मेरिगोल्ड : (हिं. झरगूल सं. गेंदुक इं. पॉट मेरीगोल्ड लॅ. कॅलेन्ड्युला ऑफिसिनॅलिस कुल-कंपॉझिटी, ॲस्टरेसी). हे इंग्लिश नाव अनेक वनस्पतींना उद्देशून वापरले जाते. तथापि मुख्यतः पुढील शास्त्रीय नावांनी ओळखल्या जाणाऱ्या सुर्यफुलाच्या कुलातील [→कंपॉझिटी] काही शोभिवंत फुलझाडांचा त्यात समावेश केला जातो : टॅजेटस इरेक्टा (झेंडू आफ्रिकन मेरीगोल्ड), टॅ. पॅट्युला (फ्रेंच मेरीगोल्ड). कॅ. ऑफिसिनॅलिस (पॉट मेरीगोल्ड) आणि ⇨  शेंवतीच्या प्रजातीतील एक जाती ख्रिसॅन्थेमम सॅजेटम (कॉर्न मेरीगोल्ड). कॅल्था पॅल्युस्ट्रिस (मार्श मेरीगोल्ड) ही जाती मात्र ⇨ रॅनन्क्युलेसी (मोरवेल कुल) मधील आहे. पहिल्या चार जाती मूलतः अमेरिकेतील (मेक्सिको ते अर्जेंटिना) आहेत कॉर्न मेरीगोल्ड ही युरेशीय जाती. उ. अमेरिकेतील पूर्व भागात आणि इंग्लंडमध्ये शेतात तणाप्रमाणे उगवते. केप मेरीगोल्ड (डायमॉर्फोथेका ऑरँटियाका) ही बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी) वनस्पती द. अफ्रिकेत शोभेकरिता लावतात. फ्रेंच व अफ्रिकन मेरीगोल्ड ह्या जाती कणखर असून त्यांची पाने बरीच खंडीत व सुगंधी असतात. त्यांची फुले पिवळी, नारिंगी, तांबडी किंवा तांबू स पिंगट असून बागेस वाफ्याच्या कडेने किंवा वायातच गटाने लावल्यास अधिक शोभा येते. कॅलेन्ड्युला प्रजातीत सु. २५ जाती असून त्यांचा प्रसार द. यूरोप, उ. अफ्रिका आणि प. आशियात आहे. भारतात फक्त दोन जाती आढळतात.

पॉट मेरीगोल्ड (कॅ. ऑफिसिनॅलिस) ही सु. ३०–६३ सेंमी. उंची व वर्षायू (एका हंगामात जीवनक्रम पूर्ण होणारी) ⇨ औषधी सर्वत्र शोभेकरिता लावलेली आढळते. सु. ३०० वर्षांपूर्वीपासून ती परदेशात लागवडीत आहे. ती मूळची भूमध्यसामुद्रिक प्रदेशातील आहे. खोड रेषांकित व शाखायुक्त असते. पाने साधी, एकाआड एक, बिन देठाची, लांबट, काहीशी केसाळ व चिकट असतात. फुलोरे [स्तबक →पुष्पबंध] सु. १० सेमीं. व्यासाचे असून फांद्यांच्या टोकांस एकेकटे लांबट दांड्यांवर येतात. ते सपाट, पिवळट ते नारिंगी रंगातील भिन्न छटांचे आणि एकेरी किंवा दुहेरी प्रकारचे असतात. किरण-पुष्पके (फुलोऱ्याच्या घेरावर असलेली पुष्पके म्हणजे लहान घटक फुले) जिव्हिकाकृती व बिम्ब (मध्यवर्ती) पुष्पके नलिकाकृती असतात. इतर सामान्य शारिरीक लक्षण सूर्यफूल कुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात.

किरण पुष्पके स्वयंपाकात व औषधात वापरीत त्यामुळे त्या अर्थाची इंग्रजी व लॅटिन नावे पडली आहेत. किरण-पुष्पकांत बाष्पनशील (उडून जाणारे) तेल, एक अस्फिटिकी कटुद्रव्य आणि ‘कॅलेन्ड्युलीन’ हा चिकट पदार्थ असतो. मुळांत इन्यु लीन असतो. सुक्या पुष्पकांना ‘कॅलेन्ड्युला’ म्हणतात.

ही वनस्पती स्तंभक (आकुंचन करणारी) व रक्तरोधक (रक्तस्त्राव थांबवणारी), उत्तेजक व घाम आणणारी आहे. ती सौम्य सुगंधी व मृत्रल (लघवी साफ करणारी) आहे. सुकी किरण-पुष्पके स्वादाकरिता सार व कढीत घालतात ती वायुनाशी व उत्तेजक असतात. फुलोरे दीपक (भूक वाढविणारे), कृमिनाशक, जंतुनाशक, आर्तवजनक (विटाळ सुरू करणारे) असून काविळीवरही देतात. पानांचा रस व शिर्का (व्हिनेगार) यांचे मिश्रण आग होत असलेल्या सुजेवर लावणे हितकर असते. गांधीलमाशी व मधमाशी यांचा दंश झाल्यावर फूल त्वरित चोळल्यास वेदना नाहीशा होतात. बारीक ताप आणि आचके थांबविण्यास सुक्या फुलांचे टिंक्च रयुक्त औषध देतात जखमा, भाजणे, जुनाट व्रण व इतर कातडीसंबंधीच्या तक्रारीवरही बाहेरून लावल्यास गुणकारी आहे. सुक्या फुलांची केशरात भेसळ करतात. नवीन लागवड बियांपासून करतात. हिला ओलसर जमीन व भरपूर सूर्यप्रकाश आवश्यक असतात. पावसाळ्याच्या आरंभी रोपे लावल्यापासून साधारणपणे तीन महिन्यांनी फुले येतात. ह्या वनस्पतीचे वर्णन प्रथम १६५३ मध्ये निकोलस कुल्पेपर यांनी प्रसिद्ध केले होते. औषध या दृष्टीने ‘कॅलेन्ड्युला’ फारसे प्रचारात नाही.

पहा : आर्निका माँटॅना झेंडू.

संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. II, New Delhi, 1950.

             2. Kirtikar, K. R. Basu, B. D. The Indian Medicinal Plants, Vol.II, New Delhi, 1975.

             3. Uphof, J. C. Th. Dictionary of Economic Plants, Lehre (Germany), 1968.

देशपांडे, ज. र. परांडेकर, शं. आ.

मेरीगोल्ड (कॅलेन्डयूला ऑफिसिनॅलिस) : फूल, कळी व पाने यांसह फांदी.