मोसंबे : (मुसुंबी, मोसंबी हिं. बं. गु. मुसंबी, नारंगी, कमला नीम्बू इं. स्वीट ऑरेंज, मोझँबीक ऑरेंज लॅ. सिट्रस सायनेन्सिस कुल-रूटेसी). मोसंबे हा नारिंगाच्या अनेक प्रकारांपैकी एक गोड प्रकार (स्वीट ऑरेंज) असून तो मुख्यत्वेकरून महाराष्ट्रात लागवडीत आहे. हे फळ पश्चिमेकडील देशांतून भारतात आले असावे असे मानतात.
वनस्पती वर्णन : स्वीट ऑरेंज अथवा सिट्स सायनेन्सिस या जातीचा सदापर्णी वृक्ष सु. ९·५ मी. उंच, पसरट फांद्यांचा, बारीक व बोथट काट्यांचा अथवा बिनकाटेरी असतो. पानाचा देठ अरुंद व लहान पंखयुक्त असून फुले व फार सुगंधी असतात. फळ मृदुफळ, गोलाकार असून शेंड्याकडील भाग गोल असतो. पिकल्यावर फळाचा रंग सर्वाधारणपणे पिवळसर नारिंगी असतो. साल काहीशी जाड परंतु गराला घट्ट चिकटलेली असते. गर घट्ट व प्रकाराप्रमाणे पिवळा, नारिंगी अथवा लालसर रंगाचा असून बहुतांशी गोड अथवा काहिसा आंबट असतो. गरात १०–१२ फोडी असतात.
या जातीचे ‘मोसंबे’ या महाराष्ट्रात लागवडीस असलेल्या महत्त्वाच्या प्रकारची फळे लहान अथवा मध्यम आकारमानाची व आकाराने गोलाकार अथवा लांबट असतात. त्याचा पृष्ठभाग गुळगुळीत असून त्यावर उभ्या बाजूने काहीशा खोलगट रेषा असतात. शेंड्याकडील सालीचा भाग गोल चकतीप्रमाणे (पावली छाप) असतो व ही या प्रकारची विशिष्ट खूण आहे. या बाह्य लक्षणामुळे गोड नारिंगाचा हा प्रकार इतर प्रकारांपासून सहजपणे ओळखता येतो.
अहमदनगर, सातारा, जळगाव आणि सोलापूर या जिल्ह्यातील दुष्काळी भागात या विशिष्ट प्रकारची लागवड केंद्रित झाली आहे. फळाची साल पातळ व पिवळसर रंगाची असून गर जरदाळूच्या रंगाचा असतो. फळात १८ ते २० बिया असतात. गोड नारिंगाच्या इतर प्रकारांपेक्षा या प्रकारात रस कमी असतो व त्याला स्वादही बेताचाच असतो परंतु रसात इतर प्रकारांपेक्षा अम्लता फार कमी (सु. ०·३३ टक्के) असते व त्यामुळे आजाऱ्याला देण्यासाठी हा प्रकार फार उपयुक्त असतो, हे त्याचे खास वैशिष्ट्य आहे. या कारणामुळे बाजारात या फळाला पुष्कळ मागणी असते.
हवामान व जमीन : मोसंबे हा सिट्रस प्रजातीतील सर्वांत काटक वृक्ष आहे. बेतांचे वार्षिक पर्जन्यमान, कोरडी हवा आणि सरासरी तापमान १३°–३६° से. असलेल्या प्रदेशात मोसंब्यांची लागवड विशेष यशस्वी होते. हवा जेवढी कोरडी असेल त्या प्रमाणात फळांची गोडी जास्त असते. जमीन चांगल्या निचऱ्याची असणे फार महत्त्वाचे आहे. मातीचे pH मूल्य ६ ते ८ असावे [→ पीएच मूल्य]. हलक्या प्रजातीच्या मुरमावरील एक मी. खोल काळी जमीन मोसंब्यांच्या लागवडीसाठी नमुनेदार समजली जाते. जमिनीतील पाण्याची पातळी २ मी. पेक्षा वर नसावी.
अभिवृद्धी : मोसंब्याची अभिवृद्धी सर्वसाधारणपणे जंबुरीच्या रोपावर मोसंब्याचे डोळे भरून केली जाते. महाराष्ट्रात जंबुरीचा खुंट म्हणून सर्वत्र वापर करण्यात येत असला, तरी भारी काळ्या जमिनीत त्याची मुळे चांगल्या रीतीने वाढत नाहीत, असे आढळून आले आहे. रंगपूर लाइम ही वनस्पती महाराष्ट्रात खुंट म्हणून मोसंब्याचे डोळे भरण्यासाठी पुष्कळ बाबतीत आशादायक असल्याचे आढळून आले आहे. फळांची प्रत चांगली असते आणि उत्पन्नही जास्त येते. शिवाय या खुंटावरील मोसंब्याची झाडे व्हायरस रोगांचा काही प्रमाणात प्रतिकार करू शकतात. हलक्या प्रकारच्या जमिनीत जंबुरीचा खुंटा डोळे भरण्यासाठी चांगला असल्याचे आढळून आले आहे. अलीकडील संशोधनावरून असे दिसून आले आहे की, रंगपूर लाइमखेरीज रफ लेमन, सॉमिंगडाँग, मार्मालेड ऑरेंज अगर नसनारन या खुंटावर केलेली कलमे दीर्घायुषी, उत्पादनक्षम व व्हायरसजन्य रोगांना प्रतिकारक असतात. नसनारन खुंटावर केलेली कलमे फक्त हलक्या जमिनीत लागवड करावयाची असल्यास लावतात.
खुटासाठी रोपे तयार करताना झाडावरच पक्व झालेल्या फळांतून बी काढल्यावर ते सावलीत वाळवून गादी वाफ्यात १० सेंमी X २·५ सेंमी. अंतरावर पेरतात (उन्हात बी वाळविल्यास काही तासांतच त्याची उगवणशक्ती नष्ट होते.) बी उगवून आल्यावर रोपांचे स्थलांतर करून फक्त जोमाने वाढणारी रोपे नवीन वाफ्यात प्रत्येक वेळी जास्त अंतरावर लावतात. शेवटी रोपवाटिकेमध्ये दोन रोपांतील अंतर १ मी. X ०·३ मी. ठेवतात. खुंटावर फुटून आलेल्या सर्व डिऱ्या वेळोवेळी काढून एकेरी खोड ६० ते ७० सेंमी. उंचीपर्यंत वाढू देतात. रोपे साधारण पेन्सिलीच्या आकाराची झाल्यावर (सु. एक वर्षाची असताना) त्यावर ‘टी पद्धतीने’ जमिनीपासून कमीत कमी २२ सेंमी. उंचीवर डोळे भरतात [→ कलमे]. डोळा फुटून वाढू लागल्यावर खुंटाच्या शेंड्याकडील भाग डोळ्याच्या वर प्रथम १५ सेंमी. उंचीवर आणि मागाहून काही दिवसांनी ५ सेंमी. उंचीवर छाटतात.
कलमे कायम जागी लावणे : कलमे (पन्हेरी) सु. ०·६६ सेंमी. उंच वाढल्यावर (सु. ६ ते ८ महिन्यांची झाल्यावर) कायम जागी १ मी. X १ मी. X १ मी. आकारमानाच्या खड्ड्यात लावतात. त्यापूर्वी बगलेतून निघालेल्या सर्व फांद्या छाटून टाकतात. कलमे लावण्यासाठी फार पाऊस, कडक उन्हाळा अथवा कडक थंडी सोडून इतर महिने पसंत करतात. कलमे लावताना डोळे भरलेली जागा जमिनीपासून १५ ते २२ सेंमी वर राहील याची काळजी घेणे आवश्यक असते. तसे न केल्यास डोळा भरलेल्या जागी मातीचा संपर्क होऊन रोगाची सुरुवात होण्याचा संभव असतो. कलमे लावण्यापूर्वी प्रत्येक खड्ड्यात २५ किग्रॅ. शेणखत, २·५ किग्रॅ. राख आणि १ किग्रॅ. हाडांचे चूर्ण घालतात. जमिनीत फॉस्परस व पोटॅश यांची उणीव नसल्यास हाडाचे चूर्ण घालण्याची जरूरी नाही. दोन झाडांत सर्वसाधारणपणे ६·५–८ मी. अंतर ठेवतात.
कलमे लावल्यावर एक महिना त्यांच्यावर सावली राहील अशी तजवीज करणे आवश्यक असते. सूर्यकिरणांपासून खोडाला अपाय होऊ नये म्हणून झाड ७ ते ८ वर्षांचे होईपर्यंत त्याला दरवर्षी चुन्याची सफेती किंवा घट्ट बोर्डो मिश्रण फासतात. खोडाभोवती गोणपाटाची पट्टी अगर अन्य प्रकारचा माल २ ते ३ वर्षांपर्यंत गुंडाळण्याचाही प्रघात आहे.
बागेची निगा : वर्षभर झाडाच्या बुंध्याभोवतालच्या आळ्यामधील तण काढून ते स्वच्छ ठेवतात. पोट पिके घ्यावयाची झाल्यास ती भाजीपाल्याची पिके, लसूण घास, बरसीम व ताग यांसारखी थोड्या मुदतीची पिके घेतात. ताग, उडीद अगर चवळी यांसारखी द्विदल धान्ये पेरून त्यांचे हिरवळीचे खत करून गाडल्यामुळे तणांचा नाश होतो व जमिनीला सेंद्रिय खताचा पुरवठा होतो.
झाडे चार वर्षांची होईपर्यंत त्यांना आलेली सर्व फुले काढून टाकतात. झाडाची वाढ चांगली असल्यास पाचव्या वर्ष त्याच्यावर पहिले जुजबी पीक येऊ दिले जाते.
जमिनीपासून ४५ सेंमी. उंचीपर्यंत झाडावर फुटलेला कोणताही बाजूचा कोंब वाढू देत नाहीत. झाड लहान असताना शेंडा छाटून बगलेतून ४–६ मुख्य फांद्या खोडाच्या सभोवर सारख्या विभागून पसरतील अशा तऱ्हेने वाढू देतात. अशा रीतीने झाडाचा सांगाडा तयार झाला म्हणजे जोमाने वाढणारे पाण-सोट छाटून टाकणे एवढेच छाटणीचे काम करावे लागते. तसेच वाळलेल्या फांद्याही छाटणे आवश्यक असते.
खत : मोसंब्याला खते देण्याच्या अलिकडील शिफारशीप्रमाणे कलमे लावल्यावर पहिल्या वर्षी खते देण्याची जरूरी नसते. दुसऱ्या वर्षी दर झाडाला ४·५ किग्रॅ. शेणखत आणि ०·४५ किग्रॅ. अमोनियम सल्फेट देतात. पुढे दर वर्षी ४·५ किग्रॅ. शेणखत आणि ०·४५ किग्रॅ. अमोनियम सल्फेट या प्रमाणात वाढवीत झाडे १० वर्षांची झाल्यावर त्यांना प्रत्येकी ४५ किग्रॅ. शेणखत व ४·५ किग्रॅ. अमोनियम सल्फेट मिळू लागेल. याशिवाय हिरवळीच्या खताचा अथवा कंपोस्ट खताचा भरपूर वापर करण्याचीही शिफारस करण्यात येते.
सूक्ष्म पोषकद्रव्यांचा अभाव दूर करण्यासाठी ०·९ किग्रॅ. झिंक सल्फेट, ०·९ किग्रॅ. मँगनीज सल्फेट व ०·४५ किग्रॅ. उमलवलेला चुना ही सर्व २,००० लि. पाण्यात मिसळून बहाराचा कालावधी संपल्यानंतरचे पहिले पाणी दिल्यावर लगेच हे मिश्रण झाडावर फवारण्याची शिफारस करण्यात येते.
पाणी देणे : मोसंब्याच्या झाडांना नियमितपणे योग्य प्रमाणात पाणीपुरवठा करणे आवश्यक असते. उन्हाळ्यात दर ८–१० दिवसांनी आणि हिवाळ्यात जमिनीच्या मगदुराप्रमाणे १२–२० दिवसांनी पाणी देतात. पाणी देताना ते झाडाच्या खोडाला लागू नये यासाठी झाडाच्या बुंध्यालगत वर आलेली मुळे झाकली जातील अशा बेताने माती घालून उंचवटा करतात किंवा खोडाभोवताली ५०–६० सेंमी. अंतरावर बांगडी पद्धतीने मातीचा वरंबा घालतात. यामुळे ज्यांचा मातीतून प्रसार होतो असे रोग उद्भवण्याची शक्यता कमी होते. लहान वयाच्या झाडांना आळे पद्धतीने आणि जास्त वयाच्या झाडांना मोकार पद्धतीने पाणी देतात. जसजसे झाड वाढते तसतसे आळ्याचे आकारमान वाढवितात व झाडाचा विस्तार सु. ३ मी. व्यासाचा झाल्यावर खोडाभोवताली ६० सेंमी. पर्यंत आळे बांधून बाकीच्या जागेत मोकार पद्धतीने पाणी देतात.
तणांच्या नियंत्रणासाठी आणि जमिनीतील ओल टिकवून धरण्यासाठी पुढील उपायांनी झाडाभोवतालची जमीन झाकून घेतात : (१) वाळलेले गवत पसरणे, (२) ताग पेरणे, (३) पॉलिथिनाची काळी चादर जमिनीवर अंथरणे.
बहार धरणे : मोसंब्याच्या झाडांना चवथ्या वर्षापासून फळे धरू लागतात. झाडांची शारीरिक वाढ थांबल्यावाचून आणि घुमाऱ्यात व कोंबांत अन्नपदार्थांचा संचय झाल्याशिवाय फुले येणे व फळे धरणे या क्रिया घडून येत नाहीत. ज्या प्रदेशात तापमान १३° से. इतके राहते तेथे मोसंब्यासारख्या सिट्रस प्रजातीतील फळझाडांची केवळ शारिरिक वाढ होते आणि फुले व फळे येत नाहीत अथवा आल्यास थोडीशीच येतात. उत्तर भारतात हिवाळ्यातील तापमान वर उल्लेख केलेल्या तापमानापेक्षा फार खाली उतरत असल्यामुळे झाडांची शारीरिक वाढ आपोआप थांबते आणि त्यांच्या धुमाऱ्यात आणि कोंबात प्राकृतिक अन्नद्रव्यांचा संचय होतो. त्यानंतर तापमान वाढू लागले म्हणजे झाडांना पुष्कळ प्रमाणात फुले येऊन फळे धरतात. झाडांची शारिरिक वाढ थांबविण्याचे अशा प्रकारचे नैसर्गिक साधन महाराष्ट्रातील तापमानाच्या परिस्थितीत उपलब्ध नाही. कारण हिवाळ्यातील तापमान उत्तर भारताइतके खाली उतरत नाही. यासाठी कृत्रिम उपायांचा अवलंब करून झाडांच्या धुमाऱ्यात आणि अंकुरांत अन्नद्रव्यांचा संचय करणे आवश्यक असते. सिट्रस प्रजातीतील फळझाडांच्या बाबतीत झाडाच्या वाढीचे फेब्रुवारी-मार्च, जून-जूलै आणि सप्टेंबर-ऑक्टोबर असे तीन हंगाम असतात. या हंगामांत झाडांना पालवी फुटते व थोडी फुले व फळे येतात. झाडांना नैसर्गिकरित्या वाढू दिले, तर त्यामुळे वर्षासाकाठी थोडीशीच निकृष्ट दर्जाची फळे धरतील. फळांचे जास्तीत जास्त उत्पादन यावे यासाठी वरील वाढीच्या हंगामापूर्वी झाडाची वाढ थांबवून झाडांच्या धुमाऱ्यात आणि अंकुरात अन्नसंचय व्हावा यासाठी विशेष पद्धतीचा अवलंब करतात. मागील हंगामातील फळे काढल्यानंतर झाडांची वाढ थांबविल्यास अन्नसंचय होतो, तो झाल्यावर झाडाची शारीरिक वाढ पुन्हा सुरू होऊ दिल्यास फुले मोठ्या संख्येने येऊन फळे धरतात. अशा प्रकारच्या विशेष पद्धतीला ‘बहार धरणे’ असे नाव आहे. फेब्रुवारी-मार्च या काळात फुले धारण करावयाला लावण्याच्या उपाययोजनेला ‘आंबेबहार’ असे नाव आहे कारण या दिवसात आंब्यालाही फुले येतात. जून-जुलै या काळात फुले येण्यासाठी केलेल्या उपाययोजनेला ‘मृगबहार’ म्हणतात व सप्टेंबर-ऑक्टोबर या काळात फुले येण्यासाठी केलेल्या उपाययोजनेला ‘हत्तीबहार’ म्हणतात (हस्त नक्षत्रावरून हे नाव प्रचारात आले आहे). या तीन बहारांपैकी सतत कोणतातरी एकच बहार धरण्यात येतो कारण बहार बदलण्याचा प्रयत्न केल्यास एक किंवा दोन पिके गमावण्याची शक्यता असते. पाणीपुरवठ्याची (विषेशतः उन्हाळ्याच्या दिवसांत) सोय, बाजारपेठेत फळाच्या मागणी-पुरवठ्याची निरनिराळ्या हंगामातील परिस्थिती आणि कीटक उपद्रव कोणत्या हंगामात जास्त असतो या गोष्टी विचारात घेऊन कोणता बहार घ्यावयाचा ते ठरवावे लागते. मोसंब्याला फुले आल्यापासून कमीत कमी आठ आणि बहुतांशी नऊ महिन्यानंतर फळे तोडण्यालायक होतात, ही बाब लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
बहार धरण्यासाठी बहाराच्या प्रकाराप्रमाणे झाडांना ज्या वेळी फुले यावी असे वाटेल त्याच्या आधी जमिनीच्या मगदुराप्रमाणे एक ते दीड महिना झाडाचे पाणी तोडतात. पहिले पाणी जरा कमी करून नंतर पाणी देणे संपूर्णपणे बंद करतात.
आंबेबहार धरण्यासाठी झाडाचे पाणी नोव्हेंबर महिन्यात दर पाळीला कमी करीत महिन्याअखेर पाणी देणे संपूर्णपणे बंद करतात. डिसेंबरच्या मध्याला झाडामधील जमीन नांगरून कुळवतात व खत घालतात. पाण्याचे पाट आणि ओळी तयार करून जानेवारीच्या मध्याला पहिले पाणी थोड्या प्रमाणात देतात. त्यानंतर आठ दिवसांनी मध्यम स्वरूपाचे पाणी देतात आणि त्यानंतरच्या पाण्याच्या पाळ्या व पाण्याचे प्रमाण नेहमीप्रमाणे असते. फेब्रुवारीच्या मध्याला फुलांचा बहार येऊ लागतो आणि तो मार्चच्या मध्यापर्यंत चालू राहतो. फळे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये तयार होतात व ती काढण्याचे काम डिसेंबरपर्यंत चालू राहते. मृगबहारासाठी करावयाच्या उपचाराची सुरुवात एप्रिल महिन्यात होते व तयार झालेली फळे फेब्रुवारी ते एप्रिल या काळात काढतात. हत्तीबहारासाठी उपचार ऑगस्ट महिन्यात सुरू करतात. ज्या भागात पावसाचे प्रमाण फार कमी असते परंतु कालव्याचे पाणी उपलब्ध असते अशा भागातच हा बहार घेणे शक्य होते. या बहाराची फळे ज्या वेळी बाजारात येतात त्या वेळी इतर फळे कमी असल्यामुळे त्यांना भाव चांगला येतो. विहिरीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या बागांतून आंबेबहार न धरता मृगबहार धरतात कारण उन्हाळ्यात विहिरिंना पाणी टिकेलच अशी खात्री नसते. भारी प्रकारच्या जमिनीत केवळ पाणी तोडल्यामुळे झाडाची शारीरिक वाढ थांबत नाही असे आढळून आल्यास २–३ वर्षांतून एकदा जरूरीप्रमाणे मुळांचा जारवा छाटण्याची शिफारस करण्यात येते. पूर्वी झाडांच्या विश्रांतीच्या काळात मुळांची सरसकट जोराची छाटणी करण्यात येत असे ती पद्धत योग्य नाही असे संशोधनान्ती आढळून आले आहे.
अहमदनगर, पुणे, नासिक, सातारा व सोलापूर या जिल्ह्यांत कालव्याच्या पाण्याखाली असलेल्या मोसंब्याच्या बागांतून आंबेबहार धरतात कारण तेथे उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासत नाही.
हॉर्मोनांचा वापर : फळांचे उत्पन्न वाढविण्यासाठी व ती टिकून राहावीत यासाठी हॉर्मोनांचा (विशिष्ट शारीरिक क्रियेवर प्रभाव पाडणाऱ्या कार्बनी संयुगांचा) वापर करणे फायद्याचे ठरते. बहारसंपल्यानंतर पहिले पाणी देण्याच्या वेळी २, ४, ५–टी हे हॉर्मोन दर दशलक्ष भाग पाण्यात १५ (१५ पीपीएम.) या प्रमाणात मिसळून झाडावर फवारतात. फलधारणेनंतर १५ ते २० दिवसांनी प्लॅनोफिक्स अथवा एनएए हे हॉर्मोन १० पीपीएम या प्रमाणात फवारतात. पहिल्या फवाऱ्यामुळे फुले जास्त संख्येने येतात व दुसऱ्या फवाऱ्यामुळे फळांची गळ कमी होते.
फळांची तोडणी : मोसंब्याच्या झाडाला सर्वसाधारणपणे चौथ्या वर्षापासून फलधारणा सुरू होते. फुले आल्यापासून ८ ते १० महिन्यांनंतर (बहुतांशी ९ महिन्यांनंतर) फळे काढण्यास सुरुवात होते. फळे झाडावरून उतरविते वेळी त्यांत सु. ८% शर्करा असावी. फळे पक्व झाली, तरी ती झाडावरच २ ते ३ महिने ठेवता येतात. सर्वसाधारणपणे फळांचा रंग बदलावयास सुरुवात झाली म्हणजे ती झाडावरून उतरवितात. झाडावरून उतरविल्यानंतर पुढे त्यांत पिकण्याची क्रिया होत नाही. तसेच फळ काढावयास तयार झाले की नाही ते केवळ त्याच्या रंगावरून ठरविता येत नाही. पुणे भागात तयार फळाचा रंग फिकट पिवळा असतो परंतु बाजारात भाव मिळविण्यासाठी साल हिरवी असतानाच फळे झाडावरून उतरवितात. काढलेली फळे १०° ते १३° तापमानात २ महिने ठेवल्यास त्यांचा रंग एकसारखा व गर्द नारिंगी बनतो. रसाच्या गुणधर्मात त्यामुळे बदल होत नाही. एथिलीन वायूचा वापर करूनही फळाचा हिरवा रंग पिवळसर बनविता येतो. फळाच्या गुणधर्मांत काहीच बदल होत नाही.
फुले धरल्यापासून झाडाररच बारा महिन्यापर्यंत राहिलेल्या फळांना ‘जुन्या बहाराची फळे’ असे म्हणण्याचा प्रघात आहे.
उत्पन्न : झाडांची योग्य प्रकारे निगा ठेवल्यास चौथ्या वर्षी फलधारणा सुरू होते व सातव्या ते आठव्या वर्षांत प्रत्येक झाडापासून सु. ७०० फळे मिळतात. झाडावरून काढल्यानंतर घरातील तापमानात फळे सु. एक आठवडा चांगली राहतात परंतु १५ दिवसांनंतर ती विकण्याच्या दृष्टीने आकर्षक राहत नाहीत. शीतगृहात ती ५° ते ७·५० से. तापमान व ८५ ते ९०% सापेक्ष आर्द्रतेत ४ महिन्यांपर्यंत चांगली राहतात.
महाराष्ट्रात मोसंब्याच्या झाडांचे आयुष्य सर्वसाधारणपणे ३० वर्षांपेक्षा जास्त नसते.
रोग व किडी : रोग : (अ) सल : (डायबॅक). हा मोसंब्याच्या झाडाचा फार नुकसानकारक रोग आहे. फळांचा पहिला अगर दुसरा बहार येऊन गेल्यावर बहुधा या रोगाची लक्षणे आढळून येतात. झाडाच्या फांद्या शेंड्याकडून मागे वाळत जातात क्रमाक्रमाने सर्वच फांद्यांवर हा रोग दिसून येतो व शेवटी संपूर्ण झाड वाळते. रोगट स्थितीत झाडे बराच काळपर्यंत टिकून राहतात. जसजशी रोगाची प्रगती जाईल त्यामानाने फळांचे उत्पन्न कमी होत जाते व फळेही बारीक आकारमानाची असतात. हा रोग म्हणजे अनेक कारणे एकाचवेळी कार्य करीत असल्याचे बाह्य लक्षण असते. रोगाच्या मुळाशी पुढील कारणे असू शकतात : (१) जमिनीतून पाण्याच्या निचरा योग्य तऱ्हेने न होणे, (२) वाढीच्या महत्त्वाच्या काळात पाण्याची कमतरता, (३) पोषकद्रव्यांचा अभाव अथवा असमतोलपणा, (४) कवकीय (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतींमुळे होणारे) व व्हायरसजन्य रोग, (५) किडी व सूत्रकृमी आणि (६) फळबागेची अयोग्य निगा. व्हायरस हे या रोगाचे प्रमुख कारण मानले जाते. यात निरनिराळे प्रकार असून ट्रिस्टेझा नावाचा व्हायरस रोग सर्वांत नुकसानकारक आहे. झाड दुबळे होऊन वाढीचा जोम कमी होतो व फळे बारीक आकारमानाची असतात. कितीही खते घातली, तरी झाडे सुधारत नाहीत. रोगप्रतिकारक खुटावर डोळे भरून कलमे करणे हाच एक उपाय आहे व या दिशेने पुष्कळ संशोधन झाले आहे. सोरॉसिस नावाच्या व्हायरस रोगात झाडाच्या सालीचे पापुद्रे निघून येतात व त्याखालील थरामध्ये डिंकासारख्या पदार्थाचे अस्तित्व आढळून येते. फूटून आलेली पाने लहान व पिवळी असतात व त्यांची संख्याही अगदी थोडी असते. १० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व रोगाची वरील लक्षणे दिसून येत नसलेल्या झाडांचेच डोळे कलमे करण्यासाठी वापरण्याची खबरदारी घेणे आवश्यक असते.
पुढील उपायांमुळे सल रोगाचे प्रमाण कमी राहण्यास निश्चितपणे मदत होते, असे सांगण्यात येते. जमिनीवरील पाण्याचा योग्य निचरा होईल अशी तजवीज करणे, तणे काढणे, पाण्याअभावी झाडांना फाजील ताण बसणार नाही याची खबरदारी घेणे, नांगरट करतेवेळी मुळांना इजा न पोहोचेल अशा तऱ्हेने नांगरट करणे, भरपूर प्रमाणात शेणखत अथवा हिरवळीचे खत अथवा कंपोस्ट खत देणे आणि प्रत्येक झाडाला दरवर्षी कमीत कमी १ किग्रॅ. नायट्रोजन देणे.
(आ) डिंक्या रोग : फायटॉफ्थोरा प्रजातीतील कवकामुळे होणारा हा रोग मोसंबीच्या झाडांना फार नुकसानकारक आहे. झाडाच्या तळाच्या भागातील खोडाची साल कुजते व त्यातून अंबर रंगाचा डिंकासारखा चिकट पदार्थ बाहेर पडतो. कवचाचे वास्तव्य जमिनीत असते व डोळा खुंटावर बसविलेल्या जागेतून आणि जमिनीलगत असलेल्या खोडाच्या सालीतून रोगाचे संक्रमण होते. पुरेशी ओल आणि २७° से. तापमान असल्यास रोगाची वाढ झपाट्याने होते. जंबुरीच्या खुंटावर डोळे भरून केलेली कलमे हलक्या जमिनीत लावल्यास हा रोग होत नाही परंतु भारी जमिनीत लावलेल्या कलमावर हा रोग जास्त प्रमाणात आढळतो. रोगनियंत्रणासाठी डोळा भरतेवेळी तो जमिनीपासून कमीत कमी २२·५ सेंमी. उंचीवर भरतात. झाडाला पाणी देतेवेळी ते प्रत्यक्ष खोडाला लागणार नाही याची खबरदारी घेतात. रोग दिसून आल्यास रोगट जागेवरील व त्याच्या आसपासची कुजलेली साल तासून काढतात व उघड्या भागावर २५–३०% क्रिओसोट तेल अथवा ०·१% मर्क्युरिक क्लोराइड अथवा कार्बॉलिक अम्लाचा ५०% विद्राव लावतात.
(इ) मूळकूज : कवकांमुळे होणाऱ्या या रोगात झाडाची मुळे कुजतात व तंतुमय बनतात. साल काळपट तपकिरी रंगाची होते व तंतुमय स्थितीत उकलून येते. जमिनीच्या खालच्या थरातील माती घट्ट असते अशा बागांतून हा रोग विशेष प्रमाणात आढळून येतो. कवकांची वाढ न होऊ देण्यासाठी जमिनीतील पाण्याचा निचरा सुधारणे हा एकच उपाय आहे.
किडी : (१) पाने खाणारे सुरवंट : जंबीर फुलपाखरु (लेमन बटरफ्लाय) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या फुलपाखराचे सुरवंट रोपवाटिकेतील रोपांची कोवळी पाने खातात. पावसाळ्याच्या हंगामात विशेष नुकसान करतात. उपाय म्हणून सुरवंट हाताने पकडून नष्ट करतात व ५०% डीडीटी अथवा एंड्रीन पाण्यात मिसळून रोपांवर फवारतात (१० लि. पाण्यात १० मिली. एंड्रीन).
(२) फळांतील रस शोषणारा पतंग : ओथ्रीस प्रजातीतील किडीचा पतंग रात्रीच्या वेळी तयार फळातील रस शोषून घेतो. त्यामुळे त्याने फळात केलेल्या छिद्रातून सूक्ष्मजंतूंचा प्रवेश होऊन फळे कुजतात व २ ते ३ दिवसांत झाडावरून गळून पडतात. पावसाळी हंगामात ही कीड विशेष नुकसानकारक असते. फळांवर पिशव्या बांधणे व पावसाळ्यात झाडावर रसदार फळे असणार नाहीत अशा तऱ्हेने बहारधरणे हे उपाय आहेत.
(३) खोड पोखरणारे मुंगेरे व साल खाणारी अळी : भुंगेऱ्याचे डिंभ (अळ्या) खोड पोखरतात. साल खाणाऱ्या अळ्या खोडात वास्तव्य करतात व रात्रीच्या वेळी बाहेर येऊन साल खातात. उपायम्हणून भोकात तार घालून कीड बाहेर काढतात अथवा रॉकेल अगर पेट्रोल भोकात घालून भोक बाहेरून मातीने लिंपतात.
(४) माइट : या फळातील रस शोषणाऱ्या किडीमुळे फळाची साल चिवट व कातड्यासारखी बनते आणि तीवर तपकिरी रंग चढतो. गंधकाची पूड पिस्करून या किडीचे नियंत्रण करतात.
(५) पांढरी पिसू : या किडीची अर्भके व पूर्ण वाढ झालेल्या किडी पानांतील अन्नरस शोषून घेतात व त्यामुळे फलधारणा कमी होते. किडीच्या शरीरातून बाहेर पडणारा स्त्राव पानांवर पडून त्यावर काजळी नावाने ओळखल्या जाणाऱ्या कवचाची वाढ होते. परिणामी पानांची प्रकाशसंश्लेषणाची (सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने पाणी आणि कार्बन-डायऑक्साइड यांपासून अन्न तयार करण्याची) क्रिया मंदावते आणि पाने व फांद्या वाळतात.
(६) सिट्स सायला : झाडाच्या कोवळ्या फांद्या, पाने आणि फुलांतील रस शोषून घेणारी ही कीड आहे. किडीचा स्त्राव पानांवर पडून त्यावर काजळी वाढते. महाराष्ट्रात या किडीमुळे १९६०–६१ मध्ये बरेच नुकसान झाले. एंड्रीन, डिमेक्रॉन, अथवा मेटासिस्टॉक्स पाण्यात मिसळून दर आठवड्याला फवारतात.
(७) पानाची त्वचा पोखरणारी अळी : (लीफ मायनर). कोवळ्या पानाची त्वचा किडीने पोखरल्यामुळे पानांवर वेडीवाकडी चकचकीत बिळे तयार झालेली दिसतात. पोखरलेली पाने वेडीवाकडी होतात व शेपटी वाळून खाली पडतात. किडीचा उपद्रव कमी प्रमाणावर असल्यास कीड लागलेली पाने हाताने गोळा करून जाळतात. मोठ्या प्रमाणावरील किडीच्या नियंत्रणासाठी ५०% कार्बारील अथवा मेटासिस्टॉक्स पाण्यात मिसळून फवारतात.
फळाचे संघटन व उपयोग : मोसंब्याच्या रसात ग्लुकोज, फ्रुक्टोज व सुक्रोज या शर्करा, निरनिराळया प्रकारची कार्बनी अम्ले (मुख्यत्वेकरून सायट्रिक अम्ल), ब आणि क जीवनसत्वे, खनिजे आणि इतर पोषक द्रव्ये असतात. सर्वसाधारणपणे फळात ३० ते ४६% रस असतो आणि रसात ७·७% शर्करा व ०·३%अम्लता असते. या फळाचा मुख्य उपयोग ते ताजे असताना खाण्यासाठी करतात. रस त्वरित उत्साहवर्धक असून आजारी व अशक्त व्यक्ती, लहान मुले व वृद्ध यांसाठी फार उपयोगी आहे. फळांच्या सालीतून तेल काढून त्यांचा उपयोग सुगंधी पदार्थात अथवा अन्नपदार्थांना स्वाद आणण्यासाठी करतात. फळांचे काप करून वाळवून केलेली पूड विविध प्रकारच्या मिठायांत वापरतात. फुलांपासून नेरोली ऑइल नावाचे बाष्पनशील (बाष्परूपाने उडून जाणारे) तेल आणि कोंबांपासून पेटिटग्रेन ऑइल काढतात व त्यांचा उपयोग अर्क, अत्तरे यांसाठी करतात. मोसंबे रक्त शुद्ध करते, तापात तहान भागवते, श्लेष्मविकार बरा करते व भूक वाढविते. साल वातहारक आहे. फळाची ताजी साल चेहऱ्यावरील मुरुमासाठी चोळतात.
गोड नारिंगाचे इतर काही प्रकार : ‘नारिंग’ या फळाच्या ज्या गोड नारिंग (स्वीट ऑरेंज) या वर्गात मोसंब्यांचा समावेश केला जातो, त्याच वर्गातील आणखी काही प्रसिद्ध प्रकार भारतात लागवडीत आहेत. त्यांची थोडक्यात माहिती येथे दिली आहे.
माल्टा ब्लड रेट : हा मुळचा भूमध्य समुद्राभोवतालच्या प्रदेशातील प्रकार पंजाब व राजस्थानात लागवडीत आहे. झाड ठेंगणे असून संपूर्ण पिकलेल्या फळातील गर रक्तासारखा लाल असून गोड, आंबट व स्वादिष्ट असतो. फळात रसाचे प्रमाण भरपूर असते परंतु त्यात मोसंब्यापेक्षा अम्लतेचे प्रमाण सु. तीन पट असते.
पाइन-ॲपल : हा मूळचा अमेरिकेतील चांगल्या प्रतीचा प्रकार पंजाबात मोठ्या प्रमाणावर लागवडीत आहे. फळ गोलाकार असून साल पातळ व गुळगुळीत असते. रस भरपूर प्रमाणात व स्वादिष्ट असतो.
माल्टा-कॉमन : या परदेशी प्रकारची पंजाब व उ. प्रदेशाच्या पश्चिम भागात व्यापारी प्रमाणावर लागवड होते.
साथगुडी अथवा चिनी : हा प्रकार आंध्र प्रदेशाच्या कडप्पा, चित्तूर व कर्नुल या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर लागवडीत आहे. फळ लांबट गोलाकार व मध्यम आकारमानाचे असते साल मध्यम जाड गुळगुळीत व गराला चिकटलेली असते. फळाचा रंग पिवळसर असून गर रसाळ असतो परंतु त्याला स्वाद बेताचाच असतो. बटाव्हिअन हा साथगुडीसारखाच प्रकार त्या राज्याच्या ईशान्य भागात लागवडीत आहे.
वरील प्रकारांखेरीज वॉशिंग्टन नॅव्हल, जाफा, व्हॅलेंशिया लेट आणि हॅम्लीन या परदेशी प्रकारांची भारतात आयात झाली असून ते काही प्रमाणावर लागवडीत आहेत. वॉशिंग्टन नॅव्हल हा मोठ्या आकारमानाच्या फळांचा, बिनबियांचा, उत्कृष्ट स्वादाचा व फळात भरपूर रस असलेला प्रकार अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यात फार मोठ्या प्रमाणावर लागवडीत आहे (भारतातील हवामानात तो फारसा यशस्वी ठरलेला नाही). या प्रकाराच्या फळात शेंड्याकडील भागावर बेंबीसारखा भाग पुढे आलेला असतो व त्यात आणखी एक छोटेस उप-फळ असते. जाफा हा बिनबियांचा व मधुर रसाचा प्रकार इझ्राएलमध्ये आणि शामुटी हा जगप्रसिद्ध बिनबियांचा प्रकार पॅलेस्टाइन भागात मोठ्या प्रमाणावर लागवडीत आहेत. व्हॅलेंशिया लेट हा उशीरा फले धरणारा प्रकार पंजाबात यशस्वी ठरला आहे.
गोड नारिंगाची लागवड सर्वांत मोठ्या प्रमाणावर अमेरिकेच्या फ्लॉरिडा व कॅलिफोर्निया या राज्यात होते व त्याखालोखाल ती स्पेन, इटली, ब्राझील, मेक्सिको, इझ्राएल, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका व भारत या देशांत होते.
संदर्भ : 1. Cheema, G. S Bhat, S. A. Naik, K. C. Commercial Fruits of India, Bombay. 1954.
2. Hages, W. B. Fruit Growing in India, Allahabad, 1960.
3. Sham Singh Krishnamurti, S. Katyal, S. L. Fruit Culture in India, New Delhi 1963.
4. Singh, R. Fruit, New Delhi, 1969.
५. नागपाल, र.ला. अनु. पाटील, ह. चिं. फळझाडांच्या लागवडीची तत्त्वे आणि पद्धती आणि फळे टिकवून ठेवण्याची तत्त्वे आणि पद्धती, पुणे, १९६३.
६. परांजपे, ह.पु. फळझाडांचा बाग, पुणे १९५०.
गुप्ता, पु. कि. गोखले, वा. पु.
“