म्वासां, आंरी : (२८ सप्टेंबर १८५२–२० फेब्रुवारी १९०७). फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ. ⇨ प्ल्युओरीन या मूलद्रव्यासंबंधीचे संशोधन व त्याचे विलगीकरण आणि विद्युत् प्रज्योत भट्टीच्या [→ विद्युत् भट्टी] साहाय्याने केलेले महत्त्वपूर्ण कार्य याबद्दल त्याना १९०६ सालच्या रसायनशास्त्राच्या नोबल पारितोषिकाचा बुहुमान मिळाला.
म्वासां यांचा जन्म पॅरिस येथे झाला. त्यांचे उच्च शिक्षण प्रथम म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरीमधील एद्माँ फ्रेमी यांच्या प्रयोगशाळेत व नंतर पॅरिस येथील स्कूल ऑफ फार्मसीमध्ये झाले. १८७९ मध्ये त्यांना ॲग्रॉनॉमिक इन्स्टिट्यूटमध्ये नोकरी मिळाली व १८८० मध्ये त्यांनी सायनोजेन श्रेणीतील संयुगांवर प्रबंध लिहून डॉक्टरेट पदवी संपादन केली. त्यानंतर ते स्कूल ऑफ फार्मसीमध्ये साहाय्यक अध्यापक व वरिष्ठ प्रयोगनिदेशक आणि पुढे १८८६ मध्ये विषविज्ञानाचे प्राध्यापक झाले. त्याच संस्थेत १८९९ मध्ये अकार्बनी रसायनशास्त्राच्या अध्यासनावर त्यांची नेमणूक झाली. पुढील वर्षी पॅरिस विद्यापीठात ते अकार्बनी रसायनशास्त्राचे प्राध्यापक झाले.
त्यांचे सुरुवातीचे संशोधन वनस्पतींच्या पानांतील ऑक्सिजन व कार्बन डाय-ऑक्साइड यांच्या विनिमयासंबंधी होते परंतु लवकरच त्यांचे लक्ष अकार्बनी रसायनशास्त्राकडे वळले आणि त्यात प्रारंभी त्यांनी लोह गटातील धातूंची ऑक्साइडे आणि क्रोमियम व क्रोमस लवणे यांसंबंधी अभ्यास केला. १८८४ मध्ये त्यांनी आपले लक्ष प्ल्युओरिनाच्या रसायनशास्त्राकडे केंद्रीत केले. त्यांनी या मूलद्रव्याची काही कार्बनी व फॉस्फरसयुक्त संयुगे तयार केली. पुढील वर्षी त्यानी निर्जल हायड्रोजन प्ल्युओराइडातील पोटॅशियम प्ल्युओराइडाच्या विद्रावाचे विद्युत् विच्छेदन (विद्रावातून विद्युत् प्रवाह जाऊ देऊन त्यातील घटक द्रव्ये अलग करण्याची क्रिया)करून प्रथमच प्ल्युओरीन वेगळा करण्यात यश मिळविले. या वायूच्या गुणधर्मांचा व इतर मुलद्रव्यांबरोबरील त्याच्या विक्रियांचा त्यांनी सखोल अभ्यास केला. म्वासां व जेम्स देवार यांनी १८९७ मध्ये प्ल्युओरिनाचे द्रवीकरण व १९०३ मध्ये घनीभवन केले.
वितळलेल्या लोखंडातील कार्बनच्या दाबाखाली स्फटिकीकरण करून हिऱ्यांचे संश्लेषण (कृत्रिम रीतीने तयार करण्याची क्रिया) करता येईल, असा सिद्धांत म्वासां यानी १८९२ मध्ये मांडला. या कामात मदत होण्यासाठी त्यांनी एक विद्युत् प्रज्योत भट्टी अभिकल्पित (आराखडा तयार केला) व विकसित केली (ही भट्टी त्याच्या नावानेच ओळखण्यात येते) या भट्टीत ३,५००° से. पर्यत तापमान मिळवून त्यानी अतिशय लहान कृत्रिम हिरे तयार केले. पुढे या भट्टीचा उपयोग त्यानी पूर्वी वितळविता येणार नाहीत अशा समजल्या गेलेल्या अनेक पदार्थांचे बाष्पीकरण करण्यासाठी अनेक नवीन संयुगे (विशेषतः कार्बाइडे, सिलिसाइडे व बोराइडे) तयार करण्यासाठी केला. कॅल्शियम कार्बाइड, हे व्यापारी दृष्ट्या अतिशय महत्त्वाचे सयुग या भटीमुळे मुबलक व सहज रीत्या तयार करणे शक्य झाले. १८९१ मध्ये त्यानी कार्बोरंडम (सिलिकॉन कार्बाइड) या अतिशय उपयुक्त पदार्थाचा शोध लावला. कार्बाइडे व त्याच्या विक्रिया याचा त्यांनी सखोल अभ्यास केला. त्यांना कॅल्शियम, सोडीयम व पोटॅशियम यांची हायड्राइडे तयार केली आणि ती विद्युत् संवाहक नाहीत असे दाखविले. मॉलिब्डेनम, टँटॅलम, निओबियम यासारख्या धातू विलग करण्यासाठी त्यानी विद्युत् भट्टीचा वापर केला. या भट्टीमुळे मिळणाऱ्या २,५००° – ४,०००° से तापमानाचा रासायनिक विक्रियामध्ये उपयोग होऊ लागला आणि उच्च तापमान रसायनशास्त्राच्या संशोधनाला मोठी चालना मिळाली. भट्टीचे व्यापारी महत्त्व कळूनदेखील त्यांनी तिचे एकस्व (पेटंट) घेतले नाही.
नोबेल पारितोषिकाखेरीज त्यांना प्री लाकाझ पुरस्कार, डेव्ही पदक व होफमान पदक हे बहुमान मिळाले. ते ॲकॅडेमी द मेडिसन, ॲकॅडेमी डेस सायन्सेस, रॉयल सोसायटी (लंडन), केमिकल सोसायटी (लंडन) वगैरे अनेक मान्यवर वैज्ञानिक संस्थांचे सदस्य होते. त्यांचे ३०० च्या वर संशोधनपर निबंध प्रसिद्ध झाले. त्यानी लिहलेले Le Four Electrique (१८९७), Le Flour et ses Composes (१९००) व Trait de Chimie Minerale (५ खंड, १९०४–०६) हे ग्रथ विशेष प्रसिद्ध आहेत. ते पॅरिस येथे मृत्यु पावले.
मिठारी, भू. चिं. घाटे, रा. वि.