मोर्गान्ये, जोव्हान्नी बात्तीस्ता: (२५ फेब्रुवारी १६८२–५ डिसेंबर १७७१). इटालियान शारीरविज्ञ आणि विकृतिवैज्ञानिक. मोर्गान्ये यांचा जन्म जन्म फोर्ली (इटली) येथे झाला. वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी बोलोन्या विद्यापीठात प्रवेश केला. तेथे मार्चेल्लो मालपीगी या सुप्रसिद्ध शारीरशास्त्राच्या प्राध्यापकांचे शिष्य आंतॉन्यो व्हालसाल्व्हा यांच्या प्रभावामुळे त्यांचे लक्ष विकृतीविज्ञानाकडे ओढले गेले. १७०१ मध्ये त्यांनी त्या विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान व वैद्यक या विषयांच्या पदव्या मिळविल्या. व्हालसाल्व्हा शारीरशास्त्र शिकवीत असताना मोर्गान्ये त्यांच्या वर्गाकरिता प्रत्यक्ष दाखविण्यासाठी लागणारे मृत शरीर भाग तयार करून देत. १७०४ मध्ये व्हालसाल्व्हा यांच्या ‘कानाचे शारीर व विकार’ या संबंधीच्या ग्रंथाच्या तयारीकरिता मोर्गान्ये यांनी बहुमोल सहाय्य केले. व्हालसाल्व्ह यांची बदली झाल्यानंतर बोलोन्या येथेच मोर्गान्ये शरीरशास्त्राचे प्राध्यापक झाले.
इ. स. १७०६ मध्ये ते ॲकॅडेमिया इक्वाएटोरियम या वैज्ञानिक संस्थेचे अध्यक्ष झाले. त्याच वर्षी त्यांचा Adversaria anatomica Prima हा पहिला ग्रंथ प्रसिद्ध झाला. आणि त्यामुळे त्यांना शारीरविज्ञ म्हणून आंतरराष्ट्रीय किर्ती मिळाली. १७०७–०९ या काळात त्यांनी व्हेनिस येथे वास्तव्य केले आणि तेथे रसायनसास्त्राचा अभ्यास व जी.डी. सांतोरीनी यांच्या समवेत अनेक शवविच्छेदने केली. १९०९ मध्ये ते फोर्ली येथे परतले व तेथे त्यांनी वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. १७११ च्या सुमारास ते पॅड्युआ विद्यापीठात सैद्धांतिक वैद्यकाचे अध्यापक झाले व १७१५ पासून शारीरशास्त्राच्या प्रमुख अध्यासनावर त्यांची नेमणूक झाली. पॅड्युआ येथे असताना १७१७ मध्ये Adversaria anatomica altera et tertia हा त्यांचा दुसरा ग्रंथ प्रसिद्ध झाला. त्यांच्या या ग्रंथानंतर एक तंतोतंत वर्णन करणारे शारीरविज्ञ म्हणून त्यांना प्रसिद्धी मिळाली. वयाच्या ऐंशीव्या वर्षी त्यांचा De Sedibus et causis morborum per antatomen indagatis हा महान ग्रंथ १७६१ मध्ये प्रसिद्ध झाला. अनेक वेळा पुनर्मुद्रित झालेल्या (इंग्रजी भाषांतर १७६९) या ग्रंथात ६४० शवविच्छेदनानंतरच्या शवपरीक्षेची माहिती दिली आहे. त्यात प्रत्येक मृताच्या रोगाची लक्षणे, रोग-इतिहास वगैरे माहितीही दिली आहे. शवपरीक्षा करणाऱ्या प्रत्येक वैद्याला रोगांचा गाढा अनुभव आणि प्राकृतिक (सर्वसाधारण) शरीररचनेचे सखोल ज्ञान असलेच पाहिजे, असा त्यांचा सिद्धांत होता. वैद्यकातील निदान, फलानुमान (रोगाच्या संभाव्य फलनिष्पत्तीसंबंधीचे पूर्वानुमान) व उपचार शरीररचनेच्या सखोल ज्ञानावर अवलंबून असतात, असे त्यांचे ठाम मत होते.
शरीरातील काही भाग व काही विकृती आजही त्यांच्या नावाने ओळखल्या जातात. उदा., गुदद्वाराच्या श्लेष्मकलास्तराच्या (बुळबुळीत पातळ थराच्या) उभ्या घड्यांना ‘मोर्गान्ये स्तंभ’ आणि ⇨ मोतीबिंदूच्या एका प्रकाराला ‘मोर्गान्ये मोतीबिंदू’ म्हणतात. ते पॅडयुआ येथे मृत्यू पावले.
भालेराव, य. त्र्यं.