मेडलर : (इं. मेस्पिल लॅ. मेस्पिलस जर्मॅनिका पायरस जर्मॅनिका कुल-रोझेसी). फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] द्विदलिकित वर्गातील हा एक लहान अनेक शाखायुक्त व पानझडी वृक्ष मूळचा यूरोपातील व प. आशियातील आहे. रोमन काळापासून तो यूरोपात लागवडीत आहे. हल्ली यूरोपात याची लागवड बरीच पण त्यामानाने अमेरिकेत बरीच कमी आहे. हा सु. ३–४·५ मी. उंच वाढतो रानटी अवस्थेत त्यावर काटे असतात. पाने साधी, एका आड एक, फार लहान देठाची, दातेरी, लांबट व लवदार असतात फुले बिनदेठाची, मोठी पांढरी किंवा लालसर व एकेकटी असून आखूड फांद्यांच्या टोकांस मे-जूनमध्ये येतात. फळे छद्म (आभासी) प्रकारची, टोकास खाचदार व उघडी आणि पुष्पस्थलीने [⟶ फूल] वेढलेली असून त्यांतून अर्धगोलाकृती अष्ठिका (कठिण अंतःकवचाने वेढलेल्या बिया) बाहेर डोकावतात. फळाचा व्यास सु. २·५ सेंमी असून ते प्रथम कठीण परंतु दहिवरामुळे आणि नंतर थोड्या विश्रांतिकाळानंतर मऊ होते. अतिपक्व फळ खाद्य असते परंतु तत्पूर्वी ते जास्त आंबूस असते त्याचा मुंरबा घालतात. पक्व फळांपासून सायडर नावाचे मद्य बनवितात. याचे ‘डच’ व ‘नॉटिंगॅम’ प्रकार विशेष चांगले असतात. जायगँशिया (मोठ्या फळाचा) आणि ॲबोर्टिवा (बीजहीन) हे प्रकार लागवडीत आहेत.
जपानी मेडलर (एरिओबॉट्रिया जॅपोनिका) ही जाती गुलाब कुलातील पण भिन्न प्रजातीतील असून तिला ⇨ लोक्वॉट म्हणतात. मेडलरच्या लागवडीकरिता विशेष कौशल्य किंवा काळजीची जरूरी नसते. बियांपासून वा कलमांनी लागवड करतात. बी रुजण्यास साधारणपणे वर्षाचा अवधी लागतो.
संदर्भ : Bailey, L. H. The Standard Cyclopedia of Horticulture, Vol, II, New York, 1960.
परांडेकर, शं. आ.
“