मेरी मे, प्रॉस्पेअर : (२८ सप्टेंबर १८०३–२३ सप्टेंबर १८७०). विख्यात फ्रेंच कथालेखक, नाटककार, इतिहासकार आणि पुरातत्त्वज्ञ. त्याचा जन्म पॅरिस येथे एका सुसंस्कृत मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. पॅरिस विद्यापीठात त्याने कायद्याचा अभ्यास केला (१८१९–१८२३), पण वकिली कधीच केली नाही. ग्रीक, स्पॅनिश, इंग्रजी, रशियन ह्या भाषा आणि त्यांतील साहित्य त्याने अभ्यासिले. स्तँदाल ह्या त्याच्या साहित्यिक मित्राच्या प्रोत्साहनाने १८२२ साली त्याने क्रॉम्बेल हे नाटक लिहिले. आरंभी साहित्यक्षेत्रात मेरीमेने काही मिष्किल लबाड्या केल्या. एका तथाकथित जोसेफ देत्रॉजने केलेला, एका कल्पित स्पॅनिश नटीच्या नाटकांचा अनुवाद म्हणून स्वतःचा तेयात्र द केलारा गाझुल (१८२५) हा नाटकसंग्रह प्रकाशित करविला. तसेच स्वतःचा एक कवितासंग्रह ला गुझ्ला (१८२७) हा एका तथाकथि त हायसिंथ माग्नोनोविचनामक लेखकाने अनुवादिलेल्या एका कल्पित इलिरियन कवीच्या कविता असल्याचे भासविले. तेही इतक्या चतुराईने, की भलेभले अभ्यासकही चकले. यापुढील त्याच्या ज्याकेरी (१८२८) या नाटकावर सर वॉल्टर स्कॉटच्या ऐतिहासिक कादंबऱ्याची छाप दिसते. लॉ क्रॉ निक द्यु ताँ द शार्ल न्यफ (१८२९) ही उल्लेखनीय कादंबरी स्वच्छंदतावादाच्या पठडीहून वेगळ्या पडणाऱ्या अशा तटस्थ, व्यासंगपूर्ण व वस्तुनिष्ठ दृष्टीतू न उतरल्यामुळे उठून दिसते. या पाठोपाठ त्याची लोकाझियाँव ल कारॉस द्यु सें साक्रमाँ (इं. शी. द कॅरिएज ऑफ सेंट सॅक्रमेंट) (दोन्ही १८३०) ही दोन्ही नाटके प्रकाशित झाली.
मेरीमेच्या कथा त्याची कल्पनाशक्ती व नैराश्यगंभीर मनोवृत्ती उत्तम प्रकारे प्रकट करतात. ‘मातेओ फाल्कॉन’ (१८३३), ‘कोलाँबा’ (१८४०, इं. शी. व्हेंडेटा) आणि ‘कार्मेन’ (१८४६) या त्याच्या काही प्रमु ख कथा. या कथांतून प्रेम, द्वेष, मत्सर, सूड इ. भावनांचा आविष्कार प्रभावीपणे झालेला आढळतो. ‘कार्मेन’ या कथेतून स्फुरलेली झॉर्झ बीझेची ‘कार्मेन’ ही संगीतिका (१८७५) जगप्रसिद्ध ठरलेली आहे.
ऐतिहासिक स्मारकांचा मुख्य तपासनीस म्हणून मेरीमेची १८३४ मध्ये आरमारी खात्यात नेमणूक झाली. त्या निमित्ताने त्याने ग्रीस, स्पेन, तुर्कस्तान इ. देशांत पुष्कळ प्रवास केला. अेत्यूद स्यूर लिस्त्वार रोमॅन (१८४४, इं. शी. स्टडीज ऑन रोमन हिस्टरी), मोन्युमाँ हेलेनिक (१८४०–४२ इं. शी. हेलेनिक मॉन्यूमेंटस), आर्शितेक्त्यूर मिलितॅर ओ मोएनाज्य (१८४३, इं. शी. मिलिटरी आर्किटेक्चर इन द मिड्ल एजीस) हे ग्रंथही त्याने लिहिले. त्यामुळे पुराणवस्तु-संशोधक व इतिहासकार म्हणून त्याने लौकिक संपादन केला. ब्रिटीश म्यूझियमचा प्रमुख ग्रंथपाल सर अँथनी पानिझी याला त्याने लिहिलेली पत्रे पुढे लॅत्र आ मस्य पानिझी : १८५०–७० (१८८१) या शीर्षकाखाली प्रसिद्ध केली. ही पत्रे फ्रान्सच्या दुसऱ्या साम्राज्याचा इतिहास म्हणून समजली जातात.
टुर्ग्येन्येव्ह, गोगोल, पुश्किन इ. रशियन लेखकांची फ्रान्सला ओळख करून देणाऱ्या अनुवादकांपैकी मेरीमे होता. मुख्यतः पुश्किनचा त्याच्यावर विशेष प्रभाव पडलेला दिसतो. स्वच्छंदतावादी काळातील असूनही मेरीमेचे लिखाण व्हिक्टर ह्यूगो व इतर स्वच्छंदतावादी लेखकांपेक्षा वास्तववादी कादंबरीकार फ्लोबेअर याच्याशी अधिक साधर्म्य दाखविते. कॅन येथे तो निधन पावला.
संदर्भ : 1. Johnstone, Derwent, Prosper Merimee : A Mask and a Face, 1926.
2. Lyons, Sylvia, The Life and Time of Prosper Merimee, Toronto, 1948.
3. Raitt, A. W. Prosper Merimee, New York, 1971 .
टोणगांवकर, विजया