मेलबर्नचे सुप्रसिद्ध क्रिकेट मैदान.मेलबर्न: ऑस्ट्रेलियातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर आणि व्हिक्टोरिया राज्याची राजधानी. या शहराला जोडून अनेक उपनगरे वसली आहेत. मुख्य शहर आग्नेय किनाऱ्यावर यॅरा नदीमुखाशी फिलिप उपसागराच्या टोकाला वसले आहे. महानगरीय मेलबर्नचे क्षेत्रफळ ५४९ चौ. किमी. असून त्याची लोकसंख्या २८,८८,४०० (१९८४) होती. या शहराची स्थापना १८३५ साली झाली व लॉर्ड मेलबर्न या इंग्लंडच्या पंतप्रधानाचे नाव त्यास देण्यात आले (१८३७). जॉन नॅश या प्रसिद्ध वास्तुशास्त्रज्ञाच्या रॉबर्ट रसेल या विद्यार्थ्याने या शहराची आखणी केली आहे. त्यावेळच्या काही सुरेल इमारती अद्यापि अवशिष्ट आहेत. शहराचा एक चतुर्थांशाहून अधिक भाग उद्याने आणि बागा यांनी व्यापला आहे.

मेलबर्नची पहिली वसती जॉन बॅटमन या टास्मानियन धनगराने उभी केली. त्याने पॅस्को फॉक्‌नर याच्या मदतीने ४४,००० हे. जमीन आदिवासींकडून विकत घेतली व आज जेथे हे शहर विखुरले आहे, तेथे शेती केली. राणी व्हिक्टोरियाच्या सनदेनुसार २५ जुन १८४७ मध्ये या वसतीला शहराचा दर्जा प्राप्त झाला. त्यावेळी तेथे चर्च स्थापण्यात आले. विद्यामान रोमन कॅथलिक व अँग्लिकन आर्चबिशप यांची पदे येथे आहेत. बॅल्लारॅट व बेंडिगो येथील सोन्याच्या शोधामुळे एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात शहराची झपाट्याने वाढ झाली. मेलबर्नचे वनस्पती उद्यान प्रसिद्ध असून त्याने ५२ हेक्टर क्षेत्र व्यापले आहे. तेथे सु १०,००० प्रकारच्या विविध वनस्पतींच्या जाती आढळतात. याशिवाय एक राष्ट्रीय वनस्पती संग्रहालय आहे. ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध कलाकृती आणि विविध कलाशैलींचे नमुने येथील राष्ट्रीय कलावीथीत असून व्हिक्टोरिया वस्तूसंग्रहालय आहे.

मेलबर्नमध्ये तीन विद्यापीठे असून, मेलबर्न विद्यापीठ (१८५३) हे सर्वांत जुने आहे. मोनॅश विद्यापीठ (१९५८) व लाट्रोब विद्यापीठ (१९६७) ही विसाव्या शतकातील उपनगरांतील दोन विद्यापीठे आहेत. मेलबर्नचे तंत्रनिकेतन, बॅले नृत्य-विद्यालय आणि राष्ट्रीय कलाविधी या शैक्षणिक क्षेत्रातील विशेष मान्यवर संस्था आहेत. मेलबर्न हे सागरी व्यापाराचे महत्त्वाचे बंदर आहे. ऑस्ट्रलियाचे हे एक मोठे व्यापारी केंद्र असून लोकर व कच्च्या मालावर येथे प्रक्रिया करून त्यापासून पक्का माल बनविला जातो व त्याची निर्यात होते. उद्योगधंद्यात जहाजबांधणी, मोटारनिर्मिती, कृषीअवजारे, वस्त्रोद्योग, कागद तयार करण्याचे कारखाने, इलेक्ट्रॉनिकचे उद्योग, कातडी कमावणे, मद्यपेये, सिगारेटी तयार करणे इ.चे मो ठे कारखाने असून मालाची मोठी निर्यात होते. सर्व शहर आधुनिक सुविधांनी सुसज्ज असून सांस्कृतिक व राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे आहे. त्याचा स्थानिक प्रशासकीय कारभार कौन्सिल बोर्डातर्फे चालतो. शहराचे आंतरराष्ट्रीय विमानतळ टूलमरी न या नावाने प्रसिद्ध आहे. तेथून देशांतर्गत व परदेशांशी विमान वाहूतक चालते. शहरातील बहुसंख्य वाहतूक मोटारींद्वारे होत असली, तरी विजेवर चालणाऱ्या रेल्वेगाड्या, बसगाड्या, जुन्या पद्धतीच्या पण कार्यक्षम ट्राम यांचे जाळे शहरात असून, वाढत्या रहदारीला आळा घालण्यासाठी भुयारी रेल्वे सुरू करण्यात आली आहे. (१९८१).

येथे १९५६ चे उन्हाळी ऑलिंपिक सामने झाले. मेलबर्नचे क्रिकेट मैदान हे जगातील एक मोठे मैदान असून त्यात १,१०,००० प्रेक्षकांची बसण्याची व्यवस्था आहे. याशिवाय टेनिस, फुटबॉल वगैरे खेळांची अनेक मैदाने आहेत.

संदर्भ : 1. Davidson, G. J. The Rise and Fall of Marvellous Melbourne, Melbourne, 1978.

             2 . Jones, F. L. Social Areas of Melbourne, Canberra, 1970 .  

             3. Lyne, J. A. Greater Melbourne, Cambridge, 1974.

देशपांडे, सु. र.