मेण: स्पर्शाला तेलासारखा बुळबुळीत, थोडाफार चिकट, मऊ, अर्धवट घनरूप, दाब दिला असता दबणारा व द्यावा तो आकार घेणारा, कमी तापमानास द्रवरूप होणारा, पिवळसर वर्णाचा, अपारदर्शक पाण्याचा प्रतिकार करणारा आणि ज्याचा पृष्ठभाग घासल्याने चकचकीत बनतो असा आणि टर्पेटाइन, नॅप्था इ. विद्रावकांत (विरघळविणाऱ्या पदार्थांत) विरघळणारा पदार्थ अशी मेणाची सर्वसाधारण व्याख्या करता येईल. तथापि ही व्याख्या बरीच स्थूल आहे. कारण कित्येक मेणे कठीण व ठिसूळ आहेत, तर काहींचा वर्ण काळसर, हिरवट, तांबडा व शुभ्रही आहे आणि काही कमी तापमानास न वितळणारी आहेत. मधमाश्यांचे मेण हाच मेण या वर्गाचा पदार्थ मनुष्याने प्रथम वापरला असावा आणि त्यामुळे भौतिक गुणांत त्याच्याशी साम्य असलेल्या पदार्थांना मेण ही संज्ञा लावण्यात येऊ लागली.

मेणांचे मुख्य वर्ग दोन आहेत : (१) नैसर्गिक आणि (२) संश्लेषित (कृत्रिम रीतीने बनविलेली) व रूपांतरित, नैसर्गिक मेणे वनस्पतिज, प्राणिज व खनिज या तीन प्रकारची आहेत.  

वनस्पतिज मेणे झाडांची पाने, गवताची पाती, देठ, फळे, बीजे व मुळे यांवर असणाऱ्या थरांच्या रूपात असतात. कोरड्या व रेताड जमिनीत अथवा दमट व उष्ण हवेत उगवणारी झाडेझुडपे व गवत यांच्यातील पाण्याचे प्रमाण झाडाच्या वाढीच्या दृष्टीने कायम राखणे महत्त्वाचे असते. मेणाच्या थराच्या योगाने बाष्पीभवनाचे नियंत्रण होऊन पाण्याचे प्रमाण कायम ठेवण्यास मदत होते.

प्राणिज मेणे जलचर व स्थलचर प्राण्यांच्या शरीरांचे विविध भाग आणि केसावरील पातळ थर, तसेच कीटकांनी बांधलेली कोठ्यायुक्त घरे आणि बॅसिलस या प्रजातीतील सूक्ष्मजंतू यांमध्ये असतात.

खनिज तेले, दगडी कोळसा व तत्सम खनिजे यांमध्ये मेणे असतात. कच्च्या मालापासून मेणे विविध प्रक्रियांनी वेगळी काढली जातात.

संघटन : मेणे अनेक संयुगांची मिश्रणे असतात. वनस्पतिज व प्राणिज मेणांमध्ये मुख्यत्वेकरून C16 ते C34 या मर्यादेतील कार्बन अणूंची सम संख्या असलेली ⇨ वसाम्ले व तशाच प्रकारची वसा अल्कोहॉले यांपासून बनलेली एस्टरे असून त्याशिवाय तेवढेच कार्बन अणू असलेली आल्डिहाइडे व कीटोने आणि काही प्रमाणात वरील मर्यादेतील पण विषम अणुसंख्या असलेली हायड्रोकार्बने, स्टेरॉले व रेझिने या वर्गांची संयुगे आणि मुक्त स्थितीत असलेली वसाम्ले व वसा अल्कोहॉले वेगवेगळ्या प्रमाणांत असतात. पॅराफीन मेण व काही इतर खनिजांमध्ये मुख्यतः हायड्रोकार्बने असतात.

मेणांचे गुणधर्म त्यांमध्ये असलेल्या संयुगांचे रासायनिक वर्ग व त्यांची प्रमाणे यांवर अवलंबून असतात. ही ठरविण्यासाठी स्तंभवर्णलेखन [⟶ वर्णलेखन] पद्धतीने घटक सुलभतेने वेगळे करता येतात. त्यानंतर एस्टर वर्गाच्या संयुगांचे क्षारीय विच्छेदन [दाहक सोड्याचा जलीय विद्राव वापरून संयुगांचे विभाग पाडण्याची क्रिया ⟶ जलीय विच्छेदन] करून त्यांमधील अम्ले व अल्कोहॉले यांची तपासणी करून त्यांमधील कार्बन अणुसंख्या निश्चित करतात. प्रत्येक रासायनिक वर्गातील घटकांची संख्या व प्रमाणे वायुवर्णलेखन [⟶ वर्णलेखन] या तंत्राच्या साहाय्याने ठरविता येतात.

भौतिक गुणधर्म: मेणे पाण्यात विरघळत नाहीत. नेहमीच्या तापमानास ती कार्बनी विद्रावकातही फारशी विरघळत नाहीत. द्रवांकांच्या आसपास ती बेंझीन, टोल्यूइन, झायलीन, पेट्रोलियम नॅप्था, ट्रायक्लोरोएथिलीन इ. विद्रावकांत विरघळतात.

हवेच्या तापमानापेक्षा उच्च तापमानास मेण विद्रावकात विरघळून केलेल्या विद्रावातील काही भाग मेण विद्राव हवेच्या तापमानास निक्षेपित होतो (न विरघळलेल्या स्वरूपात साचतो). मेण विद्रावक यांची परस्पर प्रमाणे कायम ठेवून मेण नमुन्यांच्या निक्षेप प्रमाणांची तुलना शुद्ध मेणाच्या निक्षेप प्रमाणाशी करता येते व त्यावरून नमुन्याची शुद्धाशुद्धता कळू शकते.


दोन अथवा अधिक मेणे मिसळल्यास ती त्यांच्या वितळबिंदूंच्या जवळपास एकजीव होतात. वातावरणाच्या तापमानास आल्यावर वापरलेल्या मेणांच्या मूळच्या कमीअधिक घनरूपानुसार ती मिश्रणे कमीअधिक घनरूप धारण करतात.

प्राप्ती : नैसर्गिक पदार्थापासून मेणे मिळविण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरतात.

(१) काही वनस्पतिज मेणे मिळविण्यासाठी मेण असलेला वनस्पतीचा भाग वाळवून झोडपतात व सुटे होऊन खाली पडलेले मेण गोळा करून व दळून वितळवितात आणि गाळून थंड करतात. उदा., कार्नोबा मेण.

(२) काही मेणांसाठी मेण ज्यामधून काढावयाचे असेल तो भाग वेगळा करून पाण्याबरोबर उकळतात. मेण वितळते व त्याचा थर पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगू लागतो. तो थंड करून वेगळा करतात. ज्या मेणाचे पाण्याबरोबर पायस (एकमेकांत न मिसळणाऱ्या द्रवापासून दृढ मिश्रण) बनते त्यासाठी ही कृती उपयोगी पडत नाही. उदा., कँडेलिल्ला मेण.

(३) मेणयुक्त भाग वाळवून तो ७०º से. ते १५०º से. या तापमान मर्यादेत उकळबिंदू असणाऱ्या योग्य अशा कार्बनी विद्रावकात (बेंझीन, टोल्यूइन, पेट्रोलियम नॅप्था इ.) भिजत ठेवतात व योग्य कालावधीनंतर विद्राव काढून घेतात. त्यानंतर ऊर्ध्वपातनाने (वाफ करून व ती थंड करून मिश्रणातील घटक अलग करण्याच्या क्रियेने) विद्रावातील विद्रावक काढून टाकला म्हणजे मेण उरते. उदा., घायपात मेण.

(४) खनिज मेण मिळविण्यासाठी मेण असलेल्या खनिज तेल भागाचे (अंशाचे) पुनः भागशः ऊर्ध्वपातन करतात. ऊर्ध्वपातित न झालेल्या भागाचे अंशतः स्फटिकीकरण केले म्हणजे मेण मिळते.

कच्च्या मालापासून वरीलप्रमाणे मिळविलेली मेणे प्रथम अशुद्ध असतात. त्यांचे शुद्धीकरण करण्यासाठी त्यावर ऊर्ध्वपातन, स्वेदन, अंशतः वितळणे, शोषण इ. भौतिक क्रिया आणि हवेने व पेरॉक्साइडांच्या योगाने ऑक्सिडीकरण, हायड्रोजनीकरण, जलीय विच्छेदन, एस्टरीकरण वगैरे रासायनिक प्रक्रिया करतात.

परीक्षण : मेणांची शुद्धाशुद्धता अजामवण्यासाठी त्यांच्या भौतिक व रासायनिक गुणधर्मांची तपासणी केली जाते. त्यासाठी नमुन्याचे विशिष्ट गुरूत्व, वितळबिंदू, मुक्तरूपात असलेल्या अम्लाचे प्रमाण (अम्लांक), एस्टरांचे प्रमाण (साबणीकरण मूल्य), आयोडीन मूल्य, ॲसिटील अंक इ. गुणधर्म उपयोगी पडतात [⟶ तेले व वसा].

उद्योगधंद्यात उपयोगी पडण्याच्या दृष्टीने मेणाचे कठीणपणा, वितळबिंदू, प्रणमनांक (हवेपेक्षा भिन्न घनता असलेल्या पारदर्शक पदार्थातील प्रकाशवेग व हवेतील प्रकाशवेग यांचे गुणोत्तर दर्शविणारा अंक), जलांश, संधारित (लोंबकळत्या स्थितीत असलेल्या) पदार्थांचे प्रमाण, राखेचे प्रमाण, जलीय विच्छेदन न होणाऱ्या भागाचे प्रमाण, हायड्रोकार्बने व रेझिने यांची प्रमाणे, अम्लांक, साबणीकरण मूल्य, आयोडीन मूल्य, ॲसिटील अंक हे गुणधर्म महत्त्वाचे असतात.

नैसर्गिक मेणे : वनस्पतिज मेणे: कार्नोबा मेण : कोपर्निशिया सेरिफेरा या जातीच्या झाडांच्या पानांपासून हे मिळते. हे झाड ताडाच्या झाडासारखे असून ७·५ – ९ मी. उंच वाढते. पानाच्या दोन्ही बाजूंस मेणाचा थर असतो पण वरच्या बाजूचा थर जास्त जाड असतो. मेण मिळविण्यासाठी पूर्ण वाढ झालेल्या झाडाची पाने वाळवून झोडपतात व खाली पडणारे मेण चाळून घेतात. नंतर त्यात थोडे पाणी घालून मेण वितळवितात व गाळून घेऊन थंड करतात. साधारणपणे १० झाडांपासून एका वर्षात सु. १ किग्रॅ. मेण मिळते. ब्राझीलमध्ये या झाडांच्या लागवडी असून तेथून हे मेण निर्यात होते. या मेणामध्ये मेण अम्लांची एस्टरे ८४–८५ %, मुक्त मेण अम्ले ३–३·५% अल्कोहॉले २–३%, लॅक्टाइडे २–३%, हायड्रोकार्बने १·५–३%, रेझिने ४–६% असून जलांश ०·५ ते १% असतो. जमीन, फर्निचर, बूट, मोटारी इत्यादींच्या पृष्ठभागासाठी वापरावयाच्या पॉलिशांसाठी आणि कार्बन कागदाच्या उत्पादनात या मेणाला फार महत्त्व आहे. पृष्ठभागास चकाकी देणे व कार्बनी विद्रावक बद्ध करून ठेवणे हे गुण या मेणात आहेत.

कमी वितळबिंदू असलेल्या मेणात कार्नोबा मेण थोड्या प्रमाणात मिसळले, तर मिश्रणाचा वितळबिंदू, तसेच कठीणपणा व चकाकी देण्याचा गुण यांत वाढ होते. त्यामुळे कागद, कापड, विद्युत् प्रवाह निरोधक वस्तू, मेणबत्त्या, आगकाड्या रंगाच्या कांड्या इत्यादींच्या निर्मितीत ते उपयोगी पडते. उत्पादन व किंमत या दोन्ही दृष्टींनी या मेणाचा क्रम खनिज तेल मेणाच्या खालोखाल लागतो.


कँडेलिल्ला मेण : हे पेडिलँथस पॅव्होनिस या तणापासून मिळते. हे बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारे) तण वायव्य मेक्सिकोत व दक्षिण टेक्सासमध्ये वाढते. तणाच्या सर्वांगावर मेणाचे पापुद्रे असतात. मेण मिळविण्यासाठी झाडे उपटून व पाण्यात बुडवून उकळतात. फेस होऊ नये व प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी पाण्यात थोडे सल्फ्यूरिक अम्ल मिसळतात. वितळलेले मेण थंड झाल्यावर थिजते. ते काढून घेतात व पुनः वितळवून व विरंजन (रंग घालविण्याची क्रिया) करून शुद्ध मेण बनवितात. या मेणात अम्ले व मेण अल्कोहॉले यांची एस्टरे २८–२९%, अल्कोहॉले, स्टेरॉले व उदासीन रेझिने १२–१४%, हायड्रोकार्बने ५०–५१% मुक्त अम्ले ७–९% आणि उरलेला भाग खनिजे व जलांश यांचा असतो. यूफोर्बिएसी कुलातील यूफोर्बिया अँटिसिफिलिटिका व याच कुलातील इतर कित्येक वनस्पतींपासून कँडेलिल्ला मेण मिळविण्यात येते.

हे मेण कार्नोबा मेणाइतके कठीण नाही. याचे जलीय विच्छेदन व पायसीकरण लवकर होत नाही.

फर्निचर आणि पादत्राणे व इतर कातडी माल यांकरिता पॉलिशे व व्हार्निशे, मेणबत्त्या, विद्युत् निरोधक मिश्रणे बनविण्यासाठी, कागद धंद्यात इत्यादींत हे वापरतात. मऊ मेणांना कठीणपणा आणण्यासाठी आणि कार्नोबा व मधमाश्यांचे मेण यांच्या जागी कित्येक ठिकाणी हे वापरतात.

उसाचे मेण  : उसाच्या डोळ्याजवळच्या पृष्ठभागावर या मेणाच्या चूर्णाचा पातळ थर असतो. साखर बनविण्यासाठी काढलेल्या रसात हे मेण येते व रस शुद्ध करताना गाळाच्या रूपात (प्रेस मड) जी अशुद्ध द्रव्ये वेगळी होतात त्यांपासून ते अलग काढतात. रावळगाव येथील साखर कारखान्याने बसविलेल्या कार्यक्षम पद्धतीत हा गाळ प्रथम वाळवितात. नंतर तो एका टाकीत घेऊन त्यात विशिष्ट प्रतीचे कोमट टर्पेटाइन तेल मिसळतात. मेण टर्पेटाइनात विरघळते व त्याचा विद्राव बनतो. तो वेगळा करून ऊर्ध्वपातन पात्रात भरतात व ऊर्ध्वपातन करून टर्पेटाइन काढून घेतात. वितळलेल्या स्थितीत मेण शिल्लक राहते. ते पसरट लोखंडी पात्रात ओतून ६–७ तास राहू दिले म्हणजे घट्ट होते आणि कापून लाद्यांच्या रूपात काढून घेता येते. ऊर्ध्वपातनाने मिळणारे टर्पेटाइन पुनःपुन्हा वापरता येते.

या मेणामध्ये क्षारीय विच्छेदनीय भाग मेणाच्या सु. ३५% असतो. त्यामध्ये C14 ते C36 या मर्यादेतील सम संख्या असलेली शाखारहित वसाम्ले ६०–६५%, हायड्रॉक्सी वसाम्ले २०–२४% रेझीन अम्ले ६–७% असतात आणि सु. ३–४% भाग अनिश्चित व जटिल स्वरूपाच्या संयुगांचा असतो. क्षारीय अविच्छेदनीय भाग सु. ६०% असून त्यात वसा अल्कोहॉले C18 ते C32 या मर्यादेतील सम संख्या असलेली व विषम संख्या असलेली हायड्रोकार्बने व स्टेरॉले यांचा भरणा असतो. या मेणाचा रंग गडद काळपट हिरवा असतो. ते साधारण कठीण जातीचे असून चिकट असते. पृष्ठभागाला चकाकी देण्याचा गुण यांच्या अंगी आहे पण विद्रावक बद्ध करण्याचा गुण यामध्ये नाही. गुणधर्माच्या दृष्टीने हे मेण कमी प्रतीचे असले, तरी प्रेस मडपासून भारतात याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होऊ शकेल. भारतात याचे उत्पादन फक्त रावळगाव येथील साखर कारखाना १९६५ पासून १९७७ पर्यंत करीत होता. कार्बन कागद, टंकलेखन यंत्राची फीत, कातडी जोडकामस पॉलिशे व छपाईची शाई यांमध्ये हे मेण उपयोगी पडते.

घायपाताचे मेण  : घायपाताच्या पानापासून दोर तयार करण्यासाठी तंतू सोडवून घेण्याच्या पद्धतीत भुसकटासारखा टाकाऊ पदार्थ मिळतो त्यामध्ये हे मेण असते. रेटिंग (पाने कुजवून तंतू सुटे करण्याच्या) पद्धतीने तंतू काढताना मिळणाऱ्या भुसकटात मेणाचे प्रमाण १०–१८% असते. ते निष्कर्षणाने मिळविण्याची एक पद्धत पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीने बसविली आहे.

या मेणामध्ये क्षारीय विच्छेदनीय भाग सु. ६२–६७% असून त्यात C18 ते C36 या मर्यादेतील सम संख्या असलेली व शाखा नसलेल्या कार्बन साखळीची वसाम्ले ५५% व C18 ते C32 या मर्यादेतील सम संख्या ω हायड्रॉक्सी वसाम्ले (एका टोकास OH गट व दुसऱ्या टोकास COOH असलेली) ४५% असतात. क्षारीय अविच्छेदनीय भाग ३३–३५% असतो व त्यात C28 ते C34 या मर्यादेतील वसा अल्कोहॉले ८५% व C24 ते C30 या मर्यादेतील α, ω डायॉले (दोन्ही टोकांना OH गट असलेली) ९% व याच मर्यादेतील पण विषम कार्बन अणुसंख्या असलेली हायड्रोकार्बने ३–५% असतात. या मेणाचा रंग काळसर तांबडा असतो. याची गणना कठीण प्रकारच्या मेणात होते. कार्नोबा मेणात असलेले विशेष गुणधर्म याही मेणात आहेत. यापासून केलेले पॉलीश ४९º से. तापमानासही पातळ होत नाही.

भारतात महाराष्ट्र, ओरिसा व आंध्र प्रदेश या राज्यांत घायपाताच्या लागवडी मोठ्या प्रमाणात केलेल्या आहेत. इतरत्रही लहान लागवडी आहेत. त्यामुळे हे मेण मिळविण्यास चांगला वाव आहे. अहमदनगर येथील अफालि कंपनी १९६१ ते १९६६ पर्यंत या मेणाचे उत्पादन करीत असे. योग्य कच्चा माल न मिळाल्यामुळे त्यानंतर उत्पादन थांबले.


एस्पार्टो गवताचे मेण : उत्तर आफ्रिकेतील स्टायपा टेनासिसिमा आणि लायजियम स्पार्टम या कागद बनविण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या गवताच्या [⟶ गुच्छघास] पात्यावर आवरणाच्या रूपात हे मेण असते. कागद बनविताना प्रथम गवत झोडपून काढतात. त्या वेळी जे भुसकट पडते त्याचे विद्रावकाने निष्कर्षण करून नंतर निष्कर्षाचे ऊर्ध्वपातन करतात तेव्हा मेण शिल्लक राहते. हे कठीण प्रकारचे मेण आहे. वितळबिंदू ७८º से. कार्नोबा मेणाऐवजी हे पॉलिशे, कार्बन कागद व कापड उद्योग यांत वापरले जाते.

होहोबा (जोजोबा) मेण : काही तेलांचे गुणधर्म मेणांसारखे असल्यामुळे त्यांचा समावेश मेणांत केला जातो. होहोबा तेल हे अशांपैकी एक आहे,. ते ॲरिझोना, द. कॅलिफोर्निया, मेक्सिकोतील सनॉरा इ. ठिकाणी आढळणाऱ्या बक्‌सेसी कुलातील सिमॉन्डसिया कॅलिफोर्निका या झुडपाच्या बियांपासून काढतात. बियांच्या वजनाच्या सु. ५०% तेल असून ते दीर्घकाळ ठेवले, तरी खराब होत नाही व त्याचा चिकटपणा उच्च तापमानासही कमीजास्त होत नाही. या तेलाचा सु. ९०% भाग C20 ते C22 या दरम्यानची (मुख्यत्वे C20) एक द्विबंध असलेली सरळ साखळीची वसाम्ले आणि एक द्विबंध असलेली सरळ साखळीची एक हायड्रॉक्सी गटाची C22 ची अल्कोहॉले यांपासून बनलेल्या एस्टरांचा असतो. कित्येक अंतःक्षेपणाची (इंजेक्शनाची) औषधे, सौंदर्यप्रसाधने व नाजूक यंत्रसामग्रीसाठी वंगण म्हणून याचा उपयोग होतो. स्पर्म व्हेलचे तेल याच कामासाठी फार उपयुक्त म्हणून प्रसिद्ध आहे. ते मिळविण्यासाठी या माशांची बेसुमार हत्या झाल्यामुळे त्यांची संख्या घटली असून ही जात नष्ट होण्याची फार भीती आहे. होहोबा तेल पुरेसे मिळाले, तर ही आपत्ती टळेल म्हणून ॲरिझोना व कॅलिफोर्निया येथे मोठ्या प्रमाणावर होहोबाची लागवड करण्यात येत आहे [⟶ होहोबा वृक्ष].

प्राणिज मेणे : मधमाश्यांचे मेण : एपिस मेलिफेरा या जातीच्या मधमाशीच्या पोळ्यातील कप्पे या मेणाचे बनविलेले असतात. पोळ्यातील मध काढून घेतल्यावर पोळे थोडे सल्फ्यूरिक अम्ल घातलेल्या पाण्याबरोबर उकळतात व थंड होऊ देतात. मेण वेगळे होऊन तरंगते, ते पुनः वितळवून त्यातील तळाशी बसणारी व तरंगत राहणारी अशुद्ध द्रव्ये काढून टाकतात. अशुद्ध मेणाचा रंग माशीची जात, तिचे खाद्य आणि मेण मिळविण्याची पद्धत यांवर अवलंबून असतो. भारतातील मधमाश्यांपासून मिळणाऱ्या मेणाला घेडा मेण म्हणतात. ते पिवळसर किंवा तांबूस पिवळसर रंगाचे असते व त्याला विशिष्ट वासही असतो. डायाटमी माती (मुख्यतः डायाटम या एकपेशीय शैवलाच्या सिलिकामय कवचाची बनलेली माती) व कार्बन यांमधून गाळून, त्याचप्रमाणे सूर्यप्रकाशाने, पोटॅशियम परमँगॅनेट वा पोटॅशियम डायक्रोमेट यांच्या रासायनिक विक्रियेने त्याचे विरंजन करतात.

या मेणामध्ये पामिटिक अम्ल, १६ –हायड्रॉक्सी पामिटिक अम्ल व ७ –हायड्रॉक्सी पामिटिक अम्ल यांची C26 वसा अल्कोहॉलाबरोबर बनलेली एस्टरे अनुक्रमे १८–२०%, ५७–५८% आणि ४% असतात. त्याचप्रमाणे C14, C16 व C18 या तृप्त आणि अतृप्त अम्लांची ग्लिसराइडे ४–५%, C26 ते C30 या मर्यादेतील समसंख्या असलेली मुक्त वसाम्ले ५–६%, C27 ते C31 या मर्यादेतील विषम संख्या असलेली हायड्रोकार्बने ८–९% व स्टेरॉले सु. १% या मेणात असतात.

दोन अथवा अधिक मेणे वितळवून एकत्र केल्यास एकजीव होत नसतील, तर त्यांत थोडे मधमाश्यांचे मेण घातले असता ती पूर्णपणे मिसळतात. या मेणाच्या अंगी आकार्यता (आकार घेण्याची क्षमता) हा गुण जितक्या प्रमाणात आहे तितका महाग व सूक्ष्मस्फाटिकी मेणांखेरीज इतरांच्या अंगी नाही. [⟶ मधमाशीपालन].

लोकरीचे मेण : मेंढ्यांच्या लोकरीवर मेणाचा पातळ थर असतो. ऑस्ट्रलियातील मेरिनो मेंढ्यांच्या लोकरीवर सर्वांत जास्त (सु. १७%) मेण असते. लोकरीचे पेळू बनविण्यालायक करण्यासाठी प्रथम ती प्रक्षालकामिश्रित (संश्लेषित निर्मलक पदार्थ मिश्रित) पाण्याने धुतात. त्या वेळी मेणाचे पायस बनून ते पाण्याबरोबर राहते. पाण्याचे तापमान ७५º –८०º से. इतके ठेवून केंद्रोत्सारक यंत्राने [⟶ केंद्रोत्सारण] मेण वेगळे करतात. नंतर क्षाराच्या जलीय विद्रावाने धुऊन त्यातील मुक्त रूपात असलेली अम्ले काढून टाकतात मिळणाऱ्या मेणाचा रंग व वास नाहीसा करतात आणि मेण कोरडे करतात. हे मेण सु. ४०º से. तापमानास वितळते.

या मेणात क्षारीय विच्छेदनीय भाग सु. ५०% असून त्यात शाखारहित, तशीच सशाख व α-हायड्रॉक्सी अशा सर्व जातींची कार्बन अणूंची सम व विषम संख्या असलेली वसाम्ले असतात. क्षारीय अविच्छेदनीय भाग सु. ५०% त्यात ६०–६५% कोलेस्टेरॉल, आयसोकोलेस्टेरॉल आणि या जातीची संयुगे व वसा अल्कोहॉले २५–३०% आणि सम व विषम कार्बन अणूंची संख्या असलेली डायॉले ५% असतात. हे मेण जुने झाले तरी खवट होत नाही. तेलामध्ये पाणी (W/O) या प्रकारची पायसे घडविण्याचा व टिकविण्याचा गुण या मेणात मोठ्या प्रमाणात आहे. रुक्ष कातडीला मऊपणा आणण्याच्या गुणात ते अद्वितीय आहे. सौंदर्यप्रसाधने व जीववैज्ञानिक मलमे यांमध्ये ते मोठ्या प्रमाणात (दरसाल सु. १५ लक्ष टन) वापरले जाते [⟶ लोकर].

लाखेचे मेण : लॅसिफेरिनो या कुलातील कीटकांपासून लाख मिळते. तीमध्ये ४–५% मेण असते. ते निष्कर्षणाने वेगळे करतात किंवा लाख सोडियम कार्बोनेटाच्या पाण्यात विरघळवितात व विरंजक विद्रावाचा उपयोग करून मिश्रण उकळतात आणि थंड झाल्यावर मेणाचा थर वेगळा करतात. या दोन पद्धतींनी काढलेल्या मेणाच्या गुणधर्मात थोडा फरक आढळतो.


या मेणामध्ये C26 ते C32 या मर्यादेतील मुक्त वसाम्ले १०–१४%, वसा अल्काहॉले, रेझिने व हायड्रोकार्बने सु. ४% आणि एस्टरे ८०–८२% असतात. त्यामध्ये C26 वसा अल्कोहॉलची C24 ते C26 वसाम्लांबरोबर झालेली सर्वांत जास्त सु. ७०% आणि C32 अल्कोहॉल व C32 वसाम्ल यांची १०–१२% असतात. हे मेण कठीण असून पृष्ठभागाला चकाकी देण्याचा गुण ह्याच्या अंगी आहे तथापि विद्रावक बद्ध करून ठेवण्याचा गुण फार थोडा असल्यामुळे हे मेण कार्नोबा मेणाला पर्याय म्हणून वापरता येत नाही. हे उत्तम विद्युत् निरोधक आहे. [⟶ लाख–१].

स्पर्म तेल : हे फायझिटर मॅक्रोसेफॅलस या देवमाशाच्या चरबीपासून आणि डोक्याच्या पोकळ्यांतील पदार्थांपासून मिळते. या तेलात मुख्यतः अतृप्त वसाम्ले व अल्कोहॉले याची एस्टरे असतात. या तेलाचा उपयोग विशेष प्रकारच्या वंगणासाठी मोठ्या प्रमाणावर होतो. स्पर्मासेटी मेण देवमाशाच्या डोक्यातील तेल थंड करून व निवळू देऊन मिळविण्यात येते. त्याचा उपयोग मलमे, मेणबत्त्या, सौंदर्यप्रसाधने इत्यादींत करतात.

सूक्ष्मजंतूंतील मेणे : घटसर्प, कुष्ठरोग व क्षय या रोगांच्या जंतूंच्या आवरणात मेणे असतात. ती वेगळी करून त्यांच्या संघटनाही ठरविण्यात आल्या आहेत. औद्योगिक दृष्ट्या ती महत्त्वाची नाहीत.

खनिज मेणे : खनिज तेल मेणे : ही कच्च्या खनिज तेलाचे परिष्करण [⟶ खनिज तेल] करण्याच्या प्रक्रियांमध्ये मिळतात. यांचे दोन प्रकार आहेत : (१) पॅराफीन मेणे व (२) सूक्ष्मस्फटिकी मेणे.

कच्च्या खनिज तेलाचे परिष्करण करताना निरनिराळ्या उकरबिंदूंचे जे अंश वेगळे काढतात त्यांतील वंगण तेल नावाच्या अंशापासून (३३८º– ४६८º से.) ही मेणे मिळतात.

पॅराफीन मेणांचे त्यांच्या वितळबिंदूनुसार वेगवेगळे प्रकार केले जातात. नेहमीच्या वापरण्यातील शुद्ध पॅराफीन मेण सु. ४८º– ५६º से. या तापमान मर्यादेत वितळते. या मेणात सूक्ष्म प्रमाणात (०·२% पेक्षा कमी) तेल असते. हे मेण कठीण असून रूचिहीन, गंधहीन व शुभ्र वर्णाचे असते. यांचे स्फटिक मोठे व सुस्पष्ट असतात. यामध्ये C20 ते C30 या मर्यादेतील शाखा नसलेल्या हायड्रोकार्बनांचा मुख्यतः भरणा असतो.

कोष्टक क्र. १. काही नैसर्गिक मेणांचे गुणधर्म 

मेणाचे नाव 

वितळबिंदू ० से.

विशिष्ट गुरूत्व 

मुक्त अम्ल मूल्य 

क्षारीय विच्छेदन 

मूल्य (साबणी- 

करण मूल्य) 

आयोडीन 

मूल्य 

१ 

२ 

३ 

४ 

५ 

६ 

कार्नोबा  

८०-८६

०·९९६-०·९९८ (२५से.)  

०·३-१·०

६९-९५

५-१४

कँडेलिल्ला  

६५-६९

०·९८२-०·९९३ (१५से.) 

११-१९

४६-६६

१५-३६

ऊस 

७२-७८

०·९६-०·९८(२५से.) 

२०-३०

१३०-१४५

२५-३५

घायपात  

८३-९०

१·००-१·०१०(१५से.) 

२५-३५

९०-९५

१५-२०

एस्पार्टो  

७२-७४

०·९८३-०·९८९ (२५ से.) 

२८-३३

६१·६-६९·४

८-१६

मधमाशी  

६२-६४

०·९६५ (२५से.) 

५-८

९०-१०२

५-९

लोकर 

३४-४२

०·९४१-०·९४५ (७१से.) 

१ पेक्षा कमी

९२-१०६

१८-३२

ओझोकेराइट 

७७-८४

०·९७-०·९८(१५से.) 

१४-१९

८५-९५

६-८

माँटन 

६५-८०

०·८५-०·९५ 

७·८-९·२

कार्नोबा  

७७-८४

१·०२ (१५से.) 

१५-२०

७०-८०


मेणबत्त्या, पॉलिशे, सौंदर्यप्रसाधने, औषधी मलमे त्याचप्रमाणे जलरोधक कागद व कापड बनविण्यासाठी, फळे व भाज्या यांवर आवरण देण्यासाठी आणि वंगणाकरिता यांचा उपयोग केला जातो.

वंगण तेल अंशातून पॅराफीन मेण काढून घेतल्यानंतर शिल्लक राहणाऱ्या भागाचे निर्वात ऊर्ध्वपातन केले म्हणजे सूक्ष्मस्फटिकी मेणे मिळतात. त्यांमध्ये शाखायुक्त हायड्रोकार्बने मोठ्या प्रमाणात व वलयी हायड्रोकार्बने काही प्रमाणात असतात. ही मेणे चिवट असून त्यांत कार्बनी विद्रावक बद्ध करणे आणि तसा टिकविणे हे गुणधर्म मोठ्या प्रमाणात आहेत. या मेणांचे स्फटिक सूक्ष्म व अस्पष्ट असतात.

ओझोकेराइट मेण : हे मेण खाणीतून काढतात. अमेरिका, रशिया, ऑस्ट्रिया, पोलंड, इराण व ग्रेट ब्रिटनमध्ये याच्या खाणी आहेत. खाणीतून काढलेले मेण उकळत्या पाण्याने वितळवून खडकाच्या कचऱ्यापासून वेगळे करतात. नंतर सल्फ्यूरिक अम्ल व विरंजक मृदा यांच्या क्रियेने फिक्क्या रंगाचे व शुभ्र रंगाचे हे प्रकार त्यापासून बनवितात. शुद्ध ओझोकेराइटाचा वितळबिंदू ७४º–७६º से. असतो.

या मेणामध्ये हायड्रोकार्बन वर्गाच्या वेगवेगळ्या तऱ्हेच्या संयुगांचे मिश्रण असते. त्यामध्ये C37 ते C53 या मर्यादेतील कार्बन अणूंची पार्श्वशाखा असलेली व पार्श्वशाकारहित संयुगे मुख्यत्वे असतात.

तेले व विद्रावक शोषण करण्याच्या गुण याच्या अंगी मोठ्या प्रमाणात आहे. अम्ले व क्षार यांचा यावर परिणाम होत नाही. सौंदर्यप्रसाधने, विलेपन रंग, व्हार्निशे, छपाईची शाई यांत तसेच कातडी माल, मोटारगाड्या व जमिनी यांसाठी पॉलिशे बनविण्याच्या कामी याचा उपयोग होतो.

माँटन मेण : लिग्नाइट व पीट [⟶ कोळसा, दगडी] यांमध्ये हे मेण १०–१८% असते. हे निष्कर्षण करून वेगळे करून शुद्ध करतात. या मेणात C24 ते C30 या मर्यादेतील वसा अल्कोहॉले व C20 ते C30 या मर्यादेतील वसाम्ले यांपासून बनलेली एस्टरे ४०% हायड्रॉक्सी वसाम्लांची एस्टरे १२–१४%, C23 ते C31 या मर्यादेतील सशाख कार्बन साखळी असलेली व विषम कार्बन अणुसंख्या असलेली मुक्त वसाम्ले १७%, रेझिने २०–२३% आणि कीटोने ३–६% असतात.

हे कठीण जातीचे मेण असून ह्याचा रंग गडद काळसर तांबडा असतो. ह्याच्या अंगी चकाकी देण्याचा गुणधर्म आहे. हे मेण शुद्ध करून वापरतात किंवा वापर रासायनिक विक्रिया करून रूपांतरित मेणे बनवितात. 

संश्लेषित व रूपांतरित मेणे : यांचे अनेक प्रकार आहेत.

एफ. टी. मेणे : फिशर-ट्रॉप्श या नावाने प्रसिद्ध असलेल्या संश्लेषित पेट्रोल तयार करण्याच्या कृतीत कार्बन मोनॉक्साइड व हायड्रोजन यांचे प्रमाण १ : १ ठेवले असता तयार होणाऱ्या मिश्रणात ९·६–१३·८% मेण असते. खनिज तेलाच्या परिष्करणात ज्याप्रमाणे मेणे वेगळी करतात त्याच तऱ्हेने या मिश्रणातून मेण काढून घेतात, त्याचा वितळबिंदू ५०º – ११५º से. असतो. त्याचे भागशः ऊर्ध्वपातन करून आणि स्फटिकीरणाने २º – ४º से. वितळबिंदू फरक असलेली मेणे वेगळी करतात.

पॉलिथीन मेणे: एथिलीन वायूचे सु. १२५º से. तापमानास व ५००–१,००० वातावरण दाब देऊन ऑक्सिजन किंवा बेंझॉइल पेरॉक्साइड या उत्प्रेरकाच्या (विक्रियेत स्वतः भाग न घेता तिच्या त्वरेत बदल करणाऱ्या पदार्थाच्या) उपस्थितीत बहुवारिकीकरण (लहान, साध्या रेणूच्या संयोगाने प्रचंड रेणूंची संयुगे तयार करण्याची क्रिया) केले असता २,००० ते १४,००० रेणुभार असलेल्या व C24 ते C150 अणुसंख्या असलेल्या पदार्थांचे मिश्रण मिळते. त्यांपैकी २,००० ते ५,००० या मर्यादेत रेणुभार असलेला भाग (वितळबिंदू ९५º–११०º से.) मेण या सदरात येतो.

कार्बोवॅक्स : एथिलीन ऑक्साइडापासून बनविलेल्या १,००० ते ५,००० रेणुभार असलेली पॉलिथिलीन ग्लायकॉले ‘कार्बोवॅक्स’ या व्यापारी नावाने विकली जातात. ही मेणे काही प्रमाणात पाण्यात विरघळतात, हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.


हेक्‌स्ट मेणे : ही मेणे पूर्वी गेरस्थोफेन मेणे व त्यापूर्वी आय. जी. मेणे या नावाने ओळखण्यात येत होती. माँटन मेणातील रेझीनयुक्त भाग कार्बनी विद्राकांनी काढून टाकल्यावर उरलेल्या भागाचे क्रोमिक व सल्फ्यूरिक अम्लांनी ऑक्सिडीकरण केल्याने जे मेण मिळते त्याला ‘हेक्स्ट एस.’ मेण म्हणतात. त्यामध्ये सु. ८५% वसाम्ले मुक्तरूपात असतात.

हे मेण व ब्युटिलीन ग्लायकॉल यांच्या विक्रियेने जे एस्टर मिळते त्यास चुन्याच्या निवळीने (कॅल्शियम हायड्रॉक्साइडाने) अंशतः जलीय विच्छेदन केले असता हेक्स्ट ओ. पी. हे मेण मिळते. पॉलिशे करण्यासाठी हे कार्नोबा मेणाच्या तोडीचे समजले जाते. हेक्स्ट एस. मेण व एथिलीन ग्लायकॉल यांच्यापासून जे एस्टर मिश्रण मिळते त्याला के. पी. मेण म्हणतात आणि हेक्स्ट एस. मेण, एथिलीन ग्लाकॉल व ब्युटिलीन ग्लायकॉल यांच्या मिश्रणापासून जे मिळते त्याला के. पी. एस. मेण म्हणतात. या मेणांचे गुणधर्म विविध असल्याने ती वेगवेगळ्या कामांसाठी वापरली जातात. कोष्टक क्र. २ मध्ये काही हेक्स्ट मेणांचे गुणधर्म दिले आहेत.

कोष्टक क्र. २ काही हेक्स्ट मेणांचे विशिष्ट गुणधर्म 

मेणाचा 

प्रकार 

रंग 

वितळबिंदू 

( से.) 

मुक्त-अम्ल मूल्य

क्षारीय 

मूल्य विच्छेदन मूल्य 

(साबणीकरण मूल्य) 

एस. 

पांढरा  

८०-८३ 

१४५-१६० 

१६५-१८५ 

ओ. पी. 

फिका पिवळा 

१०२-१०६ 

१०-१५ 

११०-१२५ 

के. पी. 

तांबूस पिवळा 

८०-८३ 

२०-३० 

१३५-१४५ 

के. पी. एस. 

पिवळसर 

८०-८३ 

२०-३० 

१३०-१५० 

एस्टर वर्गाची मेणे : तेले व विविध चरबी प्रकार यांपासून मिळणारी वसाम्ले व त्यांपासून बनविलेली वसा अल्कोहॉले यांच्या, तसेच इतर नैसर्गिक पदार्थांपासून मिळणारी हायड्रॉक्सी वसाम्ले व विविध संश्लेषित ग्लायकॉले यांच्या रासायनिक संयोगाने एस्टर जातीची मेणे मिळतात. ती कठीण मेणांच्या तोडीची नसली, तरी दुय्यम दर्जाची म्हणून कित्येक ठिकाणी उपयोगी पडतात. एरंडेल तेलाचे हायड्रोजनीकरण व जलीय विच्छेदन करून मिळणाऱ्या १२ हायड्रॉक्सी स्टिअरिक अम्लाचा उपयोग अशी मेणे करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो.

हायड्रोजनीकरणाने मिळणारी मेणे: असंतृप्त तेले व वसा यांचे हायड्रोजनीकरण केले असता त्यांचे वितळबिंदू वाढतात व ते पदार्थ मेणे या वर्गात येतात. एरंडेलापासून या पद्धतीने कॅस्टर मेण मिळते. याचा वितलबिंदू ८६ से. असून ते पिवळसर रंगाचे व गंधहीन असते. ते इतर मेणांशी मिसळते व विद्रावक बद्ध करू शकते त्यामुळे औद्योगिक दृष्ट्या ते महत्त्वाचे आहे.

कीटोन मेणे : काही कीटोनांच्या अंगी मेणांचे गुणधर्म असतात. अशी कीटोने उच्च वसाम्लांपासून उत्प्रेरकी क्रियांनी किंवा वसाम्ले व वलयी हायड्रोकार्बने यापासून ⇨ फ्रीडेल-क्राफ्ट्स विक्रियेने मिळतात. लॉरिक, पामिटिक व स्टिअरिक अम्लांपासून अनुक्रमे लॉरोन (वितळबिंदू ६६º – ६७º से.), पामिटोन (वितळबिंदू ७९º – ८०º से.) व स्टिअरोन (वितळबिंदू ८२º – ८४º से.) ही कीटोन मेणे मिळतात. पृष्ठभागास चकाकी देणे, विद्रावक टिकविणे व इतर मेणे एकरूप करण्यास मदत करणे हे गुण त्यांच्या अंगी आहेत.

याशिवाय वसाम्लांपासून बनविलेली अमाइडे, पॅराफीन मेणांचे क्लोरिनीकरण करून मिळविलेली संयुगे आणि थॅलिक ॲनहायड्राइड व कित्येक प्राथमिक अमाइने यांच्या संघननाने (द्रवीकरणाने) मिळणारी संयुगेही मेणे म्हणून वापरली जातात.

उपयोग: कागद, पुठ्ठे व कापड जलाभेद्य करण्यासाठी मेण वापरतात. पाणी व हवेतील बाष्प यांपासून बचाव व्हावा म्हणून वस्तूला गुंडाळण्यासाठी व पातळ पदार्थांकरिता पेट्या करण्यासाठी जलाभेद्य कागद, पुठ्ठे व कापड हे उपयोगी पडतात. यासाठी वापरावयाच्या मेणांच्या अंगी जलाभेद्यतेबरोबरच लवचीकपणाही असावा लागतो. अन्यथा मेणाचा थर मोडण्याची भीती असते. पॅराफीन व सूक्ष्म स्फटिकी मेणे याकामी उपयोगी पडतात. वितळलेल्या मेणाचा फवारा उडवून किंवा वितळलेल्या मेणात वस्तू बुडवून असा थर देता येतो. मेणाच्या रूळावरून दाब देऊन वस्तू फिरवून व नंतर दोन गरम केलेल्या रूळांमधून काढल्यानेही मेणाचा थर बसतो.


कातड्याच्या वस्तू, लाकडी सामान, जमिनीची फरशी, मोटारगाड्यांचे पृष्ठभाग इत्यादींचे संरक्षण व्हावे आणि चकाकी यावी यासाठी लागणाऱ्या पॉलिशांचे दोन प्रकार आहेत ते म्हणजे पायसरूप व कार्बनी विद्रावकातील जेलरूप. कार्नोबा, घायपात, हेक्‌स्ट ओ. पी., कँडेलिल्ला, माँटन, लाखेची मेणे, पॅराफीन व स्फटिकी मेणे यासाठी उपयोगी पडतात.

विद्युत् साधनसामग्रीमध्ये मेणे अनेक ठिकाणी लागतात. त्यासाठी पॅराफीन, सूक्ष्म रवाळ व पॉलिथीन मेणे, तसेच लाखेच्या मेणाचे झिंक स्टिअरेट व काही संश्लेषित रेझिने यांच्याशी केलेली मिश्रणे वापरली जातात. याशिवाय कार्बन कागद (कार्नोबा, पॅराफीन, सूक्ष्मस्फटिकी व पॉलिब्युटिलीन), मेणबत्त्या (पॅराफीन व मधमाश्यांचे मेण), छपाईची शाई (मधमाश्यांचे मेण, पॅराफीन व लोकरीचे मेण), सौंदर्यप्रसाधने (मधमाश्यांचे व लोकरीचे मेण आणि सेटिल अल्कोहॉल), चीज इ. खाद्यपदार्थांवर आवरण देण्यासाठी (पॅराफीन, सूक्ष्मस्फटिकी), औषधी मलमे (लोकरीचे मेण) याशिवाय रंगांच्या काड्या, रबर आणि प्लॅस्टिक यांच्या वस्तूंच्या उत्पादनात त्याचप्रमाणे दातांचे ठसे घेण्यासाठी व बाटल्या हवाबंद करण्यासाठी, विशेष प्रकारच्या वंगणामध्ये आणि प्रदर्शनातील मूर्तीसाठी मेणे वापरली जातात.

भारतीय उद्योग : भारतात फार पूर्वीपासून मधमाश्यांच्या मेणाचे उत्पादन केले जात आहे. १९५७ सालापासून भारत या मेणाची निर्यात करू लागला आहे. १९७९–८० मध्ये भारताने १९,१३२ किग्रॅ. (किंमत रु. ६ लक्ष) मधमाशीचे मेण अमेरिका, पूर्व जर्मनी, ब्रिटन, जपान, फ्रान्स, नेदर्लंड्स इ. देशांना निर्यात केले. अरब राष्ट्रे, अफगाणिस्तान, सिंगापूर व श्रीलंका हे देशही भारतीय मेण आयात करतात. मधमाशीचे मेण अजूनही अत्यल्प प्रमाणात आयात करण्यात येते. खनिज तेलाच्या परिष्करणास प्रारंभ झाल्यापासून पॅराफीन मेण भारतात तयार होऊ लागले आहे व या मेणाच्या बाबतीत भारत बराचसा स्वयंपूर्ण झालेला आहे. रावळगाव येथील साखर कारखान्याने १९६५ साली उसाच्या मेणाचे उत्पादन सुरू केले. १९७४–७५ मध्ये, २६,७७३ किग्रॅ. हा उत्पादनाचा उच्चांक होता, तथापि उत्पादन परवडत नसल्याने १९७७ मध्ये बंद करण्यात आले.

भारतात कार्नोबा व इतर वनस्पतीज मेणे, मधमाशीचे व इतर कीटकजन्य मेणे, लोकर मेण, स्पर्म तेल व सूक्ष्मस्फटिकी मेण आयात करण्यात येतात. १९७७–७८ मध्ये एकूण ८,३५,७७२ किग्रॅ. (किंमत– ७७,६४,५१२ रुपये) मेणे आयात करण्यात आली व त्यापैकी कार्नोबा मेणाची आयात ३,३४,६९९ किग्रॅ. (किंमत ४७,३५,७६८ रुपये) होती.

पहा : मेणाचा किडा.

संदर्भ : 1. Bennett, H. Industrial Waxes. 2 Vols., New York, 1956.

             2. C. S. I. R. The Wealth of India, Industrial Products, Part VI, New Delhi, 1965.

             3. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vols. I. Delhi, 1948.

             4. Warth, A. H. The Chemistry and Technology of Waxes, New York, 1956.

म्हसकर, व्यं. वा.