मोहनसिंग ‘माहिर’ : (२० ऑक्टोबर १९०५–? १९७८). प्रख्यात आधुनिक पंजाबी कवी. जन्म सध्याच्या पाकिस्तानातील मर्दान येथे. शिक्षण पंजाबमध्येच एम्. ए. एम्.ओ.एल्. अमृतसर येथील खालसा महाविद्यालयात फार्सी व उर्दूचे विभागप्रमुख म्हणून त्यांनी काही काळ नोकरी केली. तथापी १९३९ मध्ये ही नोकरी सोडून ते लाहोरला गेले व तेथे त्यानी पंज दर्या नावाचे पंजाबी मासिक स्वतःच्या संपादकत्त्वाखाली काढले. इंग्रजी, फार्सी व उर्दू काव्याचा त्यांचा व्यासंग सखोल होता. फाळणीनंतर लाहोर सोडून ते अमृतसरला व नंतर जलंदरला गेले व तेथून पंज दर्या काढू लागले. १९६४ मध्ये संपादन सोडून देऊन ते पूर्णवेळ लेखन व्यवसाय करू लागले. लुधियाना येथील पंजाब कृषी विद्यापीठात १९७० ते ७७ ह्या काळात त्यांची गुणश्री प्राध्यापक म्हणून नियूक्ती झाली. पंजाबी साहित्य अकादेमीचे ते आद्य ‘फेलो’ (१९६६) म्हणून नियुक्त झाले होते. तसेच ह्या अकादेमीचे ते सन्मान्य सरचिटणीसही होते. साहित्य अकादेमी पुरस्कार (वड्डावेला–१९५९), पंजाब शासन पुरस्कार (जन्द्रे), सोव्हिएत लॅँड नेहरू पुरस्कार (१९६८), पंजाब विद्यापीठ पुरस्कार (नानकायन–१९७२) इ. बहुमानाचे पुरस्कारही त्यांना लाभले.
आधुनिक पंजाबी कवितेच्या क्षेत्रात मोहनसिंगांना अत्यंत मानाचे व वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. नवे अनुरूप शब्द तयार करून ते आपल्या काव्याच्या संगीतमय लयीत कलात्मकतेने गुंफण्याची कला त्यांना चांगली अवगत होती. आधुनिक पंजाबीतील सर्वच समकालीन कवींवर त्यांचा गहिरा प्रभाव पडलेला आहे. त्यांच्या कवितेतील आशय नेहमीच वैश्विकतेच्या व बहुमुखतेच्या गुणांनी युक्त असतो.
मोहनसिंग यांचा खरा पिंड स्वच्छंदतावादी कवीचा आहे. त्यांच्या तरुण पत्नीच्या आकस्मिक निधनानंतर ते काव्यलेखनाकडे वळले. स्वच्छंदतावाद हा त्यांच्या कवितेतील अविभाज्य घटक असून त्यामुळेच त्यांच्या कवितेस अनोखी अशी कलात्मक उंची प्राप्त होते.
सावे पत्तर (१९३६–म. शी. हिरवी पाने) ह्या त्यांच्या पहिल्या संग्रहाने त्यांना पंजाबीतील अतिशय लोकप्रिय कवी म्हणून मान्यता व प्रतिष्ठा मिळवून दिली. अत्यंत साधी सरळ भाषा, संगीतमयता आणि प्रवाहीपणा ही त्यांच्या कवितेची ठळक वैशिष्ट्ये होत. आपल्या कवितेतून त्यांनी नव्या वृत्तांचा व छंदाचा वापर तर केलाच पण पंजाबीतील जुन्या, पारंपारिक छंद-वृत्तांनाही नवे सौंदर्यपूर्ण घाट प्राप्त करून दिले. कुसुंभ्डा (१९३६) हा त्यांचा दुसरा काव्यसंग्रह प्रसिद्ध होताच त्यांची एक श्रेष्ठ कवी म्हणून पंजाबीत प्रतीमा कायम झाली. वर्ड्स्वर्थचा त्यांच्यावर प्रभाव दिसून येतो. आधुनिक पंजाबी काव्यात नवे प्रवाह आणण्याचे श्रेय त्यांच्याकडेच जाते. व्यक्तिगत अभिव्यक्तीचे प्रभावी साधन म्हणून जरी त्यांनी कवितेचा वापर केला असला, तरी त्याच सोबत जनसमूहाच्या भावनांना अभिव्यक्ती देणारे प्रतिनिधिक कवी म्हणूनही त्यांचे स्थान महत्त्वपूर्ण आहे.
⇨ वारिस शाहच्या ‘हीर’ प्रमाणेच मोहनसिंगांची कविता अगदी खालच्या व सामान्य माणसासही सहज आकलन होते. विचारांची स्पष्टता, प्रासादिकपणा, शब्दांचा योग्य व नेमका वापर करण्यात ते निष्णात आहेत. एक श्रेष्ठ व प्रतिभासंपन्न कवी म्हणून कुठल्याही काव्यप्रकाराचा वा छंदाचा ते आपल्या रचनेत अत्यंत समर्थ व कलात्मकपणे वापर करू शकतात. उत्कृष्ट भावगीतरचनाकार म्हणूनही त्यांचा लौकिक आहे. विविध वयोगटांतील व विभिन्न बौद्धिक पातळी असलेल्या लोकांचे त्यांची कविता पुरेपूर रंजन करून त्यांना समाधान देते. त्यांची कविता स्मरणसुलभही आहे.
रंगमंचावरील कवि म्हणून त्यंनी आपल्या काव्यलेखनाची सुरुवात केली. वाढत्या वयाबरोबर त्यांची कविता अधिक गंभीर व सामाजिक जाणिवांनी युक्त बनली. त्यांच्या दृष्टिकोनातील हे समाजवादी स्थित्यंतर सहज लक्षात येते. ते निसर्गावर उत्कट प्रेम करणारे कवी होते. मध्यंतरी ते प्रतीकवादाकडे वळले व त्यांनी रचनेचे अनेक यशस्वी प्रयोगही केले. परंपरेला अनुसरुनही त्यांनी काही नवे प्रयोग केले आणि ते कमालीचे यशस्वी होऊन ते पुन्हा परंपरा बनले. गझल, काफी, रुबाई, वार, इ. प्रकारांतही त्यांनी पंजाबी कविता रचण्याचे प्रयोग केले. शेवटी ते क्रांतीचे उद्गाते कवी बनले आणि त्यांचा दृष्टिकोनही अधिक प्रगतिशील बनला. प्रेमाच्या त्याच त्या विषयांचे चर्वितचर्वण करणे तर त्यांनी कायमचे बंद केले आणि शेतकरी व कामगारांच्या लढ्यांबाबत, त्यांच्या दुःखांबाबत, हालअपेष्टांबाबत त्यांनी काव्यलेखन केले.
चार हंझू (१९३४), अधवाटे (१९४१), कच-सच (१९५०), आवाजां, वड्डावेला, निकी निकी वाशना, जैमीर, जन्द्रे, नानकायन इ. त्यांच्या उल्ल्खनीय कृती होत.
के. जगजित सिंह (इं.) सुर्वे, भा. ग. (म.)