प्राणरक्षकसाधने, सागरी: समुद्रात जहाजास अपघात झाल्यास किंवा समुद्रावरून जात असताना विमानास अपघात झाल्यास पाण्यात पडलेल्या माणसांच्या जीवाला धोका निर्माण होतो. त्यांचे प्राण वाचविणे, त्यांना सुरक्षित स्थळी हलविणे म्हणजे अवमोचन करणे अशी दोन कार्ये करण्यास उपयुक्त ठरणारी साधने प्रस्तुत नोंदीच्या विषयात येतात. किनाऱ्यानजीक किंवा किनाऱ्यापासून दूर अंतरावर अपघात झालेला असेल, तर त्याकरिता प्राणरक्षक नौका, प्राणरक्षक तराफा, प्राणरक्षक बोयरा, प्राणरक्षक जाकीट इ. साधने वापरतात. त्याशिवाय अपघात होण्याचे क्षेत्र इतके विस्तृत झाले आहे की, अपघात स्थळ निश्चित करण्याकरिता प्रथम त्याचा शोध करावा लागतो. त्याकरिता विमाने, हेलिकॉप्टर संकट-संदेश मिळालेली अपघात परिसरातील सर्व जहाजे यांचा उपयोग करतात. शोध कार्याच्या सुसूत्रीकरणाकरिता संघटनेची जरूरी असते.

 

प्राणरक्षक नौका : सागरी प्राणरक्षक साधनांमध्ये प्राणरक्षक नौका प्रथम प्रचारात आली. समुद्रावर संकटात सापडलेल्या लोकांना यशस्वीपणे मदत करावयाची असल्यास प्राणरक्षक नौका निमज्जनरोधी (न बुडणारी), न उलटणारी, वेगवान व जास्तीत जास्त लोक बसण्याची क्षमता असलेली असावयास पाहिजे. इ. स. १७६५ मध्ये फ्रान्समध्ये निमज्जनरोधी नौका तयार करण्यात आली होती परंतु प्रत्यक्षात तिचा प्राणरक्षक नौका म्हणून उपयोग केला गेला नाही. पुढे १७८५ मध्ये इंग्लंडमध्ये लायओनेल ल्यूकिन यांनी एका नौकेत हवाबंद टाक्या बसवून निमज्जनरोधी नौका तयार केली. ह्या नौकेचा प्राणरक्षक नौका म्हणून उपयोग केला गेला. १७८९ मध्ये इंग्लंडमधील टाईन नदीच्या मुखापाशी एक जहाज बुडून बरीच प्राणहानी झाली. ह्या दुर्घटनेमुळे प्राणरक्षक व्यवस्थेबद्दल लोकमत जागृत झाले व प्राणरक्षक नौकेचा अभिकल्प (आराखडा) करण्यासंबंधी एक स्पर्धा आयोजित केली गेली. ह्या स्पर्धेतून मिळालेल्या अभिकल्पानुसार १० मी. लांब व १० वल्ही असलेली प्राणरक्षक नौका १७९० मध्ये बांधून तयार झाली व ती पुढे ४० वर्षे किनाऱ्यावरील सेवेत कार्यक्षम होती.

 

इ. स. १८९० पर्यंत प्राणरक्षक नौका वल्ही व शिडे यांवर चालवत असत. परंतु ह्या वर्षी प्रथमच वाफेवर चालणारी प्राणरक्षक नौका प्रचारात आली. १९२५ सालापर्यंत वाफेच्या प्राणरक्षक नौका वापरात होत्या. १९०४ मध्ये पेट्रोल एंजिन बसवलेली नौका प्रचारात आली व पुढे डीझेल एंजिनावर चालणाऱ्या नौका प्राणरक्षक सेवेमध्ये वापरण्यात येऊ लागल्या. या नौकांचे एंजिन संपूर्ण पाण्यात बुडाले, तरी कार्यक्षम असते. तसेच त्यांची कार्यकक्षा ४५० किमी.पर्यंत वाढली आहे. आधुनिक प्राणरक्षक नौकेवर रेडिओ दूरध्वनी, रडार, प्रथमोपचाराची साधने, खाद्यपदार्थ, प्राणरक्षक कडी इ. साहित्य असते. मदत येईपर्यंत प्राणरक्षण करण्याच्या दृष्टीने ही नौका स्वयंपूर्ण असते.

 

किनाऱ्यावरील केंद्रातील प्राणरक्षक नौका उतरत्या मार्गावरून घसरवून पाण्यात सोडण्याची व्यवस्था असते. किनारा उंच असेल, तर ती डॅव्हिटवर (एक खांबी आरीवर) टांगून ठेवतात. म्हणजे आपत्काली ती चटकन पाण्यात सोडता येते. प्रत्येक प्रवासी जहाजावर कायद्याप्रमाणे प्राणरक्षक नौका असाव्या लागतात. त्यांची संख्या सर्व प्रवासी व खलाशी यांना पुरेशी असावी लागते. ह्या नौका जहाजावरील सर्वांत वरच्या गच्चीवर डॅव्हिटला टांगून ठेवलेल्या असतात. प्रत्येक नौका सर्व दृष्टींनी स्वयंपूर्ण असते. सर्वसाधारणपणे प्रवाशांत नौका वल्हविण्याची सवय असलेले लोक थोडेच असतात. म्हणून पूर्वी वल्ह्याच्या ऐवजी तरफेने नौका चालविण्याची यंत्रणा प्रचारात होती. प्राणरक्षक नौकेने फार लांब अंतर जाण्याची अपेक्षा नसते. फक्त सर्व नौका एकत्र राहून बाहेरील मदत येईपर्यंत तरंगत राहणे एवढीच अपेक्षा असते.

 

आ.१. प्राणरक्षक नौका : (१) प्रचालक (पंखा), (२) डीझेल एंजिन, (३) इंधन टक्या, (४) प्रवासी बसण्याची जागा, (५) नांगर, (६) रेडिओ दूरध्वनी, (७) आकाशक, (८) रडार, (९) प्राणरक्षक कडे.आ. १ मध्ये १३·२ मी. लांबीची पोलादी प्राणरक्षक नौका दाखविली आहे. तिचे प्रचालन (गती देण्याचे कार्य) १५० किवॉ.इतक्या कार्यशक्तीचे डीझेल एंजिन करते. सर्वांत वरची गच्ची जलरोधी असते. नौका या निरनिराळ्या कप्प्यांची बनविलेली असल्यामुळे नौकेस भोक पडल्यास ती बुडण्याची भीती नसते. या नौकेत ८५ प्रवाशांना बसण्याची सोय असते.

 

प्राणरक्षक नौकांत दिवसेंदिवस अधिक सुधारणा होत आहेत. पूर्वी लाकडाच्या नौकांत तरंगण्यासाठी हवाबंद पत्र्याच्या टाक्या बसविलेल्या असत. हवाबंद टाक्या फुटल्या, तर नौका तरंगू शकत नाही म्हणून त्यांच्याऐवजी आता प्लॅस्टिक फेसासारख्या हलक्या पदार्थांचा उपयोग करण्यात येऊ लागला आहे. लाकडाऐवजी आता पोलादी अगर ॲल्युमिनियमाच्या पत्र्याचा तसेच तंतुरूप काचेचा वापर करण्यात येत आहे. समुद्रातील खनिज तेलाची ने-आण वाढल्यामुळे जळते तेल पसरलेल्या पाण्यातून मार्गक्रमण करता यावे म्हणून संपूर्ण झाकलेल्या अग्निप्रतिबंधक पद्धतीच्या किंवा बाहेरून पाणी शिंपडण्याची सोय असलेल्या नौका बांधण्याचे प्रयोग यशस्वी झालेले आहेत. अशा प्रकारची प्राणरक्षक नौका एका डच कंपनीने तयार केलेली असून ही नौका तंतुरूप काचेची बनविलेली आहे. यात पॉलियूरेथान फेसाचा उष्णता-निरोधक म्हणून उपयोग केलेला आहे. सु. ८·५ मी. लांबीचा सांगाडा असलेल्या या नौकेत ५१ माणसे बसू शकतात व डीझेल एंजिनाच्या साहाय्याने ती सहा नॉटइतक्या वेगाने प्रवास करू शकते. सर्व दारे बंद करून ही नौका आतील तापमान धोकादायक परिस्थितीपेक्षा कमी राखून ज्वाला पसरलेल्या पाण्यातून जाऊ शकते. हिच्यातील हवेच्या टाक्या या परिस्थितीत १५ मिनिटे हवा पुरवू शकतात आणि या वेळात तेलवाहू जहाजातील वा समुद्रातील तेल विहिरीनजीकचे कर्मचारी ज्वालांपासून सुरक्षितपणे दूर जाऊ शकतात.


 प्राणरक्षक तराफा : हे तराफे दोन प्रकारचे असतात : (१) दृढ तराफे व (२) फुगवलेले तराफे.

 

दृढतराफे : हे लाकडाचे किंवा लोखंडी पत्र्याचे व जलरोधी रचनेचे असतात. अशा तराफ्यावर ऊन, पाऊस, वारा यांपासून संरक्षण करणारे व शोध घेणाऱ्या लोकांना सहज दिसू शकेल असे नारिंगी रंगाचे आच्छादन असते. तराफ्याच्या चोहो बाजूस धरण्याकरिता एक व तराफा ओढून नेण्यासाठी दुसरी अशा दोऱ्या बांधलेल्या असतात. एक तरंगणारा दिवा दोरीने तराफ्यास बांधलेला असतो. प्रथमोपचार साधने व खाद्यपदार्थांचा साठा तराफ्यात ठेवलेला असतो. जहाज बुडाल्यास हे वरच्या गच्चीवरील तराफे जहाजापासून दूर होऊन तरंगू लागतात. अशा तराफ्याचे सामानासह वजन २०० किग्रॅ. पेक्षा जास्त नसते.

 

आ.२. फुगविता येणारा तराफा : (१) सागरी नांगर, (२) दाबयुक्त वायूची बाटली, (३) संतुलन राखणारा पाण्याचा कप्पा, (४) उत्प्लावक टाक्या, (५) तराफा ओढून नेण्यासाठी दोरी, (६) जीवनावश्यक वस्तूंचा साठा व इतर सामग्री, (७) बाह्य पडदा, (८) बाह्य दीप, (९) तराफा उचलण्याची कडी, (१०) आच्छादन, (११) फुगवून तयार केलेला तळ, (१२) समुद्राच्या सान्निध्यात उत्तेजित होणारी विजेरी.फुगवलेलेतराफे : दृढ तराफे अवजड व जास्त जागा व्यापणारे असतात. त्यामुळे फुगविता येणारे व जहाजातून किंवा विमानातून पाण्यात टाकता येण्यासारखे तराफे प्रचारात आले आहेत. सहा ते पंचवीस माणसे बसू शकतील अशी गोल किंवा लंबगोल आकाराची तराफ्याची रचना असते. तराफ्यावरील आच्छादन नारिंगी रंगाचे असल्यामुळे शोध घेणाऱ्या विमानांना तो चटकन दिसू शकतो. दोरी ओढल्याबरोबर एका बाटलीतील दाबयुक्त वायू मुक्त होऊन तराफा फुगतो. जहाज एकदम बुडाल्यास पाण्याचा स्पर्श झाल्याबरोबर दाबयुक्त वायू मुक्त होईल अशी यंत्रणा असते. जीवनावश्यक वस्तूंचा साठा एका बंद पेटीत ठेवलेला असतो. आ. २ मध्ये फुगविता येणाऱ्या तराफ्याचे चित्र दाखविले आहे.

 

ॲल्युमिनियमाच्या मिश्रधातूच्या फुगविता येणाऱ्या नळीचा लंबगोल तराफा प्रचारात आहे. तो जहाजातून वा विमानातून पाण्यात टाकता येतो. पाण्यात पडल्याबरोबर तो फुगावयास सुरुवात होते. त्यावर एंजिन, रेडिओ दूरध्वनी, खाद्यपदार्थ, तापन यंत्रणा यांची सोय असून तो ता. ४५० किमी. इतके अंतर जाऊ शकतो. यात आठ माणसांची सोय असते.

 

आ.३. प्राणरक्षक बोयराप्राणरक्षक बोयरा : अपघात स्थळ किनाऱ्यापासून थोड्या अंतरावर असल्यास व वादळामुळे प्राणरक्षक नौकेच्या साहाय्याने जहाजाजवळ जाणे शक्य नसल्यास प्राणरक्षक बोयऱ्याचा उपयोग करतात. अशा वेळी उखळी तोफेच्या किंवा रॉकेटाच्या साहाय्याने किनाऱ्यावरून एक लहान आकारमानाचा दोर जहाजावर फेकला जातो. रॉकेटाने १०० मी. अंतरापर्यंत दोर फेकला जातो. त्यानंतर लहान दोराला बांधून मोठा दोर किनाऱ्यावरून जहाजावर ओढला जातो. ह्या मोठ्या दोराचे एक टोक किनाऱ्यावर व दुसरे टोक जहाजावरील उंच ठिकाणी पक्के बांधतात. त्यावरून आ. ३ मध्ये दाखविल्याप्रमाणे माणसांना ओढून किनाऱ्यावर आणले जाते. जखमी माणसांची ने-आण करण्याकरिता जलरोधी लंबगोल आकाराची गाडी वापरतात. १९४३ सालानंतर ह्या बोयऱ्याचा उपयोग केला गेलेला नाही. हेलिकॉप्टरमुळे प्राणरक्षक बोयरा कालबाह्य ठरला आहे.

 

प्राणरक्षक जाकीट : कॉर्क (हलके व सच्छिद्र लाकूड), सावरीचा कापूस, तंतुरूप काच, स्पंजासारखे सच्छिद्र प्लॅस्टिक इ. उत्प्लावक (पाण्यावर तरंगणारे) पदार्थ वापरून बिनबाह्याची व बंदांनी बांधण्याची प्राणरक्षक जाकीटे तयार करतात. उत्प्लावक पदार्थावर जाड आणि टिकाऊ कापड व जलरोधी कापड अशा दोन थरांचे आवरण असते. तसेच व्हिनिल प्लॅस्टिकाचा थर असल्यास इलेक्ट्रॉनीय प्रयुक्तीने बंद केलेला असतो. पुढच्या बाजूस उत्प्लावक पदार्थ जास्त ठेवतात. त्यामुळे वापरणाऱ्याचे तोंड पाण्यात बुडत नाही. प्राणरक्षक जाकीटे इ. स. १८०० च्या सुमारास प्रचारात आली. दुसऱ्या महायुद्धात फुगविता येण्यासारखे रबराचे प्राणरक्षक जाकीट प्रचारात आले. हे जाकीट एका लहानशा कुपीतील दाबयुक्त वायूच्या साहाय्याने फुगविण्याची व्यवस्था असते. काही जाकिटांना मोठी कॉलर असते व त्यामुळे डोके पाण्याच्या वर ठेवण्यास मदत होते. हवेचे कप्पे असलेले जाकीट वापरण्यास मनाई आहे. जाकिटाला नारिंगी रंग दिलेला असतो. त्यामुळे विमानातून शोध घेण्यास सोपे जाते.


 आ.४. प्राणरक्षक जाकीट

प्राणरक्षक कडे : प्राणरक्षक जाकिटाकरिता उपयोगात आणलेले पदार्थ वापरून सु. ७५ सेंमी. व्यासाचे कडे तयार करतात. त्यावर धरण्याकरिता दोरी बांधलेली असते. या कड्याबरोबर एक मीटर लांबीच्या दोरीने बांधलेली शिट्टी असावी लागते. कॉर्क किंवा बालसा लाकडाची कडी १९६० च्या नवीन नियमाप्रमाणे वापरण्यास मनाई केलेली आहे. कारण पाण्यात उडी मारताना अशा कड्यामुळे ते वापरणाऱ्याची हनुवटी किंवा मान मोडल्याचे दिसून आले आहे.

 

प्रत्येक अपघाताच्या वेळी कारणमीमांसा करताना प्राणरक्षक साधनात काय सुधारणा करता येईल याचा विचार केला जातो. सागरी सुरक्षिततेच्या दृष्टीने ओढवणारे संकट टाळणे, संकटावर मात करणे आणि संकट आटोक्याबाहेर गेल्यास प्राणरक्षण करणे असे तीन मुख्य भाग आहेत. पहिल्या दोन भागांत सुधारणा होत असल्याने प्राणरक्षक साधनांचा वापर करण्याची वेळ क्वचितच येते. तथापि प्राणरक्षण हे अतिशय मोलाचे कार्य असल्यामुळे प्राणरक्षक साधनांकडे दुर्लक्ष करणे अयोग्य ठरेल.

 

प्राणरक्षक सेवा : चीनमध्ये यांगत्सी व इतर मोठ्या नद्यांवर संघटित प्राणरक्षक सेवा पंधराव्या शतकात उपलब्ध असल्याची नोंद मिळते. प्राणरक्षक साधनांनी युक्त अशा तांबड्या रंगाच्या नौका नदीवर प्राणरक्षणाकरिता वापरीत असत. त्यांवरील खलाशांना अवमोचन कार्याचे प्रशिक्षण दिलेले असे. नेदर्लंड्समध्ये १७५७ मध्ये संघटित प्राणरक्षक सेवा उपलब्ध करण्याकरिता एक संस्था स्थापन केली होती. पुढे इंग्लंडमध्ये १७८५ साली ल्यूकिन यांनी निमज्जनरोधी नौका तयार केल्यावर बॅम्बर्ग या बंदरात संघटित प्राणरक्षक केंद्र स्थापन झाले. जॉन शार्प या इंग्लिश धर्मगुरूंच्या पुढाकाराने हे केंद्र वाढीस लागले.

 

ह्या केंद्रावरून किनाऱ्यालगत होणाऱ्या अपघातात सापडलेल्या लोकांना मदत करणे, टेहळणी करून धोक्याचा इशारा देणे, गस्त घालणे इ. कार्ये करण्यात येत असत. या केंद्रातील सेवक पूर्णपणे विनावेतन काम करून ही प्राणरक्षक सेवा चालवत असत. प्राणरक्षण व अवमोचन ही कार्ये झटपट व योग्य तऱ्हेने करता यावी म्हणून स्वयंसेवकांना प्रशिक्षण दिले जात असे. प्राणरक्षण केंद्रावर स्वयंसेवकांची नोंद केलेली असते. तसेच चोवीस तास गस्त घालण्याचे काम होत असल्यामुळे दुर्घटनेची खबर लगेच स्वयंसेवकांना कळविण्याची व्यवस्था असे. वल्ही किंवा शिडे यांनी चालणाऱ्या नौका चालविण्याकरिता अनुभवी लोक लागत असत. सुरुवातीच्या काळात कोळी समाजातील लोक हे कार्य करीत असल्यामुळे त्यांना पूर्वानुभव असे. यांत्रिक नौका प्रचारात आल्यावर फक्त तांडेल व साहाय्यक तांडेल हे दोनच लोक अनुभवी लागत. पहिल्या महायुद्धानंतर प्रत्येक यांत्रिक नौकेवर एक पगारी चालक नेमण्याची व्यवस्था करण्यात आली. बाकीचे लोक स्वयंसेवक असत. अशी प्राणरक्षक केंद्रे इंग्लंडमधील इतर बंदरांतही स्थापन झाली. या निरनिराळ्या केंद्रांचे सुसूत्रीकरण तसेच प्राणरक्षक साधनांचा विकास व इयत्तीकरण करणे, या उद्देशाने इंग्लंडमध्ये ‘नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर प्रिझर्वेशन ऑफ लाइफ फ्रॉम शिपरेक’ या नावाची संस्था स्थापन झाली व राष्ट्रीय पातळीवर प्राणरक्षक सेवा संघटित केली गेली. पुढे १८५४ मध्ये या संस्थेचे नाव ‘रॉयल नॅशनल लाइफबोट इन्स्टिट्यूशन’ असे केले गेले. या राष्ट्रीय पातळीवरील संस्थेचे कार्य बहुतांशी सेवाभावी लोकांच्या सहकार्याने चालते.

 

इंग्लंडप्रमाणे इतर दर्यावर्दी देशांतही अशा संस्था स्थापन झाल्या. अमेरिकेमध्ये प्रथमतः स्वयंसेवकांनी संघटित केलेली संस्था होती. पुढे १९१५ मध्ये ‘यू. एस. कोस्ट गार्ड’ या सरकारी संघटनेकडे प्राणरक्षण व अवमोचन कार्य दिले गेले. अमेरिकेच्या नौदलाचाच हा एक भाग आहे. विकसनशील देशांमध्ये सरकारी संघटनेतर्फे प्राणरक्षक सेवा दिली जाते. भारतात किनारा संरक्षण दलाकडे प्राणरक्षक सेवेची जबाबदारी आहे.

 

इ. स. १८५२ मध्ये प्रत्येक जहाजावर प्राणरक्षक साधने ठेवणे अत्यावश्यक ठरविण्यात आले. अपघात झाल्यास जहाजावरील प्रत्येक माणसास उपयोगी पडेल इतकी विविध प्राणरक्षक साधने जहाजावर असणे आवश्यक असते. १९१२ मध्ये टाइटॅनिक (टिटॅनिक) नावाचे ब्रिटनचे आलिशान जहाज पहिल्याच प्रवासात बुडले व मोठ्या प्रमाणावर मनुष्यहानी झाली. या अपघातानंतर सागरी सुरक्षितता या विषयावर आंतरराष्ट्रीय स्तरावर विचार चालू झाला. याप्रमाणे १९१३-१४ मध्ये ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स फॉर सेफ्टी ऑफ लाइफ ॲट सी’ या नावाने ओळखली जाणारी आंतरराष्ट्रीय परिषद भरविण्यात आली. ही व यापुढील अशा परिषदा ‘सोलास’ (SOLAS सेफ्टी ऑफ लाइफ ॲट सी) या नावाने ओळखल्या जाऊ लागल्या. १९२९, १९४८ व १९६० मध्ये अशाच परिषदा भरवून सागरी सुरक्षिततेच्या विविध अंगांचा अधिक खोलवर विचारविनिमय करून एक जागतिक नियमावली करण्यात आली. १९४८ पासून या आंतरराष्ट्रीय परिषदा भरविण्याचे काम संयुक्त राष्ट्रांच्या ‘इम्को’ (IMCO इंटरगव्हर्न्‌मेंटल मॅरिटाइम कन्सल्टेटिव्ह ऑर्गनायझेशन) या विभागाकडे सोपविण्यात आले आहे. या विभागाने केलेल्या सूचना व नियम प्रत्येक स्वतंत्र देशाने मान्य करावे लागतात. १९६० मध्ये भरलेल्या परिषदेने केलेले नियम ७२ राष्ट्रांनी मान्य केलेले आहेत.

 

दुसऱ्या महायुद्धापूर्वी प्राणरक्षक सेवेचे कार्य मर्यादित असे परंतु दुसऱ्या महायुद्धात विमानांना मोठ्या प्रमाणात समुद्रावरून उड्डाणे करावी लागली. हवाई युद्धात विमाने पाण्यात पडत असत किंवा विमान बिघडल्यास सक्तीने पाण्यात उतरावे लागे. नाविक युद्धातही अनेक जहाजे बुडविली गेली. विमानदलातील व नौदलातील सैनिकांना वाचविण्याचे कार्य मोठ्या विस्तृत क्षेत्रात करावे लागले. महायुद्धानंतर नागरी विमान वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे प्राणरक्षक सेवेचे कार्यक्षेत्र अधिकाधिक विस्तृत होत गेले आहे. विस्तृत कार्यक्षेत्रामुळे अपघात स्थळ प्रथमतः शोधून काढावे लागते. त्याकरिता विमाने व हेलिकॉप्टर यांचा उपयोग करतात. संकट-संदेश मिळाल्याबरोबर अपघात स्थळाच्या आजूबाजूची जहाजे, प्राणरक्षक नौका संदेशात निर्देशिलेल्या स्थळाकडे जावयास लागतात. बाहेरील मदत येईपर्यंत जहाजावरील प्राणरक्षक साधनांचा उपयोग करून संकटग्रस्त तरंगत राहतात. सुसूत्रीकरणाकरिता रेडिओ संदेशवहनाचा उपयोग केला जातो. प्राणरक्षक साधनाबरोबर असलेल्या यंत्रणेने संदेश दिले जातात. तसेच त्यांच्या नारिंगी रंगामुळे विमानातून संकटग्रस्त सापडणे सोपे जाते. अशा तऱ्हेने प्राणरक्षक सेवेची व्याप्ती वाढली आहे.

 

संदर्भ : 1. Lee, E.C. B. Lee, K. Safety and Survival at Sea, Chicago, 1972.

            2. Merchant Shipping (Life Saving Appliances) Rules, India, New Dehli, 1967.

            3. Nicholl, G. W. R. Survival at Sea, New York, 1960

 

सप्रे, गो. वि. तांबवेकर, अ. श्री.