मोरवेल : (इं. व्हर्जिन्स बॉवर लॅ. क्लेमॅटिस गौरियाना कुल-रॅनन्क्युलेसी). फुलझाडांपैकी [→ वनस्पति, आवृतबीज उपविभाग]. ही जाडजूड आणि मोठी वेल [→ महालता] श्रीलंका, जावा, फिलिपीन्स आणि भारतात (प. हिमालय, पंजाब टेकड्या, सह्याद्री घाट, कोकण इ.) आढळते. मोरवेलीच्या क्लेमॅटिस या प्रजातीमध्ये एकूण सु. २५० जाती असून त्यांपैकी २५ भारतात व महाराष्ट्रात ५–६ जाती आढळतात.
मोरवेलीचे खोड पिंगट असून त्यावर उभ्या खोल रेषा असतात. कोवळ्या भागांवर लव असते. पाने एकदा, दोनदा किंवा तीनदा विभागून पिसासारखी व संयुक्त बनतात दले आयात-अंडाकृती, २·५–१२·५ X १·१–३·८ सेमी. असून त्यांची किनार अखंड किंवा दातेरी असते देठ लाब तणाव्याप्रमाणे आधाराभोवती गुंडाळून कठीण बनतो व वेल चढण्यास मदत होते दलातील शिरा आणि उपशिरा यांचे जाळे उठून दिसते. या वेलीला ऑक्टोबर ते नोव्हेंबरात अनेक शाखायुक्त फुलोरे [परिमंजऱ्या→ पुष्पबंध] येतात व त्यांवर १·२५ सेमी. व्यासाची, लहान, पिवळट किंवा हिरवट पांढरी फुले येतात. फुलास पाकळ्या नसतात पाकळ्यांखालची पुष्पदले ४ असून ती आतून आणि बाहेरून लवदार असतात. केसरदले अनेक व सुटी किंजदले (स्त्री-केसर) अनेक, सुटी व केसाळ असतात [→ फूल]. अनेक लहान स्वतंत्र कृत्स्न फळांचे (एक बीजी शुष्क फळांचे) घोसफळ बनते [→फळ] फळे तपकिरी, अंडाकृती, केसाळ असून प्रत्येकावर कायम राहिलेल्या किंजलाची केसाळ व नाजूक शेपटी असते आणि फळात एकच बीज असते. या वनस्पतीची इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ रॅमन्क्युलेसीत (मोरवेल कुलात) वर्णन केल्याप्रमाणे असतात.
क्लेमॅटिस प्रजातीतील क्ले. ट्रायलोबा (रानजाई) आणि क्ले. स्मायलॅसिफोलिया (मोरवेल) या महाराष्ट्रात आढळणाऱ्या, तसेच क्ले. पॅनिंक्युलॅटा, क्ले. मोंटॅना आल्बा व क्ले. जॅकमॅनी या जातीही महत्त्वाच्या आहेत.
संदर्भ : C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials , Vol. II, New Delhi, 1950. Pal , B.P. Beautiful Climbers of India, New Delhi, 1960.
वैद्य, प्र. भ. परांडेकर, शं. आ.
“