मोनॅझाइट : खनिज. स्फटिक एकनताक्ष सामान्यतः चापट, लहान क्वचित मोठे. स्फटिकांची पृष्ठे खडबडीत व रेषांकित आणि पुष्कळदा अंतर्वेशी, जुळे स्फटीक फुलीसारखे दिसतात [→ स्फटिकविज्ञान] सामान्यपणे याचे लहान, गोलसर कण आढळतात ⇨ पाटन (100) बरेच स्पष्ट, (001) पृष्ठाला समांतर विभाजनतले असतात. भंजन शंखाभ ते खडबडीत. कठीनता ५–५·५. वि. गु. ४·८–५·४ (थोरियमाच्या प्रमाणानुसार वाढते) चमक रेझिनासारखी किवा मेणासाखी, कधीकधी काचेसारखी व हिऱ्यासारखी. रंग मधासारखा पिवळसर ते तांबूस तपकिरी, कधीकधी हिरवा. कस पाढरा. काहीसे दुधी काचेप्रमाणे पारभासी [→ खनिजविज्ञान]. थोडेसे समचुंबकीय [ज्याची सापेक्ष चुबकीय प्रवणता तापमान वाढविले असता कमी होते असे द्रव्य → चुंबकत्व]. रा.सं (Ce, La, Y , Th) PO4 यात सुमारे १५ विरल मृतिका मूलद्रव्यांची ऑक्साइडे, अल्प सिलिका, लोह, कॅल्शियम व अत्यल्प युरेनियम ऑक्साइडे असतात. यातील थोरिया म्हणजे थोरीयम ऑक्साइडाचे (ThO2) प्रमाण १४ टक्यांपर्यंत असते.
मोनॅझाइट विरळाच आढळणारे असून ते ग्रॅनाइट ॲप्लाइट, पेग्मटाइट, पट्टीताश्म व कधीकधी सायेनाइट यांमध्ये गौण खनिज म्हणून आढळते या खडकांवरील वातावरणक्रियेने बनलेल्या डबरी वाळूत व प्लेसरात हे मुख्यत्वे आढळते. जड व रासायनिक विक्रियेला विरोध करणारे असल्यामुळे मोनॅझाइट जागच्या जागी टिकून राहून वाळूत एकत्रित होत रहाते. मोनॅझाइट, झिर्कॉन, रूटाइल, इल्मेनाइट झेनोटाइम, कोलंबाइट, ॲपेटाइट इ. जड आणि टिकाऊ खनिजांबरोबर हे आढळते. पेग्मटाइटाच्या भित्तीत ह्याचे मोठे स्फटिक आढळतात, तर क्कचित हे वालुकाश्मांत व डोलोमाइटी संगमरवरातही आढळते.
ब्राझील, भारत व ऑस्ट्रेलिया येथील सागरी वा नदीच्या किनाऱ्यावरील वाळूमध्ये तर द. आफ्रिकेच्या केप परगण्यात भित्तीसारख्या राशीमध्ये हे आढळते .यांशिवाय कॅनडा, रशिया, नार्वे, मादागास्कर, श्रीलंका, अमेरीका, इंडोनेशिया व मालावी प्रजासत्ताक या प्रदेशांत, तसेच नायजेरीया व मलेशिया येथील कथिलाच्या जलोढीय निक्षेपांतही (गाळ्याच्या रूपातील साठ्यांतही) मोनॅझाइट सापडते.
भारताच्या कोरोमंडल व मलबार किनाऱ्यांवरील वाळूत आढळणाऱ्या मोनॅझाइट ७–१०% थोरिया व ०·३% पर्यत युरेनियम ऑक्साइड, तर त्रावणकोर किनाऱ्यांवरील मोनॅझाइटात १४% पर्यत थोरिया आढळते. केरळ, तमिळनाडु, आंध्र प्रदेश, व ओरिसा याच्या समुद्रकिनाऱ्यांवर मुख्यतः मोनॅझाइट वाळू आढळते. बिहारमधील रांची पठारात याचे यांचे प्लेसर आढळतात. भारतामधील मोनॅझाइटाचा एकूण साठा ५० लाख टनांहून जास्त आहे.
थोरिया, थोरियम सीरियमासारखी विरल मृत्तिका मूलद्रव्ये आणि त्यांची संयुगे मोनॅझाइटापासून मिळतात. अणुऊर्जानिर्मितीसाठी थोरियम हा अतिशय महत्त्वाचा पदार्थ म्हणून पुढे येत आहे. थोरिया अजूनही वायुजाळीत वापरले जाते. विरल मृत्तिकांचा मॅग्नेशियमाच्या बरोबरच्या विविध मिश्रधातूंत, तसेच त्यांची संयुगे औषधांत व काच उद्योगात वापरली जातात.
विरळाच आढळत असल्याने ‘एकाकी असणे’ या अर्थाच्या ग्रीक शब्दांवरून ब्रीथाउप्ट यांनी त्याला ‘मोनॅझाइट’ हे नाव दिले (१८२९).
पहा : थोरियम विरल मृत्तिका.
ठाकूर, अ. ना.