मोसूल : इराकमधील एक मोठे औद्योगिक शहर. वायव्य इराकमध्ये ते टायग्रिस नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर, बगदादच्या उत्तरेस सु. ३५५ किमी. वर वसले आहे. लोकसंख्या १२,२०,००० (१९७७). प्राचीन ॲसिरियन संस्कृतीची ⇨ निनेव्ह ही राजधानी याच्या विरुद्ध बाजूस (पूर्व किनाऱ्यावर) होती. मोसूल हे सिरिया आणि तुर्कस्तान यांना बगदादशी रेल्वेने जोडणाऱ्या मार्गावरील प्रमुख स्थानक आहे. मोसूलची बाजारपेठ मोठी असून तेथे धान्य, फळे आणि मेंढ्या यांचा व्यापार चालतो. येथील तलम सुती वस्त्रे पूर्वीपासून प्रसिद्ध आहेत. मोसूलच्या नावावरून ‘मुसोलिना’ हे नाव तलम-सुती वस्त्राला रूढ झाले आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात मोसूलच्या परिसरातील खनिज तेलाचे साठे शोधण्यात आले आणि औद्योगिक क्षेत्रात त्याचे महत्त्व झपाट्याने वाढले. या शहरात सिमेंट, अस्फाल्ट, विटा, पादत्राणे आणि कापडनिर्मिती, इ. उद्योग चालतात. यांशिवाय कातडी कमाविणे, साखर व तेलशुद्धीकरणाचे मोठे कारखानेही शहरात आहेत.
आधुनिक शहराची वस्ती बहुधा प्राचीन ॲसिरियन बालेकिल्याच्या जागेवरच झाली असावी. येथील लोकसंख्येत अरबांचे प्रमाण जास्त असून काही प्रमाणात कुर्द व तुर्क लोकही आढळतात. मुसलमानांनी ते पादाक्रांत करण्यापूर्वी (इ.स. ६४१) तेथे ख्रिस्ती धर्मीयांची वस्ती होती. अब्बासी खिलाफतीच्या काळात (७५४–१२५८) त्याचे व्यापारी महत्त्व वाढले. कारण भूमध्य समुद्र ते इराण-भारत यांच्या लमाण मार्गावरील ते महत्त्वाचे केंद्र होते. दहाव्या शतकात अब्बासी खिलाफतीची अवनती झाल्यानंतर मेसोपोटेमियातील वेगवेगळ्या राज्यकर्त्यांनी मोसूलवर अल्पकाळ सत्ता गाजविली. मंगोलांच्या हुलागूखानने ते तेराव्या शतकात उद्ध्वस्त केले. ऑटोमन साम्राज्याच्या काळात (१५३४–१९१८) त्याची सर्व क्षेत्रात प्रगती झाली. पहिल्या महायुद्धात ते ब्रिटिशांच्या ताब्यात गेले व महादेशानुसार काही वर्षे त्यांच्या ताब्यात राहिले (१९१८–२६). नंतर राष्ट्रसंघाच्या आदेशानुसार ते तुर्कस्तानचा दावा नामंजूर होऊन इराकच्या राजसत्तेकडे आले.
शहरातील जुन्या इमारतींपैकी बाराव्या शतकातील मशीद प्रेक्षणीय आहे. मोसूल विद्यापीठ तसेच नेस्टोरियन ख्रिस्ती पंथ यांचे हे केंद्र आहे.
देशपांडे, सु. र.