म्बॉय, टॉमस जोसेफ : (१५ ऑगस्ट १९३०–५ जुलै १९६९). केन्या प्रजासत्ताकातील राष्ट्रीय चळवळीतील एक अग्रगण्य नेता आणि मुत्सद्दी. त्याचा जन्म नैरोबीजवळच्या किलिमा म्बागो या खेड्यात लुओ जमातीतील मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्याचे वडील जोसेफ हे ब्रिटिशांच्या मळ्याची देखभाल करणारे एक अधिकारी होते. त्यांनी रोमन कॅथलिक चर्चचे अनुयायित्त्व पतकरल्यामुळे टॉमने लुओ जमातीचा असूनही मिशन शाळांतून प्राथमिक शिक्षण घेतले. पुढे आरोग्यधिकाऱ्याचे प्रशिक्षण घेऊन (१९४८–५०) तो नैरोबी नगरपरिषदेत नोकरीस लागला. (१९५१–५३). त्याच वेळी नगरपरिषदेतील कामगार संघटनांशी तसेच त्यांच्या चळवळींशी त्याचा घनिष्ठ संबंध आला. ह्या कामगार चळवळींमधूनच तो कामगार नेता म्हणून प्रसिद्धीस आला. १९५२ मध्ये तो जोमो केन्याटाच्या केन्या आफ्रिकन युनियनमध्ये सामील झाला. ह्यावेळेपासून त्याचावर केन्याटाचा प्रभाव पडला व तो केन्याटाचा अनुयायी बनला. ह्या दरम्यान केन्यात माऊमाऊ ही दहशतवादी चळवळ निर्माण झाली. त्याने या चळवळीपासून अलिप्त राहून आपले सर्व लक्ष कामगारांच्या प्रश्नांवर केंद्रीत केले. या वेळी तो केन्या मजूर संघटनेचा (के. एफ्. एल.) प्रमुख सचिव होता (१९५३–६२). हे पद त्याने राजकीय पक्षांवर बंदी असतानाही अत्यंत चाणाक्षपणे सांभाळले व सक्रिय राजकारणापासून आपल्या संघटनेस अलिप्त ठेवले. १९५७ साली झालेल्या विविध मंडळाच्या निवडणुकीत तो निवडून आला. त्याने त्याच्या समकालीन आफ्रिकी नेत्यांना अप्रिय अशा ब्रिटीशांच्या बहुवंशीय प्रतिनिधित्वविषयक धोरणास विरोध केला आणि विधीमंडळात केन्याच्या स्वातंत्र्य चळवळीस मदत केली. तसेच नैरोबीत पीपल्स कन्व्हेंशन पक्षाची स्थापना केली. या स्वातंत्र्य चळवळीच्या ऐन भरात त्याने ऑक्सफर्ड विद्यापिठात एक वर्ष अध्ययनात व्यतीत केले आणि अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांना दोन वेळी भेटी दिल्या.

केन्या स्वतंत्र होण्यापूर्वी १९६० मध्ये त्याने केन्या आफ्रिकन नॅशनल युनियन (कानू) या पक्षाच्या स्थापनेत पुढाकार घेऊन त्यावेळी तुरुंगात असलेल्या केन्याटाची पक्षाध्यक्षपदी निवड केली. तो स्वतः पक्षाचा मुख्य सचिव होता. जोमो केन्याटाच्या मुक्ततेनंतर १९६१ मध्ये त्याचे महत्त्व काहीसे कमी झाले. तरीसुद्धा केन्याटाला सर्वतोपरी सहाय्य देण्याचे त्याने ठरविले. १९६२ मध्ये त्याने संयुक्त मंत्रीमंडळात कामगार मंत्री म्हणून काम केले. पुढे केन्याटाने त्याला आपल्या मंत्रीमंडळात कायदा व राज्यघटना या खात्याचे मंत्रिपद दिले (१९६३). अशा प्रकारे स्वतंत्र केन्याची राज्यघटना तयार करण्यास त्याचा हातभार लागला.  

जोमो केन्याटाच्या मंत्रिमंडळात अर्थ-नियोजन मंत्री म्हणून (१९६४–६९) आल्यानंतर ओडिंगो या कम्युनिस्ट विचारसरणीच्या नेत्याबरोबरचे त्याने जुने मतभेद विकोपाला गेले. आफ्रिकन समाजवादाच्या संदर्भात दोघांची मते भिन्न होती. ओडिंगो हा पूर्णतः साम्यवादी विचारसरणीचा असून आर्थिक नियोजनाचे पूर्ण राष्ट्रीयीकरण करावे आणि ते राबविण्यासाठी क्रांतिकारक पावले उचलावीत व उपाय योजावेत, असे त्याचे मत होते. तर म्बॉयला पाश्चात्त्यांचा विश्वास संपादन करून हळूहळू जनमत तयार करावे, असे वाटे. शिवाय त्याने अनेक वेळा आपल्या वत्त्कव्यातून केन्याटाच्या अलिप्तततावादाचा पुरस्कार केला होता परंतु ओडिंगोच्या उघडउघड चीनधार्जिण्या धोरणामुळे त्याच्या आर्थिक नियोजनात अडथळे येऊ लागले. केन्याटाने ओडिंगोला सक्रिय राजकारणापासून अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ओडिंगो-म्बॉय यांचा तणाव वाढला. म्बॉयचा १९६९ मध्ये खून करण्यात आला. त्याच्या खुनामागे ओडिंगोच्या केन्या पीपल्स युनियनचा हात असावा, असा नंतर आरोप केला गेला.

म्बॉयच्या सार्वजनिक जीवनास एक सामान्य आरोग्याधिकारी म्हणून प्रारंभ झाला आणि नैरोबी नगरपरिषदेतील कामगारांच्या समस्यांनी त्याला कामगार चळवळीकडे आकृष्ट केले. म्बॉयने अमेरिकेत १९५९ मध्ये आफ्रिकी विद्यार्थ्यांचे प्रतिष्ठान स्थापन करण्यात पुढाकार घेतला आणि त्याद्वारे पूर्व आफ्रिकेतील, विशेषतः केन्यामधील विद्यार्थांना परदेशात उच्च शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. एक तळमळीचा निष्ठावान कामगार नेता म्हणून केन्याचा स्वातंत्र्यलढ्यात त्याने स्वतःचे वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण केले.

संदर्भ : 1. Oget, B. A. Kieran, J. A. Ed. Zamani, New York, 1969.

             2. Rake, Alan, Tom Mboya, Toronto. 1962.

शेख, रूक्साना