मोटारबोट : मालवाहू म्हणून सामान्यतः वापरण्यात येणाऱ्या जहाजापेक्षा लहान व प्रचालनासाठी ⇨ अंतर्ज्वलन-एंजिनाचा [व काही वेळा झोत (जेट) एंजिनाचा] उपयोग करणाऱ्या जलवाहनास मोटारबोट म्हणतात. अशा बोटी नद्या, सरोवरे, खाड्या व समुद्रकिनाऱ्याजवळील वाहतुकीसाठी अथवा मच्छिमारीसाठी वापरतात. बंदरात अशा बोटी इंधन व गोडे पाणी नेण्यासाठी, आग विझविण्याचे एंजिन नेण्यासाठी आणि पोलिस व इतर अधिकाऱ्यांच्या उपयोगासाठी, विशेषतः गस्त घालण्यासाठी, वापरतात. आरमारामध्ये अशा बोटी लहान तोफा ठेवण्यासाठी, पाणबुडीवर हल्ला करण्यासाठी व बुडणाऱ्या लोकांना वाचविण्यासाठी वापरतात. मनोरंजन पर्यटनासाठी मोटारबोटींचा वापर फार मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.
इतिहास व विकास : वाफेवर चालणाऱ्या लाँचच्या विकासावर एंजिनाच्या वजनाची मर्यादा पडू लागल्यावर १८८० नंतरच्या काळात इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी व अमेरिकेतील अनेक नौका बांधणाऱ्यांनी अंतर्ज्वलन-एंजिन वापरण्यासंबंधी प्रयोग केले. लंडन येथील जे. जे. आर्. ह्यूम यांनी १८८५ मध्ये पेट्रोलवर चालणारी लाँच तयार केली. गोटलीप डाइमलर यांनी अभिकल्पित केलेल्या (आराखडा तयार केलेल्या) एंजिनाचा उपयोग करणारी बोट १८८७ मध्ये तयार करण्यात आली. १९०२ मध्ये एस्. एफ्. एज या इंग्रज गृहस्थांनी ६६ अश्वशक्तीच्या एंजिनाच्या साहाय्याने ताशी ३५ किमी. वेग गाठला.
विसाव्या शतकाचा प्रारंभ व पहिले महायुद्ध यांच्या दरम्यान अनेक प्रकारच्या बोटींच्या काया प्रचारात आल्या. बोटीच्या अग्रगामी गतीने तिची काया हवेत काहीशी वर उचलता आली, तर पाण्याचा रोध कमी होतो असे आढळून आले. यातूनच जलविमानाचा विकास झाला. या बोटीच्या कायेचा आकार, शक्ती व वजन यांतील परस्पर संबंध अशा प्रकारे अभिकल्पित केलेला असतो की, बोटीला विशिष्ट वेग प्राप्त होताच तिची नाळ वर उचलली जाते. या बोटीच्या नाळेच्या खालच्या कोपऱ्यावर चांगली गोलाई देतात व मागचा अर्धा भाग चौकोनी छेदाचा व थोडासा उथळच करतात. पुढचा अर्धा भाग सामान्य नौकेसारखाच पण मागच्या भागापेक्षा एका पायरीने अधिक खोलगट करतात. कायेच्या अशा रचनेमुळे पाण्याचा रोध कमी होऊन पूर्वीच्याच शक्तीने बोट जास्त वेगाने जाऊ शकते. [ ⟶ जलपर्णी नौका].
फ्रान्समध्ये १९०२ साली बोटीच्या मागच्या बाजूस कायेला बाहेरून जोडलेल्या ओट्यावर लहानसे एंजिन बसवून त्याचा लांब व तिरपा चालक दंड पाण्यातील प्रचालकाला (पंख्याला) सरळ जोडण्याची पद्धत सुरू झाली. १९०४ मध्ये लंडनच्या टेंपल प्रेसतर्फे मोटारबोट हे नियतकालिक सुरू झाले. या नियतकालिकांमुळे मोटारबोटींच्या बांधणीत सुधारणा होण्यास पुष्कळच मदत झाली. १९०५ मध्ये न्यूयॉर्क येथे मोटारबोटींचे प्रदर्शन भरविण्यात आले व त्यामुळे बहुतेक सर्व देशांत मोटारबोटींच्या वापरास चालना मिळाली. १९०९ मध्ये ओले एव्हिनरूड यांनी बोटीच्या मागे एंजिन व प्रचालक चौकटीच्या द्वारे जोडण्याची पद्धत सुरू केली. या पद्धतीने सर्व यंत्रणा चांगली आटोपशीर व सुवाह्य करता आली आणि ती फार लोकप्रिय ठरली.
शर्यतीच्या मोटारबोटींसाठी प्रथमतः पेट्रोल एंजिने व मागाहून झोत एंजिने वापरण्यात आली.
पहिल्या महायुद्धात सर जॉन थॉर्निक्रॉफ्ट या इंग्रज अभिकल्पकांनी मोटार टोर्पेडो (पाणतीर) बोटींसाठी एका पायरीच्या कायेचा शोध लावला. या कायेमुळे V अथवा Λ या आकाराच्या कायेपेक्षा अधिक वेगवान बोटी तयार करणे शक्य झाले. पुढे मोटार टॉर्पेडो बोट तांत्रिक दृष्ट्या अंतर्ज्वलन-एंजिनावर चालणारी सर्वांत प्रगत मोटारबोट ठरली. दुसऱ्या महायुद्धात प्रमुख नाविक राष्ट्रांनी मोटार टॉर्पेडो बोटी, गस्त बोटी, मोटार गनबोटी आणि अनेक प्रकारच्या मोटार लाँच व प्राणरक्षक नौका यांचे ताफे ठेवले होते. महायुद्धानंतर बांधण्यात आलेल्या मोटार टॉर्पेडो बोटींपैकी बहूतेक १८ मी. ते ३० मी. लांबीच्या, ३,००० ते १०,००० अश्वशक्तीच्या आणि ताशी ५५ ते ७५ किमी. किंवा त्याहून जास्त वेगाने जाणाऱ्या आहेत व या सर्वांत शक्तिमान मोटारबोटी ठरल्या आहेत.
विसाव्या शतकाच्या प्रारंभी मनोरंजक पर्यटनासाठी मोटारबोटी वापरणे श्रीमंत लोकांनाच शक्य होत असे परंतु पुढील काळात वाजवी किंमतींना मिळणाऱ्या उत्तम प्रकारच्या बोटी सुटसुटीत, सुरळीत कार्य करणाऱ्या सुवाह्य एंजिनांची उपलब्धता वॉटर स्कीइंग, स्किन डायव्हिंग [ → पोहणे], मत्स्यपारध इ. क्रीडांसाठी असणारी मोटारबोटींची गरज हमरस्त्यांवरील मोटारगाड्यांची वाढती गर्दी मनोरंजनासाठी उपलब्ध होणारे वाढते जलक्षेत्र वगैरे अनेक कारणांनी अमेरिकेसारख्या देशात मोटारबोटींचा प्रसार प्रचंड प्रमाणात झाला. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत १९७० मध्ये ५९ लक्ष मोटारबोटी मनोरंजक पर्यटनासाठी वापरात होत्या. भारतात मच्छीमारी व आरमारी उपयोगांखेरीज मोटारबोटींचा अद्याप फारसा प्रसार झालेला नाही.
प्रकार : एंजिनाची जागा व प्रकार यांनुसार मोटारबोटींचे दोन सामान्य वर्ग करण्यात येतात. पहिल्या वर्गातील बोटीतील एंजिन डीझेल व पेट्रोलवर चालणारे असते. हे एंजिन बोटीच्या कायेत कायमचे बसविलेले असून मागील बाजूस बसविलेल्या प्रचालकाला कायेतून जाणाऱ्या चालन-दंडाने जोडलेले असते. दुसऱ्या वर्गातील मोटारबोट चालविण्यासाठी सामान्यतः बोटीच्या मागील बाजूस एक अगर अधिक एंजिने सांधपट्ट्यांनी व बोल्टांनी जोडलेली असतात किंवा कायेतच खोलगट जागेत बसविलेली असतात. ही एंजिने सुवाह्य असून सहज जोडता वा अलग करता येतात आणि ती प्रचालक व चालन–दंड यांसह चौकटीत बसविलेल्या पूर्ण संचाच्या स्वरूपात असतात. उथळ पाण्यात प्रचालकाऐवजी वल्ह्यांचे चक्र, विमानाकरिता वापरण्यात येणारा पंखा वा जलझोत पंप वापरतात. मोटारबोटीचा वेग वाढविण्यासाठी विमानाची जेट एंजिने व विशिष्ट वेगानंतर पुढील भाग पाण्याच्या वर उचलली जाणारी आणि त्यामुळे पाण्याचा रोध कमी होणारी काया वापरतात.
मोटारबोटींची एंजिने २ अश्वशक्तीपासून १०० अश्वशक्ती किंवा त्यापेक्षाही जास्त शक्तीची असतात. कायेच्या आत बसवावयाचे एंजिन पेट्रोलचे असेल, तर ते मोटारगाडीवर वापरात असलेल्या V प्रकारचे असते आणि ते डीझेल तेलावर चालणारे असेल, तर डेल्टा प्रकारचे असते. हे एंजिन वजनाने हलके व चांगले कार्यक्षम असते. या एंजिनाला वेग-बदल पेटी जोडतात व तिच्या मदतीने बोट उलट दिशेनेही चालविता येते. कायेत बसवावयाचे एंजिन थंड ठेवण्यासाठी पाण्याची शीतन पद्धत वापरतात. त्यासाठी समुद्राचे पाणी वापरले, तर एंजिन लवकर गंजते व निरुपयोगी होते म्हणून आता गोड्या पाण्याची बंदिस्त शीतन पद्धत वापरतात. कायेच्या मागील टोकास बाहेरून जोडण्यात येणारे एंजिन थंड ठेवण्यासाठी हवेचाच उपयोग करतात. पेट्रोल एंजिनातील इंधन प्रज्वलित करण्यासाठी पूर्वी चिरचुंबकीय जनित्र (मॅग्नेटो) वापरीत असत. हे जनित्र ओलसर जागेत चांगले काम करीत नाही म्हणून पुष्कळ ठिकाणी विद्युत् घटमालेचा प्रवाह वापरतात आणि त्याचा दाब वाढविण्यासाठी ⇨ प्रवर्तन वेटोळे बसवितात. १९६६ पासून या कामासाठी इलेक्ट्रॉनीय पद्धतीचा वापर होऊ लागला आहे व त्यामुळे एंजिनाची कार्यक्षमता वाढली आहे.
मोटारबोटीचे किमान आकारमान ठरलेले नाही तसेच महत्तम आकारमान व अभिकल्पही निर्देशित करण्यात आलेले नाहीत. काही तज्ञांनी २० मी. पेक्षा कमी लांबीच्या, राहण्याची माफक सोय असलेल्या व सवेतन कर्मचाऱ्यांची आवश्यकता लागत नाही अशा बोटीला मोटारबोट आणि त्यापेक्षा मोठ्या बोटीला यॉट म्हणावे असे सुचविले आहे. झोपण्याची खोली, स्वयंपाकगृह व नळकाम यांची सोय असलेल्या मोटारबोटीला ‘क्रूझर’ ही संज्ञा बऱ्याचदा वापरली जाते.
अलीकडील सुधारणा : अलीकडच्या काळात मोटारबोटींच्या रचनेत व त्याकरिता वापरण्यात येणाऱ्या सामग्रीत आणि प्रचालन यंत्रणेत पुष्कळ बदल झाले आहेत. मोटारबोटींच्या कायेकरिता पूर्वी ओक, मॅहॉगनी व साग यांचे लाकूड आणि पोलाद वापरीत. त्याऐवजी आता प्लायवुड, ॲल्युमिनियम व प्रबलित काचतंतू यांचा उपयोग करण्यात येत आहे. १९५० नंतर कायेच्या बाहेर जोडावयाच्या एंजिनात आवाज कमी करणाऱ्या सुधारित यंत्रणा, विद्युत् चलित्र दंतचक्र (गिअर) बदल करण्याची यंत्रणा, विद्युत् आरंभक (स्टार्टर) व जनित्र, एंजिन जोडण्यासाठी अधिक बळकट व साध्या चौकटी वगैरे सुधारणा करण्यात आल्या. १९६० च्या सुमारास कायेच्या आत बसवावयाच्या व बाहेरून जोडावयाच्या एंजिनांच्या संकरित प्रकाराचा विकास करण्यात आला. या नव्या अभिकल्पात नेहमीचे आत बसवावयाचे एंजिन कायेत बसविलेले असून प्रचालक व चालन-दंड बोटीच्या मागील बाजूस हवे तसे वळविता येतील असे जोडलेले असतात. या अभिकल्पामुळे बोटीची कलण्याची क्षमता व जोडावयाच्या एंजिनाचा दिशिक रेटा आणि आत बसवावयाच्या चार-धावी नाविक एंजिनाचे अधिक स्थैर्य व आर्थिक बचत यांचा समन्वय साधण्यात आला आहे. यांखेरीज अधिक चांगले दिशानियंत्रण व पाण्याच्या खालील बोटीच्या भागांचे पाण्यात बुडालेल्या तळावरील वस्तूंपासून अधिक संरक्षण हे फायदेही आहेत. १९८१ मध्ये आऊटबोर्ड मरिन कॉर्पोरेशन या कंपनीने कायेच्या संपूर्णतः बाहेरून बसावयाचे ‘सी ड्राइव्ह’ या नावाचे एंजिन प्रचारात आणले. या अभिकल्पात कायेत जास्त जागा उपलब्ध होण्याबरोबरच वजन कमी करण्याचे उद्दिष्ट चांगले साधण्यात आले आहे.
मोटारबोटींच्या शर्यती : या स्पर्धात्मक क्रीडा प्रकाराची वाढ एकोणीसाव्या शतकात शोध लागलेल्या अंतर्ज्वलन-एंजिनाच्या विकासाबरोबर होत गेली. शर्यतीकरिता मोटारबोटींचा उपयोग करण्यासाठी प्रोत्साहन देण्याकरिता, त्यांच्या अभिकल्पात व रचनेत सुधारणा होण्याकरिता आणि शर्यतीचे नियम तयार करण्यासाठी अमेरिकन पॉवर बोट ॲसोसिएशनची १९०३ मध्ये स्थापना झाली. या संस्थेतर्फे हडसन नदीवर १९०४ मध्ये पहिली मोटारबोटींची शर्यत आयोजित करण्यात आली. या संघटनेने आयोजित केलेल्या शर्यती ‘गोल्ड कप रेस’ या नावाने प्रसिद्ध आहेत. या शर्यतीतून विकसित झालेल्या जलविमानाचा वेग १·६ किमी. सरळमार्गावर ताशी २५० किमी. पर्यंत पोचू शकतो. १९६५ मध्ये ९६ किमी. गोल्ड कप रेसमध्ये ताशी सरासरी १६८·१९ किमी. उच्चांक प्रस्थापित करण्यात आला.
ब्रिटनमध्ये अमेरिकेबरोबरच आंतरराष्ट्रीय मोटारबोट शर्यती १९०३ मध्ये सुरू झाल्या. त्याकरिता (सर आल्फ्रेड) हार्म्सवर्थ ट्रॉफी ठेवण्यात आली.
मोटारबोटींच्या आंतरराष्ट्रीय शर्यती युनियन ऑफ इंटरनॅशनल मोटारबोटींग या संस्थेतर्फे घेण्यात येतात. ही संस्था १९२२ मध्ये स्थापन झाली व तिचे मुख्यालय बेल्जियममध्ये असून ४१ देशांत तिच्याशी सलग्न असलेल्या संस्था आहेत. शर्यतीच्या एकूण मार्गावरील व सरळमार्गावरील उच्चांकांच्या नोंदीकरिता ही संस्था अधिकृत म्हणून मान्यता पावलेली आहे.
शर्यतींकरिता कायेत बसविलेल्या व कायेला बाहेरून जोडलेल्या एंजिनांनुसार व एंजिनाच्या दट्ट्याने विस्थिपित केलल्या घनफळानुसार मोटारबोटींचे वर्ग पाडण्यात आलेले आहेत. यातील अमर्यादित वर्गात एंजिनाच्या मर्यादेसंबंधी कोणतीही अट ठेवलेली नसून अशा बोटींचा उल्लेख शो-बोट्स असा करण्यात येतो. केनेथ पीटर वॉर्बी यांनी अमर्याद-वर्गातील जलविमानाच्या साहाय्याने ऑस्ट्रलियातील न्यू साऊथ वेल्समधील ब्लोअरिंग धरणाच्या जलाशयात पाण्यावरील वेगाचा उच्चांक ताशी ५५६ किमी. २० नोव्हेंबर १९७७ रोजी नोंदविला. अधिकृत उच्चांक ताशी ५१४·३८९ किमी. हा वॉर्बी यांच्याच नावाने वरील जलाशयातीलच असून तो ८ ऑक्टोबर १९७८ रोजी नोंदविला गेला.
संदर्भ : 1. Anderson, E. P. Audel’s Outboard Motor and Boating Guide, New York, 1962.
2. Bowman, H. W. The Encyclopedia of Outboard Motorboating, New York, 1955.
3. Miller, C. Small Boat Engines, Inboard and Outboard, New York, 1961.
4. Weeks, M., Ed., The Complete Boating Encyclopedia, New York, 1964.
ओक, वा. रा. भदे, व. ग.
“