गुणांमुळे लावले आहेत, असे दिसून येते. [⟶ तांत्रिक शिक्षण].

इतर व्यवसायांशी तुलना करता यांत्रिक अभियंत्यांच्या व्यवसायाच्या बाबतीत एक महत्त्वाचा फरक आढळतो. बहुतेक वैद्य व अनेक विधिज्ञ हे स्वतःचा व्यवसाय उभारू शकतात याउलट बहुतेक अभियंत्यांना उद्योगधंद्यांत, शैक्षणिक संस्थांत वा शासकीय खात्यांत नोकरी करावी लागते. विधिविषयक वा वैद्यकीय व्यवसाय उभारण्यासाठी लागणाऱ्या भांडवलापेक्षा यांत्रिक अभियांत्रिकीय उद्योग उभ्यारण्याकरिता यंत्रसामग्रीत व कच्च्या मालात फार मोठे भांडवल गुंतवावे लागते. सामान्यतः वैद्य व विधिज्ञ यांचा लोकांशी जितका निकटचा संबंध येतो त्या मानाने अभियंत्यांचा प्रत्यक्ष संबंध पुष्कळच कमी प्रमाणात येतो.

संशोधन व संस्था : यांत्रिक अभियांत्रिकीमध्ये प्रथम झालेल्या प्रगतीत वैयक्तिक कल्पक संशोधकांचा फार मोठा वाटा आहे. मोठे उद्योगधंदे निर्माण झाल्यावर त्यांना उपयुक्त असे संशोधन करण्यासाठी त्या त्या उद्योगांनीच प्रयोगशाळा स्थापन केल्या. मोटारगाड्या बनविणाऱ्या जनरल मोटर्स व फोर्ड, गोलक धारवे बनविणारी एस. के. एफ. या कंपन्यांच्या स्वतःच्या सुसज्ज मोठ्या प्रयोगशाळा आहेत. यांत्रिक अभियांत्रिकीतील मूलभूत संशोधन तज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पीएच्‌.डी.चे विद्यार्थी करतात. त्याशिवाय सरकारी स्तरावर संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा गोपनीय विषयांवर संशोधन करण्यासाठी स्वतंत्र प्रयोगशाळा आहेत. विद्यापीठीय संशोधनाकरिता सरकार व उद्योगधंदे आर्थिक साहाय्य करतात.

कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च या भारत सरकारच्या स्वायत्त मंडळाच्या अखत्यारीखालील सेंट्रल मेकॅनिकल एंजिनियरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट या दुर्गापूर येथे १९५८ मध्ये स्थापन झालेल्या संस्थेतर्फे यांत्रिक अभियांत्रिकी उद्योगांना साहाय्य करण्यासाठी सहयोग व प्रायोजित तत्त्वावर संशोधन करण्यात येते. नवीन अभियांत्रिकीय उत्पादने व प्रक्रिया यांचे अभिकल्पन व विकास, आयात करण्यात येणाऱ्या यंत्रसामग्रीचा विकास व तीत सुधारणा घडवून आणणे, उत्पादित वस्तूचे मूल्यमापन, अभियांत्रिकीय सामग्रीसाठी गुणवत्ता नियंत्रण इ. क्षेत्रांत या संस्थेतर्फे संशोधन, विकासात्मक परीक्षण व तांत्रिक सल्ला यांबाबतीत काम केले जाते. या संस्थेची दुर्गापूर, मद्रास, पुणे, लुधियाना व कोचीन येथे प्रादेशिक केंद्रे आहेत. या संस्थेतर्फे मेकॅनिकल एंजिनियरिंग बुलेटिन सीएमई आर आय न्यूज लेटर ही त्रैमासिके प्रसिद्ध होतात.

यांखेरीज यांत्रिक अभियांत्रिकीशी संबंधित अशी पुढील नियतकालिके भारतात प्रसिद्ध होतात. एंजिनियरइन्स्टिट्यूशन ऑफ मेकॅनिकल एंजिनियर्स (त्रैमासिक मुंबई), इन्स्टिट्यूशन ऑफ एंजिनियर्स (इंडिया) मेकॅनिकल एंजिनियरिंग डिव्हिजन जर्नल (द्वैमासिक कलकत्ता), मशिन टूल एंजिनियर (त्रैमासिक बंगलोर) इंडियन मशिन टूल्स जर्नल (मुंबई), मशिन अँड मशिनरी (मासिक कलकत्ता), मशिन बिल्डिंग इंडस्ट्री (मासिक मुंबई), मशिनरी अँड मशिन टूल जर्नल (मासिक नवी दिल्ली), जर्नल ऑफ एंजिनियंरिंग प्रॉडक्शन (त्रैमासिक नवी दिल्ली), जर्नल ऑफ थर्मल एंजिनियरिंग (त्रैमासिक नवी दिल्ली).

संदर्भ: 1. Baumeister, T. Marks, L. S., Ed.,Standard Handbook for Mechanical Engineers, New York, 1967.

2. Institution of Mechanical Engineers, Engineering Heritage : Highlights from the History of Mechanical Engineering. 2. Vols., New York, 1963-66.

3. Kirby, R. S and others, Engineering in History, New York, 1956.

4. Naparstek, M. I. Mechanical Engineering, New York, 1964.

तांबे, मु. शं. दीक्षित, चं. ग. कुलकर्णी, प्रि. खं.