मेळा : महाराष्ट्रात सार्वजनिक ⇨ गणेशोत्सवाची कल्पना रुजल्यानंतर या उत्सवाचे एक प्रमुख अंग म्हणून मेळ्याची कल्पना पुढे आली. व्याख्यान, की र्तन, प्रवचन या लोकशिक्षणाच्या प्रकारांपेक्षा बहुजनसमाजाला आकर्षित करण्यासाठी मेळ्याचे मनोरंजनपर साधन विशेष प्रभावी होईल, हे जाणून लोकमान्य टिळकांनी मेळ्यांना उत्तेजन दिले. सोपी, सुटसुटीत भाषा आणि सुगम संगीत यांमुळे मेळ्यांतील संवादांनी आणि विशेषतः पदांची जनतेच्या मनाची पकड फारच लवकर घेतली. त्यांतील पदे आणि खुसखुशीत संवाद लोकप्रिय झाले. त्यातून राजकीय, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक विषय तसेच तत्कालीन प्रश्नही हाताळण्यात येत. या प्रश्नांबरोबरच हिंदू-मुसलमान, ब्राह्मण-ब्राह्मणेतर, मालक-मजूर, जमीनदार-कूळ, जहाल-मवाळ यांच्यातील वादांचे चित्रण तसेच नवमतवाद, समाजवाद इत्यादींच्या प्रचारावर मेळ्यांतून भर देण्यास प्रारंभ झाला. ‘सन्मित्र-समाज मेळा’, ‘भारत-मित्र समाज मेळा’, ‘वज्रदेही शूर मेळा’, ‘ऐक्यवर्धक मेळा’, ‘रणसंग्राम मेळा’, ‘स्वातंत्र्य मेळा’, ‘श्री यशवंत मेळा’, ‘राष्ट्रीय मंडळ मेळा’, ‘रघुवीर मेळा’, ‘हिंद मेळा’, ‘समतावादी मेळा’, ‘पैसाफंड मेळा’ इ. पुण्यातील मेळे उल्लेखनीय होत. नागपूरच्या ‘बालमित्र मेळ्या’चाही उल्लेख करता येईल. घोड्यावरचा मेळा, सोवळ्याच्या पितांबराचा गणवेश, मराठमोळा मावळी पोशाख, नकली भाले व ढाली, घुंगुर लावलेल्या काठ्या , बॅंड इ. त्या काळच्या मेळ्यांची काही वैशिष्ट्ये होत. मेळ्याचा प्रारंभीचा साधा, सुटसुटीत गणवेश जाऊन पुढे भड नि दिखाऊ पोशाख व देखावे यांचा शिरकाव झाला. कार्यक्रमात नाच, गाणी यांचा अतिरेक होऊन शैक्षणिक व राजकीय जागृतीवरील लक्ष ढळले. यामुळे मेळे, त्यात भाग घेणारांचे वय आणि संख्या इ. गोष्टींवर सरकारी नियंत्रण आले. १९०९ पर्यंत मेळ्यांवर कोणतेही नियंत्रण नव्हते. त्यानंतर मात्र मेळ्यांतील पदे आणि संवाद यांचे पूर्वपरीक्षण आवश्यक करण्यात आले. तसेच मेळ्यांतील मुलांची जात, वय व व्यवसाय यांविषयी माहिती मागविण्यात प्रारंभ झाला.
मेळ्यांतील पदांत सनातन धर्मावर वीभत्स व अश्लील शब्दांत टीका व स्त्रियांची बदनामी सुरू झाल्याने तेढ उत्पन्न होऊ लागली. अशा प्रकारांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून पुण्यातील प्रतिष्ठित मंडळींची समिती नेमण्यात आली. त्यानंतर १९२६ पासून सरकारने पदांची पूर्वतपासणी करण्यासाठी एक समिती नेमण्यास सुरुवात केली. पुणे शहरासाठी एक व बाहेरच्यासाठी दुसरी अशा या समितीच्या दोन पोटसमित्या झाल्या. राजकीय दृष्टिकोनातून मेळ्यांतील पदांवर नियंत्रण ठेवण्यासाठी १९३५ पासून सरकारने पोलीस अभियो क्त्याला या समितीवर नेमण्यास सुरुवात केली.
प्रारंभी मेळे १ रुपया व नारळ इतक्या नाममात्र बिदागीवर कामे करीत. पुढे पुढे मेळ्यांना व्यावसायिक स्वरूप येऊन दर खेळाला १०० ते १५० रुपये घेण्यास प्रारंभ झाला.
प्रारंभी फक्त मुलांचे मेळे असत. रात्रीची जागरणे, थंडी, पाऊस, उघड्यावरील कार्यक्रम या गोष्टींमुळे मुलांच्या प्रकृतीवर ताण पडूलागल्याने १० वर्षाखालील मुलामुलींना व बारा वर्षावरील मुलींना मेळ्यांत भाग घेण्यास बंदी करण्यात आली. या निर्बंधामुळे आणि जनतेच्या आवडीतही बराच फरक पडल्याने शेकड्यांनी चालू असलेले मेळे आता जवळजवळ बंदच झाले आहेत, असे म्हणावयास हरकत नाही.
संदर्भ : करंदीकर, ज. स. संपा. श्रीगणेशोत्सवाची साठ वर्षे, पुणे,१९५३.
गोखले, श्री. पु.