म्यूलर, हेरमान जोसेफ : (२१ डिसेंबर १८९०–५ एप्रिल १९६७). अमेरिकन आनुवंशिकीविज्ञ, क्ष-किरणांमुळे ⇨ गुणसूत्रात बदल होऊन उत्परिवर्तन (आनुवांशिक लक्षणांमध्ये बदल होणे) होते, या त्यांच्या शोधाबद्दल त्यांना १९४६ च्या शरीरक्रियाविज्ञान किंवा वैद्यक या विषयाच्या नोबेल पारितोषिकाचा बहुमान मिळाला.
म्यूलर यांचा जन्म न्यूयॉर्क येथे झाला. १९०७ मध्ये त्यांना कूपरह्यूइट शिष्यवृत्ती मिळाली आणि कोलंबिया विद्यापीठात शिक्षण घेऊन त्यांनी बी. ए. (१९१०), एम्. ए. (१९१२) आणि पीएच्. डी (१९१६) या पदव्या मिळविल्या. कोलंबिया कॉलेजमध्ये असताना ते जीवविज्ञानाकडे आकर्षित झाले व आनुवंशिकीसंबंधी काही ग्रंथ वाचण्यात आल्यानंतर त्या शास्त्रावर त्यांचे लक्ष केंद्रीत झाले. १९१० पासून ⇨ टॉमस इंट मॉर्गन यांच्या ड्रॉसोफिला या फळमाशीवरील संशोधनाकडे त्यांचे लक्ष होते व १९१२ पासून त्या कार्यांत प्रत्यक्ष भाग घेण्याची संधी त्यांना मिळाली. हे संशोधन ⇨ गुणसूत्रे, ⇨ जीन आणि ⇨ आनुवंशिकी यांबद्दलचे होते.
ह्यूस्टन येथील राइस इन्स्टिट्यूटमध्ये १९१५–१८ या काळात अध्यापनाचे काम करीत असताना त्यांनी उत्परिवर्तनासंबंधी अभ्यास सुरू केला. १९१८–२० मध्ये ते कोलंबिया विद्यापीठात व त्यानंतर टेक्सस विद्यापीठात प्राध्यापक झाले. त्यांच्या अध्यापनाचे मुख्य विषय आनुवंशिकी व क्रमविकास (उत्क्रांती) हे असले, तरी संशोधनाचा विषय उत्परिवर्तन हाच होता.
त्यांच्या एकूण संशोधन कार्याचा आढावा खालीलप्रमाणे : (१) त्यांनी १९२१ नंतर गुणसूत्रातील जीनांचा समावेश असलेला आनुवंशिकतेसंबंधीचा भाग सर्व जीविताच्या सुरुवातीस कारणाभूत असतो आणि अजूनही सर्व जीवनाचा मूलाधार तोच आहे, हा सिद्धांत मांडून त्याचा पाठपुरावा केला. पुनरुत्पादनक्षमता अथवा आवृत्ती निर्माण करण्याची क्षमता आणि टिकाऊ बदल होऊ देण्याची म्हणजेच उत्परिवर्तनीची क्षमता हे गुणधर्म गुणसूत्रातील या भागाला वरील महत्त्व प्राप्त करून देण्यास कारणीभूत झाले आहेत, असे त्यांनी प्रतिपादन केले.
(२) १९१८–२६ या काळात त्यांनी जीनांच्या उत्स्फूर्त उत्परिवर्तनाची प्रमुख तत्त्वे मांडली. ह्यांमध्ये बहुतेक उत्परिवर्तने हानिकारक असून ती अतिसूक्ष्म यदृच्छ्या होणाऱ्या रेणवीय हालचालींमुळे होतात या तत्त्वाचाही समावेश आहे. १९२६ च्या शेवटास क्ष-किरणजन्य जीन उत्परिवर्तन व गुणसूत्रातील बदल यांविषयी भक्कम पुरावा त्यांनी गोळा केला आणि १९२७ मध्ये या संशोधनासंबंधीचा निबंध प्रसिद्ध केला. या त्यांच्या शोधानंतर अनेक नव्या संशोधनाचे मार्ग खुले झाले व पुढील काही वर्षांत ⇨ रेणवीय जीवविज्ञान या नव्या शाखेचा उदय झाला. यामुळे त्यांना या नव्या शास्त्राचे जनक मानतात.
(३) किरणीयनामुळे [हानीकारक प्रारण शरीरावर पडल्यामुळे, → प्रारण जीवविज्ञान] मानवी शरीराच्या आयुर्मानात घट अथवा वयोवस्थेची (कलानुसार बदलणाऱ्या शरीराच्या अवस्थेची) जलद वाढ या परिणामाबद्दलचे संशोधन आय्. आय्. ऑस्टर, डब्ल्यू. ऑस्टर टॅग आणि हेलेन मायर या सहकाऱ्यांसमवेत म्यूलर यांनी केले होते. हा हानिकारक परिणाम बहुताशी विभाजन होणाऱ्या कायिका कोशिकांतील (पेशींतील) गुणसूत्रांवरील किरणीयनजन्य नाशामुळे होतो, असा पुरावा त्यांनी गोळा केला होता. नैसर्गिक वयोवृद्धीत असा कोणताही बदल त्यांना आढळला नव्हता.
आधुनिक जीवन परिस्थिती मानवातील हानिकारक जीन उत्परिवर्तनात घट घडवून आणण्यास असमर्थ असल्यामुळे हळूहळू आनुवंशिक गुणऱ्हास होत आहे, असा निष्कर्ष म्यूलर यांनी १९३५ मध्ये काढला होता. एच्. ब्रुअर या सहकाऱ्यांबरोबर मानवी आनुवंशिकता सुधारण्याकरिता दांपत्याने ऐच्छीक बीज निवड करावी, अशी सूचना त्यांनी केली होती. जनन-कोशिकांचा संरक्षित संचय असावा व या कोशिका ज्यांनी अनन्यसाधारण योग्यता सिद्ध केली आहे अशाच व्यक्तींपासून मिळवाव्यात, असे त्यांनी प्रतिपादन केले होते. ‘मानवी क्रमविकासाचे नियंत्रण स्वतः मानवाच्याच स्वाधीन असावे’, हा आपल्या सर्व संशोधनाचा हेतू असल्याचे त्यांनी म्हटले होते.
म्यूलर यांनी १९३२–३३ मध्ये जर्मनीत बर्लिनमध्ये गुगेनहाइम फेलो, १९३३–३७ मध्ये लेनिनग्राड येथील रशियन अकॅडेमी ऑफ सायन्सेसच्या इन्स्टिट्यूट ऑफ जेनेटिक्स या संस्थेत आनुवंशिकीविज्ञ आणि त्यांनंतर १९३७–४० मध्ये ब्रिटनमधील एडिंबरो विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ ॲनिमल जेनेटिक्स या संस्थेत संशोधक म्हणून काम केल्यानंतर ते अमेरिकेला परतले व १९४०–४५ मध्ये ॲम्हर्स्ट कॉलेजात प्राध्यापक व १९४५ नंतर इंडियाना विद्यापीठात प्राणिविज्ञानाचे प्राध्यापक म्हणून काम व संशोधन केले. १९५३ मध्ये ते इंडियाना विद्यापीठातत विशेष सेवा प्राध्यापक व १९६४ गुणश्री प्राध्यापक झाले.
हायड्रोजन बाँबच्या स्फोटामुळे मानवी जीवनावर भयानक व संहारक परिणाम होण्याची शक्यता असल्यामुळे, अशा बाँबच्या वापरावर बंदी घालावी म्हणून १९५५ मध्ये ॲल्बर्ट आइन्स्टाइन व इतर काही प्रमुख शास्त्रज्ञांच्या सहकार्याने सर्व राष्ट्रांना उद्देशून म्यूलर यांनी एक आवाहन प्रसिद्ध केले. अण्वस्त्र चाचण्यांच्या विरुद्ध आंदोलनही त्यांनी सुरT केले होते.
म्यूलर यांनी शास्त्रीय व सांस्कृतिक विषयांवर ३५० पेक्षा जास्त लेख लिहिले. त्यांतील सर्वांत महत्त्वाचा ‘आर्टिफिशियल ट्रॅन्सम्युटेशन ऑफ जीन’ (१९२७) हा होय. रेडिएशन बायालॉजी (१९४९) या ए. होलिअँडर यांनी संपादित केलेल्या ग्रंथांत म्यूलर यांनी प्रारण आनुवंशिकी या विषयावर २७५ पृष्ठांचा लेख लिहिला आहे. द मेकॅनिझम ऑफ मेंडेलियन हेरेडिटी (टी. एच, मॉर्गन व इतरांच्या समवेत १९१५), औट ऑफ द नाइट- ए बायॉलॉजिस्टस व्ह्यू ऑफ द फ्युचर (१९३५), जेनेटिक्स, मेडिसीन अँड मॅन (सी. सी. लिटल् व एल. एच्. स्नायडर यांच्या समवेत, १९४७), स्टडीज इन जेनेटिक्स (१९६३) इ. पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. मॅन्स फ्यूचर बर्थराइट : एसेज ऑन सायन्स अँड ह्यूमॅनिटी (१९७३) आणि द मॉडर्न कन्सेप्ट ऑफ नेचर (१९७३) या ग्रंथातही त्यांचे काही लेखन प्रसिद्ध झाले आहे.
आठवी इंटरनॅशनल काँग्रेस ऑफ जेनेटिक्स (१९४८) या परिषदेचे व अमेरिकन ह्यूमॅनिस्ट ॲसोसिएशन (१९५६–५८) या संस्थेचे अध्यक्ष होते. त्यांना एडिंबरो (१९४०), कोलंबिया (१९४९) व शिकागो (१९५९) या विद्यापीठांच्या डी. एस्सी आणि जेफर्सन मेडिकल कॉलेजची एम्. डी. या पदव्या मिळाल्या. किंबर जेनेटिक्स पुरस्कार (१९५५), डार्विन-वॉलिस स्मृतिपदक (१९५८) इ. मानसन्मान त्यांना मिळाले. अमेरिका, ब्रिटन, स्वीडन, जपान, भारत इ. देशांतील मान्यवर संस्थांचे ते मानसेवी सदस्य होते. ते इंडियानापोलिस येथे मरण पावले.
भालेराव, य. त्र्यं.