मेरेडिथ, जॉर्ज : (१२ फेबुवारी १८२८–१८ मे १९०९). प्रसिद्ध इंग्रज कवी व कादंबरीकार. जन्म बहुधा हँपशरमधील पोर्टस्मथ येथे झाला असावा (काहींच्या मते हँपशरमधील पीटर्सफील्डजवळ तो झाला). न्यू वियड येथील ‘मोराव्हियन स्कूल’ मध्ये काही शिक्षण घेतल्यांनतर लंडनमधील एका वकिलाकडे त्याने काही काळ उमेदवारी केली पण कायद्याचे शिक्षण त्याने पूर्ण केले नाही. प्रसिद्ध इंग्रज लेखक टॉमस लव्ह पीकॉक याच्या मुलीशी लग्न केले होते (१८४९). तथापि त्याची पत्नी १८५७ साली त्याला आणि त्याच्या लहान मुलाला टाकून निघून गेली.
मेरेडिथच्या लेखनाची सुरुवात १८५१ साली प्रसिद्ध केलेल्या पोएम्स या कवितासंग्रहाने झाली. त्या कवितांवर टेनिसन या इंग्रज कवीच्या शैलीची छाप होती. नंतर त्याने अरेबियन नाइटस्च्या परंपरेत शोभणारे शेव्हिंग ऑफ शागपत–ॲन अरेबियन एंटरटेनमेंट (१८५६) आणि जर्मन लोककथांवर आधारित फारीना (१८५७) ही दोन पुस्तके लिहीली. आलंकारिक भाषा, प्रतीकांचा वापर आणि चमत्कृतिजन्य विनोद यांचे मिश्रण या पुस्तकांत आढळते. १८६१ साली प्रसिद्ध झालेल्या त्याच्या दुसऱ्या कवितासंग्रहावर ब्राउनिंग या इंग्रज कवीचा प्रभाव दिसतो. या संग्रहातच ‘मॉडर्न लव्ह’ ही १६ ओळींच्या सुनीतांची मालिका आहे. त्याच्या अस्थिर वैवाहिक जीवनातील संघर्षाचे संदर्भ या सुनीतांतून आलेले दिसतात. यांखेरीज पोएम्स ॲण्ड लिरिक्स ऑफ द जॉय ऑफ दि अर्थ (१८८३), बॅलड्स ॲण्ड पोएम्स ऑफ ट्रॅजिक लाइफ (१८८७) आणि अरीडिंग ऑफ अर्थ (१८८८) हे कवितासंग्रह त्याने प्रसिद्ध केले.
मेरेडिथची पहिली कादंबरी दि ऑरडिअल ऑफ रिचर्ड फेव्हरल (१८५९). अनैतिक म्हणून या कादंबरीवर बंदी घालण्यात आली. या कादंबरीतील नायकाचे मानसशास्त्रीय चरित्रचित्रण करताना त्याने व्हिक्टोरियन काळातील ढोंगी नैतिकतेवर उपरोधिकपणे लिहिले होते. त्याच्या उत्कृष्ट गणल्या गेलेल्या आणखी दोन कादंबऱ्या—दि इगोइस्ट (१८७९) आणि द डायना ऑफ क्रॉसवेज (१८८५). तत्कालीन भावविवश कादंबरीलेखनाचा तिटकारा वाटल्याने मेरेडिथने आपला कादंबरीविषयक दृष्टिकोण स्पष्ट करण्यासाठी ‘ऑन दि आयडिया ऑफ द कॉमेडी ॲन्ड द यूस ऑफ द कॉमिक स्पिरिट’ (१८७७) हा निबंध लिहिला. दि इगोइस्ट ही कादंबरी या दृष्टिकोणाचे दर्शन घडविणारी सुरचित अशी कादंबरी आहे. द डायना ऑफ द क्रॉसवेजमध्ये काही दूषित पूर्वग्रहांविरुद्ध झगडणाऱ्या एका हुशार स्त्रीचे चित्र रं गविले आहे. त्याच वेळी स्त्रीमुक्ती चळवळ सुरू असल्याने ही कादंबरी लोकप्रिय झाली. याखेरीज ईव्हन हॅरिं ग्टन (१८६१) ही बरीचशी आत्मचरित्रात्मक कादं बरी व दि ॲडव्हेंचर्स ऑफ हॅरी रिचमंड (१८७१) ही लोकप्रिय झालेली आणि पुढे स्टीव्हन्सनच्या साहसी कादंबऱ्यांशी नाते सांगणारी कादंबरी या त्याच्या काही उल्लेखनीय कादंबऱ्या आहेत.
मेरेडिथच्या कादंबऱ्या, थोडे अपवाद सोडता, काहीशा दुर्बोधच समजल्या जातात. प्रसिद्ध समीक्षक रिचर्ड चर्च ह्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याच्या कादंबऱ्या म्हणजे ‘गद्यात लिहिलेल्या विस्तृत कविता’ च आहेत. आपल्या कादंबरीतील पात्रांना विशिष्ट प्रसंगांत केंद्रस्थानी आणून त्यांच्यावर प्रकाशझोत टाकणे ही त्याची लेखनपद्धती होती. मनुष्यस्वभावातील वैचित्र, पात्रांच्या मनोव्यापारांचे चित्रण आणि त्यांच्या विचारांची गुंतागुंत ह्यांना त्याने आपल्या कादंबरीत प्राधान्य दिले पण हे करताना त्याने वापरलेल्या शैलीमुळे त्याच्या कादंबऱ्या दुर्बोध झाल्या. त्याची कवितादेखील सामान्य वाचकांना सहज समजणारी नाही. तरी मेरेडिय अमेरिकेत आणि यूरोपीय देशांत लोकप्रिय लेखक ठरला.
बॉक्स हिल, सरे (इंग्लंड) येथे तो मरण पावला.
संदर्भ : 1. Baily, E. J. The Novels of George Meredith, New York, 1910.
2. Beach. J. W. The Comic Spirit of George Meredith, New York, 1911.
3. Carle, R. H. P. Aspects of George Meredith, London, 1923.
4. Galland, R. George Meredith, Paris, 1923.
5. Galland, R. George Meredith and British Criticism, London, 1908.
6. Stevenson, Lionel, The Ordeal of George Meredith, London, 1954.
7. Trevelyan, G. M. The Poetry and Philosophy of George Meredith, London, 1908.
8. Wright, W. F. Art and Substance in George Meredith, London, 1953.
कमळकर, य.शं.