नगर रचना, एक उत्खनित, दृश्य, मोहें-जो-दडो.

मोहें-जो-दडो : पाकिस्तानातील सिंधू संस्कृतीचे सुप्रसिद्ध स्थळ. हे स्थळ सिंधच्या लार्कान जिल्ह्यात असून तेथील टेकाडांना मृतांची टेकाडे असे म्हणतात. मोहें-जो-दडो ह्या शब्दाचा अर्थ असाच आहे. १९२२ साली बॅनर्जी यांनी ह्या स्थळाचे ताम्रपाषाणयुगीन महत्त्व ओळखले. ह्यानंतर १९२७ सालापर्यंत जॉन मार्शल यांनी येथे उत्खनन केले. १९२७–३१ ह्या काळात मकाय ह्यांनी आणि नंतर मॉर्टिमर व्हीलर यांनी १९५० साली येथे उत्खनन केले. 

मोहें-जो-दडो येथे हडप्पा संस्कृतीचे अवशेष ५ किमी.च्या परिघामध्ये विखुरलेले आहेत. ह्या अवशेषांचे कोट व नागरी वस्ती असे दोन विभाग करता येतात. कोटाच्या भागातील उत्खननामध्ये मातीच्या विटांचा चौथरा सापडला व त्यावर कोटाची वास्तू उभारलेली आढळून आली. शहराच्या संरक्षणाकरिता ठिकठिकाणी भाजलेल्या पक्क्या विटांचे बुरूज बांधलेले होते. या बुरूजांचा उपयोग टेहेळणीकरिता होत असावा, हे उघड आहे.

कोटाच्या आत नागरी वस्ती होती. ह्या नागरी वस्तीच्या एकंदर सात अवस्था उत्खननात उघडकीस आल्या. नागरी वस्ती हडप्पाप्रमाणे आखीव व योजनाबद्ध मांडणीची होती. हडप्पापेक्षा येथील वस्ती जास्त योजनात्मक असल्याचा पुरावा उत्खननामधून स्पष्ट होतो. रस्ते सु. ९ मीटर रुंद असून मुख्य रस्ते पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण असे आखण्यात आलेले होते. रस्ते एकमेकांना काटकोनांत छेदीत असल्याने मोहें-जो-दडोची वस्ती निरनिराळ्या काटकोन-चौकोनी विभागांत विभाजित केलेली आढळली.

घरांचा दरवाजा मुख्य रस्त्याकडे न येता छोट्या गल्लीकडे येईल, अशा तऱ्हेने ती बांधलेली होती. ही घरे भट्टीत भाजलेल्या पक्क्या विटांची असून प्रत्येक घरात कमीत कमी तीन खोल्या, एक स्नानगृह व स्वयंपाकघर असल्याचे दिसून आले. काही काही घरे दुमजली असून वरच्या मजल्यावर जाण्याकरिता स्वतंत्र जिनाही होता.

मोहें-जो-दडोची आरोग्यव्यवस्था उत्कृष्ट होती तसेच जलनिःसारणाची व्यवस्था शास्त्रशुद्ध होती. गटारे उत्कृष्ट बांधणीची असून ती मुख्य गटाराला जोडलेली होती. गटारातील सांडपाणी व घाण लवकर वाहून जावी म्हणून गटारांना ठिकठिकाणी पायऱ्या केलेल्या होत्या. ही सर्व गटारे उघडी नसून विटांनी झाकलेली होती.

शृंगधारी तथाकथित पशुपतीची मुद्रा, मोहें-जो-दडोनागरी वस्तीच्या घरांशिवाय मोहें-जो-दडोला सापडलेले सार्वजनिक स्नानगृह अद्वितीय मानता येईल. ११ मी. लांब व ७ मी. रुंद आणि २·५ मी. खोल ह्या मोजमापाचे हे स्नानगृह विटांत बांधलेले असून त्याच्याभोवती व्हरांडा व कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र खोल्या बांधलेल्या होत्या. पाणी झिरपू नये म्हणून विटा जिप्सममध्ये बसवलेल्या होत्या. स्नानगृहाशिवाय धान्याचे एक प्रचंड गुदाम, ७१ मी. लांब व २३ मी. रुंद अशी अनेक खोल्या असलेली बहुधा विद्यालयाची इमारत, अनेक स्तंभांचा सभागृहाकरता वापरण्यात येणारा मोठा मंडप आणि एकसारख्या खोल्या असलेल्या मजुरांच्या चाळी ही वास्तुवैशिष्ट्ये उल्लेखण्यासारखी आहेत. वस्तीचे सात कालखंड झाले तरी वस्तीची रचना व वैशिष्ट्ये जशीच्या तशीच राहिली. यावरून मोहें-जो-दडो येथे शिस्तबद्ध व वंशपरंपरागत आलेली सत्ता असावी, असा कयास बांधता येतो. हडप्पा व मोहें-जो-दडो ही दोन्हीही नागरी संस्कृतीची केंद्रे असल्याने एकाच सत्तेच्या त्या दोन राजधान्या असाव्यात, असे काही विद्वानांचे मत आहे.


ब्राँझचा पुतळा

मोहें-जो-दडो येथील रहिवासी उत्कृष्ट गुलाबी रंगाच्या मडक्यांचा वापर करीत असत. येथे सापडलेल्या मडक्यांचे आकार व त्यांवरील काळ्या रंगातील चित्रकाम हडप्पाप्रमाणेच आहे. येथे सापडलेल्या मुद्रा विविध प्रकारच्या असून त्यांवर हरतऱ्हेचे विचित्र प्राणी व गेंड्यासदृश दलदलीच्या प्रदेशांत राहणारी जनावरे चित्रित केलेली आहेत. काही मुद्रांवर पशुपतीचे चित्रण असावे, असे एक मत मांडले जाते. मोहें-जो-दडो येथील मुद्रांवर चित्रित केलेला वास्तवपूर्ण वळू प्रख्यात आहे. इतक्या प्रचंड प्रमाणावर मडकी व विटा भाजण्याकरिता लागणारे जळण जवळच उपलब्ध असल्याशिवाय एवढी मोठी नागरी वास्तुबांधणी शक्य नसल्याने मोहें-जो-दडो येथे पूर्वी जवळपास जंगल असावे, म्हणजेच त्या काळी सध्या पेक्षा वेगळे हवामान असावे, असाही कयास करता येतो. मोहें-जो-दडोचे रहिवासी हरतऱ्हेचे सोन्याचे अलंकार वापरीत असत. याशिवाय हरतऱ्हेचे मूल्यवान दगडांचे, स्टिअटाइट व फियान्सचे मणीही वापरत होते. काही काही दगडी मण्यांवर पांढरा अगर काळा रंग भरून नक्षी काढल्याचे आढळून आले. यांशिवाय मातीची हरतऱ्हेची खेळणी व मूर्ती प्रचलित होत्या. त्यांतील काही खेळणी अशी आहेत की त्यांत दोरा अगर काडी घातल्यास त्या खेळण्यांची मान हलविता येते. मातीच्या मूर्ती विविध असून त्यांची नाके माती ओली असताना चिमटीत धरून ओढलेली आढळतात. यावरून त्यांचे डोळे व अलंकार चिकटवलेले दिसून येतात. याशिवाय तांब्याची छिन्नी, कुऱ्हाड, चाकू, सुऱ्या, गिरमिट इ. हत्यारे व तांब्याची भांडीही वापरत होती. उत्खननात कुठेही घोडा व घोड्याची खेळणी आढळून आली नाहीत.

मोहें-जो-दडो येथे शिस्तबद्ध दफनपद्धती आढळत नाही परंतु याचा अर्थ असा नव्हे की येथील लोक प्रेते जाळून टाकीत असत. मोहें-जो-दडोचा अजूनही काही भाग अनुत्खनित राहिला आहे. हडप्पा संस्कृतीच्या हडप्पा व लोथल ह्या केंद्रात जशी दफने सापडली आहेत, तशीच दफने मोहें-जो-दडोला आणखी उत्खनन केल्यास सापडण्याची शक्यता नाकरता येत नाही.

मोहें-जो-दडो येथील वस्तीचा नाश कसा झाला, याबद्दल विद्वानांत एकमत नाही. मोहें-जो-दडो येथे घरांमध्ये आणि रस्त्यांमध्ये जी अनेक प्रेते सापडली आहेत, त्यांवरून व्हीलर यांच्या मते मोहे-जो-दडो येथे फार मोठी कत्तल झाली असावी. काही प्रेते तर जिन्यामध्येही सापडली. यावरून हल्ला करणाऱ्या आर्यांनी मोहें-जो-दडो येथे अचानक हल्ला करून कत्तल केली असावी असे, व्हीलर म्हणतात. मोहें-जो-दडोसारख्या नगरीचा विध्वंस केल्यानेच इंद्रास पुरंदर अशी संज्ञा मिळाली, असेही सुचविले जाते परंतु हे मत सर्वमान्य नाही.

मोहें-जो-दडोचा कालखंड कार्बन–१४ पद्धतीने निश्चित करता आलेला नाही. परंतु एका अवशेषाच्या पृथक्करणानुसार कार्बन–१४ अन्वये मोहें-जो-दडोच्या उत्तरकालातील वस्तीचा कालखंड इ. स. पू. १७०७ ± ११५ असा आलेला आहे परंतु मोहें-जो-दडो येथे सापडलेल्या मुद्रा, रंगीत नक्षीकाम केलेले व फियान्सचे मणी, ब्राँझच्या कुऱ्हाडी यांचा मध्यपूर्वेतील निरनिराळ्या स्थळांच्या उत्खननांत सापडलेल्या सदृश पुराव्याशी मेळ घालता मोहे-जो-दडो येथील संस्कृतीचा काळ इ. स. पू. तिसरे सहस्त्रक असा स्थूलमानाने सांगता येतो.

संदर्भ : 1. Chaudhari, N.C. Mohenjo-daro and the Civilization of Ancient India with Reference to Agriculture, Calcutta, 1937.

             2.Childe, V.G. New Light on the Most Ancient East, London, 1958.

             3. Mackay, E.J.H. Further Excavations at Mohenjodaro 2 Vols., New Delhi, 1938.

             4. Majumdar, R. C. Ed. The Vedic Age, Bombay, 1970.

             5. Marshall, Sir John, Mohenjodaro and the Indus Civilization, 3 Vols, London, 1932.

             6. Possehl. Gregogry L. Ed. Ancient Cities of the Indus, New Delhi, 1979.

देव, शां. भा.